आदिवासी बोलीतील शब्द प्रमाण भाषेत प्रचलित होण्याची गरज….
प्रसंग १
वर्गात शिकवता शिकवता गुरुजींनी सहज प्रश्न केला…..,
“बगळ्याचा रंग कोणता असतो?”
जवळजवळ सगळ्यांचेच हात वर होतात. गुरुजी नेमकं माझ्यासारख्या खेडवळ, अशिक्षित कुटुंबातून आलेल्या मुलाला उभं करतात. तो चुणचुणीत मुलगा ऐटीत उभा राहतो आणि उत्तर देतो,
“ढवळा”
सर्वच्या सर्व वर्ग मोठमोठ्याने खिदळायला लागतो. मुलगा मात्र गोंधळात पडतो. कारण आपलं उत्तर बरोबर आहे याची त्याला शंभर टक्के खात्री असते. इतकंच काय वर्गातल्या कोणत्याच मुलाने न पाहिलेला बगळा त्याने जीवंत पाहिलेला असतो. तरी आपलं उत्तर कसं काय चुकतंय याचं कोडं त्याला पडतं.
“अरे मुर्खा, ढवळा नाही पांढरा म्हण.”
गुरुजी त्याला शाबासकी न देता खाली बसवतात. मुलगा हिरमुसून खाली बसतो. पण आपलं काय चुकलं याचं उत्तर त्याला शेवटपर्यंत मिळत नाही.
प्रसंग २
गुरुजी आदल्या दिवशी गैरहजर असलेल्या मुलांना उभे करतात आणि विचारतात,
“काय रे, काल का आला नव्हता ?”
मुलगा चाचरत उत्तर देतो ,
“गुर्जी, काल मला हिवताप आला होता.”
“अरे रताळ्या, हिवताप नाही थंडीताप म्हण.”
मुलगा काय म्हणणार? डॉक्टरने सुई दिल्यासारखा खाली बसतो.
‘ढवळा’ आणि ‘हिव’
हे दोन्ही शब्द ग्रामीण, आदिवासी बोलीतील आहेत आणि मराठी भाषेला इतके जवळचे असूनही ‘पांढर’पेशा वर्गाने ते अजूनही स्वीकारले नाहीत याचं आश्चर्य वाटतंय. आता दोन्ही शब्दांचे अर्थ आणि व्युत्पत्ती पाहू.
‘ढवळा’ हा शब्द पांढऱ्या शब्दाला प्रतिशब्द आहे. त्याची व्युत्पत्ती संस्कृतमधल्या ‘धवल’ या शब्दापासून होते. आणि पांढऱ्या शब्दाची व्युत्पत्ती ‘पंडुर ‘पासून होते. आश्चर्याची गोष्ट अशी की पंडुरपेक्षा धवल हा शब्द अधिक प्रचलित आहे. तरीही ढवळ्याला प्रतिष्ठा मिळत नाही . ‘ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला’ ही म्हण प्रत्येकाच्या परिचयाची आहे. खेड्यावर अनेकांची नावे ‘ढवळू’ ‘ढवळाबाई’ अशी असतात.
जी गत ‘ढवळा’ शब्दाची तीच ‘हिव’ शब्दाची. मला सांगा, मुख्य ऋतू कोणते? उन्हाळा पावसाळा आणि’ ‘हिवाळा’. बरोबर ना? हिवाळ्यात थंडी वाजते तरी आपण’ ‘थंडीळा’ असं म्हणत नाही. हिवाळाच म्हणतो. का? वैद्यकीय भाषेत ‘हिवताप’ हाच शब्द प्रचलित आहे. मग आपण ‘हिव’ शब्दाला मराठीत का समाविष्ट करत नाही? मराठीत असे अनेक शब्द आहेत जे केवळ बोलीभाषा ह्या एकाच निकषामुळे आपण बाद करतो. भाषेच्या समृद्धीसाठी बोलीभाषेतील अधिकाधिक शब्द प्रमाण भाषेत समाविष्ट व्हायला हवेत. चला, आपण बोलीभाषेतील असे वैशिष्ट्यपूर्ण शब्द शोधूया आणि त्यांच्या मुळापर्यंत जाऊया !
-संजय दोबाडे
©www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment