कोळी चौथरा, शिवनेरी

कोळी चौथरा, शिवनेरी

 शिवनेरीच्या इतिहासात महादेव कोळी समाजाच्या क्रांतिकारी पर्वाची साक्ष देणारा हा चौथरा इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षितच राहिला आहे. 

शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.


माझा मित्र Rahul C.Bhangare याच्या लेखणीतून काही प्रमाणात कोळी चौथ-याच्या आदिवासी भावना समजून घेण्याचा मी एक प्रयत्न केला..


कोळी चौथरा
राकट काळा सह्याद्री होता झाला जेरबंद..
अस्मानी सुलतानीला नव्हता उरला पायबंद.!!

देव धर्माला गिळत होत्या पाशवी पातशाह्या,
गोदा-भीमेचे पाणी होते यवनी सेवेत जात वाया..!!

अशात शिवबाने थोपटले होते परसत्तेविरुद्ध बाहू,
होते मराठी डोळे लागले स्वप्ने स्वराज्याची पाहू..!!

गडातटांवर शिवरायाची ऐकून अभिमानी ललकारी,
चढली सह्याद्रीच्या शिवपुत्रांनाही स्वातंत्र्याची खुमारी.!!

मातृधर्म अन मायभूच्या ऋणास झालासे पाईक,
तळहातावर शीर घॆउन निघाला खेमा नाईक..!!!

मायभूने दिला आवाज शीलरक्षणाचा,
सरसावून उठले मातीचे पूत.. विलंब न क्षणाचा..!!

बलदंड बाहू सरसावले उधळण्या यवनी राजवट,
सह्याद्रीचे कडे-कातळ झाले स्वराज्याचे अभेद्य तट..!!

सुटले मुंडासे, शिरस्त्राणाने सजले मावळाचे राजे..
टाळ मृदंग भंगले आता रणदुंदुभी वाजे..!!

घोड्यांस मारल्या टाचा, उपसल्या म्यानांतून तलवारी..
यवन निर्दालून घेतला परत ताब्यात शिवनेरी..!!

गडकोट घेतले जिंकून, जिंकला मुलुखमावळ सारा,
विजयापरांतच करविला अभिषेक भिमाशंकरा..!!

मुघल सरदारांकडून गेले थेट दिल्लीस खलिते..
की स्वाभिमानाचे सह्याद्रीत पेटलेत पलिते..!!

लाख फौज घेऊन आला शहजादा औरंग,
दख्खन सारी चिरडेन म्हणाला करून मोठा जंग..!!

निरोप धाडीला, सोडावा काफिर धर्म यावे निमूट शरण,
अन्यथा स्वत:च्या डोळ्यांनी पहाल साऱ्या कुळाचे मरण..!!

त्वेषाने मग पेटून उठले ते महादेवाचे भक्त..
हसत अर्पू जर स्वतन्त्रतेला हवेच असेल रक्त..!!

पराक्रमाला कसे रोखतील परिणामांचे हिशेब..
निर्भीडपणे ललकारला त्यांनी खासा औरंगजेब..!!!

चवताळल्या शहजाद्याने धाडीला हजारोंचा फौजफाटा,
बोलला मिळेल त्यास मारा, मिळेल ते लुटा..!!

मुठभर मावळ्यांवर पडली हजारोंची धाड..
शर्थ केली पराक्रमाची पण कसा लागावा पाड..!!!

प्राणपणे शत्रूशी लढले ते राकट मावळवीर,
न सुटली तलवारीची मुठ, न सुटला तसूभर धीर..!!

शेकडोंनी ठेविले रणभूमीवर लढता लढता प्राण,
पण वैऱ्याने शिताफीने केले दीड हजार बंदिवान..!!

आणले मैदानात बंदी वीरांस बांधून साखळदंड,
स्वाभिमानाचा पुरस्कार तो देण्या देहदंड..!!

फिरले प्राक्तनाचे फासे झाला काळसर्पाचा दंश,
विद्रोही रक्त संपविण्यासाठी केला नाईक निर्वंश..!!

क्रूरपणे धरिला रक्तसंबंधातला प्रत्येकजण, वृद्ध वा तान्हा,
नृशंसपणे समोर कापिल्या सगळ्यांच्या माना..!!

"हर हर महादेव" गुंजल्या गर्जना भेदीत आभाळा..
त्या आवाजांनी कांपून उठल्या सह्याद्रीच्या शिळा..!!

देश रक्षणार्थ झाला जरी आमुचा समूळ कुलक्षय..
सह्याद्रीच्या रक्तात नसतेच कधी मृत्यूचे भय..!!

या सांडल्या रक्तातूनच निपजेल पुढची प्रत्येक पिढी,
थेट दिल्लीच पादाक्रांत करतील मराठी मुलखाची घोडी..!!

भडकलेल्या मुघलांचे सुटले या बोलांनी भान,
क्षणार्धात करा म्हणाले सर्वांचे शीरकाण..!!!

एक एक करून झाली साऱ्यांची धडावेगळी शीरे...
मातीतली मातीतच मिसळली मराठी लेकुरे..!!

दीड हजार मुंडक्यांच्या लागल्या एकावर एक राशी..
मायभूनेच कवटाळले ते निष्प्राण पुत्र उराशी..!!


रक्ताच्या नदीने भिजली शिवनेरीची धरा,
शीरांच्या राशींवर बांधला काळा चबुतरा..!!

नाही मिळाला चुडाग्नि, नाही मिळाले सरण,
पण लाभले मातृभूमीसाठी सौभाग्याचे मरण..!!

रेंगाळलाच असेल क्षितिजावर जरा मावळतीचा सूर्य,
पाहून वेड्या मावळ्यांचे ते अपरिमित शौर्य..!!

मरणाच्या दारातही होती मान ठेविली ताठ..
अजून मातीत जिरले नाहीत त्या रक्ताचे पाट..!!

अजून त्यांच्या गर्जनांनी आसमंत थरारून उठतो..
अजून इथे अश्रू ढाळण्यासच हरेक मेघ दाटतो..!!

ही मातीच बलिदानांच्या रक्ताने रंगलेली..
ही भूमीच शूरांच्या पराक्रमाने झिंगलेली..!!

स्वदेशास्तव हसत बांधतो आम्ही कलेवरांच्या मोळी..
रक्तानेच लिहिल्या जातात आमच्या इतिहासाच्या ओळी..!!


-राहुल भांगरे

 (Ref. http://rahulbhangare.blogspot.in/2013/04/blog-post.html )


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.