निर्धार
रात्रीचा अंधार
मनात साठवत तू
जीवनात माझ्या रोजच
नवी सह्यसकाळ आणतो
तुझ्या प्रेमाच्या अविरत
बरसणा-या धारा
प्रत्येक जीविताची
स्पंदने बनल्यात
आणि
आकाशातून अवतरलेले
पानांवरील दवबिंदू
अमाप सौंदर्य
खुले करतात
मी तरी अतृप्तच....
स्वर्ग सुखालाही लाजवणा-या
डोंगरांवरील रस्त्यांवर
हसरी स्वप्ने
कधी कधी सुखावतात
पण तुझ्या छाताडावर
पाय रोवणारे
प्रगतीचे मार्ग
आकाशातील चमकणा-या
विजेगत मनाला चिरतात
सदैव...
चराचरातील तुझ्या आशा-आकांक्षा
सुख-दुखांना उगाच
हसण्याचे बळ देतात
हे समाधान
विचारांची शिदोरी पुरवते
निरंतर प्रवासासाठी....
अंकुर फुटलेल्या
नव रोपट्यांचे
मंद हवेसोबतचे झोके
ओठांवर नकळत स्मित
खुलवून जातात
क्षितीजांकडून लाल रंग
पांघरून उगवणारा सूर्य
नव क्रांतींची
तरुण किरणे
जागवत आहे....
आपल्या कार्याची फुले
यशोशिखरावर पाहण्याचे धाडस
लाभते खळखळणा-या नद्यांतून
प्रत्येक लढाईतील विजयाची
आस जगण्यात रस ओतत आहे
तुझ्या पक्ष्यांचा चिवचिवाट
त्याचेच तर संगीत आहे...
माझ्या सह्याद्रीरुपी
जीवन गाण्यात
ऊन, वारा, पावसागत
समाजव्यवस्थ्येचा मार झेलत आहे
त्यांच्याशी लढत विचारांनी
आपल्या मजबूत हातांनी
मी माझा रस्ता बनवत आहे..
पण तू शांतच आहे
कधी काही बोलल्याचे
ऐकिवात वा अनुभवात नाही
तुझ्या खामोशीतील वेदना
झेलत होणारी रात्र
त्या रात्रीच्या काळ्या
अंधाराची शाई करून
माझ्या मनात सलणारे
तुझेच दुख
गुपचूप लिहित आहे
तुझे स्वप्न कसे
माझे अस्तित्व जसे
कधी आपल्यांच्या हातांनी
कधी दुस-यांच्या हातांनी
कवडीमोल विकले जात आहे
विकासाचा बुलडोझर
दिवसा-ढवळ्या बलात्कार करतो आहे
पण तू खुश
असल्याचे भासवून
आनंदाने दुख लपवत आहे
तुझ्या हृदयातील
सह्याद्री सौंदर्यात
जन्मलेला मी
आभाळागत दुख जाणण्याचा
इवलासा प्रयत्न करणार आहे
तुझ्या अस्तित्वाचा निर्धार
मनात जपणार आहे...
© www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment