वनराईच्या संगतीनं
शाळा माझी नटली
साळला येणारी पोरं
अमराईत अडकली
शाळेचा पहिला दिवस
ज्ञानदानाचा केला नवस
शिक्षण हक्क कायदा
करी पोरांची गवस
धुळीआडून बेंचेस
लागले कुठे चमकू
करवंदाच्या जाळीतली पोरं
म्हणे साळला जावू का नकू
पटासाठी उन्हाळभर
गुरीजींचे घरोघर दौरे
पहिल्या दिवसाचा पट कमी
डोई अधिकारी धाक रे
डोंगुरद-यांच्या कुशीत शिक्षण
थोड़े कमीच आहे
बायोमेट्रिकवर बोट ठेवून
गुरूजी पोरांच्या शोधात आहे
शाळेच्या सुरुवातीलाच
येई पावसाचं दिस
नांगरामागचा बळीराजा
करी पाटी पेन्सिलाची ईचारपूस
फाटक्या संसाराच्या आशेचा तारा
थोड़ा उशीराच पण साळला चालला
मायच्या पोटचा गोळा बा'च्या डोई
वळकुटी हाती आश्रमशाळेला चालला
अक्षरांच्या दुनियेत आज
पाखरांची संगत शोधतो आहे
शिक्षिकेच्या साडीत त्याला
धांदुक फड़कीतील माय दिसत आहे
सरकारी कापडात बाळ कसा
बाराखडी शिकत आहे
वसतिगृहाच्या सावलीत
बंधुभाव जोपासत आहे
गुणवत्तेसाठीच्या ज्ञानदानापल्याड
पालन पोषण गुरूजी करतो
लागलाच कधी निकाल कमी
तर बापासारखा मनात रडतो
आश्रमशाळान्च्या निकालाची तुलना
विद्यालयांशी कधी करू नका
पगारापेक्षा जबाबदारीचे भान
वेळ काढून अनुभवुन बघा
बापासारखा गुरूजी सदा
पगारासाठी पोरका असतो
रात्र दिन राबूनही
आज कसा परका ठरतो
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment