स्वातंत्र्याचे उलगुलानी तीर नि वीर

स्वातंत्र्याचे उलगुलानी तीर नि वीर
वीरा राठोड

ऑगस्ट महिना हा अनेकार्थाने स्वातंत्र्याचा उत्सव असलेला महिना. ‘९ ऑगस्ट-क्रांती दिन’ छोडो भारतचा लगावलेला बुलंद नारा. ‘१५ ऑगस्ट-स्वातंत्र्य दिवस’ आम्हा भारतीयांचा ‘राष्ट्रीय उत्सव.’ ‘९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस’देखील नि ‘३१ ऑगस्टला जन्मजात भटक्या-गुन्हेगार लोकांचा विमुक्त दिन’ तसा एका अर्थाने स्वातंत्र्य दिनच. या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ चाललेल्या लढ्यांमध्ये आदिवासी भटक्या-गुन्हेगार ठरवलेल्या जमातींचे काही योगदान आहे का? हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.
आता हा असा सरळ सोडून वाकडा विचार माझ्या मेंदूत आला कोठून, याचे नवल मलाही वाटले. माझे अडाणी आजी-आजोबा इंग्रजांशी लढल्याच्या अनेक गोष्टी, गीते सांगतात. ‘छोरी झलकारी फरेंगीयानं दलकारी’ (झलकारी इंग्रजांशी लढली) वा ‘आंगलाई मरजाणू, मोंगलाई मरजाणू, देशेरी किली बाईमार हात आवजाणू’ (इंग्रज, मोगलाई जाऊन देशाची सत्ता आमच्या हाती यावी) हे मी लहानपणापासून ऐकत होतो. परंतु पाठ्यपुस्तकातल्या इतिहासात, वक्त्यांच्या भाषणात, शाळेतल्या शिकवणीत आदिवासी शूरवीरांच्या आंदोलनातली नावे कधीच वाचली वा ऐकली नाही. मला प्रश्न पडायचा, की हे केवळ म्हाताऱ्यांचे बकाने आहेत की लिहिलेली पुस्तकं अपूर्ण आहेत? ते आज क‌ळतयं की, ती म्हातारी माणसं पूर्णसत्य बोलायची अन् इतिहासाची पुस्तकं मात्र अर्धसत्य. स्वातंत्र्यावर बोलत असताना आदिवासी वंचितांच्या इतिहासाबाबत लेखण्या मौन बाळगून होत्या. फारशा उजागर होत नव्हत्या. बहुधा करून त्यांचे उल्लेख टाळले जात होते. आणि जे काही क्वचित ठिकाणी भाष्य नोंदवले गेले होते ते चोर, डाकू, दरोडेखोर म्हणूनच सापडते. प्रसिद्ध इतिहासकार लालबहादूर वर्मांच्या मते, ‘आधुनिक भारताचा इतिहास हा एकांगी व अपूर्ण आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक जागा अजून प्रकाशमान व्हायच्या आहेत.’ असा भेद का व्हावा? हा विचारही अनेकांना जहर लावून मारलेल्या बाणासारखाच लागतो.

आदिवासींचे लढे आणि राष्ट्रीय आंदोलनाचा आरंभ या मुद्द्यांना घेऊन इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी आदिवासी हे इंग्रजांविरुद्ध, त्यांचे मांडलिक जमीनदार, सरंजामदार आणि महाजनांविरुद्ध आपल्या स्थानिक भूमीसाठी, आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठीच लढलेत. गुजरातच्या डांग पासून बंगालच्या चौबीस परगना ते थेट ‘सेवन सिस्टर्स’पर्यंत स्थानिक सेठ सावकारांना हाताशी घेऊन इंग्रजांनी सत्ता हस्तगत करून हळूहळू आपले पाय पसरायला नि रोवायला सुरुवात केली, तेव्हा आदिवासी वनअधिकाऱ्यांना नाकारून जंगल, जमिनीचे कायदे केल्याने आदिवासी आंदोलनाचा देशभर भडका उठला. त्यांचे हे विद्रोह म्हणजे त्यांची सामूहिक मालकीच्या जमिनी, जंगल हिरावल्याची भावना होती. त्यामुळे त्यांच्या मनात असंतोष उफाळून आला नि तो सामूहिक उठावांमध्ये परावर्तीत झाला. ज्या १८५७च्या संस्थानिकांच्या उठावाला इतिहासकार राष्ट्रीय आंदोलनाचा पाया म्हणतात, त्याच्याही तब्बल ९० वर्षांआधीपासून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे बिगुल वाजले होते. उलगुलानचा नारा दिला गेला होता, हे अव्हेरता येणार नाही. ब्रिटिश सत्तास्थापनेनंतर येथील आदिवासींसोबत अनेक सशस्त्र लढे झाले, ज्याचे मुख्य कारण इंग्रजांद्वारा सामाजिक, आर्थिक आणि भूसांस्कृतिक जीवनात केलेला हस्तक्षेप हे होते. ब्रिटिशांनी वनांना सरकारी संपत्ती घोषित करून टाकले. सावकार, जमीनदार, वतनदार, महाजन इंग्रजांशी मिळून आदिवासींचे शोषण करीत. याचे परिणामरूप आदिवासी लोकसमूह आणि ब्रिटिशांमध्ये संपूर्ण देशात संघर्षाची ठिणगी पडली होती. भारतीय इतिहासात आद्यक्रांतिकारकत्व आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पायाबद्दल खूप संदिग्धता आहे. त्याबद्दल इतिहासकार भाष्य करतील. मी फक्त काही निरीक्षणे उद‌्धृत करतोय. ‘स्वातंत्र्यकोश’कार श्रीकृष्ण सरल यांच्या मतानुसार, स्वतंत्रता आंदोलनाचा परीघ हा १७५७ प्लासी ते १९६१ गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत असला तरी त्याचा भक्कम पाया मात्र देशभर उभी राहिलेली आदिवासींची आंदोलनेच म्हणता येईल. हे विधान कुणाला पटेल वा न पटेल; पण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचे ‘हम आदिवासीयों से नही लड सकते. ये लोग आजादी की लडाई हमसे भी पहले (१८५७) से लडते रहे है। आदिवासी ही भारत के सच्चे राष्ट्रवादी है।’ हे १९४९मधील झारखंडच्या आदिवासींना संबोधित करताना नेहरूंना उद्देशून केलेले विधान बरेच बोलके आहे.

इस. १७६७च्या जंगल महालच्या खैरा, मांझी, भूमिज, धोलोंच्या पासूनची आदिवासी उलगुलानची शृंखला भारतीय इतिहासकारांच्या लक्षात कशी आली नाही, याचेच आश्चर्य वाटते. मध्य भारतात सकरागड भागात पहाडीया, मांझिया, संथाल, नायका, मुखीयांचे १७६६ ते १७७८ असे तब्बल १२ वर्षे सरदार रमणा अहिडीच्या नेतृत्वाखाली १२०० पहाडीया वीरांनी आरंभलेले ‘पहाडीया आंदोलन’, १७७२च्या दरम्यान संथाल, पहाडीया मिळून २० हजाराहून अधिक आदिवासींचा सहभाग होता. ज्यात ८००० आदिवासी मारले गेले. अधिककरून महिला, मुलांची संख्या अधिक होती. हा पहिला मोठा विद्रोह होता, ज्यात संपूर्ण समुदायच नेतृत्व करीत होता. बंदूक, बनाम, तीर, भाले असे लढ्याचे रूप होते. १७७०मध्ये सुरू झालेला मुंडांचा ‘पलागु विद्रोह’ मुंडा नेता भूखनसिंह १८१९ पर्यंत व्यापलेला आहे. १७८० ते १७९० पर्यंत चाललेले संथाल परगण्यातील वीर तिलका आणि मांझी यांच्या नेतृत्वातील ‘दामीन विद्रोह’. १७९५ तमार विद्रोह, १७९७ विष्णू मानकीच्या नेतृत्वातील छोटा नागपूर मुंडा विद्रोह, १७९८ बिरभूम (बंगाल) बांकुडा चौर विद्रोह, १७९८ मानभूम (ओरिसा) भूमिज विद्रोह... जणू काही इंग्रजांना चोहो बाजूंनी घेरले होते. अनेक वेळा इंग्रजांना पराभूतही व्हावे लागले. पण स्थानिक जमीनदार, वतनदार आदींची आदिवासींना सोडून इंग्रजांनाच मदत मिळत राहिली. ज्यामुळे शेकडो इंग्रज अधिकाऱ्यांबरोबरच जमीनदार, वतनदारांनाही ठार करण्यात आले होते. याच काळात केरळमध्ये १७९३ ते १८१२ पझसी राजाच्या नेतृत्वात कुरुची, वायनाड, कुरुमा आदिवासींचे वायनाड आंदोलन झाले. महाराष्ट्रात भागोजी नाईक (१८१८ ते १८५७), वीर राघोजी (१८३० ते १८४८) यांनी अकोल्यापासून ठाण्यापर्यंत महादेव कोळी, भिल्ल, कातकरी आदी आदिवासींना आंदोलनात आणले. बागलानपासून पुणे, कारवार, बेळगावपर्यंत सह्याद्रीच्या कुशीत बेरड रामोशी उमाजी नाईकाने १८२० ते १८३२ क्रांतीकुंडच पेटवले होते. उमाजी नाईकाविषयी १८२०ला रॉबर्ट नावाचा अधिकारी आपल्या अहवालात लिहितो, ‘उमाजीचा आदर्श शिवाजी राजा आहे नि लोकही त्याला पाठिंबा देताहेत.’ तर १८३२ला कॅप्टन मॅन्किटोश हा इंग्रज अधिकारी म्हणतो, ‘उमाजी हा काही भटका वा दरोडेखोर नव्हे, शिवाजींप्रमाणे आपण राज्य मिळवावे ही त्याची जिद्द होती, तो दुसरा शिवाजी झाला असता.’ या विधानांवरून उमाजीच्या लढ्याची व्यापकता दृश्य होते.

जसजसा एका एका विद्रोहाचा बिमोड होत गेला, तसतशी शेकडो आंदोलने उभी राहात गेली. १८३० फुकन बरुआ, १८२०-३७ हो, मुंडा, मानकीयांचा सिंहभूम विद्रोह, छोटा नागपूर भागात मुंडा, उराँवांचे ‘कोल विद्रोह (१८३२)’, संथालांचा ‘हुल विद्रोह’, १८२८-३२ बुधा भगतचे ‘लरको आंदोलन’ झाले. या सर्वांवरचा कळस म्हणजे १८५५मध्ये ‘संथालक्रांती’ म्हणून इतिहासात नोंद झालेले ‘सिद्धू कान्हू विद्रोह’ ज्यात सिद्धू, कान्हू, चांद, भैरौंनी नेतृत्व केले. या आंदोलनात ३०-३५ हजारांहून अधिक आदिवासी सहभागी होते. १० हजार शस्त्रधारी होते. यात १० हजार आदिवासी कामी आले. पुढे इंग्रजांनी ‘द इंडियन रॉबीनहुड’ असे संबोधलेले तंट्या भील (१८८४-१८८९) निमाड परगण्यात. ‘उलगुलानचा’ नारा देणारा धरती आबा बिरसा मुंडा (१८९५-१९००) मध्य भारत झारखंडमध्ये, तर मानगडच्या पंचक्रोशीत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भील, बंजारा आदी आदिवासींना लढ्यात खेचणारे गोविंद गुरुबंजारा (१८८३-१९२३) इथपासून नागासंग्राम आंग्लोखेताम युद्ध (१८७९) भुटीयालेच्यांपासून अंदमान निकोबारच्या जाखा, ओंगी, सेंटीगेली आदी आदिवासींपर्यंत लढत राहिले.

एकंदरीतच आदिवासी आंदोलनांनी लोकांमध्ये मातृभूमीप्रती जागृती निर्माण करण्याचेच काम केले आहे. ही गोष्ट निश्चितच सर्वमान्य आहे की, आदिवासींची आंदोलने स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक पातळ्यांवर लढली गेली. संपूर्ण भारतभर ती लढली गेली, पण संपूर्ण भारत हे त्यांचे लक्ष्य नव्हते आणि साहजिकच ते नसणारही! कारण तत्कालीन परिस्थितीत ५६५ संस्थाने अर्थात स्वतंत्र देशच होते. संघराज्याची संकल्पनाच अस्तित्व पावलेली नव्हती. अनेक समूहातल्या आदिवासींसमोर आम्ही जिथे जन्मलो, आमच्या पूर्वजांसह आम्ही जिथे जगलो, वाढलो ती भूमी आमची मातृभूमी, अशी भावना जर या सर्व लढ्यांच्या पाठीमागे असेल तर ते खचितच मातृभूमीसाठी, तिला स्वतंत्र करण्यासाठीच होते. देशभरातील या सर्व आंदोलनांमधून प्रदेशाच्या सार्वभौमत्वाचा दावा करण्यात आला होता. खरे तर ते राष्ट्रपूर्व राष्ट्रवादच होते, हे नि:संकोचपणे स्वीकारावे लागते. भारतीय स्वातंत्र्याच्या बीजारोपणाला, पायाभरणीला याच आंदोलनांमधून आरंभ झाला आहे. हा इतिहास आम्ही येणाऱ्या भारतीय पिढ्यांसमोर एकांगी, अपूर्ण स्वरूपाचा न ठेवता व्यापक स्वरूपात लिहायला सांगितला पाहिजे तर भारताच्या इंच इंच भूमीसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे बलिदानही कामास येईल िन भारतीय जनामनात एकतेची-संघीय भावनेची भक्कम बांधणी व्हायला नक्कीच मदत होईल.


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.