विकासाचा डाव
सेवाकार्याच्या नावाखाली
संघटनांची गर्दी झाली
आदिवासी विकासाची गती
यांच्या मी पणात
आणि जाती-पातीत अडकली
कोणी म्हणे गोंडवना
तर कोणी पुकारे वारलखंड
आदिवासी युवा शक्ति
अशा एकत्रित चळवळीला
का होतात यांचे विचार थंड ?
आदिवासी विकासाचा झेंडा
आदिवासीच फडकवु शकतो
असाही काहींचा आतताई अट्टहास
मनात माझ्या खुपतो आहे
विचारांच्या लढाईत कसा
आदिवासी विकास अडकतो आहे
अबोल मनाचा आदिवासी
भोगला, नागवला, नाचवला
नराधम राज्यकर्त्यान्नी
विकासाचे कागदी घोड़े दाखवून
कंबरात वाकवला आदिवासी
शंड पुढा-यांनी
निर्मळ अन्तकरनाने
एक होण्याची हीच वेळ
आदिवासी वटवृक्षाला
सावरन्यासाठी आता साधा मेळ
आदिवासी विकासाच्या डावाचा
चला खेळुया खेळ
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मस्त झोपलाय आदिवासी...
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
संस्कृती जतनाचे विचार इथे फाडफाड बोलू नका
सिमेंटच्या जंगलातील आदिवासी रानात आणू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
ठेकेदार माजलेत, माजू दे
आदिवासी बहिणींवर हात टाकत आहेत, टाकू दे
अंगावरचे पांघरून उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
खायला नसले तरी चालेल...योजना खा
समजत नसले तरी बेहतर...पैसे घेवून मतदान करू नका
योजनांसोबत प्रगतीची उगा स्वप्ने रंगवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
आश्रमशाळेत नाव पोरगं घरीच....वाईट काय
पीत रहा दिवस आणि...नाईट काय
सारेच धुंद आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
पाणी-पुरवठा योजना नेत्याच्या घरीच.....पाणी पिवूच नका
आरोग्य केंद्र दारी, पण डॉक्टर शहरी....आजारी पडू नका
मरणाचीच वाट पहा उगा आदिवासी जोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
प्रगती आमच्या नेत्यांचीच....स्वतासाठी काही मागू नका
आदिवासी खातेच आम्हाला खातंय....दुख मानू नका
कंबराचे सोडून फक्त डोक्याला बांधू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
विकासासाठी आक्रमक आग्रही बनू नका
नाराजीने नक्षलवादाचा मार्ग तुम्ही निवडू नका
एकी आणि नेकीचे बळ आहे उद्विग्न तुम्ही होवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आश्रमशाळा
आश्रमशाळाही आमच्याच...येथील समस्याही आमच्याच....
विद्यार्थीही आमचेच.....पालकही आमचेच.....
चित्र तर आमचेच आहे...पण तक्रारीही आम्हीच करतोय....
शिक्षकही आमचेच.....अध्ययनही आमचेच.....
ज्ञान भांडार आमचेच असताना त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याने अज्ञानही जपतोय आम्हीच.....
निधीही आमचाच.....अधिकारीही आमचेच....
संघटनाही आमच्याच....आंदोलनेही आमचीच....
सर्वकाही आमचेच आणि सर्व प्रयत्नही आमच्यासाठीच......परंतु यातील समस्याही आमच्याच पाठी कायम पाचवीला का पुजलेल्या आहेत हे प्रश्नही आमचेच.......
देशही आमचाच.....नेतेही आमचेच......
समाजविकासाचा जगनरथ वाहून नेणारेही आमचेच पांढरपोषी नेते पण तरीही आज आम्हाला आमच्या हक्कांसाठी झुंज द्यावी लागत आहे. आजचा आदिवासी उद्याचा आपला कर्दनकाळ ठरू नये म्हणून कि काय आमच्या विकासात आडकाठी आणणारे खिसेभरुही आमचेच.......
निसर्गही आमचाच.....काळा चौथराही आमचाच.....
क्रांतिकारी इतिहासाचे द्योतक आमच्याच समाजात तरीही लाचारी करावी लागतेय आम्हालाच आमच्या हक्काच्या जमिनींसाठी......
बलात्कार झेलणारे आम्हीच....बलात्कार पाहणारेही आम्हीच....
अन्यायाची जाणीव होईल इतपत शिक्षण आमच्या आश्रमशाळांनी कसेही का होईना आमच्या ओटीत टाकले....काहींनी त्यातून आपल्या जीवनाचे सोने केले.....तो सोन्याचा मुकुटही आमचाच....पण तरीही आमचे रक्त कितीही अन्याय बघितला तरी का पेटत नाही हा निरागस प्रश्नहि आमचाच.....
धरणातील जमिनी आमच्याच.....त्यामुळे उपाशीपोटी निजतो आम्हीच.....
धरणग्रस्त आज जगण्याच्या स्पर्धेत झालेत एड्सग्रस्त.....याची जाणीवही फक्त आम्हालाच.....त्याच्या मरणासन्न यातनाही फक्त आम्हालाच......
आदिवासी खाते आमचेच...त्यातील योजनाही आमच्याच....
आदिवासी विकासाच्या नावाखाली या खात्यातील सुटा-बुटातील मंडळी आम्हालाच खातात....तेव्हा जगावे कि मरावे ? हा प्रश्नही पडतो आम्हालाच.....
आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......
'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....
आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....बस्स हे पातकही आमच्याच हातून.....आमच्याच हातून......!!!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी क्रांती
संस्कृतीची श्रीमंती
पोटाची गरीबी
हां खेळ आदिवासी जगण्याचा.....
मनाचे मोठेपण
अपेक्षांचे तरुणपण
हा मान आदिवासी जगण्याचा....
कपड्यांचे रंग
मन निसर्गात दंग
हा रस आदिवासी जगण्याचा.....
वारली चित्रकलेची रंगत
तारप्याची संगत
हा उत्सव आदिवासी जगण्याचा....
डोईवर ओझे
पदर सावरी मन माझे
हे लालित्य आदिवासी जगण्याचे....
पक्ष्यांचे थवे
आम्ही निसर्गाचे छावे
हा रुबाब आदिवासी जगण्याचा....
गीतांचे सुर
कधी नदीला पुर
हा ताल आदिवासी जगण्याचा....
वृक्षांची फळे
संस्कारांची मुळे
हा अभिमान आदिवासी जगण्याचा....
हरामखोरांची घुसखोरी
आमच्या ताटात होते चोरी
हा धोका आदिवासींना जगण्याचा....
घटनेचे बळ
परी कायद्याचा खेळ
ही सल आदिवासी जगण्याची....
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी फर्ज
निकल पड़े है हम
मंजिल की ओर...
नहीं पता था की
मिलेंगे बहुत से चोर....!
सदियों से लढी लड़ाइया
अब विचारों की बारी है
चलो पकड़ो आदिवासी संस्कृती की डोर
साबित करेंगे हम ना है कमजोर....!
बनना पडेगा हमें हमारा ही रहनुमा
जीतना है हमें आदिवासी आसमा
सुनहरे भविष्य के सपने लेकर
आओ चले हम मिलजुलकर....!
जल, जंगल, जमिन संपदा हमारी
डर है की खो ना दे इसे हमारी बेरोजगारी
अरे नक्सलवाद तो एक बहाना है
राज्यकर्ताओं को शायद आदिवासी मिटाना है.!
कुपोषण और भूख के शिकार बच्चे हमारे है
उद्योगपतिओ की भेड़ चाल के शिकार हम है
गुलामी का दामन तोड़ने का विचार कर
ऐ दोस्त चल आदिवासी होने का फर्ज अदा कर..!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आंध
परभणी, नांदेडच्या जमिनीतही
उन्हा-तान्हात सावरतो बांध
यवतमाळ असो वा अकोला
निसर्ग सोबती आहेत आंध
तेलगू भाषिकांचा दिसे
जगण्यावर आज प्रभाव
आर्येतर जमातीचा
जपलाय स्वभाव
रंगाने काळी
असे ओठ जाड
जमात भोळी
असे गालाचे वर हाड
खानदानी गट तो वरताळी
अनौरस ओळख ती खालताळी
बंसाळे, देवकर, गोहाडे, खडके
मगरे जपती आदिवासी कुळी
शेतीसोबत काळविट
अन सशांची शिकार
ज्वारी, तुर, उडीद, मुग, वाल
जेवणातले अनोखे प्रकार
चिखलमातीच्या भिंती
जपती स्वच्छतेची नाती
कौला-गवताची छपरे
गाती निसर्ग गीत रे
धोतर, कुडता, पागोटे
घेती पुरुषीपणाचा ठाव
चोळी अंगात नऊवारी लुगडे
दावी आदिवासी स्त्रियांचा भाव
अंगठी हातात काना असे बाळी
डोईवरी पागोटा शोभे आभाळी
बांगड्या, पारल्या, जोडव्यांचा शृंगार
मनीमंगळसूत्र साताजन्माचा आधार
मारुती, भीमसेन, खंडोबा
दैवतं पुजतो मरीआई
पुनर्विवाह-काडीमोड़
पायपाखाळणित असे लगीनघाई
पारम्परिक जात पंचायत
मुखिया करी निवाडा
आदिवासी विकासासाठी
चला गावू शिक्षणाचा पोवाडा
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सह्याद्री रत्न-राघोजी भांगरे
चोमदेव डोंगराचं ते नटनं
संस्काराचं हरवलं होत लेनं
20-30उम्ब-याचं देवगाव ठेंगनं
वनराईला घाली स्वातंत्र्याचं मागनं
धावडा, हिरडा, बेहडा वृक्ष साथीला
भात, नागली हातभार लावी जगण्याला
नजर लागली होती राजुरच्या सौंदर्याला
सावकारी फास आदिवासिंच्या गळ्याला
इंग्रजांची पाशवी निति भेदण्याला
विरांची गरज होती मावळ मुलुखाला
शोण नदीची धार टिटवी कुसाला
क्रांतीची ज्योत दिसे महांकाळ डोंगराला
काळे ढग उठण्याची चाहुल रतनगडाला
अन्यायाची जणू जान कळसुआईला
हिरव्या शालुच्या गर्द वनराईला
आदिवासी मातेची कुस आली फळाला
'स्व'विचारांचा काळोख भेदन्याला
नवतेजाची झलक पेहरा मुलुखाला
सूर्य क्रांतीचा बघा उगवला
राजुर प्रांताच्या रामजी भांगरेला
आई रमाबाईचे थोर संस्कार
पुत्र राघोजी दिसे रुबाबदार
इंग्रजांचा पुसण्या काळाबाजार
राघोजीची तळपलि तलवार
मनगटी बळाने उगारले बंड
विचारांनी हाकलले शंड
रक्ताचे पाट वाहिले गरजेला
कीर्ति पसरली सर्व मुलुखाला
इंग्रजांचा धुव्वा उडविला
सावकारांचा काळ बनला
बंदूक-गोळी असे सोबतीला
दांडपट्टाही शोभे हाताला
आया-बहिणी इज्जत प्यारी विराला
जाच न आवडे याला गोर गरिबाला
कापण्या सज्ज जो असे मातलेला
छाटला भंगसाळी शहरपुंज गावाला
अन्यायाचे फास तोड़ण्या
राघोजी रात-दिन झटला
गोर-गरिबांच्या न्यायाचा
स्वता चालविला खटला
आज पूण्यतिथिच्या वख्ताला
आयुश वंदन करी राघोजीला
विचारांचा ठेवा असे अभिमानाला
नमन आद्य आदिवासी क्रान्तिविराला
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी विकास....
आदिवासींचा विकास म्हणजे...?
आजही प्रश्न अनुत्तरित आहे
विकासाची प्रक्रिया राबवणारांचे
मात्र जगणे ऐटित आहे
नियोजन कार्याच्या कल्पनेत
आदिवासी हरवलेलाच आहे
राज्यकर्त्यांच्या दुनियेत
तो लंगोटीतच हवा आहे
शिक्षणाच्या बाजारीकरणात
ज्ञानसाधना हरवत आहे
आश्रमशालांच्या गंगाजळित
बेरोजगारी वाढत आहे
आरोग्याच्या चार भिंती
आजही अनाथ आहेत
देवासमान डॉक्टर आमचे
सीमेंटच्या जंगलात आहेत
निवा-याचे छप्पर आज
जमिनिसोबत पोरके होत आहे
जगण्याची नाळ तोडणारा
आम्हालाच पेढे भरवत आहे
फँशनच्या दुनियेत शृंगारातील
कपडे तोकडे होत आहेत
आदिवासींच्या गरिबित मात्र
झम्परचा आधार विरळ होत आहे
सभ्यतेच्या युगात
आम्ही दर्जेदार आहोत
मानवतेच्या जडणघडणित
संस्कृती उगमाचे दावेदार आहोत
जगाच्या विकासात हवीय
आदिवासी समृध्दी आम्हाला
सहानुभूती मुळिच नकोय
हक्काचे जगणे दया आम्हाला
सवलतिंच्या कुबड्या म्हणून
का हिणवता आम्हाला
गुणवत्तेच्या बाबतीत कधीच
एकलव्याने हरवलय तुम्हाला
विकासाचे मूलभूत सिध्दांत
जपण्यास हवेत जातिवंत
आर्थिक सफलतेच्या मार्गातील
चला घडवू या गुणवंत
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
करवंद आणि आदिवासी
आज करवंद ही बोलू लागली
आदिवासी जन्माची गाणी
काळ्या कातडीखाली
गोडीतुन सांगती गा-हाणी
ऊन असो वा पाऊस
डोक्यावर जगणे बांधलेले
खिशात नसली दमड़ी
मन जगासाठी सदा मांडलेले
हिरव्या पानामंधी करवंद
जिभेवर लाळ घोळवती
उघडा-नागडा आदिवासी
परी संस्कृती सदा जपती
काळ्या मैनेचे हे प्रेम
चाखली हजारोंनी माया
कातळ-कपारितला गोडवा
नांगरताना गायी आभाळमाया
काटयांचे असणे कधी
करवंदाला टोचत नाही
संकटांचे जगणे बाई
सरकारला बोचत नाही
हिरवाईचा शालू बघा कसा
करवंद जपतो आहे
फाटलेली मने विकासाची
आदिवासी शिवतो आहे
उघड्या माळरानावर सदा
जाळी करवंदाची रूपवती
योजनांचा वंचित राजा
सह्याद्री संस्कृती पेरती
निसर्ग संस्कृतीचे ग्रहण
झाडे करवंदाची गळु लागली
आदिवासी बांधवाचे मरण
घुसखोरी कोर्टातुनही जिंकु लागली
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
लपंडाव
पैशासाठी होतेय माणुसकी बेजार
मैत्र जीवाचा आज होई लाचार
फ्रेंडलिस्टचा फेसबुकवरच प्रचार
कसे मागे राहिले पूर्वजांचे विचार
निसर्ग सम्पन्नतेचा कसा भोगला तो काळ
शोभेसाठी राहिला तारप्याचा गोपाळ
भावाला भावाचाच कसा होई विटाळ
मॉडर्न शिक्षणाचिच ही पीके खट्याळ
व्यवहारात दिसेना शबरीचा तो राम
पैशाबिगर होईना कसे सरकारी काम
निसर्गचक्रही बदलले कसा भोगाल आराम
प्रत्येक ऋतूतील जगणे कसे झाले नाकाम
निवडणुकीच्या प्रचारात दिसली का हो नीतिमत्ता
शेवटी संधीसाधुच कशी भोगती सत्ता
मागाच्यांच भ्रष्टाचाराचा गिरवी सर्व कित्ता
कायद्याची पायमल्ली हा तर हुकमी पत्ता
तरुणाईच्या रक्ताची बदलासाठी धाव
बेरोजगारीच्या मुळावर कसे कोणी घालीना घाव
शेतकरी बापाच्या मालाला मिळेना भाव
प्रगतीच्या नावाने सर्वच खेळती लपंडाव
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी बाणा
मनुवादी वृत्ती जपती
भोवती आमच्या वाद
निसर्ग आम्ही पुजती
विसरा आता दैववाद
धार्मिक रंगांची उभारी
परकीय विचारांनी भिंती रंगल्या
सांस्कृतिक गिलाव्याची करणी
विचारांच्या तलवारी गंजल्या
विज्ञानाचे युग अनोखे
आदिवासी पुजती कर्मकांड
चला जपुया आदिम संस्कार
विसरून दैवतांचे थोतांड
परशरणतेचे विष
तरुणांचा करी घात
आपल्या एकतेचा श्वास
विचारांनी आखुया बेत
मुल्य-हासाचे ग्रहण
हरवले आदिवासी जीवन
संस्कृती जतनाचे कारण
संस्कृतीचे लावू या तोरण
मनाने विचार पुजले
शब्द फुलांसवे उमलले
हाक आज अगत्याची
आदिवासी बाणा जपण्याची...!!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कर्दनकाळ
कसं गावू म्या प्रगतीचं गानं
रोज जगतो म्या मरण
तुह्या प्रगतीची गिरण
आज रचते माझे सरण
इच्चार आज खुंटलेत
योजनांत अड़कलेत
आदिवासी मी दिगंतरिचा
वनवासी म्हणून मांडलेत
जगाची प्रगती आज
इजार-बंडी देवून गेली
अस्तित्वाच्या लढाईत
अब्रू धरणात गाडून गेली
परकियांचे आक्रमण
संस्कृतीचे होई संक्रमण
डोळ्यात आज पाणी
मनात जळे पुढारीपण
तुमच्या शाळा अपयशी
माझी संस्कृति उपाशी
बहरलेल्या पिकासोबत
कसा करपतो आदिवासी
कुपोषनाचे कुत्सित जपतो
उद्याचा भविष्यकाळ
निवडणुकिचा फास
कसा आमचाच कर्दनकाळ
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सा-यांचीच भूक येथे गरीब हाय
आदिवासी कष्टात राबत जाय
कंद-मुळे होती सुखाची आगरे
केले वनवासी तू आता तरी जाग रे
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
महालक्ष्मी दैवत करितो पहिले नमन
आदिसंस्कृती पूजितो हा जन्माचा मान
आदियुवा चळवळ जाणिति हा प्राण
जोड़ा 'आयुश'शी नाळ ही मातीची जाण !!!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
हजार ठिकाणी झोपड़ी गळते
मन त्यासोबत तीळ तीळ तुटते
तरी आनंदी मनाची श्रीमंती जपते
निसर्ग जपन्यास आदिवासी संस्कृती सांगते
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
जंगलासाठी आदिवासी & आदिवासींसाठी जंगल
जपावे नेटके म्हणजे निसर्ग सदा राहील मंगल
भूमिहिन कोणी असे काही कर्जबाजारी
शेतीत राबतो परी मुले कुपोषणाच्या दरबारी
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
नदीचा प्रवाह स्वछंद स्वाभिमानी
तसे आम्ही संस्कृतीने अभिमानी
आत्ता निवडा आपल्या मनातली निशाणी
म्हणजे करावी नाही लागणार कुठे गा-हाणी !!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी विकास विभाग करतोय काम
प्रत्येक कामाचे मागतोय दाम
आदिवासी माणूस गाळतोय घाम
त्याचे कष्ट बनती दुस-याचा आराम !!!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
समाज विकास
हरियाली क्यामि-यात
आदिवासी लिखाणात
खुप चांगले वाटते........
जीवनाच्या लढाईत
दारिद्र्याच्या खाईत
आदिवासीपण भंगले.....
आदिवासी खात्याचे अपयश
नाही जमत समाज विकास
पण अधिका-यांचे बंगल्यावर बंगले
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आदिवासी दैना...
काळाची घंटा वाजली
धरित्री माय चालली
ऐना प्रकल्प उराशी
बेघर कासाविस आदिवासी
ना कोर्ट ना सरकार
आमच्यासाठी सर्वच लाचार
एकी जपा माय-बापहो
काळ सोकावतो आहे ओ
रांड का करण्या संसार
योजना येई वारंवार
जंगलचे आम्ही सरदार
आज हरवला हा विचार
ओली बाळन्तिन सरसावली
पर शिकलेली टाळकी हरवली
दुःख एकच उशाला
जमिन लाटली विकासाला
आज मी हाय
उद्याचा भरवसा नाय
जंगल ना जमिन नसे
विकास तोंडाला पाने पुसे
उघडा पडणार संसार
भिक मागाल दारोदार
जपा एकी निरंतर
गरज अस्तित्वासाठी अपरंपार
कायदा साम्भाळि आज
घुसखोरांचीच लाज
खरा असे नशेत धुंद
सरकार करी जीवन त्याचे बंद
आता नाही तर कधीच नाही
शस्त्र पेलण्याची करा घाई
क्रांतिकारकांचा मर्दानी इतिहास
आज आठवावा हाच अट्टहास
संस्कृती जपण्या आयुशची हाक
लाभेल सोबत हीच एक आस
नाही तर जगाचा विकास
करील आदिवासीपणाची राख
मन आज हळूच रडतय
सर्वांना गावाला बोलावतय
बेघर जमिनी संकट बने ऐना
उद्या कंबराचे सोडून भोगाल दैना
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
बदलवून टाक......
बदलवून टाक आजचा काळ परीक्षेचा सारा
जागवु इथे आदिवासी घामाच्या अहोरात्र धारा !!
डोंगर द-यांतील कातळाना देऊ
झळाळि आदिवासी विचारांची
पडकईच्या जमिनीत घेऊ
पीके मोत्यासमान तांदळान्ची !
गावापर्यंत योजना नेवू, पिड़ीताला सहारा !!
बदलवून टाक.......
सोनेरी सूर्य आदिवासी क्रांतीचा उगवेल
जेव्हा बोलतील आदिवासी कविता
बिरसा, राघोजी, तंट्या मामा दावी
ज्वाज्ज्वल्य क्रांतिमय बाणा आदिवासिंचा
तथाकथित इतिहासकारांनी केला आदिविचारांचा कचरा !!
बदलवून टाक.......
आदिवासी संपदेवर खिळले डोळे
कावेबाज भांडवलदारांचे
राजकारणीह़ी स्वप्न जपती
आमच्या -हासाचे
चला माय-बापहो समजुन घेवु आज हा इशारा !!
बदलवून टाक......
आई महालक्ष्मीची कृपा
बळ आम्हास देई
सह्याद्रिची उंच शिखरे
कळसुआईचे नाव घेई
निसर्ग पुजती आम्हीच सारे हाच तो दरारा !!
बदलवून टाक आजचा काळ परीक्षेचा सारा
जागवु इथे आदिवासी घामाच्या अहोरात्र धारा !!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
© Raju Thokal
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment