पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपण
पर्यावरण संरक्षणाचा वृक्षारोपण हा एक भाग आहे. त्यासोबत अनेक बाबींचा सर्वांगीण विचार होणे महत्त्वाचे आहे....
पर्यावरण संरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रभर चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्याची सगळीकडे जाहिरात करण्यात आली असून सर्व सरकारी कार्यालये, शाळा महाविद्यालये, ग्रामपंचायत, पंचायत समित्या अशा सर्वांना वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मुळात ती काळाची गरज आहे. उपक्रम स्तुत्य असला, तरी गेल्या काही वर्षांत वृक्षारोपण कार्यक्रमांचा जो उंचावत जाणारा आलेख आपण बघत आलोय, त्या तुलनेत वृक्ष संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत.
पर्यावरण संवर्धनाचा इतिहास बघितला तर, मॅग्नाचार्टाच्या माध्यमातून युनेस्कोच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम कमिटीची स्थापना झाली. त्यामध्ये पन्नास सदस्य होते. या कमिटीद्वारे १९७५ मध्ये आंतराष्ट्रीय पर्यावरणीय शिक्षण कार्यक्रम अंतर्गत बेलग्रेड कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. त्यात बेलग्रेड घोषणा पत्र प्रसिध्द करण्यात आले. जागतिक पर्यावरणाची बिघडत चालेलेली अवस्था थांबविण्यासाठी आणि तिच्यात सुधारणा करण्यासाठी पर्यावरण शिक्षणाचा व्यापक कार्यक्रम हातात घेण्याची घोषणा या पत्रातून करण्यात आली. याच कॉन्फरन्समध्ये प्रत्येक देशाने आपापली पर्यावरण नीती बनविण्याचा निर्णय घेतला. बिघडत चाललेल्या पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी देशातल्या जमिनीच्या ३३ टक्के भूभागांवर वनाची अनिवार्यता असल्याचे मांडण्यात आले.
त्यानंतर दहा वर्षानी म्हणजे. १९८२ मध्ये, पर्यावरण परिषदेचे दहावे वर्धापन वर्ष साजरे करण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांचे प्रमुख पुन्हा आफ़्रिकेतील नैरौबी येथे एकत्र आले. १० जून ते १८ जून १९८२ या काळात चाललेल्या परिषदेमध्ये १०५ देशांनी भाग घेतला होता. तेव्हा एक विशेष चार्टर प्रसिध्द केला. त्याला नैरोबी घोषणा पत्र या नावाने ओळखले जाते. या चार्टरमध्ये विशेष भर देण्यात आला आहे तो १९७२ मधील स्टॉकहोम परिषदेच्या घोषणापत्रावर. त्या वेळी असलेल्या परिस्थितीत दहा वर्षानंतर फरक पडलेला नसून ती आजही तेवढीच चिंतनीय असल्याचे नमूद करुन पूर्वी सूचविलेल्या योजनांनुसार पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे कार्य पुढेही चालू ठेवण्याचे व ते आणखी प्रभावशाली करण्याचे ठरवले होते. यानुसार भारतातही पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
भारतात १९७२ पासून पर्यावरण क्षेत्रात योजनाबध्द कार्यक्रम सुरु झालेला होता. देशाच्या पर्यावरणासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी नॅशनल कमिटी फॉर एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग अॅण्ड कोऑर्डिनेशन या समितीची स्थापना झाली आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रदूषणाला (आळा) प्रतिबंध (निर्माण) करण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय प्रदुषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली. या कमिटीने काही सूचना मांडल्या त्यानुसार १९८० मध्येच केंद्रामध्ये पर्यावरण विभाग स्वंतत्र रितीने स्थापण्यात आला. नंतर राज्यांमध्येही विभाग उघडण्यात आले. या कमिटीचे रुपांतर नंतर नॅशनल कमिटी फॉर एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग मध्ये करण्यात आले. या कमिटीने पर्यावरण क्षेत्रातील सर्वप्रथम संरक्षणाची, संवर्धनाची गरज टाळून चालणार नसल्याने स्पष्ट केले होते. औद्योगिक प्रदूषणाचे नियंत्रण, नष्ट होत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांच्या परजातीचे संरक्षण, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि किमान स्वच्छता आरोग्य व्यवस्था, देशातील जमीन, पाणी आणि वनस्पती या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन या उद्दिष्टांना समोर ठेवून पर्यावरण विभागतर्फे अनेक योजना तयार करण्यात आल्या. प्रदूषण नियंत्रणांच्या दृष्टीने 'जल आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायदा' बनविला गेला. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ हा पूर्वीच्या कायद्यांना अधिक पुष्टी-शक्ती मिळावी म्हणून करण्यात आला. वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने, वन प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने, वन अभयारण्ये यांची देशभर ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगरची स्थापना झाली. १९८२ मध्ये राष्ट्रीय पातळीवर दोन विशेष कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.
(१) गंगा शुध्दीकरण प्रकल्प
(२) देशभर वृक्षारोपण (प्रकल्प) मोहिमा.
यांच्या आधारे गावागावांतून स्वच्छता मोहिमा, प्रदूषण नियंत्रण मोहिमा तसेच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना आरंभ करण्यात आला. सगळया देशभर जनजागृती होऊन सर्व स्वरांवर उत्साहाने कामे सूरु झाली.
परंतु आपल्या देशाचे दुर्दैव हे की इथे कोणतेही कार्य सुरु करताना प्रारंभी जो उत्साह. जी जिद्द असते, एकदिलाने काम करण्याची जी इच्छाशक्ती असते ती नंतर पुढे कमी होत जाते. म्हणूनच देशाची अत्यंत महत्वाची आणि जनहिताची ही पर्यावरण योजना कार्यवाहीत आणताना पुढे तिच्यात शिथिलता आली. प्रदूषण रोखण्यासाठी असलेल्या कायदेकानूनांचा, नियमांचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांची अमलबजावणी करण्यात शिथिलता आली. वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक स्वच्छता नाहीशी होऊन प्रदूषणाचा जोर वाढला गरजा भागविण्यासाठी बेसुमार जंगलतोड होत गेली. पिण्याचे पाणी आणि अन्न यांची टंचाई भासू लागली.
गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा एकदा वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. गेल्या वर्षी असलेले दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी चार कोटी करण्यात आले असून सगळीकडे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अहवाल, फोटो विविध माध्यमांतून प्रकाशित होत आहेत. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केले जाणारे वृक्षारोपण नक्कीच महत्त्वाचे आहे. परंतु गेल्या वर्षी लावलेली दोन कोटी झाडे आणि यावर्षी सध्या लागवड सुरू असलेली चार कोटी रोपे यांच्या संवर्धनाचा विचार केला तर चित्र खूपच निराशाजनक आहे. ही सर्व झाडे लावण्यासाठी जे खड्डे खोदले जातात, त्या खड्ड्यांची माती पुरेशी काळजी न घेतल्याने पावसात वाहून जाते. परिणामी जमिनीची धूप यामुळे होत आहे. तसेच खड्डे खोदताना अनेक लहान मोठ्या जीवजंतू, वनस्पती व सापांचे अधिवास नष्ट होतात. हे अधिवास नष्ट झाल्याने निसर्गातील अनंत अन्नसाखळ्या लोप पावतात. परिणामी आपल्या निष्काळजीपणामुळे व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पर्यावरणाचे नकळतपणे नुकसान होत आहे.
शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालये यांना वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे फोटो काढण्यापूरते वृक्षारोपण केले जात आहे. यावर उपाय म्हणून जिथे शक्य असेल तिथे वनविभागाची जर जमीन उपलब्ध करून दिली, तर शाळांतील मुले अतिशय आवडीने झाडे लावतील व त्यांचे संगोपनही करतील. बिया लावण्यापासून त्याचे रोप तयार करणे व इतर मशागत यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. परंतु वृक्ष संवर्धन गांभीर्याने न केल्याने खूप मोठे नुकसान होत आहे.
जगण्यासाठी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गोष्टींची कमतरता भविष्यात भासणार आहे आणि त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि श्र्वास घेण्यासाठी प्राणवायू यांची टंचाई होणार आहे व त्यामुळें सर्व जीवनच संकटात सापडणार आहे. म्हणून प्रसिद्धीचा हव्यास व कोणत्याही सरकारी उपक्रमातील निराशा आपण झटकून टाकायला हवी आणि त्याचबरोबर बिघडत चाललेल्या पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी आणि त्याचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.
0 comments :
Post a Comment