शाळाबाह्य

शाळाबाह्य

      'अ' रे आईचा...., 'ग' रे गवताचा असे कोमल स्वर कानावर पडताच दत्तू जागा झाला. तसा तो रोज लवकर उठतो. सम्पूर्ण रोजपाड्यात त्याच्या सारखा कष्टाळू दुसरा कोणी नव्हता. परंतु शिक्षणाअभावी त्याला सर्वच फसवत असत याची जाण त्याला आली होती. रात्रभर डोकं दुखत असल्याने तो आज नेहमीच्या वेळेत उठला नव्हता. त्याची बायको, झिंगी, ती उठून केव्हाच विहिरीवर पाणी आणायला गेली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस न झाल्याने संपूर्ण वाडीला टिपवन आली होती. यमुना उठून घरात आपलं आवरत होती. यमुना हि दत्तुची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे दत्तुला वाटत होते कि आपण नाही शिकलो पण आपली मुलगी नक्की शिकली पाहिजे.

     शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे सर्व मुले-मुली मोठ्या उत्साहात जोरजोरात शिक्षकांच्या मागे अ... आ....ई म्हणत होते. तो आवाज ऐकून दत्तू झोपेतून जागा झाला होता. त्याला यमुनाला घेऊन शाळेत जायचे होते. ती आता पाच वर्षांची झाल्याने, तिला पहिल्या वर्गात टाकावे असा निश्चय दत्तुने केला होता. आज पर्यंत कधीही शाळेचे तोंड न पाहिलेला दत्तू शाळेसाठी स्वताला आवरत होता. झिंगी हंड्याची दुड घेऊन आली. आपला नवरा आज मुलीला तयार करत आहे हे पाहून तिला नवल वाटत होते. कशी तरी अंघोळ उरकून त्याने यमुनाला हाताशी धरले व शाळेची वाट चालू लागला.

      झपाझप पावलं टाकत तो गावातून जात असताना त्याला दुकान दिसले. त्यातून एक पाटी व पेन्सिल त्याने विकत घेतली. यमुना त्याच्याकडे खाऊचा हट्ट करत होती. परंतू पाटी पेन्सिल घेतल्यावर त्याच्या खिशात दमडीही उरली नव्हती. आपण नंतर खाऊ घेऊ अशी तो समजूत काढत होता. यमुना मात्र दुकानातच बसून रडत होती. शाळेत जाणारी चिमुकली रडत असल्याचे पाहून शेवटी दुकानदारानेच एक चॉकलेट तिच्या हातावर ठेवला. तिचं रडणं लगेच गायब झालं व ती हसत शाळेच्या रस्त्यावर दत्तूमागे चालू लागली.

      शाळेची प्रार्थना झाली होती. सर्व मुलं आपापल्या वर्गात गेली होती. प्रार्थनेचा लाऊड स्पीकर काढणारी एक दोन मुलं दिसली. त्यांच्याकडं दत्तुनं ऑफिस कुठे आहे अशी चौकशी केली. मुलांनी दुरूनच बोटाने ऑफिस दाखवले व आपले काम करू लागले. पहिलाच दिवस असल्याने काही वर्गात साफ सफाई तर काही वर्गांत ओळख सुरु होती. हे सर्व दत्तुला नवीन होतं. म्हणून तो कुतुहालाने सर्व काही पाहत होता. हळूहळू चालत असताना कधी ऑफिस आले ते त्याला समजलेच नाही.

"ओ पाव्हणं काय काम काढलं" असं शिपायानं दरडावून विचारलं.

"काय नाही...." असं गोंधळत दत्तू पुटपुटला.

      काही पालक आपल्या मुलांना वर्ग दाखवत असल्याचे दत्तू पाहत होता. त्याचे मुळात आपल्या बरोबर कोण बोलतय याकडे लक्षच नव्हते.

"काही काम नाही तर मग कशाला गर्दी करता....जा घरी आपल्या...आम्हाला आमची कामे करू द्या", शिपाई आता जरा मोठ्याने ओरडला.

     दत्तू आता थोडा स्वताला सावरत यमुनाचा हात धरून शिपाई काय म्हणत आहे त्याकडे लक्ष्य देत होता.

"काय नाही....जरा या माझ्या मुलीला पहिलीच्या वर्गात टाकायचं होतं".

"आता नाही जमणार....तुम्ही जा घरी"

"का नाही जमणार....आज तर पहिलाच दिवस आहे"

"अहो तुमच्या सारखे असे खूप पालक येऊन गेले....वर्गात बसायला जागा नाही पहिलीच्या वर्गात....तेव्हा तुम्ही अजून डोकं लावू नका"

"....पण मग मी माझ्या मुलीला घेऊन कोणत्या शाळेत जाऊ?" दत्तू विनंती करत होता.

"कुठेही जा तो तुमचा प्रश्न आहे....आमचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत".

"मला मुख्याध्यापक सरांना भेटू द्या....मग बोलतो त्यांच्याबरोबर"

"ते बघा तिकडे खुर्चीत बसलेत.....पण काही उपयोग होणार नाही"

     दत्तुने यमुनाचा हात धरला व पटकन मुख्याध्यापकांकडे गेला. नमस्कार करून मुलीला प्रवेश द्यावा अशी विंनती करू लागला. मुख्याध्यापक शांत स्वभावाचे होते. त्यांनी दत्तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

"त्याचं कसं आहे दत्तू भाऊ....आपल्या आश्रमशाळेत फक्त पन्नास मुलांना प्रवेश असतो. आपल्याकडे काही तुकडी नाही. तरी आपण जवळपास 80 मुलांना प्रवेश दिलेला आहे....तेव्हा आता मी काही जास्त प्रवेश देऊ शकत नाही"

"पण सर मी गरीब माणूस....माझ्या मुलीला दुसरीकडे कुठं शाळेत टाकणार....मलाच खायची चिंता तर तिचा शिक्षणाचा खर्च कसा करणार?" दत्तू आर्जव करत होता.

"दत्तू तू एक काम कर प्रकल्प कार्यालयात जाऊन तुझ्या मुलीचे नाव नोंदव.... मग तिकडून नाव आले तर बघू"

"अहो सर तिकडे जायला पैसे तर कुठं आहेत....मग जाणार कसा....आणि गेलो तरी तिथं सगळे घोड्याच्या पोटचे....कोणी ऐकून घेत नाही", दत्तू आता वैतागला होता.

"अरे तू जा तुझ्या मुलीचे नक्की ऍडमिशन होईल"

        वर्गात मुलांचे पाढे म्हणणे चालू होते. आपल्या मुलीला हि संधी मिळते कि नाही असा विचार करत दत्तू जडपावलांनी माघारी फिरला होता. आता प्रकल्प कार्यालयात जायचे म्हणजे पैसे हवेत....ते कोठून आणायचे या विचारात तो घरी पोहचला. काहीही झाले तरी मुलीला शाळेत टाकायचेच हा निर्धार त्याने केला होता.

        दुस-या सकाळीच उठून तो खंडू सावकाराकडे गेला. आपली अडचण सांगून काही मदत मिळेल का म्हणून त्याने विनंती केली. खंडू सावकाराने हसत म्हटले, "अरे तुझी पोर शिकली, तर शेतात कोण काम करील रं? मोठा आला पोरीला शिकणारा...ते काय तुझं काम नाही...जा घरी जा"

"नाही सावकार....काही तरी मदत कराच....माझी पोरगी नक्की शाळेत जाणार", दत्तुने सावकाराला विनंती केली.

"तू म्हणत आहे तर करतो...पण अशा खाली हाताने आलेल्या माणसाकडून काय तारण मिळणार? आणि त्याशिवाय आम्ही कशी मदत करणार?", सावकाराने आपला डाव टाकला.

"सावकार तुम्ही म्हणाल ते करील....आता माझ्याकडं काही नाही....तुमच्या शेतात रात्रं दिवस काम करील हा शब्द देतो...पण तेव्हढी मदत कराच"

"तू माझ्या काय कामाचा....अगोदरच कामाला खूप माणसं आहेत. त्यांना पगार द्यायला मला परवडत नाही आणि त्यात तुला ठेऊ काय?"

"नाही सावकार....नाही म्हणू नका....माझ्या एकुलत्या एक मुलीसाठी तुम्ही म्हणाल ते करील", दत्तुने सावकाराचे पाय पकडले.

            आता शिकार आयती सापडली असल्याचे पाहून सावकाराने फासा टाकला,

"तू नाही पण झिंगीला पाठव वाड्यावर कामाला....बघ तुझी इच्छा...नाही तर मग जा तू" सावकार काहीसा हळू आवाजात बोलला.

        गरजेपुढे माणूस लाचार होतो तशी अवस्था दत्तुची झाली होती. पण नकार देऊन त्याला यमुनाची शाळा बुडवायची नव्हती.

"व्हय....व्हय सावकार.....उद्यापासून झिंगीला वाड्यावर कामाला पाठवतो....तुम्ही फकस्त त्येवढं पैशाचं काही तरी करा...मह्या पोरीला औंदा काही झालं तरी शाळेत पाठवायचं आहेच" दत्तू काहीसा अडखळत बोलत होता.

       सावकाराची अट दत्तूनं मान्य केल्याने त्याने लगेच खिशातून पाचशे रुपयांची नोट दत्तूसमोर धरली. दत्तुला बरं वाईट काही सुचत नव्हतं. त्याला फक्त आपल्या मुलीच्या ऍडमिशनसाठी प्रकल्प कार्यालयात जायचं आहे हेच कळत होतं.

       दत्तूने सावकाराकडून पैसे घेतले व घर गाठले. झिंगीला यमुनाचं आवरायला सांगितलं. कारण तिला सोबत घेऊन जाणं गरजेचं व्हतं. झिंगीनं उत्सुकतेनं विचारलं,

"काय मग....लेकीला आज कुठं घेऊन जाताय? जरा कामाचं बघा"

"अगं काय काम काम सारखी बोंबलत असते. आपल्या यमुनाला यावर्षी काही झालं तरी शाळेत टाकायचं आहे. म्हणून आम्ही जरा तालुक्याला जाऊन येतो" दत्तू पुटपुटला.

"अहो जायला यायला पैसं नको का खिशात....आधीच कामाचा कुठं पत्त्या नाय....कुठून आणणार पैसं?" झिंगी विचार करून बोलत होती.

"काय नाय गं....गरज असली कि मार्ग आपोआप मिळत जातात. हे बघ सावकाराने दिलेत पैसे....यात आपण यमुनाच्या शाळेची सोय करू शकतो"

"सावकार....आणि पैसे.....काय बोलता काय तुम्ही असे?....अहो पण तो मेला कुणाला काही फुकट देत नाही आणि तुम्हाला पाचशे रुपये दिलेत.....काय नक्की कोणता डाव खेळलाय तो?" झिंगीला सावकाराची खोड माहीत होती. म्हणून ती अधिक चौकशी करत होती.

"थोडेच पैसे घेतलेत.....तू लगेच फेडशील कि वाड्यावर कामाला जाऊन....आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी हे सारं तर करायला हवंच"

      झिंगीला वाड्यावर कामाला जायचं म्हटल्यावर तिचं डोकं फिरलं....तिला सावकाराची खोड माहीत होती. आपण नक्की कोणत्या दुष्टचक्रात अडकलो आहोत याची जाणीव तिला हळूहळू होत होती. पण नव-यापुढे तिला अधिक काही बोलता येत नव्हते.

      दत्तूने यमुनाला सोबत घेतले व बस स्थानकाकडे जायला निघाला. शेजारचे त्याला कुठे निघालास म्हणून विचारत होते. तो मोठ्या उत्साहाने मुलीला शाळेत जागा करायचीय म्हणून तालुक्याला चाललोय प्रकल्प कार्यालयात असे सांगत होता.

        दुपारची बस पकडून दत्तू तालुक्याला प्रकल्प कार्यालयात आला. याच्या अगोदर तो कधी या ऑफिसात आल्याचे त्याला आठवत नव्हते. दुपारचे एक वाजले होते....पण त्याला कोणी कामाच्या जागेवर दिसत नव्हते. आता कोणाला भेटावे म्हणून सतत इकडून तिकडे चकरा मारत होता. यमुना मात्र खुश होती. कारण तिला आज गाडीत बसायला मिळाले होते. मोठी हिंमत करून दत्तुने एका सुटाबुटातल्या माणसाला विचारले,

"अहो साहेब ते मुलांचे शाळेसाठी नाव कुठे नोंदवतात हो?"

समोरच्या व्यक्तीने वर न पाहता उत्तर दिले,

"हि काय शाळा आहे का? हे प्रकल्प कार्यालय आहे तुम्हाला समजत नाही का? जा इथून निघा....."

दत्तूला आपलं काय चुकलं हेच समजलं नाही. पण समोरच्याशी नको वाद घालायला म्हणून त्याने दुसरा माणूस शोधन्याचा प्रयत्न केला.

To be continue......

-Raju Thokal


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.