गोविंदराव खाडे यांचा मुलगा किसनराव खाडे व रामजी भांगरे यांची मुलगी, तसेच राघोजी भांगरे यांची बहीण रुख्मिणी खाडे यांच्या विवाह सोहळ्यास जव्हार संस्थानचे तत्कालीन राजे व काही किल्लेदार उपस्थित होते. हा शाही विवाह सोहळा अनुभवण्यासाठी विविध परगण्यातील किल्लेदार तसेच काही इंग्रज अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. हा विवाह सोहळा पाहिल्यामुळे रामजी भांगरे यांच्याकडे पाहण्याचा इंग्रजांचा दृष्टिकोन बदलला व त्यातून पुढे रामजी भांगरे यांचेही बंड घडले हे इतिहासाने नोंदविलेले आहे. इंग्रजांच्याही मनात इर्षा निर्माण व्हावी असा हा सोहळा किती तेजस्वी असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. सह्याद्रीचे डोंगर, देवगावची भूमी किती नटली असेल नाही काय.
जव्हार संस्थानचे मूळ पुरुष जायबा मुकणे हे अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावचे असल्यामुळे त्यांच्या पश्चात असलेल्या राजगादीवरील राजांची नाळ अकोल्याशी म्हणजे त्या काळातील राजूर प्रांताशी जोडलेली होती. याच भावनेने गोविंदराव खाडे व रामजी भांगरे या क्रांतिकारी कुटुंबांच्या मंगलमय सोहळ्यास मुकणे संस्थानचे तत्कालीन राजे उपस्थित होते.
जावजी बांबळे यांनी उभारलेला लढा असो वा राघोजी भांगरे यांनी दिलेली क्रांतीची हाक असो यात जव्हार संस्थान नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असायचे. अकोले, राजूर, जुन्नर, मावळ, आंबेगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, नाशिक या भागातील अनेक क्रांतिकारकांना अडचणीच्या काळात आश्रय देण्याचे काम जव्हार संस्थानने केलेले आहे. त्यामुळे सह्याद्रीतील बंड अधिक गतिमान होण्यास मदत झाली.
Pride of Jawhar State
राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment