ऋण.....!
नव्वदच्या दशकात 25 पैशांची पेन्सिल घेण्यासाठी हट्ट धरायचो लहान असताना....त्याशिवाय शाळेत जाणार नाही असा सूर लावून धरायचो. वडील एकदा दोनदा समजावून सांगायचे, "अरे आज नाही उद्या देतो". परंतु मी काही ऐकत नसायचो. तेव्हाची ती वडिलांची मजबुरी समजून घेण्याची बुद्धी मला नव्हती. पण आज काळाने आणि परिस्थितीने खूप काही शिकवलं....दाखवलं. आश्रमशाळेत शिकताना आंबरे सरांनी खूप फटकवल्याने नशिबाने चांगला निकाल लागला आणि आम्ही पास झालो. दहा रुपयांचे पेढे वाटल्याचे मला आजही आठवते.
दहावी पास झाल्यावर फक्त अकोल्याला जायला भाड्याला पैसे नव्हते म्हणून जवळ समशेरपुरला आर्ट शाखेला फक्त 100 रुपयात प्रवेश घेतला आणि इच्छा असूनही विज्ञान शाखेला कायमचा गुडबाय केला. प्रवाहाच्या विरोधात आणि मनाच्या विरोधात एखादी गोष्ट करणे सोपे नसते, परंतु वडिलांच्या भावनांचा ठाव घेत ते मी स्वीकारले. बारावीला 62 टक्क्यात पास झालो तेव्हा आजच्या 90 टक्के मिळविणारांपेक्षा सातपट अधिक आनंदी होतो. पुन्हा वडिलांनी दहा रुपये दिले होते पेढे वाटायला.
बारावीनंतर अकोल्यात शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाल्याने कॉलेजचा प्रवास सुकर झाला. परंतु जशी जाणीव होत गेली....तसा वसतिगृहातील संघर्ष अनुभवत गेलो. जेवणातले सोंडे, भाजीतल्या आळ्या बाजूला करून पोटाची भूक भागवून अभ्यास करण्यावर लक्ष्य दिले. इंग्रजी कच्चे असतानाही कॉलेजला इंग्रजी विषय निवडला....त्यामुळे रात्रं-दिवस अभ्यास करत होतो. कॉलेजात प्राध्यापक काय शिकवतात ते समजत नव्हते.....त्यात ते अनेकदा मराठीतच शिकवत होते. त्यामुळे त्या शिकण्यात मन रमत नव्हते. मग काय चांडाळ चौकडी (सचिन शिर्के, दीपक यादव, चंदू शेणकर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली, भरत बनकर असे अनेक....लोकांच्या शब्दात उनाड आणि पोरींच्या मताने टुकार) जमा करून कॉलेज कट्ट्यावर गप्पा मारत बसत असत. पगारे सर खूप चांगले शिकवायचे. परंतु त्यांच्याही तासाला बसण्याची मानसिकता नव्हती. कारण त्या वर्गात सर्व उच्च वर्गीय श्रीमंत बापाची मुलं-मुली अधिक असल्याने माझे त्यांच्याशी काही जुळत नव्हते. असे असतानाही कॉलेजनंतर पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करून बी.ए. ला इंग्रजी विषयात पहिला आलो. खरं तर दोन तासात पेपर देऊन बाहेर यायचो, त्यामुळे पहिला येईल असे वाटले नव्हते.
खरा अभ्यासाचा संघर्ष पुणे विद्यापीठात करावा लागला. पूर्ण वेळ अभ्यास करून तिथे काय शिकविले जायचे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचो. प्रवीण थोरात, ज्ञानेश्वरी, संदीप पगार, शंकर भोईर यांनी एम ए चा अभ्यास सोयीस्कर करून समाजवून दिल्याने अधिक मदत झाली. एम ए चे दुसरे वर्ष सुरु असतानाच बी एडची सी ई टी दिली. काही विशेष वेगळा अभ्यास नसताना तेव्हा st च्या मिरीटमध्ये राज्यात तिसरा आलो होतो. इच्छा नसताना फक्त चांगले गुण मिळाल्याने बी एड साठी टिळक शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेतला. टिळक म्हणजे वैतागाचा कळस अशी व्यवस्था तिथे होती त्याचा अनुभव यायला जास्त उशीर लागला नाही. माझ्या भाषेवरून रोजच मला टोमणी ऐकावी लागत होती. परंतु त्याला न जुमानता माझ्या भाषेचा गर्व करत मी ते सारं झेललं. अमित खरात, मिलिंद खडताळे, हनुमंत झांजरे यांच्याबरोबर लेसन नोट, पाठ, प्रॅक्टिकल चुटकी सरशी पूर्ण केल्या. टिळक कॉलेजच्या सख्तपणाला सुरुंग लावण्याचे काम काही प्रमाणात आम्ही केले. तेथील मेसमधील जेवणाबाबत आमची अडचण आम्ही sp मंडळीपर्यंत घेऊन गेलो. बी एडच्या प्रवासात चव्हाण मॅडम आणि सहारे मॅडम यांनी काही प्रमाणात मला समजून घेऊन मार्गदर्शन केल्याने काही चांगल्या गोष्टी शिकलो. इसावे सरांचे भूगोल मेथड व माहिती संप्रेषण शिकविणे सर्वाधिक आयडियल होते. आजही आठवते मला, सर म्हटले होते, "अहो पाठाला जाताना इनशर्ट करत जा". सरांचा ते सांगण्यातला चांगुलपणा मी समजत होतो....पण इनशर्ट करण्यासारखा एकही ड्रेस माझ्याकडे तेव्हा नव्हता. बी एडला असताना अनेकदा तास बुडवून बॅडमिंटन खेळायला जायचो. त्या आनंदातून मिळालेली ऊर्जा मला अभ्यासात मदत करायची. सहारे मॅडमचा तास सर्वाधिक एन्जॉय करायचो कारण त्यात आम्हाला आमची वैयक्तिक मते मांडण्याची संधी मिळायची. धामणे सरांचे खणखणीत नाणे आज दैनंदिन कामात उपयोगात येत आहे. अतिशय मजा करत आणि विविध उपक्रम राबवत बीएड पूर्ण केले. ते पूर्ण करताना सहारे मॅडम व चव्हाण मॅडम यांच्याकडून हक्काने भांडून अनेकदा आईस्क्रीम खायचो याचे आजही मला अप्रूप वाटते.
बी एड नंतर चार महिन्यात आश्रमशाळेत नोकरी मिळाली....आश्रमशाळेत नोकरी मिळावी हे खरे तर माझे स्वप्न होते. कारण मला चांगले शिक्षक मिळावे हि माझी इच्छा असायची पण ती कधी पूर्ण झाली नाही. आता त्यात उतरून काही तरी आपल्या मुलांना आपण देऊ या उद्देशाने त्यात उतरलो. अनेक समस्या यात आहेत, परंतु मी तरी हे क्षेत्र एन्जॉय करतोय. आज मुख्याध्यापक पदावर काम करतानाही मी मस्त आहे.
माझं जगणं आनंददायी झालं....कारण त्यात सदा तुम्ही माझ्या सोबत होता....आहात....आणि पुढेही राहाल असा मला विश्वास आहे.
मी काय कमावलं मला नाही माहीत....कारण पाच आकडी पगार असूनही मला अनेकदा प्रवासाला पैसे उसने घ्यावे लागतात. पगारातील 20-30% रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करत आहे. त्यातून जो आनंद मिळतोय तो बँकेत नाही साठवू शकत, पण त्यामुळे उद्याचं मरण माझं अधिक आनंदी असेल याची जाणीव मला आहे.
"माणसं जोडत आयुष्य जगावं" हे सोप्प सूत्र मी जगण्यात वापरत आहे. त्याचं उत्तर म्हणून तुम्ही काल माझ्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पाडला... त्यात भर म्हणजे ज्या निसर्गावर मी माझ्या जीवापल्याड प्रेम करतोय, तो निसर्गही पाऊस बनून बरसला. या मातीची तहान भागवत त्याने माझे मन प्रसन्न केले.
मला जगायला या पलीकडे काही नकोय....म्हणून वाढदिवसाला डाळ तडका आणि बाजरीची भाकरी असे बायको आणि मुलाबरोबर जेवण केले. वाचलेल्या खर्चातुन लवकरच एखाद्या शाळेत ग्रंथदिंडी देणार आहे.
असेच प्रेम आपणाकडून मिळत राहो. धन्यवाद म्हणत नाही....परंतु ऋण व्यक्त करतो.
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment