जीवनाचे सार....
रिमझिम पाऊस पडत होता. रस्त्यावर साचलेले पाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे अंगावर उडू नये म्हणून जो तो घाईत होता. मी पण शाळा सुटल्यावर काहीसा चिखल तुडवत खाली पाहतच चाललो होतो. समोर खड्डा होता आणि त्याला पार करायचे म्हटल्यावर उडी मारून पलीकडे जावे लागणार होते. काहींच्या उडया पलीकडे जात होत्या तर काहींच्या उड्या अपुऱ्या पडल्याने पाण्याचे तुषार उडाल्याचे एक मोहक चित्र निर्माण होत होते. असाच मी पण उडी मारणार, तेव्हढ्यात एक आजोबा माझ्या समोर येऊन त्या खड्ड्यात उभे राहिले. त्यांना जगाशी काहीच देणे घेणे नसेल अशी त्यांची स्वताशी बडबड सुरू होती. आजोबा काय बोलतात याकडे लक्ष्य दिले तर दोन चार शब्द कानावर पडले.
"तिच्या मनातली जादू कमी झाली असून तोंडातल्या वाफा वाढल्या आहेत.....मी काय करू?....दोन तुकडे भाकरीचे मिळविण्यासाठी आता या पावसात कोणाकडे पदर पसरू...."
असे ते आजोबा सतत काही तरी बडबडत होते. वरून कोसळणाऱ्या पावसाची जणू त्यांना जाणीवच होत नसावी अशा अवस्थेत ते हळुवार चालत होते.
मी त्यांना ओलांडून माझ्या रस्त्याने पुढे निघून गेलो. चांगला रस्ता आल्यावर मात्र पुन्हा आजोबांच्या शब्दांवर विचार करू लागलो. मनाला कोडं पडावं आणि त्यात अडकून पडून सारं संपावं असंच वाटू लागलं होतं..... कारण आजोबांच्या वाक्याचा अर्थ मला लागत नव्हता.
मी विचार करत मागून येणाऱ्या आजोबांची वाट पाहू लागलो....मला त्यांच्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा होता. अर्धा तास वाट पाहिली पण आजोबा काही येत नव्हते. तेवढ्यात संतोष आपल्या गाडीवर बसून त्याच रस्त्याने जात असल्याचे मला दिसले. जोरात हाक मारली...."ऐ संतोष...." तसा गाडीचा ब्रेक मारल्याचा आवाज जोरात आला. मागे वळून पाहत, त्याने "काय काम आहे?" असे जोरात विचारले. "अरे थांब रे....मला तिकडेच यायचे आहे" "चला मग लवकर...."
गाडीवर बसल्यावर त्याला गाडी चालवायला सांगितली. एक मिनिट झाला नसेल, तर समोर आपल्याच नादात आजोबा एका कडेने येताना दिसले. काहीशा अंतरावर संतोषला गाडी थांबवायला सांगून विचारले, "अरे ते आजोबा कोण आहेत रे", "अहो सर ते मोठ्या पदावर मुंबईला कामाला होते" संतोष त्याला जे माहीत होते ते सांगायला लागला. "त्यांना चांगला पगार होता. गावात घर व शेती होती. एकच मुलगी असल्याने त्यांनी घर व शेती सर्व मुलीच्या नावावर करून दिली. सुरुवातीला काही वर्षे तिने यांना सांभाळले.....परंतु नंतर गावातले घर व शेतही तिने विकून टाकले....आता ती नवऱ्यासोबत पुण्याला राहते.....आणि हे आजोबा असेच इथे तिथे भटकत असतात....कोणाच्याही घराच्या बाजूला झोपतात...असेच सतत बडबड करत असतात."
माझी विचार प्रक्रिया काहीशी थांबली. मन सुन्न झाले.... ज्यांनी आपलं सर्वस्व मुलांसाठी वाहिलेलं असतं...त्या आई-वडिलांना मुलं अशी वय झाल्यावर वाऱ्यावर का सोडतात ह्याचा मला काही ठाव लागत नव्हता.
आजोबांचे तेच वाक्य आताही आठवत होते...."तिच्या मनातली जादू कमी झाली असून तोंडातल्या वाफा वाढल्या आहेत.....मी काय करू?....दोन तुकडे भाकरीचे मिळविण्यासाठी आता या पावसात कोणाकडे पदर पसरू...." कारण त्या वाक्यातून आपला भविष्याकाळ तर उलगडत नाही ना अशी पुसटशी कल्पना मनात येऊन गेली. त्यामधील जीवनाचं तत्त्वज्ञान मी आजही शोधत आहे. कदाचित त्यातला योग्य तो अर्थ आपणास नक्की उमजेल म्हणून आपणासोबत मनातली खदखद शेअर करत आहे.
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment