गुणवत्ता विकास
वैशाली गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत येत नव्हती. तिचं गाव डहाणू तालुक्यातील दिवशी जवळ चामलपाडा येथे निसर्गाच्या कुशीत आहे. शाळेपासून तिच्या गावाचं अंतर दूर असल्याने भांगरे गुरुजी तिचे वडील लाडक्या यांच्याशी फोनवरून संपर्क करत होते. परंतु शाळेत दिलेला नंबर काही लागत नव्हता. इकडे द्वितीय सत्र परीक्षा जवळ येऊ लागल्याने भांगरे गुरुजींनी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सकाळचे दोन तीन तास घेऊन त्यांनी आपली गाडी काढली. सोबत पाण्याची एक बाटली घेतली व उन्हाचा तडाखा चांगलाच असल्याने डोक्याला बांधण्यासाठी एक रुमाल सोबत घेतला. आपल्या सोबतच्या सरांना दिवशीला जाऊन येतो असे सांगून हालचाल रजिस्टरला नोंद करून ते निघाले. सायवन येईपर्यंत भांगरे गुरुजींच्या वाटलीतलं पाणी पिऊन संपलं होतं. एक तासाच्या प्रवासात त्यांनी एक लिटर पाणी पिऊन टाकलं यावरून उन्हाची तीव्रता किती असेल याची कल्पना येते. त्यात या भागात उष्ण व दमट हवामान असल्याने त्याचा त्रासही अधिक जाणवत होता.
सायवन पाण्याची बाटली घेऊन दिवशीकडे जाणाऱ्या वळणावळणाच्या वाटेने गाडी पुढे नेली. किन्हवली पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडं असल्याने उन्हाचा त्रास थोडा कमी झाला. किन्हवलीचा बोर्ड वाचून गाडीने डाव्या बाजूचा रस्ता धरला. उतार असल्याने गाडी थोडी वेगात धावत होती. गाडीचा वेगाबरोबर भांगरे गुरुजींच्या मनावरील दडपण वाढत होतं. पालक भेटतील का नाही? पालक भेटले तर वैशालीला शाळेत पाठवतील का नाही? असे अनेक प्रश्न डोक्यात येत होते. त्यात भाग नवीन...इकडची भाषा वेगळी... आपली भाषा लोकांना समजली नाही तर काय करायचे याचाही काही ताण मनावर वाढत होता. पण वैशाली शाळेत आली पाहिजे हा दृढ निश्चय असल्याने भांगरे गुरुजी काही मागे हटले नाहीत.दाभाडी, फनसोनपाडा, पाटीलपाडा, दिवशी अशी गावं मागे टाकत गुरुजी चामलपाड्यात पोहचले. सगळीकडे उन्हामुळे शांतता होती. कुणाचाही आवाज येत नव्हता. गावात वयानं व अनुभवानं असं मोठं कोणीही दिसत नव्हतं. आता वैशालीचं घर कोणाला विचारायचं असा प्रश्न भांगरे गुरुजींना पडला. या प्रश्नाचं उत्तर देणारी योग्य व्यक्ती शोधण्याच्या नादात पाण्याची अर्धी बाटली संपली होती. घाम पुसून हातातला रुमाल पुरता ओला झाला होता. तो जर पिळला असता तर ग्लासभर पाणी त्यातून निघालं असतं.
दूर एका कुडाच्या घरासमोर दोन म्हाताऱ्या सावलीत बसलेल्या दिसल्या. भांगरे गुरुजी पायी चालत त्यांच्या जवळ गेले. त्यांना लडाक्याची वैशाली कुठे राहते असा प्रश्न विचारला. त्या दोघींच्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह पाहून गुरुजींनी पुन्हा प्रश्न विचारला. तोंडातून काही एक शब्द बाहेर न काढता त्यांनी वैशालीच्या घराकडे जाणारा रस्ता दाखवला. एकदाचा रस्ता सापडल्याने भांगरे गुरुजींचा उत्साह वाढला होता. उन्हाच्या झळा डोक्याला चटके देत होत्या, पण त्याकडे आता गुरुजींचे लक्ष्य नव्हते.
वाकड्या-तिकड्या वळणाची पाऊलवाट एका कुडाच्या पण टुमदार घरासमोर थांबली. घराचा दरवाजा बंद असल्याने गुरुजी घराच्या आजूबाजूचा परिसर न्याहळू लागले. घर मातीचं व कुडाचं असलं तरी घराची मांडणी, आजूबाजूला असली सुंदर परसबाग यामुळे ग्रामीण आदिवासी संस्कृतीची श्रीमंती नजरेत भरत होती. आजूबाजूला कोणीही नसल्याने न राहवून शेवटी भांगरे गुरुजींनी दरवाजा वाजवला. दरवाजा लवकर उघडण्यास कोणीही आले नाही. पुन्हा प्रश्न चिन्ह... घरात कोणी आहे की नाही?
दहा पंधरा मिनिटांनी दरवाजा उघडला. दरवाजाच्या आडून वैशाली दरवाज्यात कोण आहे हे पाहत होती. भांगरे गुरुजींना पाहताच ती तशीच माघारी फिरली व पळत घराच्या आतल्या खोलीत गेली. जाताना फक्त "मास्तर आलाय" एवढीच ओरडली.
वैशालीचा आवाज ऐकून मागच्या खोलीत झोपलेला तिचा भाऊ पुढच्या खोलीत आला. भांगरे गुरुजींनी वैशालीला बोलवा म्हणून त्याला सांगितले. तो गेला व दहा पंधरा मिनिटांनी वैशालीला घेऊन आला.
भांगरे गुरुजींनी वैशालीला शाळेत का येत नाही म्हणून विचारले. पण वैशाली काही बोलत नव्हती. यायचे का नाही याचेही काही उत्तर देईना. घरात तिचे आई वडील देखील नव्हते. तिच्या भावाला आई वडीलांविषयी विचारले तर ते गुजरातला मजुरीसाठी गेलेत एवढं सांगितलं.
वैशालीला बोलतं करण्यासाठी भांगरे गुरुजींनी घरातील कणगी, नांगर व इतर शेती उपयोगी अवजारे यांची माहिती विचारली. आता वैशाली बोलू लागली. आपल्या बोलीभाषेत कणगी व त्यात साठवलेले भात याची माहिती दिली. सरांना तिने पाणी दिले. जेवण बनवते...जेवण करा अशीही... विचारणा केली. आता वैशालीच्या मनातली भीती दूर झाली होती. घरी राहून ती काय कामं करते याचीही माहिती तिने दिली.
तासभर गप्पा मारल्यानंतर भांगरे गुरुजींनी पुन्हा वैशालीला प्रश्न विचारला, "तू शाळेत का येत नाहीस?"
आता मात्र वैशालीने उत्तर दिले,
"सर मला काहीच येत नाही, तर मी कशाला शाळेत येऊ...!"
सरांनी तिला कोरोनानंतर अनेक मुलांच्या बाबतीत हीच अडचण झाल्याचे सांगितले, पण आठवीतली वैशाली आपल्याला काही येत नाही यावर ठाम होती. आता पर्यंत शेतीशी निगडित सर्व औजारांची माहिती सांगणारी व आई वडिलांच्या गैरहजेरीत इतक्या लहान वयात घर सांभाळणारी वैशाली म्हणतेय मला काहीच येत नाही याचे भांगरे गुरुजींना आश्चर्य वाटले.
वैशालीला तिच्या वडिलांचा नंबर विचारून भांगरे गुरुजींनी त्यांना फोन लावला. वैशालीच्या शाळेबाबत त्यांना समजावले. त्यांनीही तिने शिकलं पाहिजे हा आशावाद व्यक्त केला. परंतु ती शाळेत येत नाही, तर आम्ही तिला जबरदस्ती करू शकत नाही असे म्हटले व जास्त वेळ फोनवर बोललो तर मालक रागावेल म्हणून फोन ठेऊन दिला.
भांगरे गुरुजी वैशालीला समजावीत असताना तिचे डोळे ओले झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कमी वयात तिची माणूस म्हणून समज चांगली आहे. परंतु कोरोना काळातील दीड दोन वर्षांचा शिक्षणात पडलेला खंड व त्यातून तिची अक्षरओळख विस्मृतीत जाणे या गोष्टी ती समजून घेत नव्हती. शेवटी दोन दिवस विचार कर मी परत न्यायला येतो असे म्हणून भांगरे गुरुजी परतीच्या प्रवासाला लागले.
'सर मला काहीच येत नाही, तर मी कशाला शाळेत येऊ' हे वैशालीचे बोल मात्र भांगरे गुरुजींच्या मनावर वारंवार आघात करत होते. मुलांना कमीत कमी लिहिता वाचता आलं पाहिजे यासाठी गुणवत्ता विकास व त्यातील उपक्रम राबविण्याचा मानस गुरुजींनी मनोमन निश्चित केला होता. वैशालीचं उत्तर म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेचं उपेक्षित वास्तव होतं हे समजुन नाही घेतलं, तर अशा अनेक वैशाली या प्रवाहातून बाहेर पडतील.
0 comments :
Post a Comment