धाराराव : अकोले तालुक्याच्या गर्दझाडातील एक आदिवासी क्रांतिकारी विचार
- राजु ठोकळ : Aboriginal Voices
अकोले तालुक्यातील कुमशेत गावाजवळ धाराराव म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणाची अधिक माहिती घेतली असता, तिथे धाराराव या आदिवासी बांधवाने इंग्रजांच्या अन्याय्य धोरणाला विरोध करत काही इंग्रज शिपायांचा देखील बळी घेतलेला असल्याचे सांगितले जाते. आजही या भागात प्रचंड जंगल आहे, तर 1600 च्या सुमारास या भागात किती घनदाट जंगल असेल याची आपण कल्पना केली, तरी हा इतिहास समजून घेणे काहीसे सोपे होऊ शकते. धाराराव यांच्या बंडाचं जे ठिकाण आहे, तेथून जवळच नंतरच्या काळात म्हणजे 1818 च्या सुमारास इंग्रजांची पोलीस चौकी होती व त्या चौकीचे अवशेष आजही आपणास पाहायला मिळतात. दुर्दैवाने सरकारी पातळीवर त्याचे संवर्धन न झाल्याने हा दुर्लक्षित वारसा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजांना त्या काळात या भागात पोलिस चौकी उभारण्याची गरज भासली, यावरून धाराराव यांचा संघर्ष किती मोठा असेल व त्यातून ब्रिटिश विरोधी किती मोठी ठिणगी पेटली असेल याची कल्पना आपणास होऊ शकते. कुमशेत परिसरातील पोलिस चौकी उभारण्याच्या धोरणाबाबत बोलताना डॉ.विलास दुंदा गवारी यांनी सांगितले की, "क्रांतिकारक व त्यांचे सहकारी ज्या गावातील असत त्या गावात किंवा कोकणात ज्या महत्त्वाच्या घाटवाटा उतरत अशा गावात इंग्रजांनी पोलिस चौक्या उभारल्या होत्या. यात त्रिंबकेश्वर ते भिमाशंकर या पट्ट्यातील अनेक गावांचा समावेश होता. क्रांतिकारकांच्या गावातील लोकांवर अतिरिक्त कर आकारला जात होता. पोलिस चौक्या उभारून येथील लोकांवर अतिरिक्त अंकुश ठेऊन लुटमार केली जात होती व याच अन्याय - अत्याचाराला विरोध करण्यासाठी अनेक क्रांतिकारक या जंगल खोऱ्यांत जन्माला आले."
ब्रिटिश सरकारच्या रानचराई विरोधात त्याने उठाव केल्याची माहिती काही पुस्तकांत वाचायला मिळते. तर काही ब्रिटिश कागदपत्रांत ' धाराराव हा एक राजा होता' असे उल्लेख आढळतात. 5 जून 1672 रोजी मोरोपंत पिंगळे यांनी जव्हार संस्थान जिंकून घेतल्यावर जव्हारचे राजे विक्रमशहा हे नाशिक परिसरात आले असताना त्यांनी पुन्हा सैन्य जमविण्यास जेव्हा सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या या कामात धाराराव यांनी मोलाची मदत केल्याचे लिखित संदर्भ आहेत. अकोले तालुक्यातील राजूर परिसरात आजही धाराराव यांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात.
मौखिक आदिवासी परंपरेत धारेराव उर्फ धाराराव यांच्याविषयी आजही उल्लेखनीय माहिती सांगितली जाते. परंतु पुरेसे लिखाण न झाल्याने हा क्रांतिकारक दुर्लक्षित राहिलेला आहे. मौखिक परंपरेतील धारेराव यांचा ऐतिहासिक मागोवा घेताना डॉ.सुरेश देशमुख सांगतात की, "धारेरावचे मूळ नाव धारोबा असवले असे होते. त्यांनी तीन इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी खूप मोठी फौज घेऊन कुमशेतच्या जंगलात धारोबा असवले याच्या विरुद्ध युद्ध पुकारले. आज जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी ब्रिटिशांचे आणि धारोबा असवले व त्यांचे सहकारी यांच्यात घनघोर युद्ध झाले व त्या युद्धात धारोबा असवले यांना वीर मरण आले. धारोबा असवले हे असवले कुळाचे वीर म्हणूनच ओळखले जातात. आज त्या ठिकाणाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून एक नवसाला पावणारा देव म्हणून त्यांची ख्याती सर्व दूर पसरली आहे." धारेराव यांचे मंदिराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कुमशेत येथे धाराराव यांचे मंदिर बांधण्यात आलेले असून त्याची पूजा करण्यासाठी अनेक आदिवासी बांधव येत असतात. जगातील कोणत्याही आदिवासी जमातीने काल्पनिक देव देवतांची पूजा केलेली नाही त्यांनी वास्तविक आणि प्रकृतीशी निगडित अशाच देव देवता निर्माण केलेल्या दिसून येतात. त्यामुळे एखाद्या क्रांतिकारकाचे दैवतीकरण होणे हे चुकीचे असले, तरी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता जर धारेराव यांचा ऐतिहासिक बलिदानाचा वारसा यातून जोपासला जाणार असेल तर ते नक्कीच चांगले आहे. सामाजिक कार्यकर्ते पुना गांडाळ यांनीही धाराराव यांच्या मंदिराबाबत बोलताना म्हटले की, "धाराराव यांनी आदिवासी हित व हक्क संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिल्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले आहे. जसे देवळा जि. नाशिक येथील मामलेदाराने इंग्रजांचे राजवटी विरुद्ध जाऊन जनतेस उपासमारीत सहकार्य केले त्यानंतर त्यांना देवत्व प्राप्त झाले व देव मामलेदार असे मंदिर उभारले व आज तेथे मोठी यात्रा भरते, त्याप्रमाणे धारेराव यांच्याबाबत झालेले असावे." मौखिक इतिहासाला लेखणीची व जागृतीची जोड वेळीच न मिळाल्याने हे झाले असावे. यापुढील काळात धाराराव यांचा इतिहास सविस्तरपणे जगासमोर येणे आवश्यक आहे.
फोटोत दिसणाऱ्या विरगळी या विरपुरुषांच्या दिसत आहेत. अशा विविध विरगळी धाराराव, कुमशेत येथे पाहायला मिळतात. यातील पुरुषांच्या हातात शस्त्र असल्याचे स्पष्ट दिसत असून आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचा विचार ते या परिसरातील आदिवासी बांधवांना पटवून देत आहेत. ज्या काळात कोणतेही पुस्तक, लेखणी, संघटना, चळवळ या भागात पोहचली नव्हती, त्या काळात या विरगळी समाज प्रबोधनाचं कार्य करत होत्या व आजही करत आहेत. धाराराव यांच्या बलिदानामुळे पेटलेली ठिणगी नंतरच्या काळात अनेक क्रांतिकारकांना जन्म देऊन गेलेली आहे. हा विचार आपण जपण्याची गरज आहे.
राजु ठोकळ
©Aboriginal Voice
खरच खूप छान प्रकारे तुम्ही इतिहासाला समोर आणत आहात,येणाऱ्या पिढीसाठी आदिवासी देव हे काल्पनिक नसून ते आपलेच स्वातंत्रवीर आहेत हे समजेल. एवढ्या दुर्गम भागात लेखणी नव्हती त्यामुळेच मूलनिवासी चा संघर्ष हा समोर यायला उशीर होत आहे. पण आपल्या सारखे अनेक लोक आहेत जे अस कार्य करून तो इतिहास समोर आणत आहेत.
ReplyDeleteबरोबर.
ReplyDelete