Adivasi Culture
Bohada Dance
सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम घाट उतारावर राहणा-या लोकांचा लोकप्रिय
उत्सव म्हणजे बोहडा होय. साजशृंगार करून हे लोक मनपूर्वक नाचण्यासाठी, नाटक
खेळण्यासाठी यामध्ये सामील होतात.‘बोहडा’ हा आदिवासी लोकांचा नृत्यनाट्य प्रकार होय. बोहडयाची प्रथा खूपच जुनी आहे. निरनिराळे मुखवटे घालून वाजत-गाजत गावात मिरवणे हे या नृत्यनाट्य प्रकाराचे स्वरूप असते. पूर्वी शिका-याला अंगावर वाघाचे कातडे घालून किंवा गावदेवतांना माणसाच्या रुपात आणून नाचविण्याची प्रथा प्रचलित होती. आजही काही भागात हि प्रथा आपणास आढळून येते. उदा. वीराचे सोंग, सुपल्या, गांवठाण्या, कमळजा देवीची ताटी, डूक-या, बळीराम, बनाईबावरी, चंदन हिरा इत्यादी.
बोहडा नृत्य सादर करताना लोक तोंडाला साजेसे मुखवटे घालतात. आज आदिवासींच्या नाच-गाण्यांमध्ये हिंदू संस्कृतीतील काही प्रथाही आपणास दिसून येतात. काही पौराणिक मुखवटेही आदिवासींच्या जुन्या मुखवट्यांबरोबर नाचू लागले आहेत. यात नारद, वाल्याकोळी, राम-रावणाचे युद्ध, वाली-सुग्रीवाची लढाई, भीम-बकासुर युद्ध, दशरथ-श्रावण बाळाची कथा, राम-त्राटिका युद्ध इत्यादींचा उल्लेख करता येईल. पारंपारिक दैवतांचे व विविध देवदानवांचे मुखवटे घालून आदिवासी परंपरेच्या संगीत, गीत आणि नृत्य माध्यमातून या सोंगांनी कलाकारांसह सादर केलेले हे नृत्यनाट्य साकार होते. या नाट्यामध्ये धार्मिक कथासूत्र गुंफलेले असते. सत्याचा जय व असत्याचा पराजय याला विशेष स्थान देवून कथा मांडलेली असते.
आज आदिवासी समाजावर सभोवतालच्या परिस्थितीचा फार मोठा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. त्यामुळे जमीनदार, दुकानदार, पुढारी, पुढारलेला समाज, गावचा मास्तर ह्यांचीही सोंगे नाचविण्याचा अभिनव प्रकार बोहडा नृत्यात प्रचलित झाला आहे.
सातपाड्याचा साबण्या शेट, संत्यावाणी(मारवाडी), लगण्या बामण, तात्या पंतोजी, घुटयाचोर, पाड्याचा खोत, डूक-या पाटील हि पात्रे बोहडा नृत्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आपण आढळून येतात. पूर्वीच्या काळी दोन ते चार महिने बोहडा नाचला जाई. परंतु अलीकडच्या काळात सात-आठ दिवसांतच बोहाडे साजरे होवू लागले आहेत. बोहडे सामान्यपणे चैत्र पौर्णिमेला सुरु होतात व पावसाळयापर्यंत चालतात.
बोहडा हि नृत्य परंपरा तशी फार जुनी आहे. गेली सुमारे २०० वर्षे जोपासल्या गेलेल्या नृत्यपरंपरेतील हा नाच आहे. बोहड्यात सुमारे १०० मुखवटे असतात. प्रत्येकाचे वजन साधारणतः १ ते १० किलोपर्यंत असते. यात काही वजनदार व मोठे मुखवटे असतात. अहिरावण, महिरावण, दुंदुभी, वेताळ, नृसिंह हे मुखवटे वजनदार असतात. रात्ररात्र चाललेल्या या कार्यक्रमाचा शेवट अखेरच्या दिवशी सूर्योदयसमयी करतात.
0 comments :
Post a Comment