राजू ठोकळ लिखित कथा आपल्यासमोर आणताना मनस्वी आनंद होत आहे. प्रगतीच्या प्रवाहात मनसोक्त विहार करण्याच्या नादात आपण आपला आधारवड हरवत चाललोय असेच चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते.....आणि हे प्रमाण वाढत जाणारे आहे. दुर्दैवाने सांगावेसे वाटते कि आपल्या उंच राहणीमानाच्या नादात आपण आपली माती, नाती, गावाकडील माणसं, त्यांचे संस्कार विसरत आहोत यावर प्रकाश टाकणारी हि कथा आपणास कशी वाटली याच्या प्रतिक्रिया आपण 9890151513 या whats app नंबरवर जरूर कळवा.
आधार कार्ड
पार्वती आज्जी तशी स्वभावाने थोडी तापट असली, तरी कोणी गरजू जर तिच्या दारावर आला तर कधी परत फिरला नाही. त्यामुळे तिला पंचक्रोशीत कोणी ओळखत नाही असा शोधूनही कोणी सापडणार नाही. दोन मुले आणि एक मुलगी असा लहानसा परिवार ती हातावर मिरची भाकर खाऊन जपत होती. कुंकवाचा धनी तीला खूप लवकर सोडून गेल्याने रांडकेपणाची सल तिला खूप त्रास देत होती. नवरा गेल्यावर सा-या किरमिरा गावातील लोकांनी तिला मदत करण्यासाठी हात वर केले. पण ती डगमगली नाही. आपल्या लेकरांना घेऊन तिने वाट्याला आलेली तीन चार वावरांची शेती मोठ्या कष्टाने सावरली.... नांगरली.... पेरली....कसली.
दिसामागून दिस जात होते. पार्वती आज्जी मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होती. स्वतः शिकलेली नसली तरी पोरांना तिने शाळेत टाकले होते. पोरांनी खूप शिकावं....मोठ्ठ व्हावं....आपला संसार सुखात थाटावा एवढीच तिची अपेक्षा होती. दिवस रात्र ती कष्ट करत होती....मुलांना जी लागतील ती सारी पुस्तके, वह्या ती घेऊन देत होती. तिची तिन्ही मुलंही अभ्यासात हुशार होती.
मोठ्या मुलाने म्हणजे ईश्वरने बी एस्सीला कॉलेजात सर्वाधिक गुण मिळविले....त्याच्या कष्टाचे चीज झाले होते....खरे तर पार्वती आज्जीच्या पुण्याईची ही कमाई होती. आता त्याला पुणे किंवा मुंबईला शिकायला जाण्याची इच्छा होती. परंतु शहरात शिकायचे म्हणजे खर्च हा अधिक येणार होता. त्यात खंडू आणि वनिता हि भावंडे त्याच्यामागून शिकत होती. ईश्वर जसा अभ्यासात हुशार होता.....तसाच तो दिसायलाही राजबिंडा होता. त्याचं देखणं रूप व त्याची हुशारी पाहून त्याच्या मामाने त्याला मदत करण्यास स्वताहून शब्द दिला. यात त्याने फक्त आपल्या मोठ्या मुलीचा, आर्चिचा, हात देऊ केला होता.
भावाने आपल्या अडचणीच्या काळात आपल्याकडे कधी ढुंकून बघितले नाही. कधी आपुलकीचे चार शब्द ऐकवले नाही.....आणि आज तो अचानक ईश्वरचा संपूर्ण खर्च करायला तयार झाला होता. पार्वती आज्जीला खरं तर भावाच्या या कपटीपनाचा राग आला होता. परंतु ती मदत स्वीकारण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. शेवटी ईश्वर पुण्याला शिकायला गेला तो पण मामाच्या मदतीने.
पार्वती आज्जी लोकांच्या अडचणीत मदत करत होती. स्वताच्या शेतात राबत आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करत होती. आपल्या मुलांच्या स्वप्नांना बळ देणं हेच तीच्या जगण्याचे ध्येय होते.
ईश्वरबरोबर तीचा दुसरा मुलगा व मुलगी यांच्याही उच्च शिक्षणासाठी पार्वती आज्जीनं जीवाचं रान केलं. त्यांना हवं ते सारं पुरवलं. स्वताच्या पोटाला चिमटा देत हौस मौज, सणवार सारं विसरली व तीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. ईश्वरला आय टी कम्पनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली. आईला वाटले आता आपल्या डोक्यावरील ओझे कमी झाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच लिखित होते. ईश्वरला जशी नोकरी लागली, तसा त्याचा मामा बहिणीच्या घरी येऊन बसू लागला. त्याच्या मुलीचा सून म्हणून तीने स्वीकार करावा असा आग्रह करू लागला. पार्वती आज्जीला वाटत मुलीचे अगोदर हात पिवळे करावेत....पण तिचा भाऊ तिला काही सोडत नव्हता. शेवटी वैतागून पार्वती आज्जीने ईश्वरच्या लग्नाला परवानगी दिली.
घरात आनंदाचे वातावरण होते. शेजारी आणि पाहुणे यांची ये जा सुरु होती. सारेच पार्वती आज्जीने खाल्लेल्या खस्ता आठवून तिला तिच्या कर्माचे चीज झाले असे सांगत होता. तिकडे आपल्या मुलीला मनासारखा व मोठ्या पगाराचा जावई मिळाल्याने पार्वती आज्जीचा भाऊ खूप खर्च करत होता. आज पर्यंत गावात कोणी इतका खर्च केला नसेल असा खर्च तो करत होता. लग्नाची तारीख जस जशी जवळ येत होती तस तशी पार्वती आज्जीच्या मनावरील दडपणाची जाणीव तिच्या मुलीला होती. ती सतत आपल्या आईला आधार देऊन सर्व काही ठीक होईल असे सांगत होती.
ठरल्याप्रमाणे अगदी थाटामाटात लग्न पार पडले. लग्नाला पाहुण्यांची तुफान गर्दी झाली होती. घरात सून आल्याने सर्व घर आनंदून गेले होते. आता पार्वती आज्जीला कामात मदत होणार असे अनेकजण बोलून दाखवत होते.
लग्नानंतर ईश्वर कामाला निघून गेला. दुस-या मुलाची व मुलीची परीक्षा असल्याने ते दोघे पण निघून गेले. सुनेचे नाव अलका असले तरी पार्वती आज्जी तिला आक्का म्हणून अगदी लेकीप्रमाणे हाक मारत होती. घरातील लहान मोठ्या कामात ती अलकाला मदत करत होती. बापाची एकुलती एक मुलगी असल्याने व तिची इच्छा गावाला राहण्याची मुळीच नसल्याने ती मात्र सासूच्या कोणत्याही सांगण्याकडे लक्ष्य देत नव्हती. जेवण झाल्यावर रात्री लवकर झोपणे, भांडी न घासणे, सकाळी उशिरा उठणे, पाणी न भरणे, आलेल्या पाहुण्यांशी नीट न वागणे अशा काही गोष्टी सुनेकडून घडत असताना पार्वती आज्जी मात्र शांतपणे सर्व कामे पूर्ण करत होती. आपल्यामुळे नवीन जोडप्यात दुरावा निर्माण होऊ नये म्हणून ती ईश्वरला खरं काही सांगत नव्हती. तिकडे अलका मात्र ईश्वरला आईविषयी खूप काही वेगळे पटवून देत होती. त्याचा विश्वास बसत नव्हता, परन्तु तो अलकालासुद्धा काही समजावत नव्हता. शेवटी वाद नको मानून त्याने अलकाला सोबत घेऊन जाण्याचा विषय आईकडे काढला. आईने पटकन होकार देऊन टाकला. कारण तिला पण मुलाचे मन दुखवायचे नव्हते. एक दिवस सर्व साहित्य घेऊन ईश्वर अलकासोबत पुण्याला आला.
पार्वती आज्जीचा दुस-या मुलाला पदवीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्याला पण निकालानंतर लगेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर नोकरी लागली होती. आपल्या मुलीचे काही बरेवाईट करावे हा विचार सतत तिचा मनात येत असे. एक दिवस दूरच्या नात्यातील साबळ्यांचा मुलगा जो एका चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, त्या मुकुंदचे मागणे आले. मुकुंद अगदी मनमिळावू, दिसायला सुंदर आणि सुसंस्कृत...! पार्वती आज्जीने आपल्या सुमीचा हात देऊन टाकण्याचे ठरवले. सुमीला लग्नाचा परवानगीविषयी विचारण्यात आले. स्वतः मुकुंदने पार्वती आज्जीसमोर सुमीला कोणी मुलगा प्रेमात पडला असेल तर सांग असे विचारले. सुमीने लाजत तसे काही नाही असे म्हटल्यावर लग्नाच्या तयारीला सर्वजण लागले.
सुमीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच पार्वती आज्जीने आपला दुसरा मुलगा अतुलच्याही लग्नाचा विचार सर्वांना सांगितला. जर शक्य असेल तर दोन्ही लग्न एकत्र करण्याचा विचार तिने बोलून दाखवला. सर्वांनी आपापल्या नात्यातील मुली दाखवायला सुरुवात केली. अतुल उच्चं पदावर सरकारी नोकरीत असल्याने अनेकांनी अनेक प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न केला. पार्वती आज्जी मात्र अतुलच्या पसंतीची मुलगी आपल्याला सून म्हणून हवी असे सांगत होती. अतुलने आपल्याच वर्गात असणा-या कांबळे काकांची मुलगी, सविता, आईला सुचविली. कांबळे काका आपल्या जातीतील नसल्याने सुरुवातीला पार्वती आज्जी गप्प राहिल्या. परंतु आता कुठे कोण जात पात बघतो असे तिने मनात ठरवून सविताला सून म्हणून स्वीकारायला होकार दिला. अतुलने लगेच कांबळे काकांना सविताला मागणी घातली.....मुला-मुलीची पसंती असल्याने मनातील सर्व विचार बाजूला ठेऊन या आंतरजातीय विवाहास मान्यता दिली.
लग्नासाठी सर्व खर्च ईश्वर करणार असला तरी पार्वती आज्जीने आपल्या कष्टाच्या कमाईतून बाजूला काढून ठेवलेल्या पैशातून मुलीला हवे तसे दागिने खरेदी केले. दोन्हीही लग्न मोठ्या उत्साहात पार पडली.
ईश्वर व अतुलने पार्वती आज्जीला आग्रह केला कि आई तू पण आमच्या बरोबर राहायला चाल.....परंतु तिने आत्ताच नको म्हणून नकार दिला. ती सांगत होती कि आपली शेती आणि आपला गाव सोडून मी शहरात नाही राहू शकत. पार्वती आज्जी आपला गावाकडे राहन्याचा हट्ट सोडत नव्हती. सुमीनेसुद्धा आपल्या आईला आपल्यासोबत येण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्यालाही नकार देत पार्वती आज्जी म्हणत होती कि गावाशी असणारी नाळ तोडून मी कुठेच जगू शकत नाही.
अधूनमधून सणाला मुलं भेटायला येत होती. आता सर्वांना मुलं झाली होती. आपली नातवंडं आल्यावर आज्जी त्यांचा मुक्का घ्यायची.....त्यांना खूप गोष्टी सांगायची. तिचं सारं घर आनंदानं बहरून जायचं. दोन दिवसांनी सर्व गेल्यावर मात्र आज्जीला ते घर खायला उठत असे. आता पार्वती आज्जीला पूर्वीसारखे काम होत नव्हते. त्यामुळे शेत आता पडीत होते. आपले शेत पडीक असल्याची सल आज्जीला सहन होत नव्हती. परंतू वयानुसार ती आता काही करू शकत नव्हती. तशी तिला काम करण्याची गरज नव्हती कारण दोन्ही मुले तिला खर्चाचे पैसे पोस्टाने पाठवत होते.
ईश्वरला पुण्यात एक फार्महाऊस घ्यायचे होते. आपल्या पगारातून शिल्लक असणारी रक्कम पुरेशी नव्हती. अतुलकडे मदत कशी मागावी हे त्याला सुचत नव्हते. शेवटी त्याने त्याला फोन करून आपल्या पडीक जमिनीचे काय करायचे असे विचारले. अतुलला समजून चुकले कि याला नेमके काय म्हणायचे आहे. आपली आई जमीन विकायला कधीच परवानगी देणार नाही असे तो ईश्वरला सांगत होता. परंतु तो काही ऐकत नव्हता.
सकाळची वेळ होती. एक पांढ-या रंगाची महागडी गाडी गावात येऊन थांबली. कोणी तरी साहेब गावात आला आहे कि काय म्हणून सारा गाव जमा झाला होता. गाडीत ईश्वर, अतुल आणि त्यांच्यासोबत काही पाहुणे होते. गावात सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
अतुल आपली जमीन पाहुण्यांना दाखवायला गेला. ईश्वर आईकडे त्याच्या मनात काय आहे ते सांगू लागला. पार्वती आज्जी त्याच्या निर्णयावर पुरती नाराज होती. आपली जमीन विकायची हा विचार तिला मनातून मारत होता. ती नाही म्हणत होती....ईश्वर तिला त्याच्या अडचणी सांगत होता. शेवटी आपल्या मुलांच्या सुखासाठी तिने आपल्या जमिनीचा बळी देण्याचे ठरवले.
ईश्वर व अतुलने मोठ्या किमतीत जमिनीचा सौदा केला. त्यातील काही हिस्सा सुमीला पाठवून दिला. काही रक्कम घर खर्चासाठी पार्वती आज्जीला देऊ केली. परंतु पार्वती आज्जीने त्यातील फुटी कवडी घेण्यास नकार दिला. व्यवहार पूर्ण करून ईश्वर व अतुल आईला गावाला ठेऊन निघून गेले. इकडे जमीन विकली गेल्याने पार्वती आज्जी खचली होती.
पूर्वी सणावाराला येणारी मुले, सुना, नातवंडे आता येणं कमी झालं होतं. सांगायला पार्वती आज्जी सुखी असली तरी मनातून नातवंडं, मुलं यांचा विरह तिला सहन होत नव्हता. आता तिला वाटत होते कि आपण मुलांमध्ये जाऊन राहावे. परंतु आता तिला कोणी आपल्याकडे येऊन राहण्याचा आग्रह करत नव्हते. सुमीला आपल्या आईची हि अवस्था सहन होत नव्हती. परंतु जावयाकडे जाऊन राहणे तिला मान्य नव्हते.
पार्वती आज्जीला कोणी तरी सांगितले कि आधार कार्ड काढल्यावर सरकारी सवलती मिळतात. बस प्रवासात अर्धे तिकीट पडते. आज पार्वती आज्जी सकाळीच सरपंचाच्या घरी आली होती. तिला आधार कार्ड काढायचे असल्याने ती रहिवासी दाखला मागत होती. आयुष्यभर आपल्या मुलांच्या आयुष्याला आधार देत तिनं हे जग पाहिलेलं नव्हतं.....आता ते जग तिला स्वतः पाहायचं होतं. कारण या जगात तिचा आधार असणारी दोन्ही मुलं कुठे तरी हरवली होती.
-राजू ठोकळ
Aboriginal Voices
संपूर्ण कथा वाचली... खूप छान पद्धतीने लिखान केले आहे...
ReplyDeleteएकूण कथेचा सारांश लक्षात घेता...असं वाटतंय... आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं...
बरेच प्रसंग मी असेच बघतोय...शाळा शिकल्यामुळे लोकं जमिन विकतात आणि आई वडिलांपासनू...मित्रांपासून... नातेवाईकांपासून... आणि गावापासून दूर होतात...
शिक्षण हे फक्त साक्षर होण्याचेच साधन असेल... त्यापासून जर संस्कार मिळत नसतील तर... आम्ही अडाणी असलेलेच का बरे नाही...🙏 - जगन खोकले
खूप छान पद्धतीने कथा मांडली आहे सर तुम्ही पण ही कथा नसून वास्तव आहे कारण शैक्षणिक प्रगती झाल्या नंतर नोकरीला लागल्या नंतर खूप कुटुंबाची अवस्था अशी आहे
ReplyDeleteशिक्षण घेऊन लोक नोकरी लागल्यावर शहरात राहणे पसंत करतात पण गावी आपली जमीन कामाची नाही असे समजून विकतात काय विकाव आणि काय ठेवावं हेचं यांना कळतं नाही
अश्या आडण्याना समाज बहिष्कृत केले पाहजे
ही कथा म्हणजे मी बघितलेला अनुभव आहे..
Delete