निसर्गाचा अनोखा अविष्कार असलेला जिल्हा म्हणजे पालघर होय. यात निसर्गातील विविध वनस्पती, औषधी वनस्पती, प्राणी यांचा तालुका म्हणजे जव्हार होय. याच तालुक्यात मुकणे संस्थानचा भव्यदिव्य पुरातन राजवाडा आजही येथील प्राचीन आदिवासी इतिहासाची साक्ष देत आहे. कधी काळी निसर्ग सौंदर्याने संपन्न असणारा हा भाग अलीकडे जंगलतोड व कमी होत जाणारे पावसाचे प्रमाण यामुळे अनेक समस्यांना सामोरे जात आहे. वर्षभर भात या एका पिकावर समाधान मानावे लागत असल्याने आर्थिक स्तर खूपच खालावलेला आहे. काही प्रमाणात चिकू, आंबे यांच्या बागा असल्या तरी योग्य बाजारपेठ व प्रवासाच्या अपु-या सुविधांमुळे पाहिजे तसा लाभ येथील स्थानिकांना मिळत नाही. काजूच्या बिया, मोहाची फुले या मदतीने आपल्या आर्थिक गरजा काही प्रमाणात भागविल्या आहेत. शिक्षणाची जागृती झाल्याने आज प्रत्येक पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहे. परंतु 80 च्या दशकात असणा-या शाळांमध्ये पाहिजे तशी वाढ न झाल्याने शाळा प्रवेशाचा प्रश्न बिकट बनला आहे. अनेकदा प्रवेशावरून मोठा संघर्ष शाळेत होत असतो. एका एका वर्गात फक्त 50 विद्यार्थी मर्यादा असताना शाळा 100 ते 125 पर्यंत अतिरिक्त विद्यार्थी सामावून घेत असतानाही शाळा प्रशासनावर प्रकल्प कार्यालय, स्थानिक राजकीय कार्यकर्ते यांच्याकडून अधिक प्रवेश घ्यावा म्हणून दबाव टाकला जातो. निवासी शाळेच्या काही जबाबदा-या व मर्यादा असतात या कोणी विचारात न घेता फक्त आपला हुकूमशाही विचार शाळेवर लादण्याचा प्रयत्न केला जातो.
पालक मुलांना शाळेत पाठवू लागले आहेत. परंतु शैक्षणिक साहित्याच्या गरजा पूर्ण करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे काम ठरत आहे. निवासी विद्यार्थ्यांना शाळेकडून शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. परंतु अनिवासी विद्यार्थ्याचा प्रश्न मात्र सुटत नाही. शैक्षणिक गुणवत्ता असूनही काही विद्यार्थ्यांची यामुळे कुचंबना होत आहे. हि समस्या अचूक हेरून युवा मंच, मुंबई यांनी आपला सामाजिक वसा जपत शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा विचार मांडला. विद्यार्थ्यांसाठी येणारा हा मदतीचा हात आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत होता. म्हणून तात्काळ होकार देण्यात आला. त्यांनी लगेच अपेक्षित साहित्याची यादी मागवली. त्यांना whats app वर यादी पाठवून देण्यात आली. या यादीमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे साहित्य नमूद केले होते. सोबत काही अवांतर वाचनाच्या पुस्तकांची मागणीही समाविष्ट करण्यात आली होती. यादी पाठविल्यानंतर काही दिवसातच निरोप आला, "सर सर्व साहित्य खरेदी केलेले आहे....फक्त 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या घेऊ शकलो नाही..... त्या वह्या शाळेकडून उपलब्ध करून द्या" म्हटले "ठीक आहे.....आम्ही वह्या उपलब्ध करून देतो"
15 जून 2016 ला शाळा सुरु झाली. विद्यार्थी शाळेत येऊ लागले. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्याच बिकट असल्याने वसतिगृह सुरु करण्यात आले नव्हते. वसतिगृह बंद असल्याने शाळेतील उपस्थिती 50% होती. युवा मंचकडून शैक्षणिक साहित्य वाटपासाठी आम्ही 26/06/2016, रविवार रोजी येत असल्याचा निरोप आला. तशी सूचना विद्यार्थी व शिक्षक यांना देण्यात आली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थी येतील कि नाही याची शंका मनात येत होती. दुपार झाली आकाशात काळे ढग दाटून आले होते. थोड्याच वेळात महिनाभर प्रतीक्षेत असलेला पाऊस बरसू लागला. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा बळीराजा सुखावला होता. हि आनंदाची चाहूल उद्याच्या कार्यक्रमाची असावी असा भास काही क्षण झाला होता.
अचानक पाऊस बरसू लागल्याने मान येथे शैक्षणिक साहित्य स्वीकारायला गेलेला व्यक्ती पोहचू शकला नाही. त्यामुळे युवा मंचकडून विचारणा करण्यात आली. थोडीसी दिलगिरी व्यक्त करून त्यांना साहित्याचा टेम्पो जव्हारपर्यंत पाठविण्याची विनंती केली. त्यांनी थोडीसी असुविधा दर्शविली, परंतु परिस्थिती समजून घेत मोठ्या मनाने रात्री 8:30-9:30 दरम्यान साहित्य शाळेत पोहच केले. बाहेर पाऊस बरसत होताच. लाईट कधीच गायब झाली होती. त्यामुळे साहित्याची वर्गानुसार मांडणी करणे शक्य नव्हते.
26 तारखेला सकाळी प्रसन्न वातावरण होते. पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेतात शेतकरी रोप टाकण्यासाठी लगबग करत होते. अशा प्रसन्न वातावरणात भर टाकत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येत होते. उपस्थित विद्यार्थ्यांकडून परिसर स्वच्छता करून घेण्यात आली. काही विद्यार्थिनींनी शाळेच्या बागेतील फुलांपासून पुष्पगुच्छ बनविले. साहित्य वर्गानुसार मांडून ठेवण्यात आले. तसेच फळ्यावर कार्यक्रमाची रूपरेषा रेखाटण्यात आली. बैठक व्यवस्था केल्यानंतर सर्वजण पाहुण्यांची वाट पाहू लागले.
दुपारी एक वाजता येणारे पाहुणे न आल्याने त्यांची विचारपूस करण्यात आली. मान शाळेतील कार्यक्रम आटपून ते निघाले असल्याचा निरोप मिळाला. तेव्हा तीन वाजेपर्यंत पाहुणे येतील असा अंदाज बांधण्यात आला. कार्यक्रमाला उशीर होत असल्याने लहान मुलांनी मस्ती करायला सुरुवात केली होती. काही जण भांडणे करून तक्रार घेऊन शिक्षकांकडे येत होते. दोननंतर आभाळाने आपला रंग बदलला होता. जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे काही विद्यार्थी घरी निघून जात होते.
साडे तीन वाजता जोरदार पाऊस सुरु झाला, तरी पाहुणे आले नव्हते. म्हणून पुन्हा फोन करण्यात आला. तेव्हा ते जामसर येथून चुकीच्या रस्त्याने पुढे 20 किमी गेल्याचे समजले. लवकरच येतो असा निरोप मिळाला. पावसाचा जोर चालूच होता आणि मुले त्या पावसात मस्त मज्जा करत होते. लॉनवर लहान मुले नाचत होती. तेव्हढ्यात पाहुण्यांच्या चार पाच गाड्या शाळेच्या गेटसमोर मुलांना दिसल्या. त्यांनी एकच जल्लोष केला.
रिमझिम पावसात त्यांचे हस्तान्दोलन करून स्वागत करण्यात आले. त्यांनी शाळेतील नवीनच झालेली विज्ञान प्रयोगशाळा बघण्याचा आग्रह धरला. त्यांची पंधरा सोळा जणांची टीम लॅब बघत असताना हॉलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. पाहुण्यांना चहाची विचारणा करण्यात आली. परंतु आपण कार्यक्रम सुरु करू असे मत त्यांनी मांडले. टीममधील अनेक नजरा शाळेतील बारकावे, रंगरंगोटी, परिसर टिपत होत्या. सोबत त्यांचे क्यामिरे होतेच. शाळेच्या ऑफिससमोर व गाडगे बाबांच्या मूर्तीसमोर ग्रुप सेल्फी काढून सर्वजण कार्यक्रमासाठी पोहचले. मंचावर सर्वांना जागा होत नसल्याने त्यांची बाजूने बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांची उत्सुकता अधिक न ताणता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शब्दसुमनांनी पाहुण्यांचे स्वागत सौ. जयश्री नाचवणे यांनी केले. अध्यक्षपदाची औपचारिकता न पाळता कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते गाडगे बाबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले. प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री पुंजा वाकचौरे यांनी प्रास्तविकात आश्रमशाळा ही संकल्पना उलगडून सांगितली. येणा-या अनुदानात कसा आणि कोणता खर्च करावा लागतो याचे इतिवृत्त मांडले. विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासात सामाजिक आवड असणा-या युवा मंचचे योगदान किती महत्त्वाचे आहे याचेही स्पष्टीकरण त्यांनी केले.
विद्यार्थिनींनी बनविलेले पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत श्री विष्णूभाऊ नाचवणे (सचिव, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई) यांनी केले.
रवींद्र पवार यांनी युवा मंचची स्थापना का व कोणत्या उद्देशाने करण्यात आली याचा सारांश विद्यार्थ्यांसमोर मांडला. गेल्या 8 वर्षांपासून युवा मंच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असल्याचे मत त्यांनी मांडले. तसेच किल्ले रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आयोजनात सहभाग घेत असल्याची माहिती नमूद केली. हे सर्व करत असताना ग्रामीण भागातील मुलांशी लळा लागला व त्यातून वसा घेऊन विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचा सामाजिक विचार प्रकट केला.
अमोल परब, आशिष म्हात्रे, रवींद्र पवार, विरेंद्र गायकवाड, रोहन नार्वेकर, राजेंद्र तांबडे, व इतर सर्व सहका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 200 पेजेस & 100 पेजेस वह्या, पाटी-पेन्सिल, शिसपेन्सिल, पेन, प्रयोगवह्या, आलेख वह्या, कंपास, चित्रकला वह्या, रंगपेट्या, पट्टया, खोडरबर, चार रेघी वह्या यांचे वर्गानुसार प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद गगनात मावणार नाही असाच होता. डोळ्यात वेगळेच समाधान होते.....अंगात उत्साह संचारला होता.
शैक्षणिक साहित्य वाटप झाल्यानंतर सर्व साहित्याचा मिळून एक संच युवा मंच तर्फे श्री विष्णूभाऊ नाचवणे व श्री राजू ठोकळ यांना सुपूर्द करण्यात आला.
युवामंच तर्फे खाऊ वाटप सुरु असतानाच अमोल परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही तुम्हाला हि मदत करत नसून आम्ही आमचे सामाजिक काम करत आहोत. तेव्हा तुम्ही तुमचा गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत ठेवा आम्ही आपणास असेच सहकार्य करू असे थोडक्यात मत व्यक्त केले.
आलेल्या सर्व मान्यवरांचे शाब्दिक आभार श्री राजू ठोकळ यांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांना जाण्याची सूचना देण्यात आली.
शाळेतर्फे सर्वांच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तत्पूर्वी रवींद्र पवार यांनी शिक्षकांशी हितगुज करण्याची इच्छा व्यक्त केली. चर्चेदरम्यान त्यांनी या भागातील विद्यार्थ्यांच्या समस्याच खोलवर जाऊन समजून घेतल्या. खेळातील वा इतर कलाक्षेत्रातील गुणवत्तेला अधिक पुश करण्याचे मत त्यांनी मांडले. तसेच व्यवसाय मार्गदर्शन याचाही भविष्यात विचार असल्याचे मत मांडले. तसेच शाळेतील काही गुणवंत मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याचा विचार आपण करत असल्याचे मत त्यांनी मांडले.
सर्वांनी हसत गप्पा गोष्टी करत पोहे व चहाचा आस्वाद घेतला. सर्वांचा निरोप घेऊन ते जायला निघाले तर बाहेर वरुणराजा धो धो प्रेमरुपाने बरसत होता.
अतिशय उत्साहात पार पडलेला हा सोहळा पार पाडण्यासाठी युवा मंच मुंबईचे योगदान मोलाचे होते. त्यात शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
-शब्दांकन : राजू ठोकळ (www.rajuthokal.com)
0 comments :
Post a Comment