नाळ...

                                नाळ...

 


                  पूर्वेकडून सूर्य उगवायच्या आत गावातली पाच दहा माणसं व लक्ष्मी आय यांच्यासोबत किसन लांडे राजूरच्या दिशेने पायी चालत निघाला होता. कालच त्याने राजूरच्या बाजारातून नवीन आणलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे इतरांपेक्षा तो जरा उठून दिसत होता. तासाभराची पायपीट करत ते राजूरच्या मोटारआड्यावर पोहचले. साकीरवाडी गावाला जाणारी सकाळी ९ ची एस.टी. फलाटावर लागली होती. सगळे घाईनेच आपापले सीट पकडून गाडीत बसले. निळवंडे धरणाच्या कामावर जाऊन साचवलेल्या पैशातून त्याने सगळ्यांचे तिकीट काढले. किसनला फक्त आपल्याला साकीरवाडी गावाला जायचे आहे इतकेच माहित होते. तिथे गेल्यावर कोणाच्या घरी जायचे याची कल्पना त्याला नव्हती. एस.टी.चा कंडक्टर जोरात ओरडला, “साकीरवाडीला उतरणा-यांनी लवकर पुढे या.” त्याचा आवाज ऐकताच किसन पटकन आपल्या सीटवरून उठला व दरवाजाच्या दिशेने चालत पुढे आला. त्याच्याबरोबर इतरही माणसं उठली व पुढे आली. गाडी थांबली. सगळे पटकन उतरायला लागले. उतरता उतरता महाद्या काका किसनला म्हणाले,

      “आरं पोरा इथं कोणाच्या घरी जायाचाय?”

      किसनने महाद्या काकांना काहीच उत्तर दिले नाही. फक्त गालातल्या गालात हसला.

 

      एस.टी.तून खाली उतरल्यावर सगळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या  झाडाखाली थांबले. तेवढ्यात किसनचा मामा लांबूनच हाक मारत त्यांच्याजवळ आला. किसनचा मामा खडकीचा, पण शेती आणि मॉलमजुरी करण्यातून वेळ मिळत नसल्याने तो पिम्परकणे येथे तसा कमीच यायचा. चार दिवसापूर्वीच तो किसनला पोर पहायला जायचे आहे म्हणून सांगायला आला होता. पण पोर कोणाची हे विचारायची हिम्मत किसनने केली नव्हती. किसनची आई व वडील वारल्यापासून शिक्षणाचा खर्च तसा याच कुंडलिक मामाने केला होता. किसनने बी.एड. केल्यावर आता नोकरी लागल्यावर लग्न करावे असे गावातल्या लोकांना वाटत होते. पण किसन एकटाच असल्याने त्याच्या लग्नाची घाई मामाने केली होती. किसनला लग्न करायचे आहे कि नाही याचे मत तसे कोणी विचारात घेतले नव्हतेच.

 

      कुंडलिक मामाच्या मागे चालत चालत सर्व एका कौलारू घराच्या अंगणात आले. पाहुणे येणार असल्याचा निरोप त्यांना अगोदरच असल्याने घरातील सर्व स्वागताला अंगणात आले होते. पाहुण्यांची ओळख पाळख झाल्यावर घोंगडीवर बसायला सांगितले. सर्व बसत नाहीत तोच पाणी घेऊन एक सुंदर व गोरीपान पोरगी काहीसी लाजत आली. पोरीच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिम्मत किसनची नव्हती. हा एका कोपऱ्यात खाली मान घालून बसला होता. त्याने फक्त तिच्या हातातला तांब्या बघितला. बाकी वर नजर करून बघायची इतक्या माणसात हिम्मत केली नाही.

 

      कुंडलिक मामा, महाद्या काका, लक्ष्मी आय व सोबत आलेले सर्व इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात रमून गेले. या गप्पा जवळपास अर्धा तास चालल्या. घरातून बाई माणसाचा आवाज आला,

      “अहो पाहुण्यांना जेऊ घालणार आहात कि नाहीत....फार लांबून आलेत त्ये...”

      यावर सगळे हसायला लागले. नाथू भांगरा म्हणजे गावातले एक प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व... त्यांच्या दारात आलेला माणूस असा जेवल्याबिगर कधीही जात नाही. नाथूने आवाज दिला, “अगं राधे मी यांना असं कसं जाऊ देईल व्हय... बिगर दोन घास खाल्याचं”

      नाथूने आपल्या गप्पांना आवर घालत सर्वांना जेऊन घेण्याची विनंती केली. जेवता जेवताही गप्पांची मैफिल पुन्हा रंगात आली होती.  

 

      सर्वांचे जेवण झाले. सर्वांना पानसुपारी दिली गेली. किसन अजूनही तसा गप्पच होता. नाथू भांगरा आपल्या हातातल्या आडकित्त्यात कात सुपारी कापू लागला. तसा किसनला त्या आडकित्त्यात आपली मान अडकलीय कि काय असा भास झाला. तो आपल्या मामाला म्हणाला,

      “मामा लै उशीर झालाय, आता निघाया पाह्यजे.”

      “अरे हो रे...जायचंय...पण ज्या कामाला आलोय, त्ये तर बाजूलाच राहिलं..”

      नाथू तिकडून बोलला, “प्वॉर काय करतंय?”

      “बी.एड.झालंय,” कुंडलिक मामा उत्तरला.

      “प्वॉराचे आई बाप?”

      “त्ये तर कधीच देवाघरी गेल्येत...याला म्याच शिकावला...”

      मामाचे वाक्य कानावर पडताच किसनच्या मनात धस्स झालं...पण काहीच बोलला नाही.

      “काम धंद्याचे काय?”

      “चार पाच ठिकाणी अर्ज केलेत...त्यातला एखादा तरी कॉल येया पहिज्ये”

      “घरा बिराचं कसं काय?”

      “अहो पिंपरकण्यात लै मोठा घर हाय...त्याच्या आय बापानं आधीच बांधून ठिवलाय. तुम्ही त्याची काळजी करू नका..तुमची पोर राज्य करील असं सगळं हाय” महाद्या काका बोलले.

      “तुमची पोर श्यात करणार आसल तर त्ये बी चिक्कार हाय...” लक्ष्मी आयनं पुढचं बोलून टाकलं.

      “बरं त्ये देण्या-घेण्याचं कसं करायचं?”

      “आम्हाला काही नको...फक्त तुमची पोर द्या.” कुंडलिक मामा बोलला.

      “माना-पानाचं जाऊ द्या.... पर त्ये गावाच्या रितीप्रमाणं द्याज काय द्येनार त्ये सांगा..” नाथू बोलला.

      “अहो पाव्हणं प्वॉर आमचं एकटं...ना माय ना बाप....त्ये काय द्येणार....तुम्हीच सांगा झेपंल असं काही तरी...” महाद्या काका वडीलकीच्या नात्याने बोलले.

      “प्वॉताभर तांदूळ द्या...बाकी काही नको...तुम्ही आमचीच माणसा..पण रीत राखाया पहिज्ये म्हणून...”

      “दिला....रीतीप्रमाणं प्वॉताभर तांदूळ मी मह्या घरून देईल.”

 

      सगळी बोलणी झाली. कुंडलिक मामाने सर्वांना गाडीत बसवून दिले आणि तो त्याच्या रस्त्याने निघून गेला. सर्व राजुरात उतरल्यावर किसनला पोर तुला आवडली का म्हणून विचारू लागले. किसन बिच्चारा आपला गालातल्या गालात हसत पायी चालत सर्वांच्या पुढे निघाला होता. आपलं लग्न जमलंय हि कल्पनाच त्याला आता हळू चालू देत नव्हती.

 

      देवकी आणि किसनच्या लग्नाची नाथू भांग-याने मोठी जय्यत तयारी केली होती. शिकलेला जावई मिळाला म्हणून तो मिशीला ताव मारत सर्वांची विचारपूस करत होता. लग्नात जेवण, मान पान सगळं झाल्यावर व-हाड निघालं. सर्वांनी आपल्या बैलगाड्या जोडल्या. नवरा - नवरीची गाडी सजलेली होती. गाणी म्हणत म्हणत सर्व साकीरवाडीच्या घाटातून निघाले.

 

      राजुरामधून गाड्या उताराला लागल्या होत्या. लग्नाच्या गाण्यांचा आवाज राजूरच्या पेठेने ऐकला होता. आता प्रवरा नदी ओलांडून गाड्या धुराळा उडवत पिंपरकणे गावाच्या जवळ आल्या होत्या. पिंपरकणे गाव देवकी दुरूनच न्याहाळत होती. सगळीकडे चार पाचशे कौलांची घरे जणू काही आपल्याच स्वागताला सजलेत असे तिला वाटत होते. सर्वांच्या गाड्या देवळासमोर आल्या, तेव्हा सूर्य मावळतीला गेला होता. आकाशात सोनेरी किरणांनी जणू नवीन जोडप्यांच्या स्वागताला रांगोळी काढली होती. देवळात नवरा नवरीला बसायला आदिवासी रितीप्रमाणे घोंगडी अंथरली होती. किसनच्या घरात कोणी नव्हते, पण सारा गाव त्याला आपलं मानत होता. त्यामुळे सगळेच देवळात जमले होते. कोणी नाव घ्या म्हणून हट्ट धरत होते, तर कोणी कसं वाटलं आमचं गाव म्हणून देवकीला विचारत होते.

 

      लगीन होऊन महिना उलटून गेला होता. आता नियमितपणे विचारपूस करणारे तसे कोणी किसन व देवकीच्या घराकडे फिरकत नव्हते. देवकीची सर्व मूळ झाल्याने ती आता आपल्या संसारात रमली होती. आपली शेती करत किसन नोकरीसाठी मुलाखती द्यायला शहरात जात होता. किसन मुलाखतीला गेल्यावर नाचणी, वरईची व इतर राबाची कामं तिच करत होती. घरात जरी दोघंच असली, तरी ती भाताच्या आवणीसाठी आजूबाजूंच्या शेतात इर्जुकीला जात होती. जोवर नोकरी लागत नाही, तोवर आपण चार पाच गुरं पाळायला काय हरकत आहे म्हणून देवकी किसनकडे हट्ट करत होती. किसनने देवकीचे ऐकत आपल्या मामाच्या गावाला जाऊन काही गायी आणल्या. कधी किसन तर कधी देवकी त्या गायी  चरायला रानात नेत असत. लग्न होऊन एक वर्ष कसं संपलं हे किसन व देवकीला समजलंच नाही.

      “अहो मी मह्या आयबापाकडे जाऊन येत्ये” गव-यांचा कलवड रचता रचता ती किसनला बोलली.”

      “का गं असं अचानक?”

      “अहो या वर्षी म्हणे निळवंडे धरणात पाणी धरणार हायेत...मग आपला राजुरा जायाचा रस्ता बंद व्हईल... मग आपल्याला काय लागल त्या आणता येणार नै.”

      “थांब दोन चार दिसानं आपली कामा उराकली का जा..”

      “तुमचं तर प्रत्येक टायमाला आसंच असतंय...कधी मला येळ्येवं मह्या माह्येराला जाऊ देत नै.”

      “जा बाय जा तुला जव्हा वाटल तव्हा.”

 

      दुसऱ्या दिवशी देवकीने लवकरच उठून किसनच्या वाट्याच्या दोन भाकरी थाबुन व आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी काही भाकरी थाबुन घेतल्या. गुरांना चारा पाणी करून ती चालतच राजूरच्या दिशेने निघाली. चार दोन दिवस राहून ती पुन्हा आपल्या घरी आली. येताना आपल्याला लागणारे मीठ, मिरची व इतर घरातील जिनसा घेऊन आली होती. त्यामुळे तिच्याकडे असणारे सगळे पैसे संपले होते.

 

      पाऊस सुरु झाला तसे नदीत पाणी भरायला सुरुवात झाली. पिंपरकणे येथून राजूरला जाणारा रस्ता बंद झाला. एखाद्याला राजूरला जायचे असेल तर त्याला वाकीमार्गे वळसा घालून जावे लागणार होते. त्यासाठी लागणारे तिकिटाचे पैसे अधिकचे आता खर्च होणार होते. पहिल्यांदाच नदीत पाणी साठले असल्याने होड्यांची सोय देखील नव्हती. त्यात गणा लांडे याला कोणाकडून तरी एक लहानशी होडी मिळाली होती. पण त्यात फक्त तीन चार माणसे बसू शकत होती. त्यात पाऊस पडत असल्यावर ती होडी चालवण्याची हिम्मत गणा करत नव्हता.

 

      एके दिवशी कोंबडा आरवला तसा देवकी आपली गोधडी आवरून घाईत उठली. सगळीकडे अजूनही काळोखच होता. अंधाराला तिने तसं मित्रच मानलं होतं. कारण पावसाळा म्हटला कि विजेचा लपंडाव हा नित्याचाच. त्यामुळे पिम्परकणे येथे आल्यापासून तिचा दिवस सूर्य पूर्वेकडून उगवायच्या आत अंधारात सुरु होत असे. रोज सकाळी गावाला जाग यायच्या आत ती आपली हातातली कामे उरकण्याचा प्रयत्न करत होती. पडवीतल्या जनावरांना चारा टाकण्याच्या अगोदर शेण उचलण्यासाठी ती तिकडे जायला निघाली. पण अचानक तिच्या पोटात कळ मारून आली. डोक्यावरचा पदर कंबरेला करकचून बांधला व ती तशीच कामाला लागली. बाहेर थोडा थोडा पाऊस पडत असल्याने डोक्यावर शेणाची पाटी घेऊन उकिरड्यावर जात असताना शेणाचे ओघळ पावसाच्या पाण्याबरोबर तिच्या तोंडावरून खाली ओघळत आले होते. शेणाचा गालावरून खाली आलेला ओघळ एका हाताने पुसत तिच्या मनात विचार आला कि आज आपण तपासणी करायला डॉक्टरकडे गेले पाहिजे. कारणही तसेच होते. कारण पोटातल्या कळा आज तिला जरा वेगळाच संकेत देत होत्या. हातातली कामे उरकत असताना पूर्वेकडून सूर्य उगवून आला होता. सूर्याचे दर्शन होताच तिच्या मनात धस्स झालं होतं....सूर्य उगवला म्हणजे देवगाव, वाकी मार्गे राजूरला जाणारी बस आता निघून गेली असेल. आता दवाखान्यात कसं जायच्या या चिंतेत तिच्या पोटातील कळ अधिकच जोर करत होती. तिला होणाऱ्या वेदना समजून घ्यायला अजून किसन  झोपेतून उठला नव्हता.

 

      रात्रभर पडलेल्या पावसाने अंगणात चिखल झाला होता. हातात खराटा घेऊन ती अंगणात झाडू मारण्यासाठी पुढे झाली, तितक्यात तिला रस्त्यावरून जाताना महाद्या काका दिसले. तसे त्यांना लाडाने सारा गाव महाद्या काका अशीच हाक मारायचे.  

      “काका राजुरा जाणारी इस्टी गेली का हो?” देवकीने त्यांना हाक मारून विचारले.

      “का गं बाय....आज त्या इस्टीचा काय काम काढला?”    

      “काय नाय काका आसंच इच्चारलं...” ती हळूच पुटपुटली.

      “ती मढं उकरी कव्हाच गेली... आता तर ती देवगावात पोहचली आसल..”

 

      महाद्या काकांचे इस्टी गेली असल्याचे शब्द कानावर पडताच ती जणू आपल्यावर डोंगर कोसळला कि काय म्हणून खाली बसली. अचानक खाली बसल्याने तिच्या पोटात अधिक दुखू लागले. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तिच्या पोटात असे दुखत असल्याने ती कोणाला काही सांगायला तयार नव्हती. किसन सोडता घरात तसं दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे आपलं दुखणं पोटातल्या पोटात गिळून ती काम करत होती. आता तिला माहित होतं कि एस टी गेली म्हणजे आपण राजुरला दवाखान्यात जाऊ शकत नाही. खाजगी गाडीने राजूरला जाण्याइतके पैसे आपल्या नवऱ्याकडे नाहीत याची तिला जाणीव होती.

 

      देवकीचा नवरा, किसन शिकलेला होता, पण राजूरच्या पोष्टात आलेले त्याचे नोकरीचे पत्र त्याला वेळेत न पोहचल्याने त्याला नोकरी लागू शकली नव्हती. राजूर आणि पिम्परकणे हे अंतर अवघ्या एका तासाचे पायी चालत जाण्याचे असले, तरी निळवंडे धरणाचे पाणी अडवायला सुरुवात केल्यापासून हे अंतर वाढले होते. त्यामुळे राजूरच्या पोष्टात आलेली पत्रे पिम्परकणे येथे पोहचायला अनेकदा महिना लागू लागला होता. आता तर किसनचे राजूरला जाणे बंद झाल्याने नोकरीसाठी कुठे अर्ज करणेही बंद झाले होते. त्यात लग्न झाल्याने त्याला घरातील जबाबदारी पार पाडावी लागत होती.

 

      बाहेर रिमझिम पावसासोबत आता रात्रभर गायब असलेले वादळ पुन्हा गावकुसाच्या आसऱ्याला घोंगावू लागले होते. सकाळी दर्शन दिलेला सुर्यनारायण आता ढगांच्या आड गायब झाला होता. बाहेरच्या वादळाने चुलीचा धूर काही बाहेर पडायचे नाव घेत नव्हता. देवकीने आता भाकरी थापायला सुरुवात केली होती. ओल्या लाकडांचा धूर तिच्या डोळ्यांची आगआग करत होता. त्यात पोटातली कळ अधूनमधून त्रास देत होती. धुराशी दोन हात करत तिने तव्यावर भाकर टाकली. ताम्ब्यातलं थोडं पाणी हातावर घेऊन तिनं तव्यावरच्या भाकरीवरून हात फिरवला व दुसरी भाकर थापायला लागली. दुसरी भाकर थापून झाल्यावर तिनं चुलीतली लाकडं हलवून इस्तव बाहेर ओढला व त्यावर तव्यावरची भाकर अधिक खरपूस भाजण्यासाठी टाकली. खाटवटीट असलेली भाकर तव्यावर टाकली. आहारावर टाकलेली भाकर हाताने फिरवत असतानाच बाहेरून महाद्या काकाने आवाज दिला.

      “देवके...अगं ये देवके....!”

      हातातली भाकर टोपल्यात टाकून आवाजाच्या दिशेने ओ देत ती घाईघाईने बाहेर आली.  

      “काय झालं काका... सकाळीच तर तुम्ही मला येथून शेतात जाताना दिसला होता. आता काय झालं? इतक्या जोरानं हाका मारताय...”

 

      “अगं इथं काय बोलत बसलीय...तिकडे तो किसन शेतात गुरं घेऊन गेला होता.”

 

      “हो काका....त्यांना मीच तर गुरं शेतात घेऊन जायला सांगितलं होतं.”

 

      “अगं पोरी इथं बोलत काय बसलीस....चल तिकडं शेतात...किसन चक्कर येऊन पडला आहे. त्याला काय झालंय काय माहित. पण तो काही बोलत नाही. मी आपला राम्या आणि सुभ्या यांना त्याच्याकडे पाठवलं आहे. तू चाल लवकर...”

 

      तव्यावरची भाकर तशीच ठेऊन, पिठाचा हात तसाच घेऊन ती शेताच्या दिशेने धावत सुटली. चिखल तुडवत तुडवत ती धापा टाकत महाद्या काकांच्या मागे किसन जिथे चक्कर येऊन पडला होता तिथे गेली.

 

      किसनची झालेली अवस्था पाहून त्याला काय झालंय याची कोणालाच कल्पना येत नव्हती. तिथला गडबड गोंधळ ऐकून इतरही गुराखी व शेतात काम करणारे शेतकरी तिथे जमा झाले होते.

 

      किसन बेशुद्ध असल्याने त्याला नक्की काय झालंय यावर गर्दीत तर्क वितर्क लावले जात होते.

      “आरं त्याला बैलानं मारलं आसल..”

      “देवाच्या फेऱ्यात सापडला कायनु ब्वा..?”

      “भूता बितानं त धरला नसल..?”

      “आरं पान बिन लागला कि काय नीट ह्येरा..” लहू लांबूनच ओरडला.

 

      तिथे आलेला प्रत्येक जण आपलं मत मांडत होता. देवकी मात्र किसनची ती अवस्था पाहून गर्भगळीत झाली होती. ती किसनच्या तोंडावरून हात फिरवत हमसून हमसून रडत होती. तिचा हुंदका मात्र त्या गोंधळात कोणाला ऐकू येत नव्हता.

 

      देवकी शिकलेली होती. तिला वाटत होतं त्याला नक्की काय झालंय यावर चर्चा करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याला काही करून दवाखान्यात घेऊन जायला हवं.  पण दवाखान्यात जायचं म्हणजे एखादी गाडी पहायला हवी आणि गावात तर कोणाकडेही गाडी नव्हती. त्यात नदीला पाणी आल्याने राजूरला जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे बैलगाडीने किंवा झोळी करून त्याला राजूरला नेणे शक्य नव्हते. तसेच गाडी करायची म्हणजे त्याला पैसे लागणार....गाडी करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून ती अजूनही गप्पच होती.  

 

      बराच वेळ गोंधळात गेल्यावर महाद्या काका जोरात ओरडले,

“इथं काय येळ दवडीत बसल्यात कायनू ब्वा...त्याला देवळात बिवळात न्येलं पहिज्ये.”

 

      किसनला देवाची अडचण असावी यावर देवकी सोडून सर्वांचे एकमत झाल्याने त्याला झोळी करून नेले पाहिजे यासाठी धावपळ सुरु झाली.     

      देवकीच्या पोटातलं दुखणं कळ मारत होतं...पण किसनची झालेली अवस्था पाहून तिचं दुखणं बाजूला पडलं होतं.

      सखादादाच्या पिंट्याने एक लांब लाकूड आणून त्याला आपल्या खांद्यावरील घोंगडी बांधली व त्याची झोळी बनवली. सर्वांनी मिळून त्या झोळीत किसनला ठेऊन पिचडांच्या राजाने पुढची व थिगळ्यांच्या खंड्याने मागची बाजू आपल्या खांद्यावर घेतली व ते गावाच्या दिशेने चालू लागले. देवकीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. परंतु पैशाची नड असल्याने ती काही बोलत नव्हती. सर्वांच्या मागे ती जीव मुठीत धरून चालत होती. अधून मधून कंबरेला पहाटे बांधलेला पदर अधिक घट्ट बांधत होती. वाढलेल्या गवतातून वाट काढत काढत चिखल तुडवत ते सर्व गावातल्या देवळात आले.

 

      किसनला देवळात ठेवले. एक जण लगबगीने पांडू भगत ज्या झापावर राहत होता, तिकडे धावत गेला. पांडू भगत देवळात येईपर्यंत दुपार टळून गेली होती. पांडूने आल्या आल्या किसनचा हात आपल्या हातात घेतला. नाडी तपासली. त्याच्या हाता पायाची बारकाईने तपासणी केली. उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ त्याला काही तरी चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसल्या होत्या. किसनला काय झालंय हे त्याला समजून चुकलं होतं. त्यामुळे त्याच्याही तोडावर घाम आला होता. पांडूच्या चेहऱ्यावरील भाव पाहून देवकीला धोका किती आहे याची कल्पना आली होती. पांडूने आपल्या पिशवीतून काही झाडपाला काढून तो दगडावर कुटू लागला. त्याचा रस काढून त्याने किसनच्या ओठांवर ओतला. त्यातील काही रस जिभेवरून घशाच्या खाली उतरल्याची खात्री पांडूने केली. देवकीला त्याने घाबरू नको... देवाला मी साकडं घालतो...सगळं काही ठीक होईल. तू आता घरी जा आणि संध्याकाळी परत ये.

 

      “नाही काका....मी यांना सोडून नै जाणार...आणि जाऊनही म्या घरी काय करणार...?” देवकी बोलली.

 

      “आगं पोरी तू इढं रहून तरी काय करशील.... आम्ही समदी हाये इढं... तू व्हय घरी अन दोन घास खाऊन इ...आम्ही आहोत इढं,” महाद्या काका देवकीला बोलले.  

 

      सगळ्यांच्या आग्रहास्तव इच्छा नसतानाही ती घाईने घरी गेली. घराची कडीही तिने लावली नव्हती. घरात जाताच तिला विझून गेलेली चूल आणि तव्यावर जळून खाक झालेली भाकर दिसली. ते चित्र पाहताच तिच्या पोटात जोरात कळ मारून आली आणि ती वेदनेने जमिनीवर लोळू लागली. तिकडे किसन देवळात निश्चल पडला आहे आणि इकडे देवकी पोटाच्या वेदनेने विव्हळत होती. तिचं असं ओरडणं ऐकून बाजूची मंगल धावत आली.

 

      देवकीला नक्की काय झालंय हे तिला समजेना. तिने घाईतच लक्ष्मी आयला बोलावलं. तिने देवकीला पाणी देऊन जरा शांत राहण्यास सांगितले. पण देवकीला वेदना सहन होत नसल्याने ती हात पाय जमिनीवर मारत ओरडत होती.

      लक्ष्मी आयने देवकीचा हात हातात घेतला आणि सांगितले कि अरे हि तर पोटुशी आहे. इला काहीही करून दवाखान्यात न्यायला पाहिजे. हिच्या पोटातला गर्भ सरकला असावा म्हणून इला त्रास होतोय.

      तिकडे किसन देवळात आणि इकडे घरात देवकी...दोघेही एकमेकांचे आधारस्तंभ आता अडचणीत होते. कोणी कोणाला आधार द्यायचा हा प्रश्न होता. दवाखान्यात जायचे तर आता वेळ पुरणार नव्हता. पावसाळ्याचे दिवस असल्याने या वेळेला जीव धोक्यात घालून कोणी होडी चालवणार नाही. त्यामुळे राजूरला दवाखान्यात जायचे तर सकाळच्या एस.टी.चीच वाट पहावी लागणार होती. सगळा नाईलाज होता.

 

      पांडू भगत आपल्या झाडपाल्याच्या रसाचा उपयोग करून किसनच्या शरीरातील सापाचे विष कमी करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु किसनच्या चामडीचा रंग हळूहळू काळा पडू लागला होता. पांडूला आपली हतबलता समजून चुकली होती. त्याने महाद्या काकांना एका कोपऱ्यात बोलावून त्याच्या कानात काही तरी कुजबुज केली.

 

      महाद्या काका धावतच होडीवाल्या गण्याच्या झोपडीकडे गेला. त्याच्या हातापाया पडला. काही करून आपल्याला किसनला राजूरला दवाखान्यात नेले पाहिजे हे समजावू लागला. या वादळात व हेलकावे खाणाऱ्या पाण्यावरून होडी चालविणे फारच जोखमीचे काम आहे असे गणा सांगत होता. पण महाद्या काकाचे आर्जवी बोलणे पाहून तो शेवटी तयार झाला. पण यातही एक अडचण होती. अनेक दिवस होडी उपयोगात नसल्याने ती चालते कि नाही याची खात्री करावी लागणार होती. अनेक दिवस होडी पडून राहिली तर तिच्या फटीतून पाणी होडीत घुसण्याची शक्यता असते. तसे झाले तर या अंधारातजीव गमावण्याची नामुष्की सर्वांवर येऊ शकते. त्यात वादळ पण सुरु आहे, होडी चालवणे धोकादायक होईल. क्षणाचाही विलंब न करता गण्याने होडी तपासली आणि काही धोका नसल्याची खात्री केली.

 

      महाद्या काका घाईने परत देवळात आले व सर्वांना सांगू लागले कि किसनला सर्पदंश झालेला आहे. आता फार वेळ देवाला साकडं घालून हातावर हात ठेऊन गप्प बसणं फायद्याचं ठरणार नाही. त्याला काहीही करून दवाखान्यात घेऊन जावे लागेल. या धावपळीत लक्ष्मी आय पण देवळात आली होती. तिने महाद्या काकांना देवकीची अवस्थाही बिकट असल्याची माहिती दिली. दोघांना होडीतून घेऊन जाणे शक्य होईल का याची खात्री करण्यासाठी गण्याला निरोप दिला. गण्याने या अंधारात चार पाच माणसांना होडीतून घेऊन जाण्यास नकार दिला. सर्वांनी त्याला फार विनंती केली, परंतु इतक्या सर्वांचा जीव मी धोक्यात घालू शकत नसल्याचे तो म्हणत होता. शेवटी लक्ष्मी आयने किसनपेक्षा देवकी दोन जीवांची असल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक असल्याचे मत मांडले. देवकी मात्र पोटातल्या वेदनांकडे दुर्लक्ष्य करत किसनला दवाखान्यात घेऊन जाण्याचा आग्रह करत होती. आपण दोन फेऱ्या मारू आणि तुझ्या नंतर किसनला पण दवाखान्यात आणू असे महाद्या काकाने समजावल्यावर ती दवाखान्यात जायला तयार झाली.

 

      गण्याने डोक्यावर घोंगडी पांघरली व अंधारात चाचपडत होडी नदीच्या पाण्यात नेऊन सोडली. पाण्यातल्या लाटांवर होडी अधिकच हेलकावे खाऊ लागल्यावर त्याच्या मनात भीतीचे काहूर सुरु झाले होते...पण प्रसंग कठीण असल्याने तो धीर धरून महाद्या काकांना आवाज देऊ लागला,

      “महाद्या काका... म्या व्हडी पाण्यात सोडलीय...तुम्ही या लवकर. परत पाऊस सुरु झाला, तं अवघड व्हइल सगळं.”

 

      लक्ष्मी आयने घाईत हाताला येईल ती देवकीची साडी व पांघरण्यासाठी एक दोन गोधड्या पिशवीत भरल्या व आपली सून सुशीलाला देवकीचा हात धरून होडी पर्यंत त्यांना पोहोचविण्यास सांगितले. घरापासून बरंच लांब चालत जावं लागणार होतं. पण त्याला काही इलाज नव्हता. सुशीलाच्या हाताला धरून त्या अंधारात देवकी चाचपडत चालत होती. पोटात कळ आली कि खाली बसत होती. शेजारचा सोम्या कंदील घेऊन उजेड दाखवायला सोबत आला होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. कारण सोसाट्याचा वारा सुटल्याने कंदिलाची वात नावालाच पेटत होती. त्या मिणमिणत्या प्रकाशात कसेबसे ते प्रवरा नदीच्या किनारी पोहचले व गणाची होडी कुठंय ते शोधू लागले.

 

      लक्ष्मी आय, देवकी व महाद्या काका अशा तिघांना घेऊन होडी राजूरच्या दिशेने जाऊ लागली. अधूनमधून येणाऱ्या हवेच्या झोताने होडीची दिशा अंधारात भरकटत होती. परंतु प्रवरेच्या बाजूच्या टोकाला असलेल्या घराच्या समोरील लाईटच्या अंदाजाने गणा होडी चालवत होता. धरणाच्या पाण्यात विजेच्या तारा देखील बुडालेल्या होत्या. त्यांना चुकवत होडी पुढे घेऊन जाण्याचे काम गणा मोठ्या शिताफीने करत होता. त्या तारांना चुकून होडी अडकली तर सगळंच अवघड होईल याची जाणीव गणाला होती. हेलकावे खाणाऱ्या पाण्यावरून चालणारी होडी आणि त्यात देवकीच्या मनात चाललेले विचारांचे काहूर जणूकाही नियतीचा एक वेगळाच खेळ असावा असेच देवकीला वाटत होते. तिच्या मनात सतत येत होते कि जर निळवंडे धरण नसते, तर तिला सकाळीच पोटात कळा येत असताना किसनला घेऊन राजूरच्या दवाखान्यात जाता आले असते. पण दुर्दैवाने निळवंडे धरणाने अनेकांच्या शेतीच्या विकासाला आधार दिला असला, तरी अनेकांची तहान भागविणारे पाणी आज देवकीच्या तोंडचे पाणी पळविण्यास कारणीभूत ठरले होते.

 

      होडी अनेक लाटा व वादळाचा सामना करत पुढे जात असताना गणा मात्र आपण त्या कडेला पोहचू कि नाही याबाबत मनात शंका घेऊन होडीला मोठ्या ताकदीने वल्हवित होता. होडी नदीच्या किनाऱ्याला लागणार तोच पावसाने आपला जोर वाढवला होता...वाराही आपले रूप त्या अंधारात दाखवत होता. कशीबशी गणाने होडी किनाऱ्याला लावली. देवकीला हात देऊन तिला उतरवले, नंतर महाद्या काका व लक्ष्मी आय उतरली. पावसाने जोर वाढवल्याने गणाने आपल्या डोक्यावरील घोंगडी देवकीच्या अंगावर टाकली. लक्ष्मी आय व महाद्या काका हे दोघेही चांगलेच भिजले होते. ते सर्वच थंडीने कुडकुड करत होते. थोडा वेळ आडोश्याला थांबावे असे वाटत असताना देवकीला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे आहे असे सर्वांना वाटले.

 

      महाद्या काका, गणा, लक्ष्मी आय हे तिघेच त्या अंधारात देवकीच्या सोबत होते. गणा जर होडी घेऊन परत माघारी फिरला तर देवकीला राजूरपर्यंत चालणे शक्य होईल का हा प्रश्न महाद्या काकाच्या मनात डोकावला. तसे त्याने गणाला बोलून दाखवले. गणाला देखील परिस्थितीचे गांभीर्य समजले व क्षणाचा विलंब न लावता त्याने नदीच्या कडेला आपली होडी बांधली व बाजूलाच पडलेले एक लांब लाकूड शोधून आणले. त्याला नुकतीच देवकीला दिलेली घोंगडी बांधली. देवकीच्या पोटातील कळा थांबायचे नाव घेत नव्हत्या. महाद्या काकाने देवकीला घोंगडीच्या झोळीत बसवले व एक बाजू आपल्या खाद्यावर घेतली व दुसरी बाजू गणाला घ्यायला सांगितली. महाद्या काका वयाच्या मानाने झपाझप पावले टाकत होता. पाठीमागून गणाला पुढील रस्ता दिसत नसल्याने अनेकदा काट्यांवर पाय टाकून पुढे जावे लागत होते. त्या अंधारात गोधड्या व इतर कपड्यांची पिशवी डोक्यावर घेऊन लक्ष्मी आय मागे मागे चालत होती.

 

      आकाशात ढगांनी एकदमच गर्दी केली होती. पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे चढाला चालताना महाद्या काका जपून चालत होता. पाय घसरून पडण्याची त्याला भीती वाटत होती. लक्ष्मी आय आता चढाला सर्वांच्या पुढे चालत चालली होती. ती यांना रस्ता चांगला आहे कि नाही याची खात्री करून देत होती.

 

      एकदाचा घाट संपला आणि राजूरची घरे दिसू लागली. रात्रीचा उशीर झाल्याने व त्यात पाऊस पडत असल्याने रस्त्यावर एक माणूसही दिसत नव्हता. निवाऱ्याला लपलेली व थंडीने कुडकुडलेली कुत्री यांची चाहूल लागल्याने जोराने भुंकू लागली होती. काही कुत्री अंगावर धाऊन येत होती. लक्ष्मी आय त्यांना हाड हाड म्हणून हाकलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती कुत्री ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.  

 

      कुंभाराच्या भट्टीपासून पुढे जात असताना चार दोन कार्टी गप्पा मारत वळचणीचे पाणी अंगावर पडू नये म्हणून घराच्या व्हरांड्यात उभी राहिली होती. महाद्या काका व गणाच्या खांद्यावरील झोळी पाहून त्यांचे तोंड वाकडे झाल्याचे लक्ष्मी आयने बघितले.

      सरकारी दवाखान्याचा बोर्ड लांबूनच दिसल्यावर महाद्या काकाला हायसे वाटले. कारण इतके अंतर खांद्यावर ओझे घेऊन चालणे त्यांना तसे जड वाटत होते. पण नाईलाज होता. दवाखान्याच्या गेटजवळ आल्यावर महाद्या काकाने आपली झोळीची बाजू अगोदर अलगद पायरीवर टेकवली. त्यानंतर गणाने आपली बाजू खाली टेकवत देवकीला सावरण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून आलेल्या लक्ष्मी आयने तिला हात देत तिथे असलेल्या बाकड्यावर बसवले.

      रात्रीची वेळ असल्याने दवाखान्यात आलेल्या पेशंटची चौकशी करायला लवकर कोणी आले नाही. देवकीला आपल्या पोटातल्या कळा असह्य होत असतानाही किसनला कधी दवाखान्यात आणणार याची काळजी जास्त वाटत होती. ती गणाला लवकर जाऊन किसनला दवाखान्यात घेऊन येण्याची विनंती करत होती. गणा तिला जातो म्हणून आधार देत होता. पण मनात मात्र तो एकट्याने इतक्या रात्री परत जाण्यास इच्छुक नव्हता.

 

      देवकीच्या पोटातल्या कळा थांबायचे नाव घेत नव्हत्या. तिची ती अवस्था पाहून लक्ष्मी आय अधिक काळजी करत होती. ती सारखी महाद्या काकांना डॉक्टर आलेत का बघा याची चौकशी करायला सांगत होती. सरकारी दवाखाना म्हटला कि इतकी वेळ वाट पहावीच लागणार याची जाणीव महाद्या काकांना होती आणि त्यात हि रात्रीची वेळ असल्याने आपल्याला डॉक्टर भेटेल कि नाही याची खात्री महाद्या काकांना नव्हती.

 

      तासाभरात डॉक्टर आले. त्यांनी देवकीला पोट कधीपासून दुखत आहे याची विचारपूस केली. पहाटेपासून पोट दुखत असल्याचे सांगताच, डॉक्टर तिच्यावर ओरडू लागले. इतका उशीर का झाला? असे काही बाही प्रश्न विचारून रात्रीच्या वेळी उठावे लागल्याचा राग व्यक्त करत होते. देवकी मात्र किसनच्या काळजीत असल्याने काहीच बोलत नव्हती. सकाळची एसटी गेल्यावर राजूरला यायला काय कसरत करावी लागते हे डॉक्टरला कोण सांगणार हे मनातल्या मनात ती स्वत:लाच सांगत होती.

 

      डॉक्टरांनी तिला प्रसूती कळा येत असल्याची कल्पना लक्ष्मी आयला दिली. तेव्हा घड्याळात रात्रीचे बारा वाजले असल्याची खात्री गणाने केली. आता कधी जायचे आणि कधी किसनला घेऊन यायचे हा विचार महाद्या काका व गणा करत होते. नाईलाजाने गणा व महाद्या काका दवाखान्याच्या व्हरांड्यात भिंतीला टेकून बसले व भिजलेल्या कपड्यांचे पाणी झटकू लागले. पाणी झटकता झटकता दोघांचाही डोळा कधी लागला हे त्यांना कळलेच नाही.

 

      पहाटे चार वाजता गणा झोपेतून उठला व कोणाला काही न सांगता नदीच्या दिशेने चालू लागला. सकाळची एस.टी. जायच्या आत त्याने किसनला दोघां-तिघांच्या मदतीने मोटार आड्यावर आणले. एस.टी.आल्यावर किसनला उचलून गणा गाडीत बसू लागला. किसनची अवस्था बघून कंडक्टर त्यांना गाडीत बसू देत नव्हता. या बाचाबाचीत एस.टी. जवळपास अर्धा तास जागची हालत नव्हती. शेवटी गावक-यांच्या विनंतीवरून किसनला गाडीत बसवून गणा व रंगा राजुरच्या रस्त्याला लागले. किसन हालत नसल्याने गणा चिंताग्रस्त होता. रात्रभर पांडू भगत काय काय प्रयत्न करत होता याची माहिती रंगा सांगत होता, परंतु गणाला रात्रीचा होडीचा प्रवास डोळ्यासमोर दिसत होता.

 

      एस.टी.राजूरच्या मोटार आड्यावर आली. प्रत्येकाला गाडीतून उतरण्याची घाई होती. फक्त किसन मात्र निश्चल होता. गणा व रंगा दोघांनी त्याला झोळीत घालून सरकारी दवाखान्यात नेले. एका खोलीत कॉटवर किसनला ठेऊन गणा महाद्या काकांना भेटला व देवकी कशी आहे म्हणून चौकशी केली. सकाळी ७ वाजता तिला मुलगी झाली असल्याची खबर महाद्या काकाने देताच गणाला काहीसा आनंद झाला. परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण तिकडे डॉक्टरांनी किसनला तपासले होते आणि त्याच्यासोबत कोण आहे म्हणून जोरात ओरडत होते.

 

      डॉक्टरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच महाद्या काका व गणा धावत तिकडे गेले. डॉक्टरांनी पेशंटची अवस्था अतिशय वाईट असून विष संपूर्ण अंगात भिनल्याने आम्ही काहीच करू शकत नाही अशी माहिती दिली. कालच तुम्ही याला दवाखान्यात आणायला हवे होते. आता फार उशीर झाला आहे. तुम्हाला पेशंट वाचवायचे असेल तर तालुक्याला घेऊन जावे लागेल, कारण आमच्याकडे सर्पदंशावरील लस शिल्लक नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे बोलले.

      “लस नाही..म्हणजे काय...आम्ही गरिबांनी कुठं जायाचं ?” महाद्या काका बोलले.

      “सॉरी काका...मी काहीच करू शकत नाही.” डॉक्टर बोलले.

      लस नाही... म्हणजे किसनला अकोल्याला न्यावे लागणार... पण अकोल्याला न्यायचे तर पैसे पाहिजे. तेवढे पैसे कोणाकडेच नव्हते. आता काय करायचे या विचारात सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. महाद्या काका लक्ष्मी आयकडे गेले आणि काय झालंय हे सांगितले. लक्ष्मी आयने पैशाची निकड जास्त महत्त्वाची आहे हे ओळखून मागचा पुढचा विचार न करता आपल्या गळ्यातील मंगळसूत्र महाद्या काकाच्या हातात दिले आणि म्हटले कि याचे पैसे किती मिळतात ते बघा आणि किसनला काही करून अकोल्याला घेऊन जा.

 

      लक्ष्मी आय आणि किसन हे फक्त शेजारी होते. तसे रक्ताचे नाते काहीच नव्हते. पण तरी देखील अडचणीच्या वेळी आपलं मंगळसूत्र दिल्याचे पाहून महाद्या काकाचा थकवा देखील गायब झाला होता.

 

      हातातले मंगळसूत्र घेऊन महाद्या काका सन्तु वाण्याच्या घरी गेला. कारण त्याचं दुकान उघडायला अजून बराच वेळ होता. दुकान उघडण्याची वाट पाहिली तर फार उशीर होईल याचा विचार महाद्या काकाने केला होता. सन्तु वाणी देवपूजा करण्यात व्यस्त होता. ते पाहून महाद्या काका बाहेर व्हरांड्यात बसले. पुजा उरकून सन्तु वाणी देवघरातून आत जायला निघताच, त्याचे लक्ष्य महाद्या काकाकडे गेले.

 

“काय काका...साज सकाळीच...काय काम काढलं?”

“जरा अडचण होती...म्हणून आलो...”

“मग काय मदत करू मी”

 

      महाद्या काकाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातले मंगळसूत्र सन्तु वाण्याच्या हातात दिले. सन्तु वाण्याची आणि महाद्या काकाची जुनी ओळख असल्याने हातात दिलेले मंगळसूत्र खरं सोनं आहे कि नाही हे न तपासता तिजोरी उघडली. हातात नोटा घेऊन मोजू लागला. तेवढ्यात त्याची बायको ओरडली, “अहो तुम्ही सोन्याची तर खात्री केलीच नाही आणि पैसे द्यायला निघालात.”

      “अगं सोन्यासारखी माणसं हि. इतक्या सकाळी आपल्या घरी इतक्या दूरवरून आलीत म्हणजे काही तरी मोठी अडचण असेल. तू नको यात लक्ष्य घालू.” त्याने बायकोला वरवर उत्तर देत काही नोटा महाद्या काकाच्या हातात ठेवल्या व आपल्या वहीत पेनाने लिहून त्यावर महाद्या काकांचा अंगठा घेतला.    

 

      हातातल्या नोटा न मोजता त्याने दवाखान्याकडे धाव घेतली. किसनला अकोल्याला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधली. सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याने खाजगी रुग्णवाहिका दवाखान्याच्या गेटवर उभी करून महाद्या काका आत गेले. डॉक्टरांना आम्ही पेशंट अकोल्याला नेत आहोत असे सांगितले. डॉक्टरांनी एक चिट्ठी लिहून महाद्या काकांच्या हातात दिली व अकोल्यात गेल्यावर डॉक्टरांना दाखविण्यास सांगितले.

 

      एकीकडे किसनला अकोल्याला घेऊन जाण्याची लगबग सुरु असताना देवकी आपल्या चिमुकलीच्या कोवळ्या चेहऱ्याकडे पाहून आपली वेळ मारून नेत होती. किसनला दवाखान्यात आणले कि नाही याबाबत तिला कोणीच काही सांगत नव्हते. ती लक्ष्मी आयला अधूनमधून याबाबत विचारत होती, पण ती देखील याबाबत काही सांगत नव्हती.

 

      महाद्या काका, गणा व रंगा यांनी मिळून किसनला रुग्णवाहिकेत नेले व सीटवर आडवे झोपवून वाहकाला अकोल्याला जाण्याची सुचना केली. गाडी भरधाव वेगाने सायरन वाजवत निघाली. सायरनचा आवाज देवकीने ऐकला देखील. पण तिला कल्पना नव्हती कि त्यात किसन आहे म्हणून.

 

      अकोल्याचा रस्त्याने गाडी धावत होती. गाडी खड्ड्यांतून जाताच महाद्या काकाचे डोके वर आपटत होते. पण त्याची त्यांना फिकीर नव्हती. किसनचं काय होईल याचीच काळजी त्यांना अधिक वाटत होती. वेगवेगळे विचार मनात येत असतानाच ते किसनची नाडी तपासून बघत होते. शरीराचा रंग अगदीच काळा पडल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. एकदाची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. अकोल्याचा दवाखाना रस्त्यालगत असल्याने महाद्या काका अगोदर खाली उतरले व खिशातला कागद घेऊन ते दवाखान्यात गेले. तो कागद पाहून डॉक्टर घाईने रुग्णवाहिकेजवळ आले व गळ्यातला स्टेथस्कोप कानाला लावून किसनला तपासू लागले.

 

      “फार उशीर झालाय...” डॉक्टर बोलले.

      “...म्हणजे काय डॉक्टर ?” महाद्या काकांना विचारले.

      “अहो तुमचे पेशंट कधीच दगावले आहे..”

      “काय....असं कसं काय...?

      “अहो खरंच...”

 

      डॉक्टरांचे ते वाक्य ऐकताच रोज आपल्याशी गप्पा मारणारा, गुरांमागे धावणारा किसन त्यांना आठवू लागला. ते गपकन खाली बसले व हमसून हमसून रडू लागले.

 

      गणा व रंगा यांना नक्की काय झालेय याची कल्पना यायला उशीर लागला नाही.

 

      डॉक्टरांनी किसनला शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. त्यासाठी वेळ लागणार असल्याने महाद्या काकांनी गणाला देवकीच्या आई वडिलांना निरोप देण्यासाठी साकीरवाडी येथे जाण्यास सांगितले. तर रंगाला आपल्या गावी पिंपरकणे येथे जाऊन गावातील लोकांना निरोप देण्यास सांगितले. दोघांच्या हातात भाड्याला पैसे देऊन महाद्या काका दवाखान्याच्या बाकड्यावर बसून रडू लागले.

 

      गणाने सरळ साकीरवाडीला न जाता राजूर येथे दवाखान्यात जाऊन लक्ष्मी आयला याची कल्पना दिली. लक्ष्मी आयने देवकीला याची माहिती देण्यास नकार दिला व गणा बाहेरूनच साकीरवाडी येथे जाण्यास सांगितले.

 

      देवकीला दवाखान्यात आता तीन दिवस झाले होते. तिची आई व वडील किसनचा अंत्यविधी करून राजूरला तिला पाहण्यासाठी आले होते. तीन दिवस झाले तरी किसन आपल्याला भेटायला का आला नाही म्हणून ती चिंताग्रस्त होती.

 

      दुपारच्या वेळी डॉक्टर आले... त्यांनी देवकीला तपासले व घरी घेऊन जाण्यास हरकत नाही असे सांगितले. आपल्या सोबत आणलेल्या गोधड्या व इतर कपडे यांची पिशवी लक्ष्मी आयने भरली. देवकीच्या आईने बाळाला आपल्या हातात अलगद घेतले. सर्व जण राजूरच्या मोटार आड्यावर आले. अनेक गाड्या आल्या आणि गेल्या, पण यांची गाडी यायला उशीर होता. तिथे बाकड्यावर बसून सगळे जण गंभीर होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते. देवकी सारखी किसनची चौकशी करत होती. पण त्याबाबत तिला कोणी काही सांगायला तयार नव्हते.

 

      राजूरच्या डेपोतून माईकवर पुकारण्यात आले... साकीरवाडी येथे जाणारी बस २ नंबर फलाटावर लागलेली आहे.

 

      साकीरवाडी शब्द ऐकताच देवकीचे वडील उठले व बसकडे पळत जाऊन जागा पकडू लागले. देवकीला क्षणात काय होतंय हे कळत नव्हते. आपण साकीरवाडीला का चाललोय हे ती सारखी विचारत होती. पण लक्ष्मी आय तिला समजावत होती, “कि तू वली बाळंतीण आहे. पिंपरकण्याला गेल्यावर तुझ्याकडे आणि बाळाकडे कोण लक्ष्य देणार..? तेव्हा तू आईकडे जा आणि नंतर ये.”

 

      कंडक्टरने बेल मारली. गाडी सुरु झाली. लक्ष्मी आयने खिडकीतून देवकीला बाळाची आणि तुझी काळजी घे असा जोरात आवाज दिला.

 

      एस.टी. भरधाव वेगाने साकीरवाडीच्या घाटात वळणे घेत घाट चढत होती. गाडीच्या तुटलेल्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या बाभळीच्या झाडांकडे पाहून देवकीच्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. पण त्याचं उत्तर कोणी देत नव्हते.

 

      साकीरवाडीत देवकी उतरल्यावर गावातील आजूबाजूच्या बाया माणसे तिच्यामागे चालत घराकडे येत होती. नेहमी हसून स्वागत करणारे गाव आज असे का उदास झालेय हेच तिला काही कळत नव्हते.

 

      देवकी घराच्या उंबऱ्यातून आत येणार तोच राही मावशीने तिला थांबवले. दोन दगड आणून तिच्या हातातील बांगड्या फोडायला सुरुवात केली. बांगड्या फोडून झाल्यावर तिच्या कपाळावरील कुंकू देवकीला काही कळायच्या आत पुसले.

 

      देवकीला काय घडलेय याची कल्पना यायला उशीर लागला नाही. ज्या गावाने हिरवा चुडा देऊन बोळवण केली होती, तेच गाव आज माझा कुंकू पुसायला असे पुढे येईल याची तिला कल्पना करवत नव्हती.

 

      तिने अंग टाकून धाय मोकलून किसनच्या नावाने हंबरडा फोडला. तोपर्यंत सारा गाव जमला होता. सर्वांनी आता तुला सोन्यासारख्या पोरीकडे पाहून स्वताला सावरायला पाहिजे म्हणून समजूत काढायला सुरुवात केली.

 

      किसनच्या आठवणीत तिला आपल्या चिमुकल्या मुलीकडे लक्ष्य द्यायची देखील इच्छा होत नव्हती. वेळेत जेवण न केल्याने तिचे दुध देखील कमी झाले होते. बाळाला पिण्यासाठी दुध नसल्याने ते देखील भुकेमुळे सारखे रडत होते.  बाळाची अवस्था बघून सगळे देवकीला समजावून सांगत होते. पण देवकीच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

 

      किसनच्या दिवस कार्यासाठी देवकीला तिचे आई वडील पिंपरकणे येथे घेऊन आले. बाळाला पाहण्यासाठी सारा गाव जमला होता. देवकीचा चेहरा अगदीच निस्तेज झाला होता. आलेला प्रत्येकजण पोरगी अगदी किसनवर गेलीय म्हणून देवकीचे दुख हलके करण्याचा प्रयत्न करत होते.

 

      दिवस कार्य पार पडत असताना सारा गाव तिच्या दुखात सहभागी झाला होता. पण तिचं दुख हलकं होत नव्हतं. ज्या गावात किसनचा हात धरून आपण आलो, आज त्याच गावात किसन आपल्यासोबत नाही याची उणीव तिला सहन होत नव्हती. तिच्या डोळ्यातून गालावर ओघळणारे अश्रू अधून मधून येणा-या पावसाच्या सरींमध्ये गडप होत होते. दिवस कार्य एकदाचे पार पडले. सर्व पाहुणे निघून गेल्यावर देवकी आपल्या घरातील सर्व साहित्य आवरून आपल्या आई वडिलांसोबत साकीरवाडी येथे जायला निघाली. आपल्या घराला कुलूप लावत असताना लक्ष्मी आय तिथे आली व देवकीला आता कधी येशील ग बाई म्हणून विचारू लागली.

 

      देवकी लक्ष्मी आयच्या प्रश्नाला उत्तर न देता तिच्या गळ्यात पडून रडू लागली. सर्वांनी देवकीला समजावून सांगितले व आपल्याला जायला हवं म्हणून बोलू लागले.

 

      माझं शेवटचं तोंड पहायला तरी तुझ्या पोरीला घेऊन येशील ना म्हणून लक्ष्मी आयने देवकीकडे गळ घातली. आयला हो म्हणून देवकी आपले डोळे पदराने पुसत आईच्या मागे चालू लागली. इकडे लक्ष्मी आय देखील रडत रडत अंगणात भिंतीचा आधार घेत खाली बसली.

 

      दिवस कसे गेले हे देवकीला कळलेच नाही. देवकीच्या वडिलांनी आग्रह करूनही देवकीने दुसरे लग्न करण्यास स्पष्ट नकार दिलेला होता. तिची मुलगी आता दहावीच्या वर्गात शिकत होती. देवकीच्या हातात पण फोन आला होता. तिच्या फोनवर भल्या सकाळी निरोप आला, लक्ष्मी आय गेली.

 

      लक्ष्मी आय गेल्याचा निरोप कळताच शाळेत जाणा-या आपल्या मुलीला आज शाळेत जाऊ नकोस म्हणून देवकीने सांगितले. आपल्या भावाला घेऊन ती पिंपरकणे येथे जायला निघाली.

 

      भावाची गाडी राजूरला आली. गाडीने शेंडीकडे जाणारा रस्ता न घेता पिचड साहेबांच्या बंगल्याजवळ उजव्या हाताला वळण घेतल्याने देवकीला प्रश्न पडला कि आपण इकडे कुठे जात आहोत. तिचा भाऊ काहीच बोलला नाही. तो शांतपणे गाडी चालवत होता.

 

      त्यांची गाडी राजूरच्या पुढे उताराला लागली. वळणे घेत हळूहळू गाडी प्रवरा नदीच्या तीराजवळ आली. तिला वाटले गाडी आता होडीने जाईल. पण आता तशी काही गरज नव्हती. कारण दोन दिवसांपूर्वीच ह्या पुलाचे उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झाल्याचे तेथील पोस्टर दर्शवत होते.

      राघोजी भांगरे जलसेतूवरून गाडीत बसून जात असताना सुमारे १६ वर्षांपूर्वी काय घडले याची तिला आठवण झाली आणि हलकेच तिच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू का आले असा प्रश्न देवकीच्या मुलीला पडला. तिने आपला रुमाल काढून आईचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला....पण देवकी म्हटली अगं असू दे... हा पूल जर तेव्हाच झाला असता ना तर आपली ह्या गावाशी असलेली नाळ कधी तुटली नसती........!

 

-        Raajoo Thokal

rajuthokal9@gmail.com

Mob: 98 90 15 15 13

 

( टीप : ‘नाळ’ हि कथा काल्पनिक असून हिचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. कथेतील पात्र, ठिकाणे व प्रसंग हे काल्पनिक असून निव्वळ एक कथा म्हणून मांडलेले आहेत. त्यांचे जर कोणाच्या नावाशी, गावाशी साधर्म्य येत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. आदिवासी भागात एखादा प्रकल्प होत असताना त्याचा किती विपरीत परिणाम तेथील स्थानिकांच्या जीवनावर होतो, याचे काल्पनिक चित्र समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या कथेतून केलेला आहे. कथेतील प्रसंग घेऊन कोणीही कुठल्याही प्रकारचे तर्क वितर्क लावू नयेत. )  


www.aboriginalvoice.blogspot.com

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.