जव्हार राज्य स्थापना दिवसाच्या सर्वांना खूप शुभेच्छा...
महाराष्ट्राच्या इतिहासात जव्हारच्या राज्याला अनन्यसाधारण महत्व आहे. खरे म्हणचे जव्हार राज्याची स्थापना जरी अधिकृतपणे ६ जून १३४२ रोजी झालेली असली तरी, जायबा राजे यांचा राज्याभिषेक हा ६ जून १३१६ रोजीच झाला. स्वराज्याचे पहिले तोरण त्यांनी सदानंद महाराज यांच्या उपस्थित बांधले हे लक्ष्यात घेतले पाहिजे. जव्हारची गादी त्यांनी स्वबळावर उभारली आणि इ. स. १३४१ पर्यंत निष्ठेने व समर्थपणे संभाळली.
इ. स. १२९०-१२९४ च्या कालावधीत जायबा यांनी आपल्या मूठभर पण विश्वासू महादेव कोळी बांधवाना बरोबर घेऊन संघर्ष करीत आपल्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. विळा, कोयता, धनुष्य बाण हाती घेऊन आपल्या 'बंदी' तलवारीच्या जोरावर "कोळवणात" जव्हारला राज्याची घडी बसविली. ( जव्हार तालुका, मोखाडा तालुका त्र्यंबकेश्वर, अकोला तालुका, राजूर, वसई ते धरमपूर, नासिक, दिंडोरी ते वाणी गडापर्यंतच्या भौगोलिक पट्ट्यात "महादेव कोळी" बांधवांची सलग गावेच्या गावे, वड्या वस्त्या करून राहत असल्याने या पट्टयास 'कोळवन' असे म्हणतात)
असा झाला स्वराज्याचा प्रवास:- १२८५ ते १२९० च्या कालखंडात जायबा हे साधे जमीनदार म्हणून कोंभाळणे, ता. अकोला जि. अहमदनगर येथे राहत होते. त्यांचे खरे कुळ पोपेरे असे आहे. याची महत्वाची पुष्ठी म्हणजे अजूनही या गावी पोपेरे कुळाचा "महादेवकोळी" हा आदिवासी समाज राहत आहे.
या कोळवन पट्यात जायबा यांचा फार आदरयुक्त दरारा होता. त्यांनी त्यावेळी सावकार, जमीनदार, यांचे विरुद्ध शोषणाचा लढा दिला. गोरगरीब लोकांना त्यांची सावकारांनी जप्त केलेली जमीन, भांडीकुंडी, पैसे, गुरेढोरे देखील परत केले रयतेचे अश्रू पुसले. तसेच मुघलांच्या, परकीय सत्ता विरोधात संघर्ष केले. अन्याय आणि जुलूम करणाऱ्या जुलमी सत्तेला पाणी पाजले. पुढे सदानंद महाराज या नाथ संप्रदायातील पुरुषाने त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दाखातर राजे जायबा यांनी इगतपुरी तालुक्यातील मुकणे गावी येऊन स्थायिक झाले. तेथे त्यांनी भुईकोट किल्ला बांधला. या मुकणे गावीच्या वास्तव्यावरून त्यांचे कुळ "पोपेरे वरून मुकणे" असे झाले हेही ध्यानी घेतले पाहिजे.
त्र्यंबकेश्वर येथे गौरी राजे यांचा पराभव केला:- (१२९०) पूर्वी देवगिरीच्या यादव घराण्याचे नाशिक आणि त्रंबकेश्वर येथ पर्यंत राजसत्ता पसरलेली होती. त्यावेळी गौरी राजा हा यादव घराण्यातील रामदेवराय, (देवगिरी, औरंगाबाद) यांचा पुतण्या त्रंबकेश्वर येथे कारभार पाहत होता. तेंव्हा जायबा पोपेरे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यादव घराण्याने देखील एव्हढ्या दूरवरच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे म्हणून जायबाचे कोकण प्रांतावरील अधिपत्य मान्य केले. या छोट्याशा लढाईने कोळवन पट्यात जम बसविला. त्यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी बांधवांची मोठी फलटन उभी केली. शिवाय बाकीचे आदिवासी लोक देखील जोडले गेले.
एकत्रित होणारा समाज आणि हातावर शीर घेऊन लढणारे महादेव कोळी बांधव यांच्या बळावर शेजारचा गंभीरगड वारली सुभेदार सुंभाटे(हा दिल्ली मुगलांच्या अधिपत्याखाली होता) यांचेकडून रक्त न सांडवता हिकमतीने हस्तगत केला. त्यानंतर त्यांनी भूपतगड काबीज केला. अशारितीने २२ किल्यांची जमवाजमव करून, जायबा आणि त्यांचे साथीदारांनी सात वर्षे सुरत मध्ये राहून मुस्लिम राजवटीत धनद्रव्य याची लूट करून स्वराज्य कामी उपयोग केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील सुरतच्या पहिल्या लुटीत ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ मध्ये" विक्रम शाह राजे पाहिले" यांनी १०० घोडदलाची मदत करून त्यांचा मोरचुंडी येथील माळरानावर भव्य सत्कार केला ( २९ ते ३० डिसेंबर १६६३) त्याची साक्ष अजून आहे. त्या माळास "शिरपामाळ "म्हणतात. २२ वर्षे त्यांनी सतत संघर्ष केला. शेवटी ६ जून १३१६ साली सदानंद महाराज यांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने जव्हारचे राज्य स्थापन झाले. जायबा राजाचा राज्याभिषेक झाला. आणि जव्हार राज्याचे प्रथम राजे म्हणून त्यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. एक मानाचा शिरपेच त्यांच्या मस्तकावर चढला. आणि महादेव कोळी राजाचा हा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला गेला.
तत्कालीन आदिवासी समाजाने आणि महादेव कोळी बांधवांनी तो क्षण अंतःकरणात साठविला. अजूनही त्याच्या खाणाखुणा आणि जव्हार घराण्याचे वारसदार हयात असून पुणे येथे मुकणे राजघरण्यातील वारसदार श्रीमंत महेंद्रसिह दिग्विजयसिंह मुकणे राहत आहेत. तसेच नांदगाव (वरचे) मोखाडा तालुका येथेही जव्हार राज्याची दुसरी गादी होती. येथेही राजघराण्याचे वारसदार अजून निवास करून आहेत.
पुढे १३३९ मध्ये मोगलांचा दक्षिणेत म्हणजेच दख्खन प्रांतात शिरकाव झाल्याने दिल्लीचे खिलजी घराणे (अल्लाउद्दीन खिलजी)तुघलक घराणे आणि हैद्राबाद येथील बिदरशाही घराण्यातील अहमद शाह वली यांनी देखील जव्हार राज्याला बऱ्यापैकी त्रस्त केले, परंतु जव्हारच्या प्रत्येक राजवटीने मुत्सद्दीपणा व शौर्य दाखवत आपले राज्य अबाधित ठेवले.
शेवटी दिल्लीच्या महंमद बिन तुघलक याने जायबाचे जेष्ठ पुत्र धुळाबा यांना "नेमशाह "असे नामकरण करून ६ जून १३४२ राज्याभिषेक करवून अधिकृतपणे गादीवर बसवले आणि संपूर्ण कोळवणात आदिवासी कोकणा समाज, महादेव कोळी बांधव, कातकरी, वारली, ठाकर समाजाला आनंदाचे भरीत आले. स्वराज्याचे तोरण बांधले गेले. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात कस्तुरीच्या गंधाप्रमाणे राज्याची किर्ती पसरली.
पुढे पोर्तुगीज, रामनगरचे राजे सोमशाह, पेशवाई आणि इंग्रज यांच्याशी देखील जव्हार संस्थानला तोंड द्यावे लागले. आणि त्यांनी ते समर्थपणे पेलले. विशेष म्हणजे जव्हार राज्यातील राणी साहेबानी केलेला राज्यकारभार फारच डोळ्यात भरतो. प्रथम राणी साहेबा आणि जायबा यांची सुविद्य पत्नी मोहनाबाई, राणी साहेब सईकुवरबाई, लक्ष्मीबाई, गोपिका बाई, सगुणाबाई, सरस्वती बाई, प्रियवंदा साहेबा यांचा कर्तृत्वाचा इतिहास डोळ्यात भरतो.
या निमित्ताने समस्त आदिवासी बांधवांनी जव्हार राज्याभिषेक सोहळा व स्थापना दिवस साजरा करून श्रीमंत राजे जायबा ते यशवंत राव मार्तंडताव मुकणे यांच्या कर्तृत्वास अभिवादन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन केले पाहिजे.
जव्हार राज्य स्थापना दिवसाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!
जोहार ! हर हर महादेव! जय आदिवासी !
संदर्भ : यशवंत (जव्हार संस्थान चा जाज्वल्य इतिहास)
• लेखक : डॉ. गोपाळ रामा गवारी
( पुस्तक खरेदी करण्यासाठी आपण लेखकांशी +91 95457 71603 या नंबरवर संपर्क करू शकता.)
0 comments :
Post a Comment