कुमारी माता
( कथेतील पात्र काल्पनिक आहेत. कोणाच्या भावना दुखावणे हा या कथेचा उद्देश नक्कीच नाही. सामाजिक पातळीवर जनजागृती व्हावी म्हणून सदर कथा लिहिलेली आहे.)
जव्हारचा राजवाडा पाहून जवळच एका गावातील सरकारी दवाखान्यात आपल्या गावाकडील डॉक्टर आहेत म्हणून भेटायला गेलो. अनेकदा फेसबुकवर आदिवासी संस्कृती व जगभरातील घडामोडींवर त्यांच्याबरोबर चर्चा होत असे. कधी स्वताहून व्यक्त न होता ते नेहमीच सामाजिक बदलांचा बारकाईने अभ्यास करत असत व मला त्याबाबत लिहिण्यासाठी प्रेरणा देत असत. म्हणून जव्हारच्या आदिवासी इतिहासाचे पैलू अभ्यासल्यानंतर जव्हारच्या माणसांची माणुसकी माझ्या मनात ठासून भरणारे डॉ.वायळ यांना भेटायलाच पाहिजे म्हणून त्यांच्या दवाखान्याच्या रस्त्याने जाणा-या आडवाटेने जायला सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची झाडे मन वेधून घेत होती. त्यात सागाच्या झाडांची उंची आकाशाला गवसणी घालत असल्याने मनाला आनंद देत होती. वेडीवाकडी वळणे घेत व येथील गरिबीच्या ठिगळांची स्पष्ट जाणीव करून देणारे खड्डे चुकवत मी त्या गावात पोहोचलो. रस्त्याने जाणा-या एका आजोबांना थांबवले व विचारले, “बाबा इथं दवाखाना कुठे आहे?” बाबाच्या तोंडून काही तरी शब्द बाहेर पडेल असे वाटत असताना त्यांचा फक्त हात वर झाला व उजव्या बाजूला वळणा-या रस्त्याकडे बोट दाखवले. मी त्या बाबांकडे काही वेळ पाहतच राहिलो. निसर्गाच्या सान्निध्यात आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारी ही माणसं इतकी अबोल कशी काय राहू शकतात याचे आश्चर्य वाटत होते.
थोडे पुढे जाताच मला मोठा असा दवाखाना दिसला. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असा मोठा दवाखाना पाहून खूपच बरे वाटले. दवाखान्यात नक्की मित्र आहे कि नाही याची थोडी चिंता वाटत होती. कारण अगोदर चौकशी करायला या भागात फोनची रेंज नसल्याने अडचण निर्माण झाली होती. शेवटी समोर एका दरवाजावर बोर्ड दिसला आणि मनाला बरे वाटले. त्यावर लिहिले होते- डॉ. वायळ . हळूच दरवाजा वाजवला, “आत येऊ का?” असे विचारले. आतून आवाज आला, “या...दरवाजा ढकला फक्त.” मी दरवाजा ढकलून आत गेलो आणि समोर डॉ.वायळ दिसल्याने मनाला आनंद झाला. मला अचानक दवाखान्यात पाहून क्षणभर त्याचा विश्वास बसत नव्हता. परंतु उठून त्याने लगेच गळाभेट घेतली. खूप दिवसांनी कोणीतरी गावाकडचे भेटायला आल्याचे त्याने बोलून दाखवले. आज पर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आदिवासी विचारांची देवाणघेवाण करणारे आम्ही आज प्रत्यक्ष भेटल्यावर किती बोलू आणि किती नको असे झाले होते. आमच्या गप्पा अशाच सुरु असताना एक माणूस जोरात धावत पळत आला व डॉक्टर कुठे आहेत म्हणून चौकशी करू लागला. त्याच्याकडे पाहून तो खूप शिकलेला वाटत नव्हता. शेतीचे काम अर्धवट सोडून तसाच तो आल्याचे त्याच्या एकंदरीत पेहरावावरून वाटत होते.
“डॉक्टर साहेब... सकाळपासून मुलीच्या पोटात दुखतंय...” असा तो विनंती करू लागला. डॉ.वायळ यांनी त्या माणसाला सावरत पुन्हा विचारले, “नक्की काय होतंय ते सांगा?” ती गर्भवती असल्याचे व नऊ महिने पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले. डॉक्टरांनी ही केस डिलिव्हरीची असल्याचे मला सांगितले व काही वेळ तू इथेच बसून राहा असे मला सांगून ते घाईने निघून गेले. इतक्या मोठ्या दवाखान्यात डॉक्टर व त्यांचा स्टाफ तितकाच मोठा असेल असे मला अगोदर वाटले होते. परंतु आता प्रत्यक्षात पेशंट आल्यानंतर मोजकीच माणसं धावपळ करत असल्याचे जाणवले. त्यावरून लक्षात आले कि दवाखान्यात स्टाफ खूपच कमी आहे. सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे महिलांच्या उपचारासाठी किंवा डिलिव्हरीसाठी महिला कर्मचा-यांची मोठीच कमतरता होती. पेशंटची नावनोंदणी करण्यात आली. त्यात सदर मुलीचे नाव ‘कविता’ असे नोंदविण्यात आले. नव-याचे नाव काय? असे विचारताच मुलीचे वडील क्षणभर थांबले व बापाचे नाव लिहा असे म्हणू लागले. पेशंट तिकडे आरडाओरड करत असल्याने ते नाव अर्धवट नोंदवून तो कर्मचारी धावपळ करत निघून गेला. त्यांची धावपळ सुरु असताना मुलीच्या नव-याचे नाव का सांगितले गेले नसेल याचे विचारचक्र त्याच गतीने माझ्या डोक्यात सुरु झाले होते. परंतु ते कोणासोबत व्यक्त करायला तिथे ओळखीचे असे कोणीच नव्हते. आता मित्राची वाट पाहणे हाच एकमेव पर्याय माझ्याकडे होता.
थोड्याच वेळात “मुलगी झाली....”, “मुलगी झाली....” असा आवाज कानावर पडला. मी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आलो. “मुलीचे वजन दोन किलो भरले असून....आईची तब्येत चांगली आहे” असे एकजण दुस-याला ओरडून सांगत होता. मी ते ऐकत नोंदणी विभागाजवळ येऊन न कळत थांबलो. काही वेळाने मुलाच्या जन्माची नोंद करण्यासाठी एक कर्मचारी व त्याच्यासोबत त्या मुलीचे वडील आले. त्या मुलीचे नावही त्यांनी निश्चित केले होते. ‘अनिता कविता चौधरी’ असे मुलाचे नाव नोंदवून ते दोघेही परत निघून गेले. मुलीच्या नावासमोर आईचे नाव लावले असून आडनाव हे नव-याकडील न लावता मुलीच्या आईवडीलांचे नाव लावल्याने मला काहीसे आश्चर्य वाटत होते. डोक्याला अधिक ताण न देण्याचा विचार करून मी काही वेळ दवाखान्याच्या बाहेर येऊन थांबलो. सभोवतालचा परिसर न्याहाळत होतो. सर्वकाही शांतपणे जीवन जगत असल्याचे चित्र दिसत होते. काही जन आपल्या घरासमोर झाडाखाली गप्पा मारत बसल्याचे दिसत होते, तर काही जन दुपारच्या वेळी निवांत निद्रेचा लाभ घेत असल्याचे दिसत होते. जनावरे मोकळी इकडे तिकडे फिरत होती. त्यांच्या मागे गुराखी म्हणून कोणी हातात काठी घेऊन उभे असल्याचे जाणवले नाही. शेतात कुठेच पाणी दिसत नसल्याने हिरवेगार असे काहीच नव्हते.
“अरे राजू... तुला आतच शोधत होतो. इकडे काय करत आहेस...चल आपण जेवायला जाऊ.” डॉक्टर आवाज देत माझ्या जवळ आले.
“काही नाही..सहज जरा हा परिसर बघतोय” मी उत्तरलो.
“अरे उन्हाळ्यात काही नसते, पण पावसाळ्यात आलास तर तुला इथे स्वर्ग दिसेल”
“यायला पाहिजे मग पावसाळ्यात इकडे एकदा तरी..”
“अरे का नाही....तुझ्या सारख्या फोटोग्राफरने तर नक्की आले पाहिजे” डॉक्टर बोलले.
“हा ...पण बाहेरून येऊन इथे भेट देणा-याला स्वर्ग वाटत असला, तरी इथल्या माणसाला मात्र पावसाळ्यात खूपच संघर्ष करावा लागतो...”
“लाईट असते का हो?” मी विचारले.
“असते...पण पाउस जर जोरात असेल तर मग नाही राहत अनेकदा” त्यांनी उत्तर दिले.
“सर्वात कठीण म्हणजे पहिला पाऊस जेव्हा पडायला सुरुवात होते ना तेव्हा पासून इथल्या लोकांचा संघर्ष सुरु होतो...”
“तो कसा काय?”
“पहिला पाऊस पडताच इकडे बिळात पाणी गेल्याने अनेक साप बाहेर पडतात. त्यामुळे एक तरी सर्पदंशाचा पेशंट आमच्या दवाखान्यात येतो.”
“.....पण तुमच्याकडे लस उपलब्ध आहे का?”
“नाही....खात्री करून आम्ही पुढील उपचारासाठी पेशंटला जव्हार किंवा नाशिकला पाठवतो”
अशा विविध मुद्द्यांवर गंभीर चर्चा करत आम्ही डॉक्टरांची मेस असलेल्या ठिकाणी पोहचलो.
मेसमध्ये तशी गर्दी नव्हती. आम्ही दोघेच असल्याने मी त्या डिलिव्हरीच्या पेशंटची चौकशी करायला सुरुवात केली. “बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत” डॉक्टर पुटपुटले.
“डॉक्टर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं... त्या बाळाला वडिलांचे नाव देण्याऐवजी आईचे नाव का दिले?” माझ्या प्रश्नाला डॉक्टर काही लवकर उत्तर देत नसल्याचे पाहून शेजारीच जेवण वाढत असणा-या काकू मला म्हणाल्या, “अहो ते कायमचेच आहे....या भागात हा असा कुमारी मातांचा प्रश्न तसा खूप गंभीर आहे.”
“कुमारी माता....म्हणजे काय ओ काकू?” मी उलटप्रश्न केला.
माझी ओळख नसतानाही त्या अगदी मोकळ्या मनाने पुढे सांगू लागल्या...
“या भागातील मुली सहज कोणाच्या प्रेमात पडतात...थोड्याशा अमिषाला बळी पडून मग नको ते उद्योग करतात. घरची गरिबी असल्याने आई वडील नेहमी कुठे तरी बाहेर कामाला असतात. मग या मुलींकडे लक्ष्य द्यायला कोणीच नसते. त्यात आमच्या भागात मुलींना लग्न कोणत्या मुलाबरोबर करायचे हे मुलीच ठरवतात. त्यात आईवडील दबाव टाकत नाहीत. यामुळे अनेकदा खोट्या आश्वासनांना मुली बळी पडतात व असे कुमारी मातांचे प्रश्न उभे राहतात” त्या काकू खूप घाईने सर्वकाही सांगत होत्या.
डॉक्टर म्हणाले, “अरे हे आम्हाला सवयीचे झाले आहे. अनेकदा आम्ही समजावून सांगतो, परंतु कोणी ऐकत नाही”
मेसवाल्या काकुंशी खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु कुमारी माता या एकाच शब्दाने माझी विचारशक्ती क्षणभर क्षीण करून टाकली होती. ही समस्या या भागात दिसत नसली तरी तिचे स्वरूप गंभीर असून यामुळे अनेक आत्महत्या या भागात झाल्याचे मेसवाल्या काकूंनी सांगितले. बाहेर शहरी भागातून या भागात फिरायला किंवा नोकरीसाठी आलेल्या लोकांमुळे असे अनेक प्रकार घडत असले तरी त्या विरोधात बदनामी होईल या भीतीने बोलायला कोणी तयार होत नाही. जरी तयार झाले तरी न्याय मिळविण्यासाठी जो संघर्ष उभा करावा लागतो, तो थोड्याशा पैशाने दडपून टाकलो जातो. ऐन तारुण्याच्या काळात आमिषाला बळी पडून हजारो कळ्या खुडल्या जात असल्याची सल मनात ठेऊन मी डॉ. वायळ यांचा निरोप घेतला.
(आदिवासी त्रैमासिक 'भलर'च्या चौथ्या अंकात प्रकाशित झालेली कथा.)
-राजू ठोकळ
Aboriginal Voices

कुमारी माता हा विषय केवळ त्याच भागात नसून जवळपास सर्वच ठिकाणी दिसून येत आहे...आश्रम शाळा... कॉलेज... आणि गावागातही बघायला मिळतोय... त्याच्या मागची कारणे अनेक असतील... वेळेत लग्न नाही... परिस्थिती आड येत असेल...पसंतीचा विषय असेल... मनासारखे स्थळ नसेल...
ReplyDeleteपण याही पलीकडे जाऊन बघीतले तर आपणच मुलांवर योग्य संस्कार करायला कमी पडतोय...
भलेही आपल्याला संस्कार नसतील करता येत तर नका करु...पण निदान नियम तर पाळा...
आपलेच आजोबा पंजोबा असतील... आपले आईवडील असतील...ते कसे वागले... आणि आपण काय वागतोय...
काही काही तर शिकलेली सवरलेली माणसं आहेत...कधी कधी त्यांचा डिपी स्टेट्स बघावा तर...अगदी गळ्यात गळा घालून... चिकटून फोटो बघायला मिळतोय...नको त्या पोज फोटोत बघायला मिळतात...म्हणे कॉमन झालंय ते...पण त्याचा परिणाम मुलांवर होतोय त्याचं काय...बाकी संध्याकाळचे आजच्या नवराबायकोचे प्रेम न् सांगीतलेलेच बरे...लोकं मला शिव्या देतील... म्हणून फक्त स्वतःच अनूभवा आणि त्यात बदल करा...मुलांना आपलं काहीच दिसून देऊ नका...सोप्या भाषेत सांगतोय कोणीही वाईट वाटून घेऊ नका...
मुलं सर्वात जास्त आपलंच अनूकरण करत असतात...
सन्माननीय राजू ठोकळ सरांनी
खूप महत्वाचा विषय हाताळल्याबद्दल... खूप खूप धन्यवाद....🙏
जगन खोकले