संजय दोबाडे यांच्या काही कविता



खपली

बलात्कार , गेन्गरेप आणि पानभर बातमी
याशिवाय होणारच नाही का दिवसाची सुरुवात ?
हातांच्या मुठी वळल्या जातात क्षणभर ,
पुन्हा माणूस होतो स्वस्थ
षंढ असल्यासारखा !
मिटक्या मारीत वाचणारेही नाहीत कमी !

तिने जे भोगलं त्याही पेक्षा वाईट
भोगायचं आहे अजून तिला !
पोलिसांची शिवराळ भाषा ,
वकिलांचे खोचक प्रश्न ,
चार भिंतीत, आडोशाला जे घडलं
ते चव्हाट्यावर आणण्यासाठी
मीडियाची चाललेली धडपड .
करून देतात तिला
पुन्हा पुन्हा त्याच जीवघेण्या आठवणी
आरोपीला होईल शिक्षा कधीतरी ;
पण तिच्या काळ्यापाण्याला तर
झाली आहे सुरुवात केव्हाच
गल्लीतील कुजबूज करतेय नजरकैद
तिला स्वतःच्याच घरात !
छताला टांगलेला पंखा
करतोय इशारे कपाटातल्या साडीला

नातेवाईकांची कोरडी सहानुभूती
नाही मिटवू शकत तिच्या काळजावरचे घाव

मलाही आता वाटतेय भीती
माझी आक्रंदणारी कविता
नाही ना काढणार
तिच्या काळजावरची खपली ?

©संजय दोबाडे
[
अजून किती काळ ]

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

मला माझीच लाज वाटते

बाचा फाटलेला सदरा
आणि आईचं विटलेलं लुगडं पाहून
मला माझ्या साहेबी सुटाची लाज वाटते

लाल काळ्या ढेकळासंगे घामाने निथळलेलं अंग
थंडी वाऱ्यात हातापायाला पडलेल्या भेगा
कसा सहन करता तुम्ही
एका घोंगडीवर अख्खा पावसाळा
शेतात राबताना तुमचे होणारे हाल पाहून
मला माझ्या खुर्चीची लाज वाटते

पावसाळ्यात शंभर ठिकाणी गळणारी झोपडी
वाऱ्यात उडून जाईल असे वाटते
चिमणीच्या मंद उजेडात फुलणारा तुमचा संसार पाहून
मला माझ्या आलिशान बंगल्याची लाज वाटते

भर दिवसा डोक्यावर तळपणारा सूर्य असो की
सकाळ संध्याकाळच्या पाखरांची किलबिल
कामाच्या शोधात तुम्ही भटकता कोसभर
तुमच्या पायांची अविश्रांत गती पाहून
मला माझ्या इंपोर्टेड गाडीची लाज वाटते

दोन वेळच्या भाकरीसाठी राबता तुम्ही दिवसभर
तुमचा सगळा स्वाभिमान गहाण टाकून मालकाकडे
मी फुकटचं खात नाही पण
टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची धडपड पाहून
मला माझीच लाज वाटते

©संजय दोबाडे
(
अजून किती काळ ? २०१४)

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आभाळाच्या चिंध्या झाल्यावर

आभाळाच्या चिंध्या झाल्यावर
कवी रडत बसत नाही
उचलून घेतो साऱ्या चिंध्या
त्यांचीच एक गोधडी शिवतो
मीही शिवलीय अशीच एक गोधडी
ऊब पाहिजे असेल तर
माझ्या सोबत या

स्वप्नांची माती झाल्यावर
कवी रडत बसत नाही
त्याच मातीत तो
कवितेचं बी पेरतो
मीही लावलं आहे असंच एक झाड
सावली हवी असेल तर
माझ्या सोबत या

©संजय दोबाडे

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

काजवा

उगाच भटकत हिंडत राही
एक काजवा स्वयंप्रकाशी
काय करतसे कुणा न कळे
या झाडाहून त्या झाडाशी

अंधारातच मिरवी स्वतःला
दिवसा कुठे राहतो दडून
उजेडाची जणू भीती याला
कुठल्या बिळात राहतो पडून
याचा फक्त असे दिखावा
कवडीचा ना उपयोग जगाशी

एक सुगरण भारी लबाड
काजव्याची ती करी स्तुती
चल म्हणे घरट्यात माझ्या
करीन तुजवर मी प्रीती
गर्वाने तो फुगला कीडा
भुलला खोट्या वचनाशी

रात झाली घरटा उजळला
काजव्याच्या त्या उजेडाने
दिवस होताच प्रकाश लुप्त
काजवा बने एक खेळणे
बंदीगृहात खितपत पडला
उगाच बिचारा मरे उपाशी

©संजय दोबाडे

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 



0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.