आदिवासी इतिहासातील सुवर्ण पुष्प
........................................
बाबुराव पुल्लेसुर सेडमाके
जन्म : 1833 मृत्यू : 1858
----------
----------------ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी..........
आंध्रप्रदेशातील शिरपूर येथे इ.स.870 मध्ये गोंड राजा भीमबल्लाळसिंग आत्राम यांनी गोंड राज्याची स्थापना केली व यातून आदिवासी साम्राजाची मुहूर्तमेढ त्या भागात रोवली. पुढे इ.स.970 च्या सुमारास आदिया बल्लाळसिंह यांनी आपल्या कारकिर्दीत साम्राज्य विस्ताराचे अतिशय महत्त्वाचे काम केले. आपला राज्यकारभार साम्राज्यविस्तारामुळे पाहणे शक्य व्हावे यासाठी आपली राजधानी शिरपूरवरून हलवून जवळच असलेल्या चंद्रपूरजवळील बल्लारपूर येथे हलवली. बल्लारपूरचे बल्लारशहा असे नामकरण करून राजधानी स्थापन केली.
आत्राम घराण्यात इ.स.1340 मध्ये खांडक्या बल्लाळसिंह राजा झाला. या राजाने पुन्हा आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यांनी चांदागढ किल्ल्याच्या तटाचा पाया बांधला आणि राजधानी बल्लारशहावरून चांदागढ येथे हलवली. किल्ल्याचे बांधकाम राजा धुंड्यासिंह आत्राम यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले.
या वंशातील राजांनी चांदागढ राज्याचा विस्तार पश्चिमेस माहुरपर्यंत तर पूर्वेस वैरागढपर्यंत आणि उत्तरेस देवगढ (नागपूर) पर्यंत केला. इ.स.1696 ते 1704 या कालावधीत चांदागढ येथे बिरशहा आत्राम नावाचा गोंड राजा झाला. इ.स.1751 ते 1853 या काळात संपूर्ण प्रदेश भोसल्यांच्या अधिपत्याखाली होता. रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर ईस्ट इंडिया कंपनीने तो भाग आपल्या ताब्यात घेतला. अशातच इंग्रजांविरुद्ध लढा देणारे एक महान क्रांतिकारक वीर बाबुराव पुल्लेसुर सेडमाके हे 1833 मध्ये राजगोंड घराण्यात जन्माला आले.
--------------
-----------------------वीर बाबुराव पुल्लेसुर सेडमाके.........
महाराज पुल्लेसुर बापू यांच्या पत्नीचे नाव जुरजाकुवर होते. त्यांना चार मुले होती. त्यातील मोठा मुलगा बाबुराव याचा जन्म 12 मार्च 1833 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मोल्लमपल्ली या लहान गावात एका आदिवासी घराण्यात झाला. पुल्लेसुर या शब्दाचा गोंडी भाषेतील अर्थ शूरवीर असा आहे.
पुल्लेसुर बापू यांचा आतेभाऊ प्रतापसिंह यांच्याकडे बाबुराव यांच्या शिक्षणाची जबाबदरी देण्यात आली. घोटूल ही आदिवासींच्या शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था त्या काळात होती. यामध्ये मिळालेल्या शिक्षण व अनुभवाच्या जोरावर बाबुराव तलवार, भाला इत्यादी शस्त्र चालविण्यात तरबेज झाले. (घोटूल म्हणजे संस्कार केंद्र होय. यामध्ये जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व शिक्षण दिले जात होते.)
एकदा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या मित्रांबरोबर बाबुराव वेना नदीच्या किनाऱ्यावर फिरायला गेले होते. तेथे त्यांना एक चित्ता मध खाण्यासाठी झाडावर चढलेला दिसला. ते चित्र पाहून सर्वजण खूप घाबरले. परंतु बाबुराव यांनी त्या मित्रांना धीर दिला. परंतु चित्त्याने झाडावरून यांच्याकडे उडी मारली. क्षणाचाही विलंब न लावता बाबुरावने चित्त्याने दोन्ही पाय पकडून पूर्ण ताकदीने फिरविले. त्यात चित्ता जमिनीवर आदळला व तो घाबरून पळून गेला. अवघ्या 12-13 वर्षांच्या वयात असा पराक्रम केल्याने काही दिवसातच याची चर्चा संपूर्ण परिसरात पोहचली.
बाबूराव 14 वर्षांचे झाले. घोटूल संस्कार केंद्राचे शिक्षण पूर्ण करून ते शिक्षित झाले. त्याकाळात घोटूलमध्ये गोंडी,हिंदी, तेलगू इत्यादी भाषा शिकविल्या जात होत्या. ते प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी लॉर्ड डलहौसीने सुरू केलेल्या इंग्रजी विद्यालयात रायपूर येथे त्यांची रवानगी करण्यात आली. या विद्यालयात बाबुराव यांच्यात आमूलाग्र बदल झाले.
संपूर्ण समाजात बालविवाहाची त्या काळात प्रथा सुरू असताना मात्र बाबुराव यांचे लग्न अगदी अल्प वयात लावण्यात आले नव्हते. शेवटी 9 मार्च 1851 रोजी आंध्रप्रदेशातील आदीलाबाद जिल्ह्यातील चेनूर येथील राजकुंवर या मुलीबरोबर झाला.
मोलमपल्ली, अडपल्ली, घोट या तीन विभागांची सत्ता सेडमाके कुळाची होती. मोलमपल्लीचे जमीनदार पुत्र बाबुराव सेडमाके हे अडपल्लीचे जमीनदार व्यंकटराव सेडमाके यांना भेटायला गेले. त्याचवेळी तेथून घोट परिसरातील रमय्या सावकार जात होता. त्याने अहंकारी भावनेने बाबुराव यांच्याकडे पाहिले. त्यांचा परिचय करून घेण्यासाठी थांबला. मोलमपल्लीचे महाराज पुल्लेसुर बापू यांचे ज्येष्ठ पुत्र बाबुराव आहेत, अशी व्यंकटराव यांनी ओळख करून दिली. त्याचवेळी रमय्या सावकाराने काही विचार न करता म्हणाला की, महाराजा पुल्लेसुर यांनी मागील वर्षी रु.500/- कर्ज घेतले होते. ते आजपर्यंत परत केले नाही. त्यांना तुम्ही महाराज तरी कसे म्हणू शकता. वास्तविक मागील वर्षी दुष्काळ पडला असल्याने एका शेतकऱ्याला पैशांची गरज असल्याने तो महाराज पुल्लेसुर बापू यांच्याकडे आला होता. त्यावेळी रमय्या सावकार तेथे उपस्थित होता. त्यामुळे महाराजांनी त्यास शेतकऱ्याला कर्ज देण्यास सांगितले होते. रमय्या सावकाराच्या विचकट बोलण्याचा राग बाबुराव यांना आला. त्यांनी एका दगडात सावकाराचे डोके फोडले. तेव्हापासून बाबुराव यांनी निश्चय केला की जो कोणी सावकार गरिबांना लुटून छळत असेल त्याचे काळे धन लुटून लोकांना वाटून द्यायचे. तो निश्चय केल्यानंतर बाबूराव देवलमरी या गावात आले. तेथे कोंड्या सावकाराच्या घरात प्रवेश करून त्याला चाकू लावला. त्याच्याकडून तिजोरीची चावी घेऊन तिजोरी उघडली. त्यातून 500 रुपये घेतले व त्याला दम दिला की जर येथून पुढे लोकांचे शोषण करीत राहिला तर सर्व लुटून नेईल. बाबुराव सेडमाके यांनी 500 रुपये घेऊन रमय्या सावकाराकडे रात्री 12 वाजता गेले. रमय्या सावकाराला उठवून त्याच्या तिजोरीतील कर्जखाते दफ्तर काढून ते जाळून टाकले व 500 रुपये त्या सावकाराच्या तोंडावर फेकून मारले.
त्या काळात सावकार सामान्य जनतेला लुटून काही निधी इंग्रज सरकारला पुरवत असल्याने त्यांना इंग्रजांचे सुरक्षा कवच मिळत होते. म्हणून कोणी सावकारांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत नव्हते. परंतु बाबुराव यांनी सावकारांना धडा शिकविण्याचा विडा उचलला होता. असाच एक सावकार राजगढ परिसरात रामजी गेडाम राहत होता. तो इंग्रजांचा हस्तक होता. त्याला धडा शिकवायचा तर आपल्याकडे पुरेसे सैन्य असायला पाहिजे. म्हणून बाबुराव यांनी सावकार व इंग्रज सत्तेविरोधात लढा देण्यासाठी सैन्याची उभारणी केली. आपल्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी बलिदान देण्यास अनेक जण तयार झाले. बाबुराव सेडमाके यांच्या सेनेत गोंड, गोवारी, दलित, कुणबी, तेली, मराठा, मुस्लिम हे आपले सर्व भेदभाव विसरून एकत्र आलेले नवयुवक होते. याच सेनेच्या बळावर सन 1867 ला बाबुराव सेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून पहिला लढा उभारला होता. इंग्रजांना हाकलून देण्याकरिता इंग्रजांचा मांडलिक राजगढचा गेडाम जमीनदार यावर चाल करून त्याचा 7 मार्च 1858 रोजी शिरच्छेद केला. याची बातमी कळताच इंग्रज सैन्याने राजगढ परगण्याकडे धाव घेतली. गडीसुर्ला, नांदगाव, घोसरी येथे 13 मार्च 1858 रोजी इंग्रज लष्कराशी चकमक उडाली. अडपल्लीचे जमीनदार व्यंकटराव राजेश्वर राजगोंड हे बाबुराव यांना येऊन मिळाले. डेप्युटी कमिशनर क्रिक्टन घाबरला, पण त्यांनी या दोघांवर आपल्या फौजा पाठविल्या. 19 एप्रिल 1858 रोजी सगणापूर येथे दोन्ही बाजूच्या फौजा एकमेकांवर भिडल्या व त्यांच्यात तुंबळ लढाई झाली.
बाबुराव सेडमाके यांनी गुप्त कार्यवाही करून इंग्रज अधिका-यांच्या सुरक्षित छावणीवर हल्ले करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. घोसरीजवळ एका लढाईत अनेक इंग्रज सैन्य मारले गेले व बाबुराव यांचा विजय झाला. एका बलाढ्य सैन्य असलेल्या इंग्रजांचा पराभव आपण करू शकतो हा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे लोकांचा पाठिंबाही वाढत होता.
27 एप्रिल 1858 रोजी बाबुराव सेडमाके यांच्या सैनिकांनी बामनपेठची नाकाबंदी केली. अडपल्ली, पलेझरी, मार्कंडा, रँगेवाही, अनकोडा, चंदनवेली या ग्रामीण क्षेत्रातील जंगलात आसरा घेऊन बाबुराव सेडमाके यांची क्रांती सेनेची तुकडी सशस्त्र स्वरूपात तैनात होती. इंग्रज सैन्य पूर्ण ताकदीनिशी बाबुराव यांना पकडण्यासाठी बामनपेठच्या भागात आले. त्याचवेळी बाबुराव सेडमाके यांच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. चार तास युद्ध चालले. यामध्ये अनेक इंग्रज सैनिक मारले गेले. काही सैन्य पळाले, तर काहींनी शरणागती पत्करली. बामनपेठवर क्रांती सेनेचा पिवळा ध्वज फडकवला गेला.
29 एप्रिल 1858 रोजी चिचगुडीमधील इंग्रज अधिकाऱ्यांच्या तंबूवर हल्ला चढवला. यामध्ये टेलिफोन गार्ड लॅड व हॉल ठार झाले.
10 मे 1858 रोजी सकाळच्या वेळी इंग्रज सैन्याचा दूत घोट ग्रामस्थांना इशारा पत्रक देऊन गेला. यामध्ये बाबुराव सेडमाके व व्यंकटराव राजेश्वरराव राजगोंड यांना ताब्यात द्या अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जा अशी धमकी देण्यात आली होती. याचा परिणाम उलट झाला. लोकांना इंग्रजांचा राग येऊ लागला व त्यांनी बाबुराव सेडमाके यांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला. लोकांनी आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असे समजताच कॅप्टन शेक्सपिअर यांच्या नेतृत्वाखाली तोफांसह घोट परिसराला वेढा दिला व हल्ला सुरू केला. सैन्याने गोळीबार व तोफगोळे दागण्यास सुरुवात करताच दबा धरून बसलेल्या बाबुराव यांच्या जंगम सैनिक व ग्रामस्थ यांनी तलवार, भाले, कु-हाडी, दगडगोटे इत्यादी शस्त्रानिशी इंग्रज सैनिकांवर हल्ला चढवला. या युद्धात दोन्ही बाजूची प्रचंड मनुष्यहानी झाली. परंतु स्थानिकांनी आपली गुरेढोरे इंग्रज सैनिकांच्या बाजूने सोडल्याने इंग्रज सैन्य या गर्दीत फसले व याचा फायदा घेत बाबुराव सेडमाके व वीर व्यंकटराव राजगोंड हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. हजारो स्त्री पुरुषांच्या बलिदानाने घोटची जमीन लाल झाली होती.
24 जून 1858 मध्ये भोपालपटनम येथे महाराणी दुर्गावतीच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बाबुराव सेडमाके आलेले असताना महाराणी लक्ष्मीबाई आत्राम यांच्या सैनिकांनी बाबुराव सेडमाके यांना बंदिस्त केले. कारण तसा आदेश लक्ष्मीबाई यांना इंग्रज अधिकाऱ्यान्नी दिलेला होता. परंतु बाबुराव सेडमाके यांनी त्या सैनिकांना मी मातृभूमीकरता लढत असून आपली गुलामगिरी तोडण्यासाठी माझा संघर्ष आहे. आपण आज संघर्ष केला नाही, तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे भावनिक आवाहन केले. त्या सैनिकांना गांभीर्य समजल्यावर त्यांनी बाबुराव यांना सोडून दिले.
15 सप्टेंबर 1858 रोजी इंग्रज सैन्य तारसाघाटावरून वैनगंगा नदी ओलांडण्यासाठी दोन लाकडी नौकांचा वापर करीत असल्याचे बाबुराव सेडमाके यांना समजले. सुक-या राऊत व धर्मा गेडाम हे दोन नावाडी वैनगंगाच्या एका किनाऱ्यावरून इंग्रज सैन्य नावेत घेऊन दुसऱ्या किनाऱ्यावर सोडण्यास निघाले. एका किना-यावरून दुसरा किनारा दिसत नव्हता. याचा बाबुराव यांनी असा फायदा घेतला की, नावाड्याने दुसऱ्या किनाऱ्यावर इंग्रज सैनिक सोडल्यानंतर ते घाट चढताच त्यांच्यावर तीव्र हल्ला करून त्यांना मारले जात होते. असे सुमारे सातशे सैनिक आपला एकही सैनिक न गमावता मारले होते.
शेवटी 18 सप्टेंबर 1858 रोजी महाराणी लक्ष्मीबाई आत्राम यांच्या फितुरीमुळे फसवून बाबुराव सेडमाके यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला दाखल करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दि. 21 ऑक्टोबर 1858 रोजी चांदा येथील तुरुंगात या आदिवासी विरास फाशी देण्यात आली.
अशा या महान विरास आपला कोटी कोटी प्रणाम...!
#जागर_इतिहासाचा
#आजादी_के_दिवाने
- प्रा. गौतम निकम
0 comments :
Post a Comment