जव्हार परिसराला पूर्वी 'कोळवन' असे म्हटले जात होते. जव्हार संस्थानचा बहुतेक प्रदेश म्हणजे एक हजार फूट उंचीवरील सह्याद्रीचे पठार असून तो सर्वत्र टेकड्या, डोंगर आणि बारीकसारीक ओढे व नद्या यांनी व्यापलेला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने जव्हारच्या सौंदर्याला एक वेगळीच ओळख होती. जव्हार परिसरात पूर्वी साग, शिस, पळस, तिवस इत्यादी प्रकारचे महत्त्वपूर्ण वृक्ष होते. आजही सदर वृक्ष आपणास या परिसरात आढळून येतात. या जंगलात वाघ, चित्ते,अस्वले, तरस, खोकड, सांबर, कोळसुंदे इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणात होते. वारली, कातकरी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, कोकणा या आदिवासी जमातींची लोकसंख्या ही 80 ते 85 टक्के होती. तसेच कोळी व कुणबी या जातींची संख्याही काही प्रमाणात होती. डोंगराळ प्रदेश व रस्ते कमी असल्याने व्यापार फारसा विकसित झालेला नव्हता.
जव्हार संस्थान अंतर्गत असणाऱ्या पालघर परिसरात जव्हार संस्थानच्या स्थापनेपूर्वी विविध राजघराण्याचा वावर असल्याचे आपणास दिसून येते. यादव काळातील बिंब राजाची राजधानी माहीम येथे होती. बदामी चालुक्यांच्या काळात डहाणू बंदराजवळचा प्रदेश हा चारोदक म्हणून ओळखला जात होता. चारोदक हे प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र होते. तसेच हा प्रदेश व्यापार करण्यासाठी महत्त्वाचा खुष्कीचा मार्ग देखील होता. कोकणात मौर्य, सातवाहन, शक - क्षत्रप, अभिर त्रेकुटक, राष्ट्रकूट, यादव, बदामी चालुक्य इत्यादी राज वंशांची वंशावळ आढळते. डहाणू, पालघर, माहीम, वसई या भागात विविध राजसत्तांचा उदय झालेला असला तरी जव्हार परिसराकडे मात्र या सर्वांनी पूर्णपणे दुर्लक्ष्य केल्याचे दिसून येते.
जगामध्ये जव्हार हे एकमेव संस्थान असे होते की, ज्यामध्ये सलग 632 वर्षे एकाच कुटुंबाकडे राजसत्ता अबाधित राहिली आहे. इंग्लंड, रशिया, जर्मन, फ्रान्स किंवा कुठलीही राजसत्ता इतकी टिकल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे जगाच्या इतिहासात जव्हार संस्थानचे स्थान अभूतपूर्व असेच मानावे लागेल. एकाच राजवंशाची राजसत्ता असलेला जव्हार संस्थानचा इतिहास आश्चर्यकारक व अद्वितीय आहे.
इ.स.1280 च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील पोपेरेवाडी येथील जायबा पोपेरे इगतपुरी तालुक्यातील मुकणे या गावात स्थायिक झाला. त्या गावाच्या नावावरून त्याला 'मुकणे' हे आडनाव मिळाले.
जायबा मुकणे यांनी मुकणे या गावात स्वतःची गढी निर्माण केली व त्यातून तो परिसरातील लोकांचे न्यायनिवाड्याचे काम करत असे. जायबा यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून सदानंद महाराज यांनी त्यांना जव्हार परिसरात जाऊन स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा सल्ला दिला. सदानंद महाराज उर्फ भोजराज हे नाथपंथीय असल्याच्या नोंदी आढळतात. परकीय आक्रमणापासून आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी बंड केले होते. या भावनेतून त्यांनी जायबा मुकणे यांना आपले राज्य निर्माण करून येथील भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी प्रेरित केले होते.
जव्हार परिसरात प्रचंड जंगल होते. या घनदाट अरण्यातून घोड्यावरून प्रवास करणे, युद्ध करणे, किल्ले सर करणे, तसेच युध्दात धनुष्यबाण, भाले, कोयते, कुऱ्हाडी यांसारख्या पुरातन काळातील शास्त्रांच्या साह्याने खूपच अवघड होते. परंतु हे काम श्रीमंत जायबा राजे यांनी करून दाखवले. जायबा मुकणे यांनी अन्यायाविरुद्ध केलेल्या बंडाच्या उठावाच्या वेळी जी तलवार वापरली, त्या तलवारीस 'बंदी तलवार' असे म्हटले जाते. आजही त्या तलवारीची पूजा दसऱ्याच्यावेळी केली जाते.
सन 1286 ते 1292 च्या दरम्यान जायबा मुकणे यांनी गौरी राजाचा पराभव केला व कोकण ठाणे प्रांतावर ताबा मिळवला. प्रथम पेठ, धरमपुर ही गावे काबीज केली. जायबा आपल्या सोबत्यांसह सुरत व तापी खोऱ्यात सुमारे सात वर्षे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी गनिमी काव्याने यवनी सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. शाही खजिन्याची लूट करून त्यांनी धनसंचय व सैन्यबळ वाढवले. याच शौर्याच्या जोरावर प्राचिन काळी जायबाने मिळविलेल्या महादेव कोळ्यांच्या वास्तव्याचा प्रदेश म्हणून त्यास कोळवन असे म्हटले जात होते. जायबा मुकणे यांच्या राज्याभिषेकदिनी या भागाचे नाव बदलून 'जयहर' असे ठेवले.
जव्हार संस्थान उदयाला आले, त्या काळात खिलजी सुलतान सत्ता, तुघलक सुलतान सत्ता, बहामनी सत्ता, बिदरची बेबंदशाही, वऱ्हाडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, मोगल सुलतानाची सत्ता अशा यवनी सत्ता उदयाला आल्या. या सत्तांप्रमाणेच पोर्तुगीज, ब्रिटिश आणि पेशवाई अशा अनेक सत्ता उदयाला आल्या आणि अस्तालाही गेल्या. परंतु जव्हार संस्थान मात्र 632 वर्षे सलगपणे अस्तित्वात होते.
भुपतगडाचा सुभेदार सुंभाटे हा वारली या आदिवासी जमातीचा होता. त्याचा बुध्दीचातूर्याच्या खेळात पराभव करून जायबाने हा किल्ला जिंकला. कालांतराने सुभेदार सुंभाटे हा जायबा राजांना येऊन मिळाला. त्यानंतर त्याला गंभिरगडाची जहागिरी देण्यात आली.
सन 1316 मध्ये सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत जायबा मुकणे यांचा राज्याभिषेक माघ महिन्यातील शुद्ध बीजेला पार पडला. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जव्हार संस्थानचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. जव्हार संस्थानची राजमुद्रा धनुष्यबाण अशी होती. धनुष्यबाण हे आदिवासींचे प्रमुख पारंपरिक शस्त्र आहे. जायबा मुकणे यांना दोन मुले होती. त्यांची नावे धुळबाराव उर्फ नेमशहा व होळकरराव अशी होती. जायबा यांच्यानंतर नेमशहा हा जव्हारच्या गादीवर बसला.
दिल्लीच्या मुसलमान पातशहांस या डोंगराळ भागातील प्रदेश अनेकदा हल्ले करूनही जिंकता आला नाही. परकीय आक्रमणे रोखण्यात नेमशहा यशस्वी झाला होता. आपल्याला सदर प्रदेश जिंकता येत नाही याची जाणीव दिल्लीच्या पातशहास झाल्याने त्यांनी नेमशहास 7 जून 1343 रोजी 'शहा' हा किताब देऊन त्याच्या ताब्यात असलेला 22 किल्ले असलेला 9 लाख उत्पन्नाचा प्रदेश स्वतंत्रपणे तोडून दिला. दिल्लीच्या सत्तेने जव्हारचे राज्य मान्य केल्याचा हा महत्त्वाचा संकेत होता.
धुळबारावराजे यांच्यानंतर त्यांचा मुलगा भीमराव उर्फ भीमशहा हे जव्हारच्या गादीवर बसले. परंतु त्यांची कारकीर्द अल्पकाळ ठरली. त्यांच्यानंतर देवबाराव हे गादीवर बसले. त्यांनी आपल्या पराक्रमाने राज्याची हद्द अगदी बहामनी राज्यापर्यंत भिडवली. त्यामुळे बहामनी सुलतान जाफर याच्याशी वैर निर्माण झाले. त्यांच्यात नेहमीच चकमकी घडत असत. एका चकमकीत बेसावध असणाऱ्या देवबारावांना अटक करण्यात सुलतान जाफर यशस्वी झाला. देवबारावांना कर्नाटक राज्यातील कलबुर्ग्यास नेऊन डांबून ठेवले. तेथे त्यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली.
देवबाराव जसे पराक्रमी होते, तसेच ते देखणेही होते. जाफरच्या मुलीने देवबाराव राजांना पाहिल्यावर त्यांच्यावर ती लुब्ध झाली. तिच्या प्रेमापोटी जाफर याने देवबाराव राजांना सोडण्याची अनुमती दर्शवली. परंतु त्यासाठी त्यांना मुसलमान धर्म स्वीकारून आपल्या मुलीबरोबर लग्न करण्याची अट घातली. शेवटी आपला जीव वाचवून आपल्या राज्यात परत जाण्यासाठी देवबाराव राजे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला व जाफरच्या मुलीशी विवाह केला. त्यावेळी त्यांचे नामकरण महम्मदशहा असे करण्यात आले होते.
देवबाराव उर्फ महम्मदशहा यांच्या मनावर या घटनेचा फारच परिणाम झाला. यातूनच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. त्यांच्या या फकिरी वृत्तीमुळे जव्हारची गादी 'फकिरी गादी' म्हणून ओळखली जाऊ लागली. देवबाराव राजे यांच्या मृत्यनंतर देवबाराव राजे यांचा मुलगा मुसलमान असल्याने होळकरराव यांचा नातू कृष्णराज यास सरदारांनी देवबारावांचा दत्तकपुत्र म्हणून गादीवर बसवले व त्यांचे कृष्णशहा 1 असे नामकरण करण्यात आले.
जव्हार संस्थान उदयास आल्यानंतर होऊन गेलेले राजे व त्यांचा कार्यकाल समजून घेणे महत्त्वाचे आहे.
1) सन 1306–1343 - मूळ पुरुष जायबा मुकणे
2) सन 1343-1414 - नेमशहा उर्फ धुळबाराव मुकणे महाराज
3) सन 1414–1429 - भिमशहा उर्फ भीमराव मुकणे महाराज
4) सन 1429–1492 - मुहम्मदशहा उर्फ देवबाराव मुकणे
5) सन 1492-1560 - कृष्णशहा मुकणे महाराज ( पहिला )
6) सन 1560–1630 - देवबाराव/ नेमशहा मुकणे महाराज ( दुसरा )
7) सन 1630-1678 - विक्रमशहा मुकणे महाराज ( पहिला )
8) सन 1678-1717 - पतंगशहा मुकणे महाराज
9) सन 1717–1742- कृष्णशहा मुकणे महाराज ( दुसरा )
10) सन 1742–1758 - विक्रमशहा मुकणे महाराज ( दुसरा )
11) सन 1758-1765 - मालोजीराव / कृष्णशहा मुकणे महाराज ( तिसरा )
12) सन 1768-1798 - गंगाधरराव/ पतंगशहा मुकणे महाराज ( दुसरा)
13) सन 1798-1821 - हनुमंतराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( तिसरा )
14) सन 1821 - 1865 - गणपतराव / पतंगशहा मुकणे महाराज ( तिसरा )
15) सन 1865- 1865 - नारायणराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( चौथा )
16) सन 1865–1905 मल्हारराव / पतंगशहा मुकणे महाराज ( चौथा )
17) सन 1905 - 1917 - गणपतराव/ कृष्णशहा मुकणे महाराज ( चौथा )
18) सन 1917 - 1927 - मार्तंडराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( पाचवा )
19) सन 1927 -1948 - कॅप्टन यशवंतराव / पतंगशहा (पाचवा) मुकणे महाराज
मुघल पोर्तुगीज संघर्षात मुघलांचा पराभव होऊन तह झाला. त्यावेळी इ.स. 1559 मध्ये जव्हारवर पोर्तुगीजांनी आक्रमण केले. जव्हारकरांनी पोर्तुगिजांचा हा हल्ला निकराने मोडून काढला. सन 1600 मध्ये जव्हार संस्थानच्या राज्याची हद्द अहमदनगर पर्यंत होती. अहमदाबादचे सुलतान, ज्याच्याकडे उत्तर कोकणचा समुद्र किनारा होता, त्यांनी जव्हार संस्थान हस्तगत करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्यात तो कधीही यशस्वी झाला नाही. पोर्तगीज, इंग्रजांसारख्या परकीय शक्तींना रोखण्यासाठी संजाणजवळील झाई येथे जव्हारकरांनी स्वतःचे आरमार उभारले होते. पोर्तुगीज हे जव्हार संस्थानला चौथाई देत होते, यावरून जव्हारच्या शौर्याची कल्पना आपणास येते. दख्खन जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाच्या कालावधीत त्याची हद्द जव्हारच्या सीमेलगत होती. परंतु त्याने कधीही जव्हारवर हल्ला करण्याची हिम्मत केली नाही.
सतराव्या शतकात जव्हार संस्थानकडे माहुली किल्ला ते भिवंडी पर्यंतचा प्रांत होता. तसेच दमणजवळील तवर, वझे ( वासिंद) व उंबरगावजवळील दरीळे ही तीन प्रमुख शहरे जव्हारकरांच्या ताब्यात होती. सन 1668 च्या सुमारास जव्हार संस्थान व शिवाजी महाराज यांचे संबंध सलोख्याचे होते. सुरतेच्या स्वारीवर जाताना 31 डिसेंबर 1663 रोजी शिवाजी महाराज हे जव्हारजवळील शिरपामाळ येथे आले होते. त्यावेळी जव्हार नरेश पहिले विक्रमशहा यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सुरत लुटून राजगडाकडे परतताना कृतज्ञता म्हणून लुटीतील 17 लाखांचा ऐवज त्यांनी जव्हार संस्थांनाधिपतींना दिला होता. 18 ऑगस्ट 1666 मध्ये शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर जव्हारकरांकडील खाशा कोळ्यांचे शंभराचे घोडदळ त्यांच्या दिमतीला होते. या तुकडीचे नेतृत्व भगवानरावांनी केले होते. यामुळे जव्हारकरांची शान निश्चितच वाढली होती. सन 1672 मध्ये सुरतेच्या दुसऱ्या स्वारीच्यावेळी मात्र शिवाजी महाराज व जव्हारकर यांचे संबंध बिनसले होते. त्यातूनच मराठा सरदार मोरोपंत पिंगळे याने जव्हारवर हल्ला करून हा प्रदेश जिंकून घेतला. तत्कालीन जव्हारचा राजा विक्रमशहा आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या तावडीतून सुटून जाण्यात यशस्वी झाले. मोरोपंतांनी त्यावेळी जव्हारमधून 17 लाख रुपयांचा ऐवज लुटला व जव्हारचे उमदे घोडदळ आपल्या ताब्यात घेतले. यात महादेव कोळी जमातीच्या घोडेस्वारांचा भरणा अधिक होता. त्यांनी जव्हारकरांवर वर्षाला 1000 रुपयांचा सरदेशमुखी हा कर बसवला. जव्हारच्या तुटपुंज्या उत्पन्नात तेथील राज्यकारभार चालवणे मराठ्यांना जिकिरीचे वाटू लागले. त्यात फिरंगी, पोर्तुगीज, मोघल यांचा सामना करणेही अवघड होते. तसेच जव्हारचे तत्कालीन वंशजांनी धाराराव या महादेव कोळी नायकाच्या मदतीने जव्हारवरील आपली सत्ता परत मिळविण्यासाठी जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली. या सर्वांचा सामना करत येथे राज्यकारभार करणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावर मुकणे घराण्याकडे सदर संस्थानाची धुरा सोपवण्यात आली. नंतरच्या काळात तुटपुंजे उत्पन्न व त्यातून कसाबसा चालवावा लागणारा राज्यकारभार यामुळे जव्हारची सैनिकी ताकद काहीशी कमी झाली होती. त्यामुळे सततच्या लढाया न करता तह करून आपले राज्य व येथील जनता सुरक्षित राखण्याचा मुत्सद्दीपणा जव्हारकरांनी राबवला. याचाच एक भाग म्हणून जव्हारकर मराठ्यांचे मांडलिक बनले. परंतु यामुळे जव्हार संस्थानच्या ताब्यातील बराचसा प्रदेश मराठ्यांना द्यावा लागला. परिणामी जव्हारच्या ताब्यात थोडासाच प्रदेश शिल्लक राहिला.
मराठ्यांनंतर पेशव्यांनी देखील जव्हारवर अनेक आक्रमणे केली.जव्हारकरांना पूर्णपणे जिंकता न आल्याने पेशव्यांनी जव्हारकरांशी तह केला. याच तहाचा भाग म्हणून सरदेशमुखी व बाबती हे कर जव्हारकरांवर बसवले. तसेच दरवर्षी 1 हजार रुपयांचा नजराणा पेशव्यांना देणे निश्चित करण्यात आले.
सन 1826 मध्ये पेशव्यांकडून जव्हारची सत्ता हस्तगत करून ईस्ट इंडिया कंपनीने जव्हार संस्थानच्या तत्कालीन राजांबरोबर तह केला. असे असले तरी जव्हार संस्थानने 1857 च्या उठावात सक्रिय सहभाग घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारले होते.
श्रीमंत महाराज पतंगशहा यांच्या काळात जव्हार संस्थानच्या इतिहासात अनेक सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रम राबविण्याचे कार्य तत्कालीन राजांनी केले असल्याचे आपणास दिसून येते. जव्हारच्या कृष्ण विद्यालयाची इमारत 30 एप्रिल 1867 रोजी बांधली. जनतेच्या आरोग्यासाठी 1878 मध्ये मोफत दवाखाना सुरू केला. जव्हारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी उद्यानात सुर्य तलाव बांधला. सन 1879 मध्ये रयतेच्या भांडणतंट्यामध्ये न्याय मिळावा म्हणून न्यायालयाची स्थापना केली. जव्हार प्रांतात तीन न्यायालयांची व न्यायाधीशांची नेमणूक केली. सन 1881 मध्ये पतंगशहा कुटीर रुग्णालयाची पायाभरणी केली. स्वतंत्र संस्थानचे स्टॅम्प निर्माण केले. गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी 15 विहिरी बांधण्यात आल्या. घाट माथ्यावर दळणवळण वाढावे म्हणून जव्हार मोखाडा हा पक्का रस्ता तयार केला. शेतीत सुधारणा करण्यासाठी खावटी वाटप सुरू केले. प्रांतानुसार धारा वसुलीची पद्धत सुरू केली. न्याय क्षेत्रात दंडसहिता आणि कायदे तयार करण्यात आले. अशा प्रकारे जव्हार संस्थान ब्रिटिश काळातदेखील स्वाभिमानाने, सार्वभौमत्वाने काम करत होते.
सन 1905 मध्ये राज्याच्या गादीवर बसलेल्या कृष्णशहा ( चौथे ) यांनी आदिवासी मुलांसाठी मुलांचे वसतिगृह व मुलींसाठी कन्या वसतिगृह सुरू केले. 1 ऑक्टोबर 1907 मध्ये पोष्ट व तार खाते सुरू करण्यात आले. स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण होत असताना आदिवासींना मतदानाचा अधिकार देऊ नये असा अनेकांचा सुर होता. परंतु जव्हार संस्थानने नगरपरिषदेची स्थापना करून स्वातंत्र्यापूर्वीच अनेक वर्षे अगोदर आदिवासींना मतदानाचा अधिकार बहाल केला होता.
श्रीमंत महाराज यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर बऱ्याच सामाजिक व विकासात्मक सुधारणा झाल्या. त्यांना फ्लाईट लेफ्टनंटचा पहिला मान मिळाला. इंग्लंडचे बादशहा सहावे जॉर्ज यांनी हिज हायनेस हा बहुमानाचा किताब बहाल करून यशवंतराव महाराज यांचा गौरव केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दिनांक 10 जून 1948 मध्ये जव्हार संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. तेव्हा श्रीमंत महाराज यशवंतराव मुकणे हे गादीवर होते. जव्हार संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतरही यशवंतराव महाराज यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते.
- राजू ठोकळ | Aboriginal Voices
संदर्भ :
1)यशवंत, डॉ.गोपाळ रामा गवारी
2) जव्हार दर्शन, दयानंद मुकणे
3) जव्हार संस्कृतीची शोधयात्रा, डॉ.हेमंत बळवंत मुकणे
4) The History of Konkan
5) Jayaba, Maharaj Yaahwantrao Mukane
6) The History of Maratha
7) Peshwas State Diaries
8) Gazetteer of Thane
0 comments :
Post a Comment