किल्ले हरिहर ट्रेक With गडवाट 28 Dec 2013





किल्ले हरिहर ट्रेक With गडवाट

दि.२८/१२/२०१३ रोजी सकाळी पाच वाजता सर्व तयारी करून रूम सोडली. बाहेर काळाकुट्ट अंधार मनाला थोडासा चलबिचल करण्यास भाग पाडत होता. त्यात लागाचा घाट म्हटल्यानंतर अनेकांना अंधारात प्रवास करताना धडकी भरते....परंतु मनातील सर्व इच्छा एकत्र करून मी माझी बाईक सुरु केली ट्रेकची वाटचाल सुरु झाली. ब्राम्हणवाडा, कोतूळ, राजूर , रंधा धबधबा असा प्रवास करत असताना आजूबाजूला धुक्यातून निसर्गाचे विलोभनीय दर्शन मनाला पुढील प्रवासासाठी जणू चेतावनीच देत होते. रस्त्यात मोरांचे झालेले दर्शन नवीन अनुभवांची चाहूल करून देत होते. कलसुबाईच्या पायथ्याजवळून जात असताना मनोमन देवीची प्रार्थना केली व ट्रेक सुखरूप आणि आनंददायी होण्याचा आग्रहच धरला. धुक्याची दुलई आणि अंगाला झोंबणारी थंडी....सभोवताली मनाला दिलासा देणारा भंडारदरा परिसरातील पक्षांचा चिवचिवाट.....डीसकव्हर राईड आणि नेहमीप्रमाणे एकटा पण जातिवंत The Son Of Sahyadri....!    

सह्याद्रीतील हा अनुभव पुन्हा माझ्या नशिबात असेल कि नाही मला माहित नाही. पण आजच्या या निसर्गरम्य सफरीबद्दल सह्याद्रीला त्रिवार धन्यवाद देतो.  माझ्यासारख्या उनाड, स्वच्छंदी पाखराला मायेची ऊब देण्याचे काम शिवस्पंदन युवा आणि गडवाट या माझ्या परिवारांनी केले....त्यांचेही ऋण मी कदाचित कधी फेडू शकणार नाही. ठिक सकाळी ८:३० वा. घोटीमध्ये पोहचलो. ईश्वर सहाणे यांना फोन केला असता ते शेतात पिकाला पाणी देत असल्याने उशीर होणार असल्याची मला जाणीव झाली. थोडावेळ चहा घेतल्यानंतर मनाला काही चैन पडत नव्हती. दत्तू भवारी यांच्याकडून हरिहर किल्ल्याकडे जाणा-या मार्गाची माहिती घेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. एकटाच असल्याने मनाला थोडासा थकवा जाणवत होता. परंतु नेहमीच उर्जा देणारे गडकोट आणि त्यातील हा एक हरिहर मला प्रेरणा देत होता.   सकाळी ठिक ९:३० वा. मी एकटाच वैतारणा येथे पोहचलो. धरणाचा परिसर बघून आतापर्यंतच्या प्रवासाचा सारा थकवा नाहीसा झाला होता. तेवढ्यात गडवाटकरी घोटीतून वैतारणाकडे येत असल्याचे समजले. तोपर्यंत ईश्वर सहाणे व दीपक खातळे पोहचले होते.    


सर्व गडवाटकरी आल्यानंतर मग एकच जल्लोष सुरु झाला....सर्व सह्याद्रीच्या प्रेमातून झालेले जीवाभावाचे भेटल्याने एकमेकांना आलिंगन देत होते. दुपारी १२:३० च्या सुमारास आम्ही सर्व कोटमपाडा येथे पोहचलो. कोटमपाडा हे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव.   गडवाट परिवारात दाखल झालेल्या सर्व गडवाटकरींचे स्वागत सुहास पवार याने केले. सर्वांची ओळख झाल्यानंतर ट्रेकच्या नियमानुसार सर्वांचे फॉर्म भरून घेण्यात आले. हि बाब मला खूप आवडली. एखाद्या बाबीची जबाबदारी किती जबाबदारीने पेलायची याचा संदेश यातून मला मिळाला. ट्रेक करत असताना घ्यावयाची काळजी याविषयी सुचना केल्यानंतर गावात विक्रांत गायकवाड याने एकच गारद दिली......गारद ऐकून वातावरण अगदीच शिवमय झाले होते. प्रत्येकाच्या नजरेत गावातून हरीहरचा दिसणारा भगवा ध्वज....आणि त्याच्याबाजूने असणारे कातळकडे....श्वास रोखून.... हा किल्ला कधी एकदाचा सर करतो असेच प्रत्येकाला वाटत होते.  दुपारी १:१५ च्या सुमारास गडावर जाण्यासाठी सर्वांनी आगेकूच सुरु केली. अनेकांनी आपले क्लिकक्लीकाट करण्याचे साहित्य बाहेर काढले. 


गावातील आदिवासी जीवनशैली नजरेला काही प्रमाणात लाजवून गेली. काही मुले तीही अगदीच अशक्त खेळत असताना दिसली. अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. कसे असतील? जंगल संपदा जवळपास संपुष्टात आलेली....पोटाची खळगी भरण्यासाठी भक्त भात शेती....तीही तुकड्या-तुकड्यांची...त्यामुळे वर्षातील काही महिने उपासमारच....लोकांची शरीरयष्टी अगदीच हाडं दर्शविणारी....स्त्रिया तोकडे धान्दुक (एका लुगडयाचे दोन भाग करून नेसणे) नेसलेल्या....जेमतेम आपली लाज झाकण्याचाच प्रयत्न....आम्हाला बघून एकटक आमच्याकडे बघणारी गावातील मंडळी बघून माझे तर हृदय हेलावत होते. हि सामाजिक दरी दूर करण्यासाठी सरकारदरबारी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु ज्यांच्यासाठी त्या असतात त्यांच्यापर्यंत त्या दुर्दैवाने पोहचत नाहीत. कोटमपाडा परिसरातील दुख उरात साठवून मी सर्वांसोबत गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. हर्षगड हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला असावा याची प्रचीती आपणास दुरूनच येते. गडाच्या दिशेने पाऊले टाकत असताना सहज गडाचा इतिहास आठविण्याचा प्रयत्न करत होतो.  

अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात एक महत्त्वाचा किल्ला होता. किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.  गडाच्या पायथ्यापासून  गडाच्या उत्तुंगपणाची  जाणीव झाली....गडावर चढत असताना अगोदरच्या आजारपणाचा अशक्तपणा अधिकच त्रासदायक ठरू लागला होता. परंतु गड सर करायचाच हा ध्यास मला कुठे थांबू देत नव्हता. मनस्थिती थोडीसी बिघडल्याने मग क्लिकक्लीकाट माझा अगदीच थंड झाला होता. दुरूनच गडाच्या पाय-या मनात भरायला सुरुवात झाली होती आणि तसतसा या पाय-यांचा ऐतिहासिक उल्लेख माझ्या मनात डोके वर काढत होता....  १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही.  यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या   पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.    

या पाय-या चढण्याचा थरार अनुभविन्यापुर्वीच अधिक त्रास जाणवू लागल्याने मग मी माझी वजनदार BAG विठ्ठल गोरेकडे दिली. त्यामुळे थोडेसे हलके वाटले आणि सर्वांच्या पाठीमागे अनेकांशी बोलणे टाळत मी  एक  एक पायरी काळजीपूर्वक चढत होतो.  शेवटी नव्वद पाय-या  चढल्यानंतर  मुख्य प्रवेशद्वाराशी पोहचल्यानंतर मनाला एकच हर्ष झाला. प्रवेशद्वाराच्या  शेजारीच दोन छोटे  बुरुज आहेत जे प्रवेशद्वाराची शोभा वाढवतात..परंतु सध्या त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. वेळीच त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  प्रवेशद्वाराची निगा आणि बुरुजांची दुरावस्था यांचा विचार मनात घोळतच अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पाय-यांचा दगडी जिना लागला. येथील थंडगार हवा तर गड सर केल्याचे चीज झाले असाच संदेश देत होती.  गडाच्या डाव्या बाजूने पुढे जात असताना काही पाण्याची टाकी दिसली. त्यात काही प्रमाणात पाणी होते. परंतु त्यांचीही पुरेशी निगा न राखल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता. त्यामुळे त्यातील पाणी पिण्यायोग्य दिसत नव्हते.   येथून पुढे माझी नजर पुरातन अवशेष शोधत असताना समोर घुमटाकार माथा असलेली दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशी दगडी कोठी दिसली.. कोठीचे  प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख होता.. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव शाबूत असलेली इमारत आहे.  गडाच्या या सपाट भागावर येईपर्यंत सर्वांना जोराची भूक लागली होती.

ईश्वर सहाणे व दीपक खातळे यांनी घरूनच बनवून आणलेल्या चपात्या आणि विशेष असा ठेचा सर्वांना देण्यात आला. भूक लागलेली असल्याने सर्वांनी एकच ताव मारला....मी सुद्धा आक्रमण केले होतेच....परंतु चार-पाच घास खाल्ल्यानंतर नाकातून-कानातून ठेच्याचा धूर निघायला सुरुवात झाली. पाणी पिऊन मी अगदी हैराण झालो परंतु तिखटपणा काही जात नव्हता. शेवटी मग पेढ्यांवर ताव मारण्यात आला. पेढ्यांमुळे मग काही प्रमाणात तिखटपणा कमी झाला होता. मग काय सर्वांना चर्चा करण्यासाठी आयताच विषय मिळाला होता.   

जेवण करत असताना सूर्य मावळतीकडे सरकत होता. म्हणजे आमच्याकडे आता कमी वेळ शिल्लक होता. म्हणून थोड्याशा घाईनेच हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणा-या टेकडीकडे आगेकूच केली. सभोवताली धूसर वातावरण असल्याने निसर्ग पाहिजे तसा आपले रूप आम्हाला दाखवत नव्हता. माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसली..इथे आल्यानंतर सर्वोच्चतेचा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर जाणवत होता.

  परतीचा प्रवास सुरु करण्याची सुचना सुहासने दिल्याने सर्वजण घाईत परंतु तितक्याच काळजीने गड उतरत होते. वाटेत चोर दरवाजा पाहण्याची संधी प्रत्येक जण घेत होता.....हरिहरच्या पाय-या चढण्यापेक्षा उतरताना अधिक धोकादायक वाटत असल्याने सोयीच्या दृष्टीने रोप लावण्यात आला. त्याच्यासाह्याने सर्वजण खाली आले. शेवटी अंधारात धडपडत....पाय मुरगळत ७:०० वाजता कोटमपाडा या पायथ्याच्या गावात आलो. ईश्वर सहाणे यांची ऐतिहासिक माहिती....नंतर हजेरी झाली आणि मग काहीसा हर्षोल्हासात परतीचा प्रवास सुरु झाला......!!!   

_/\_ गडवाटकरी 
 ©www.rajuthokal.com

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.