जव्हार संस्थान संशोधनाची गरज...
जव्हार संस्थान, पालघर, डहाणू, वसई या संपूर्ण परिसराला फार मोठा प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच उत्सुकतेपोटी अनेक देशी विदेशी पर्यटक या भागात भेट द्यायला येतात. जव्हार संस्थान हे प्राचीन संस्थान असल्याने त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांच्या मनात असते. याच उत्सुकतेतून वैभव घोलप, जव्हार पर्यटन याने फोन केला आणि बराच वेळ जव्हारच्या वैभवशाली इतिहासावर गप्पा झाल्या. जव्हार नगरीला समृध्द असा ऐतिहासिक, नैसर्गिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जव्हारच्या लाल मातीने विविध कला गुण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण केलेली आहे. त्यामुळे साहजिकच जव्हारचा हा वारसा अभ्यासण्यासाठी, अनुभवण्यासाठी देश विदेशातील पर्यटक इकडे येऊ लागलेले आहेत. असं असताना या पर्यटकांना येथील ऐतिहासिक वारसा सांगताना मर्यादा पडतात ही सल आमच्या चर्चेतून बाहेर पडली आणि यावर दोघांचेही एकमत झाले. यावर काय करता येईल असा विचार करत असताना मी वैभवला काही पुस्तकांची नावे सांगितली. यामध्ये यशवंतराव मुकणे महाराज यांची जायबा कादंबरी, डॉ.गोपाळ गवारी यांची यशवंत, डॉ.हेमंत मुकणे यांचे जव्हार संस्कृतीची शोधयात्रा, दयानंद मुकणे यांचे जव्हार दर्शन इत्यादी पुस्तकांची नावे सांगितली. पुस्तकांची नावे ऐकून वैभवला बरे वाटले, पण तो म्हटला की पुस्तकांची नावे सांगून उपयोग नाही. हा इतिहास पुस्तकात किंवा जुन्या कागदपत्रांत बंदिस्त राहू नये. कारण येणाऱ्या पर्यटकांना तो आपण पुस्तकांची नावे सांगू शकत नाही. त्यामुळे हा इतिहास लोकांच्या अंगवळणी पडला पाहिजे यासाठी काही तरी केले पाहिजे. त्यासाठी सातत्याने यावर लिहिले पाहिजे. नवनवीन संशोधनात्मक माहिती लोकांसमोर आली पाहिजे यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे आणि ती गरज जव्हार पर्यटन हा आपला उपक्रम राबवत असताना वैभवला जाणवली.
जव्हार व एकूणच कोकणच्या इतिहासाचे संशोधन होणे ही अत्यंत गरजेची बाब आहे, कारण जव्हार संस्थानच्या राज्याचा उदय हा स्वातंत्र्यापूर्वी सहाशे वर्षांपूर्वी झालेला आहे. जव्हार हे संस्थान सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेले शहरवजा गाव आहे. आज जव्हार संस्थांनशी निगडित अनेक वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत, तर जय विलास राजवाडा हा काहीसा सुस्थितीत आहे. परंतु तेथेही इतिहासाची सविस्तर माहिती देणारे फलक अथवा गाईड नाही. परिणामी जुने दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना एवढ्याच आठवणी घेऊन लोकं जातात. वास्तव जर बघितले तर एकेकाळी जव्हार संस्थान व परिसर समृध्द होता. सांस्कृतिक सौंदर्य परमोच्च शिखरावर पोहचलेले होते. जव्हार तालुक्यात अश्मयुगीन हत्यारे व अवशेष सापडल्याने त्यादृष्टीने येथे संशोधनास प्रचंड वाव आहे.
जव्हार संस्थानच्या अंतर्गत असणाऱ्या डहाणू या शहराची प्राचीन ओळख सांगणारा शिलालेख नाशिकच्या पांडव लेण्यांमध्ये गौतमी सातकर्णी या राजाच्या शिलालेखात 'डहाणूका नगर' या नामोल्लेखाने सापडतो ही बाब येथे येणाऱ्या पर्यटकांना माहीत होणे किंवा त्यांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर बदामी चालुक्य राजवटीत पूर्व चारोदक विषय ( डहाणू बंदराला जोडून असलेला वन विभाग ) व पच्छिम चारोदक ( डहाणू बंदर परिसर ) विषय हे प्रशासन विभाग असल्याचे आढळून आलेले आहे. तत्कालीन काळात हे प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. सफाळे शब्दाची उत्पत्ती ' सफाऊ' या शब्दापासून झालेली असावी आणि त्याचा अर्थ चंदेरी सारखे सफेद रंगाचे चमकणारे मासे होय. या गावाच्या नावाचा उल्लेख कान्हेरी लेण्यांमध्ये असणाऱ्या शिलालेखात आढळतो.
यादव काळात बिंब राजाची राजधानी माहीम येथे होती. तेथे त्याने एक किल्ला देखील बांधल्याचा उल्लेख सापडतो. वाडा येथे बिंब राजाने राजमहाल बांधला होता. वाडा येथे जव्हारच्या राजांनी एक सरोवर निर्माण केले होते. ताम्रपटामध्ये दांडा या पालघर तालुक्यातील एका गावाचा उल्लेख आढळतो. मनोर या गावाचा देखील ताम्रपटात उल्लेख आढळतो. बदामी चालुक्याच्या काळात प्रशासक मंगलरस याने मनोरजवळ राजधानी स्थापन केली होती.
मौर्य, सातवाहन, शक - क्षत्रप, अभिर, त्रेकुटक, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इत्यादी राजवंश यांचा संबंध जव्हार संस्थानच्या निगडित असणाऱ्या कोकण विभागाला लाभलेला आहे. त्यामुळे याबाबत संशोधन होऊन येथील लोकांना सदर इतिहास माहीत होणे आवश्यक आहे.
इ. स. पूर्व 250 ते इ. स. 1500 या कालखंडात कोकणचा हा भाग श्रीमंत व वैभवशाली होता. कारण त्या काळात व्यापारी उलाढालीच्या मोठ्या बाजारपेठा कोकणात होत्या. सिंधू संस्कृतीचे पच्छिम आशियाशी असलेले व्यापारी संबंध मेसोपोटेमिया ( इराण व इराकचे प्राचीन नाव ) यांच्याशी होते. त्या काळात या भागातून मोठ्या प्रमाणात चंदनाच्या लाकडाची निर्यात होत असे. ग्रीक, रोमन साम्राज्याबरोबर देखील या भागाचे व्यापारी संबंध होते.
व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा खुष्कीचा मार्ग या संस्थानाच्या अंतर्गत डहाणूजवळ होता.
जव्हार, डहाणू व कोकणचे प्राचीन महत्त्व समजून घेत असताना जव्हार संस्थानचा इतिहास देखील माहीत करून घेणे आवश्यक आहे. जव्हार संस्थान व त्याचे महत्त्व सांगत असताना काही मौलिक घटनांचा उल्लेख होणे आवश्यक आहे. जव्हार संस्थानचे मूळ पुरुष जायबा मुकणे यांचे पूर्वीचे आडनाव पोपेरे असे होते. त्यांचे मूळगाव अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे आजही पोपेरे आडनावाचे आदिवासी बांधव राहतात. जायबा मुकणे यांनी देखील आपल्या राज्यकारभारासाठी आवश्यक असणारी आर्थिक गरज भागविण्यासाठी सुरत शहराची लूट केलेली होती. त्या काळात म्हणजेच सन 1294 ते 1300 या दरम्यान जव्हार परिसरात जायबाने आपल्या राज्याचा विस्तार आपल्या पराक्रमाच्या जोरावर वाढवला. त्या काळात जव्हार परिसरात घनदाट जंगल होते. या घनदाट जंगलातून घोड्यावरून प्रवास करणे, युद्ध करणे, किल्ले सर करणे हे अवघड होते. त्यात युद्धासाठी लागणारे धनुष्यबाण, भाले, कोयते, कुऱ्हाडी सोबत घेऊन प्रवास करणे अवघड होते. पण ते जायबा यांनी करून दाखवले. जायबा यांनी युध्दात वापरलेली बांडी तलवार अजूनही ती राजघराण्याकडे आहे.
जव्हार संस्थान उदयास आल्यानंतर होऊन गेलेले 19 राजे व त्यांचा कार्यकाल समजून घेणे महत्त्वाचे आहे. यात प्रामुख्याने
सन 1306–1343 - मूळ पुरुष जायबा मुकणे
सन 1343-1414 - नेमशहा उर्फ धुळबाराव मुकणे महाराज
सन 1414–1429 - भिमशहा उर्फ भीमराव मुकणे महाराज
सन 1429–1492 - मुहम्मदशहा उर्फ देवबाराव मुकणे
सन 1492-1560 - कृष्णशहा मुकणे महाराज ( पहिला )
सन 1560–1630 - देवबाराव/ नेमशहा मुकणे महाराज ( दुसरा )
सन 1630-1678 - विक्रमशहा मुकणे महाराज ( पहिला )
सन 1678-1717 - पतंगशहा मुकणे महाराज
सन 1717–1742- कृष्णशहा मुकणे महाराज ( दुसरा )
सन 1742–1758 - विक्रमशहा मुकणे महाराज ( दुसरा )
सन 1758-1765 - मालोजीराव / कृष्णशहा मुकणे महाराज ( तिसरा )
सन 1768-1798 - गंगाधरराव/ पतंगशहा मुकणे महाराज ( दुसरा)
सन 1798-1821 - हनुमंतराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( तिसरा )
सन 1821 - 1865 - गणपतराव / पतंगशहा मुकणे महाराज ( तिसरा )
सन 1865- 1865 - नारायणराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( चौथा )
सन 1865–1905 मल्हारराव / पतंगशहा मुकणे महाराज ( चौथा )
सन 1905 - 1917 - गणपतराव/ कृष्णशहा मुकणे महाराज ( चौथा )
सन 1917 - 1927 - मार्तंडराव / विक्रमशहा मुकणे महाराज ( पाचवा )
सन 1927 -1948 - कॅप्टन यशवंतराव / पतंगशहा (पाचवा) मुकणे महाराज
वरील यादीतील काही राजांच्या पराक्रमाच्या लिखित नोंदी वाचायला मिळतात. परंतु सविस्तर इतिहास समोर आलेला नाही. त्यामुळे याबाबत संशोधनास वाव आहे.
भारतातील पहिल्या सर्कशीची सुरुवात करणारे विष्णुपंत छत्रे हे काही काळ जव्हार संस्थानात घोडदळ सांभाळण्याचे काम करत होते. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी या संस्थांनशी निगडित आहेत. त्या उजेडात आल्या, तर इथल्या लाल मातीत स्वाभिमानाची फुंकर मारण्याचे काम होईल. जव्हार संस्थानचा कार्यकाळ हा 600 वर्षांच्या पुढे असल्याने तो असा संक्षिप्त सांगणे किंवा मांडणे अवघड आहे. परंतु त्यातील प्रमुख घडामोडी आपणास माहीत असणे आवश्यक आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला उत्तर कोकणचा बराच भाग हा जव्हारच्या महादेव कोळी राजांच्या अधिपत्याखाली होता. जव्हारची राजसत्ता सलग 632 वर्षे एकाच कुटुंबाकडे राहिली ही ऐतिहासिक बाब आहे. इंग्लंड, रशिया, जर्मन, फ्रान्स किंवा जगात इतर कुठेही 180 वर्षांपेक्षा अधिक काळ राजसत्ता एका कुटुंबाकडे टिकलेली नाही.
जव्हार संस्थानच्या एकूण कार्यकाळात 19 राजांचा कार्यकाळ समाविष्ट आहे. त्यात अनेक घडामोडींचा समावेश आहे. त्यातील अनेक बाबी आजही प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. भविष्यात त्यावर संशोधन होऊन तो इतिहास समाजासमोर येणे आवश्यक आहे.
जव्हार संस्थानचे मोघल, मराठा, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी संबंध होते. असे असले तरी वेळ आल्यावर सर्वांशी युद्ध केल्याचे देखील पुरावे आहेत. सन 1739 मध्ये चिमाजी आप्पा यांच्या मागणीनुसार जव्हारचे राजे कृष्णशहा मुकणे तृतीय यांनी आपले सैन्य वसईच्या मोहिमेत सहभागी केले. कोहोज गडावरील तोफा तसेच शिधासामग्री देखील मराठ्यांना पाठवले. जव्हारकर यांच्या तर्फे सरदार भगवानराव यांनी वसईच्या युद्धात नेतृत्व केले आणि अशेरी, तांदूळवाडी, टकमक किल्ले जिंकून देण्यास मदत केली.
जव्हार संस्थानमधील महिला देखील पराक्रमी होत्या. राजघराण्यातील महाराणी मोहनाबाई ते शेवटच्या महाराणी प्रियवंदा ह्या अत्यंत मर्दानी, मुत्सद्दी, विवेकशील, कर्तव्यकठोर आणि विचारवंत होत्या. बऱ्याचवेळा राजा दिवंगत झाल्यावर दत्तक घेतलेल्या मुलाच्या किंवा स्वतःच्या मुलाच्या अज्ञानपणाच्या काळात या राण्यांनी सांभाळलेले राज्य मोठे कौतुकास्पद आहे. त्यांचा राज्यकारभार हा रयतेच्याप्रती असलेल्या कारुण्याने आणि प्रचंड जाणिवेने, सुप्रशासनाने भरलेला होता.
प्राचीन काळापासून येथील भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण, भूसंपदा, जंगले, प्राणी, सरोवरे, धबधबे, नद्या, तसेच मानव समूहाची वस्ती विशेषकरून आदिवासी बांधवांची वस्ती, त्यांची जीवनशैली, कला, नृत्य आणि संगीत इत्यादींचा आविष्कार व नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंगत राहणीमान हे समजून घेणे आवश्यक आहे.
मूळ पुरुष जायबा मुकणे ते कॅप्टन यशवंतराव मुकणे महाराज हा वारसा जव्हारकरांना माहीत होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी याबाबत सतत संशोधन होणे गरजेचे आहे. कधीकाळी श्रीमंत असणारा हा भाग आज बेरोजगारी, कुपोषण, दुष्काळ अशा विविध कारणांनी संघर्ष करत आहे. त्यांना जर येथील मातीत रुजलेला इतिहास अंगीकृत झाला, तर कदाचित या मातीतून येथील समस्या व विकास याबाबत भाष्य करणारे नेतृत्व उदयास येईल.
राजू ठोकळ
- संदर्भ
1) यशवंत, डॉ.गोपाळ रामा गवारी
2) जव्हार दर्शन, दयानंद मुकणे
3) जव्हार संस्कृतीची शोधयात्रा, डॉ.हेमंत बळवंत मुकणे
4) The History of Konkan
5) Jayaba, Maharaj Yaahwantrao Mukane
6) The History of Maratha
महादेव कोळ्यांचा जाज्वल्य इतिहास... आज जगासमोर येणे काळाची गरज आहे.
ReplyDelete