राघोजी भांगरे, आद्य आदिवासी क्रांतिकारक यांची आज 212 वी जयंती....त्यानिमित्त या महामानवास विनम्र अभिवादन...!
सावकारी पाशातुन आदिवासी बांधवांना मुक्त करण्याचे धैर्य दाखविणा-या या आदिवासी युग पुरूषाचे कार्य सामान्य जनतेपर्यंत जाण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज.
राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.
जीवन
राघोजींचा जन्म महादेव कोळी जमाती झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्या, वतनदार्या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरीबांना रोखपैश्याची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. सावकार आणि ब्रिटिशांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली.
इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले . परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंतॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.
ठाणे गॅजेटियराच्या जुन्या आवृत्तीत "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले. राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरामध्ये सापडतो.
सातार्याच्या पदच्यूत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छळ करणाऱ्या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती . कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता . टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी,त्रंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडाच्या काळात तो देवदर्शनाला गेला होता. तेथे त्याला पकडले. ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही. त्याने स्वतःच बाजू मांडली.
फाशी
२ मे १८४८ रोजी त्याला फाशी देण्यात आली.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
*राघोजी भांगरे चरित्रगीत:-
झाडामधी झाड । झाड उंच पांगाऱ्याच ॥
राघोजीनं केला बंड । नाव सागं भांगऱ्याच ॥१॥
नाव देवगावं, याच्या वेशीमधी चीरा ।
रमाबाईच्या पोटी राघु जन्मला हिरा ॥२॥
राघुनं केला बंड, केला नवतीच्या भरात ।
घेतलं वचन वरसुबाईच्या दारात ॥३॥
राघुनं केला बंड, जव्हार हद्दीला ।
नाही लावला धक्का, त्यांनी राजुर गादीला ॥४॥
रमाबाई बोले, राघु कुठवरी गेला ।
जांबगावा पासी, रात्री सावकाराला आडवा झाला ॥
रमाबाई बोले, राघु कुठसी भेटला ।
जांबगावा पासी, रात्री सावकाराला लुटीलं ॥५॥
राघुनं केला बंड, घाटाखाली कोकणातं ।
शिदा घ्यायला आला यं । काळुरस्त्याच्यादुकानात ॥६॥
राघुनं केला बंड, कोकणाच्या वाटेवरी ।
मंजील बाधुंन आलाय घाटावरी ॥७॥
राघुनं केला बंड, धवाळ माळीच्या नाकाला ।
पडीला दरारा, आंबेवाडीच्या वाण्याला ॥८॥
कळसुबाईच्या डोंगरी । निळ लाविला फरारा ।
राघु भांगऱ्याचा । बंडु वाण्याला दरारा ॥९॥
वारंघुशी गावात, उभा राहिला पाशवं ।
टाकीला दरोडा, गोसांरवाण्याच्या घरावं ॥१०॥
राघुनं केला बंड, याच्या पायामधी तोडा ।
गुलाब वाण्याच्या । दिला दुकानाला वेढा ॥११॥
राघुनं केला बंड, उभा राहिला खिडकी ।
भेसाळवाण्याची उघडी मागली खिडकी ॥१२॥
भेसाळीन बोले माझा भेचाळ ।
भेसाळीन बोले माझा एकलुता एकला ॥१३॥
राघुनं केला बंड, भंडादऱ्याच्यानहेरी ।
खातो वरियाची भाकरी व आंब्याची कयरी ॥१४॥
रमाबाई बोले, राघु गेलाय उपाशी ।
रतणुबाईच्या गडावं गर्दी झालीय तोफांची ॥१५॥
खेचल्या बंदुका, लोक बसलेल्या वायला ।
राघु गेलाय निघुन गेला हेल्याच्या ॥१६॥
शिळवंडी घोटीत नाव सांगतो कोळ्याचा ।
शिळवंडी घोटीत जेवण जेवतो पोळ्याचा ॥१७॥
रमाबाई बोले, राघुला नाही कोणी ।
शिळदंडी घोटीत, राघुच्या माया बहिणी ॥१८॥
अकोले पेठामधी, राघु भांगऱ्याचाशिक्का ।
राघुन केला बंड, नाही गरीबांना धक्का ॥१९॥
संगमनेरच्या पेठामधी, राघु खेळेढालपट्टा ।
राघु खेळे ढालपट्टा तोडती शिपायांची बोटा ॥२०॥
राघुने केला बंड, गाव शेलीरा वाडाला ।
लागलं गुलब्यावाणी आता राघुच्या हाताला ॥२१॥
राघुने केला बंड, त्याच्या कंबरी साखळी ।
मारला गुलब्यावाणी केली गरीबा मोकळी ॥२२॥
राघुने केला बंड, माळे गावाच्या लवाला ।
सोयरा म्हणुन नाही । कोनाला गवला ॥२३॥
रमाबाई बोले, राघु माझा तो गोसाव्या ।
जरीचे पातळ आहे रमाला नेसाया ॥२४॥
रमाबाई बोले, राघु माझा बंडामधी ।
सव्वाकिलो याळा रमाच्या दंडामधी ॥२५॥
रमाबाई बोले, राघु माझा तो झोकात ।
दोन तोळ्यांची नथ आहे, रमाच्या नाकात ॥२६॥
नाव देवगावं, वेशीमधी वळ्शाला ।
आली राघुला जपती, बाडगीच्या पाम्या गेला ॥२७॥
राघुने केला बंड, बारीच्या दऱ्यांनी ।
ओवाळाया आल्या त्याला आया-बहिणी ॥२८॥
राघुने केला बंड, गांव बार शिगवा ।
पांडव कड्याला झेंडा लाविला भगवा ॥२९॥
राघुने केला बंड, धामणीला धक्का मोठा ।
पिंपळगावाच्या लवाला, राघु खेळेढालपट्टा ॥३०॥
राघुने केला बंड, केला मोराच्या डोंगरी ।
सर्वजण आले त्याच्या बरोबरी ॥३१॥
राघु करीतो आंघोळ, वज्राबाईच्याकुंडात ।
सोन्याचा कंगण आहे, राघुच्या दंडात ॥३२॥
राघु करीतो आंघोळ, वज्राबाईच्यातळ्यात ।
सोन्याचा चौसरा आहे, राघुच्या गळ्यात ॥३३॥.
~गायिका:-
सोमाबाई बांडे
पेनशेत,अकोले,जिल्हा:-अहमदनगर
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
क्रांतीसुर्य राघोजी भांगरेचा जीवनपट-
१)राघोजी भांगरेचा जन्म:८/११/१८०५
२)आईचे नाव: रमाबाई
३)वङिलांचे नाव: रामजी भांगरे
४)क्रांतीचा उदय: १८२६
५)क्रांतीची प्रतिज्ञा:१८२७
६)सह्याय्यक सल्लागार:देवजी आव्हाङ
७)अंगरक्षक:राया ठाकर
८)राघोजीचे उठाव उग्र:१८२८
९)इंग्रज सत्तेचा विरोधात:१८३०
१०)भिल्ल समाजाची मदत:१८३०
११)राजे उमाजी नाईकांना अटक:१८३१
१२)राघोजींना पकङण्यास मोठे बक्षिस:१८३२
१३)रतनगङ परिसरात उठाव:१८३८
१४)बापु भांगरेस अटक:१८३८
१५)गोर्यांचा मोठ्या फौजा दाखल: १८४३
१६)राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट: १८४४
१७)जुन्नरचा उठाव: १८४५
१८)उठावाच्या ठावठिकाणाचे शोध: १८४६
१९)राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल: १८४७
२०)पंढरपुरमध्ये दर्शनासाठी: १८४८
२१)आद्य क्रांतीविर राघोजी भांगरेना फासी: २मे१८४८
0 comments :
Post a Comment