राणी चेन्नम्मा (कित्तुर,कर्नाटक)
भारताच्या या पावन भुमीला स्त्रीयांच्या इतिहासाची महत्वपुर्ण जोड आहे.खरं पहायला गेलं तर इतिहास बदलवुन टाकणारे अपत्य जन्माला घालुन भारतीय स्त्रियांनी मातृभुमीवर अनंत उपकारच केले आहेत.पण वेळप्रसंगी स्वतःही हातात खड्ग घेऊन लढण्याचा पावित्रा घेतला आहे.
त्यापैकीच एक कर्नाटकच्या कित्तुरच्या राणीसाहेब चन्नम्मा.
त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यापुर्वी थोडी पार्श्वभुमी पाहुया.
1585 मध्ये कित्तुरच्या राजघराण्याला प्रारंभ झाला.मैसुर संस्थानातील सागर येथील हिरे-मल्लशेट्टी आणि चिक्क-मल्लशेट्टी हे त्याचे संस्थापक होत.
कित्येक वर्षे इमानेइतबारे चाकरी केल्याबद्दल विजापुरच्या आदिलशहाकडुन हा प्रदेश इनाम मिळालेला होता.दोघेही भाऊ शुर योद्धे होते.हिरे मल्लशेट्टीस 'समशेर जंगबहाद्दर' असा किताब आदिलशहाकडुन मिळालेला होता.त्यांचा पराक्रम आणि त्यांनी केलेली सेवा यांच्यावरील मान्यतेचे शिक्कामोर्तब म्हणुन 1585 मध्ये आदिलशहाकडुन त्या वेळी हुबळी 'परगणा' म्हणुन ओळखल्या जाणार्या हुबळीजवळच्या प्रदेशाची सरदेशमुखी सनदेच्या रुपाने त्यांनी मिळवली होती.त्यानंतर ते खाली सरकले आणि (आता बेळगाव जिल्ह्यात असलेल्या) संपगाव नावाच्या गावात वास्तव्य करुन राहीले.तीच त्यांनी राजधानी केली आणि तेव्हा कित्तुर प्रांतात असलेल्या त्या प्रदेशावर राज्य केले. इ.स.1585 ते 1824 अशी एकुण 239 वर्षे या राजघराण्याने राजवट केली.
राजा मल्लसर्जा हा 1782 मधे कित्तुरच्या गादीवर बसला. तत्पुर्वी या राजघराण्यात बर्याच घटना घडुन गेल्या त्या नंतर कधीतरी आवर्जुन लिहीन आज विषय राणी चन्नम्मांचा.
तर 1782 ते 1816 या काळात मल्लसर्जा याने कित्तुरवर अधिपत्य गाजवले.राजा मल्लसर्जाच्या काळात कित्तुर संस्थानची प्रचंड भरभराट झाली.
1816 मधे मल्लसर्जाचा मुलगा शिवलिंगरुद्रसर्जा उर्फ बापुसाहेब हा गादीवर आला.असं म्हणतात हा तितकासा प्रभावी वारस नव्हता.तो राजकारभारापेक्षा जास्त कला आणि वाङ्मय यात रमणारा होता आणि वय अनुभवाने लहानही होता.त्यामुळे राजा मल्लसर्जाची द्वितीय पत्नी राणी चन्नम्मा हीने राजकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली.तिच्यात तारुण्य,साहस आणि विवेक यांचा मिलाफ झालेला होता.ती मोहक,सुदृढ आणि सुंदर होती.तलवार चालवण्यात,घोड्यावर बसण्यात,नेमबाजीत आणि राज्यविद्येत ती निष्णांत होती.मोठ्या रुबाबदारपणे ती दरबारचे कामकाज चालवायची.तिने आपले लढाऊ सैन्य उत्कृष्ट अशा युद्धसज्ज स्थितीत ठेवले होते.
राजा मल्लसर्जाच्या काळापासुन कित्तुर संस्थान हे पेशवे विरुद्ध टिपु आणि पेशवे विरुद्ध इंग्रज ह्या लढायांमुळे विनाकारण भरडुन निघत होते.राजा मल्लसर्जा हा कर्नाटकातील सर्व छोट्यामोठ्या संस्थानिकांचा अघोषित नायक होता.तो विचारी होता.त्याच्या मते पेशवे व टिपु ह्या एतद्देशियांनी परस्परांत न लढता हिंदुस्थानात मुळे रोवु पहाणार्या ब्रिटीशांविरोधात लढायला हवं होतं.तसा प्रस्तावही त्याने बर्याच संस्थानिकांना दिला होता परंतु पेशव्यांनी मल्लसर्जाला अपमानास्पद वागणुक दिली.पुढे मल्लसर्जा वारल्यानंतर शिवलिंगरुद्रसर्जाच्या काळात ब्रिटीशांनी कित्तुर संस्थानचे दत्तकविधान नामंजुर करत संस्थानवर 'थॅकरे' नावाचा पाॅलिटीकल एजंट लादला.राणी चन्नम्माचे आणि थॅकरेचे दरबारात सदैव खटके उडायचे,थॅकरे हा अतिशय उद्धट आणि घमेंडखोर अधिकारी होता.राजा शिवलिंगरुद्रसर्जाला अपत्य नसल्याकारणाने त्याने दत्तक मुल घेण्याचे ठरवले असताना थॅकरेनी ह्यात आडकाठी केली. थॅकरेला वैतागुन राणी चन्नमाने थॅकरेचा वरिष्ठ अधिकारी चॅप्लिनला तक्रारीचे पत्र लिहीले पण त्यानेही राणीला प्रतिसाद दिला नाही.शेवटी 18 आॅक्टोबर 1824 रोजी तिने सगळ्या सरदारांना व दरबारातील अधिकार्यांना बोलावले आणि मनोगत सांगितले.त्या सर्वांचा पाणउतारा करण्यासाठी थॅकरेने केलेल्या सर्व कृत्यांची तिने त्यांना कल्पना दिली. राजकुटुंबीयांना व दरबार्यांना दिलेल्या वागणुकीमुळे ती कृद्ध झाली होती.अत्यंत भावोत्कट शब्दांत तिने घोषणा केली....
"कित्तुर आपले आहे.आपल्या स्वतःच्या मुलखाचे आपण मालक आहोत.आम्ही त्यांची परवानगी घेतली नव्हती म्हणुन दत्तकविधान खरे नाही असे ब्रिटीशांचे म्हणने आहे पण मुलगा दत्तक घ्यायला त्यांची परवानगी घ्यायला हवी असा नियम कुठे आहे ? दत्तक विधानाबाबत आम्ही खोटेपणा केला असे आपल्या सत्तेच्या मदात पाॅलिटिकल एजंट थॅकरे म्हणाला.हे ब्रिटीश व्यापाराचे निमित्त करुन आपल्या देशात आले आणि आता आम्ही आपापसांत भांडत आहोत हे पाहुन आमचा देश बळकवण्याची व आमच्यावर राज्य करण्याची त्यांची इच्छा झाली आहे.आम्ही नजराण्याच्या भल्यामोठ्या रकमा त्यांना द्याव्यात अशी त्यांची इच्छा आहे.आपल्या धुर्त व दुष्ट कारस्थानांनी त्यांनी देशाच्या या भागातील इतर राजेरजवाड्यांना नामोहरम केले असेल.
पेशव्यांनी आपले काही वाईट केले असेल तरी ती आपलीच माणसे आहेत,हे आपण विसरु नये.एक दिवस त्यांना आपल्या चुका उमजतील आणि आपल्या पवित्र भुमीतुन या परकियांना हाकुन लावण्यात त्यांचा आपल्याला हातभार लागेल.हे ब्रिटीश काय आपली माणसं आहेत ? ते काय आपल्या देशातले आहेत ? कित्तुर म्हणजे लहानसे संस्थान चुटकीसरशी जिंकता येईल अशा मोठ्या भ्रमात थॅकरे आणि त्याचे भाट धडपड करत आहेत.नक्कीच त्यांचा गैरसमज झाला आहे.कित्तुरचे लोक स्वातंत्र्यावर जिवापाड प्रेम करतात हे त्यांना माहीत नाही.स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि इतकी वर्षे स्वातंत्रध्वजा उंच फडकवत ठेवलेल्या हजारो हुतात्म्यांच्या रक्ताने कित्तुरची पवित्र भुमी पावन झाली आहे.निसंशय आपले संस्थान लहान आहे.ब्रिटीशांच्या तुलनेने आपले सैन्य संख्येने कमी असेल पण आपले सैनिक द्रव्यलोभी नाहीत.देशप्रेम, या स्वातंत्र्याविषयीचे प्रेम,त्यांच्या धमन्याधमन्यांतुन वाहत आहे.आपल्यातला एक जण त्यांच्यातल्या दहा जणांच्या तोडीचा आहे. काहीही झाले तरी आम्ही त्यांच्यापुढे नमणार नाही असे आपण मि.थॅकरे आणि मि.चॅपलिन यांना सांगू. या भुमीवर अखेरचा माणुस शिल्लक राहीपर्यंत कित्तुर लढत राहील.ब्रिटीशांचे गुलाम होण्यापेक्षा ते मरण पत्करतील."
राणी चन्नम्माच्या ह्या उत्स्फुर्त भाषणाने जमलेल्या लोकांचे क्षात्रतेज जागे झाले.कित्तुरच्या सैनिकांच्या तलवारी तळपल्या.एका आवाजात ते सगळे ओरडले...
"कित्तुर चिरायु होवो...
राणी चन्नम्मा चिरायु होवो..."
वेळ आणिबाणीची होती,ब्रिटीशांच्या पारंगत फौजेला उत्तर देण्यासाठी तितक्याच दमाची आणि संख्येची फौज राणी चन्नम्माला हवी होती तिने तात्काळ एक दुत कोल्हापुर छत्रपतींकडे पाठवला.राणीने सैन्य जमवाजमव सुरु केली होती.तीने राज्यातल्या सर्व किल्लेदारांना शिबंदीसह हजर होण्याचा हुकुम सोडला.राजवाड्याच्या पश्चिमेकडच्या केम्मनमर्डी व गडदमर्डी येथील किल्ल्याच्या बुरुजांवरसुद्धा किल्लेदारांचा पहारा ठेवण्यात आला. त्या वेळी 1000 शिपाई,2000 घोडे,1000 उंट,50 हत्ती,दोन 24 पौंडी पितळी व इतर चौदा पल्लेदार तोफा इतकी कित्तुरच्या किल्ल्यात शिबंदी होती.बंदुका,तलवारी,धनुष्यबाण,भाले,कुर्हाडी आणि इतर शस्त्रे यांनी कित्तुरचे योद्धे सुसज्ज होते याखेरीज लढाईच्या वेळेस ज्यांची मदत घेता येईल असे सुमारे 6000 तरबेज लढवय्ये 'शेतसनदी' होते.
21 आॅक्टोबर रोजी थॅकरे सैन्य घेऊन कित्तुरमधे शिरला त्याला ह्या बंडखोर परिस्थितीचा अंदाज नव्हता,तो बेफिकीरपणे राजवाड्यात शिरला,देसायाच्या वाड्यापर्यंत त्याला सोबत द्यायला बोलावुनही किल्ल्यातला कुणी सोबत द्यायला येईना.किल्ल्यात मोठ्या प्रमाणात सरदार आणि जनता जमल्याचं त्याला दिसलं.पण थॅकरेच्या उपस्थितीची दखल एकाही माणसानं घेतली नाही एरवी त्याचा रुबाब बराच असायचा पण आज त्याला कुणी विचारत नव्हत.तसा राणीचा सख्त हुकुमच होता.
थॅकरेनं चिडुन आपल्या तोफखाना प्रमुखाला कॅ.ब्लॅक ला किल्ल्याच्या दारात तोफा नेण्याचा हुकुम दिला आणि सकाळपर्यंत शरण येऊन तह न केल्यास गंभीर परीणाम होतील असा सज्जड दम त्याने राणीला एका निरोपात दिला.त्याने दोन बलदंड तोफा किल्ल्याच्या दारात लावल्या.एक दिवस असाच गेला.
23 आॅक्टोबर 1824 रोजी ब्रिटीश तोफखान्याचा अधिकारी पहारे बदलायला गेल्यानंतर राणीच्या पहारेकर्याने त्यांना आत जाण्यास मज्जाव केला.याने थॅकरे अजुन चिडला त्याने किल्ल्यावर तोफा डागण्याचा आदेश दिला.तोफा डागल्या गेल्या बाहेरचा दरवाजा फुटला.थॅकरेने राणीच्या सेनापतीला दार उघडण्याचा सख्त आदेश जासुदामार्फत दिला.सेनापतीने जोवर ब्रिटीश फौजा सुरक्षित अंतरावर जात नाहीत तोवर दार उघडण्यास मनाई केली.
किल्ल्याबाहेर ब्रिटीश तोफखाना होता.थॅकरेने दार उघडण्यासाठी 24 मिनिटांचा अवधी दिला.
जसे चोविस मिनिट सरले तसे दार हळुच उघडले गेले आणि क्षणाधार्त राणीच्या कित्तुरी फौजेचे तरणेबांड घोडेस्वार विद्युतवेगाने थॅकरेच्या फौजेवर चालुन आले ,त्यांनी सर्वप्रथम सगळे प्रमुख तोफची (कॅ.ब्लॅकसहीत) कापुन काढले,आणि ते ब्रिटीश घोडदळाकडे वळाले...
किल्ल्याच्या तटबंदीवरुन राणी चन्नम्मा हातात नंगी तलवार घेउन पराक्रमी कित्तुरी फौजेला आदेश देत होती,रणावेश तिच्या नसानसांत संचारला होता.तिच्या उजव्या बाजुला तिचा एकनिष्ठ अंगरक्षक अमटुरचा साधुनवर बाळाप्पा उभा होता...
इकडं फौजेनं शक्य तितक्या कत्तली केल्या.. रणधुमाळी माजली इतक्यात राणीचा अंगरक्षक साधुनवर बाळाप्पानं राणीच्या दिशेनं येणार्या थॅकरेला पाहीलं,बाळाप्पा अप्रतिम नेमबाज होता.त्यानं थॅकरेवर निषाणा धरुन एका गोळीत त्याला ठार केला. थॅकरे पडल्याचं पहाताच त्याची अर्धमेली फौजही पळाली.राणी चन्नम्माचा विजय झाला.
थॅकरे मेला ही बातमी ब्रिटीशांना काही मान्यच होईना त्यांनी विश्वसनिय हेरांमार्फत शहनिशा करुन मगच या बातमीवर विश्वास ठेवला. कित्तुरच्या या विजयानंतर 3 दिवसांनी दत्तक राजाचा राज्याभिषेक मोठ्या थाटात साजरा करण्यात आला पण इकडे ब्रिटीश अधिकारी चॅप्लिन याला एका लहानशा संस्थानने कंपनीच्या फौजेला हरवावं आणि थॅकरेसारख्या कसलेल्या सेनानीचा लज्जास्पद मृत्यु व्हावा ह्या विचाराने झोपच लागेना. त्याने तात्काळ फौज जमवा जमवीला सुरुवात केली.
चॅप्लिननं तब्बल दिड महीना पत्रापत्री करुन "नेटिव्ह इन्फंट्र्यां"चं तब्बल 25000 सैन्य जमवलं आणि तो कित्तुर हस्तगत करण्याचे डावपेच आखु लागला.
इकडे राणीही शांत नव्हतीच तिने या दिड महीन्यात चॅप्लिनला पत्र लिहुन सर्व घडामोडी कळवल्या आणि थॅकरेच्या अन्यायी वृत्तीबद्दल कल्पना दिली पण आता चॅप्लिनचं नाक कापलं गेलं होतं.
तो सुडाच्या आगीत जळत होता.
2 डिसेंबरला प्रचंड मोठा तोफखाना आणि नेटिव्ह इन्फंट्रीचं सैन्य घेऊन तो कित्तुरमधे दाखल झाला आणि 3 डिसेंबरला सकाळी 10 च्या आत सर्व सैन्य जर शरण आलं नाही तर युद्धाला तयार रहा असं राणीला बजावलं.दरम्यान कोल्हापुरचे सैन्य राणीच्या मदतीला का आले नसावे हा प्रश्न पडतो.
शेवटी राणी युद्धाला तयार झाली,इमानी सरदारांनी व सैन्यानं आपल्या लाडक्या राणीसाठी व प्राणप्रिय कित्तुरसाठी शेवटच्या क्षणापर्यंत दमदार लढत देण्याची शपथ घेतली.
ब्रिटीश सैन्याची एक तुकडी राणी चन्नम्माच्या शिपायांचा कडक पहारा असलेल्या केम्मनमर्डीच्या दिशेनं निघाली तर काही तुकड्या रणगद्दी तलावाच्या काठी, तर तुंबकेरीच्या बाजुला तीन तुकड्या असं तब्बल 25000 सैन्य कित्तुरला वेढा टाकुन पुढे सरकत होतं.केम्मनमर्डी हा कित्तुरचा बालेकिल्लाही ब्रिटीशांनी वेढला होता.
क.डिकाॅन,ले.क.वाॅकर,ले.क.मन्रो आणि मे.ट्र्युन्सन हे ब्रिटीश अधिकारी होते. तर राणीचे अवरादी विरप्पा,संगोळी रायण्णा,बिचगट्टी चन्नबसप्पा,गजवीर आणि सेनापती सरदार गुरुसिदप्पा हे विर जिवाची बाजी लावत होते.
3 डिसेंबरला तोफांच्या सरबत्तीपुढे कित्तुरकरांचे काहीच चलले नाही आणि त्यांनी बालेकिल्ल्याकडे माघार घेतली.
4 तारखेला सकाळी ब्रिटीश सोजीरांनी गडदमर्डीवर घाला घातला.तिथे कित्तुरच्या योद्ध्यांनी शर्थीची लढत दिली.
पण कित्तुरचे बहुतांश शिपाई मारले गेले.
दिवसभराच्या रणधुमाळीनंतर याच दिवशी मध्यरात्री किल्ल्याच्या तटबंदीला खिंडार पाडलं गेलं आणि ब्रिटीश फौजा आत शिरल्या.
कित्तुरला वाचवण्याचे सर्व पर्याय संपले अशा वेळी काही सरदार पळुन जाण्यात यशस्वी झाले तर काही पकडले गेले.राणी चन्नम्माला आपल्या शुर योद्ध्यांच्या आग्रहापुढे झुकून पळुन जावं लागलं पण....
सुन वीरम्मा आणि जानकीबाईसोबत किल्ल्याच्या ईशान्येकडुन संगोळ्ळी कडे पळताना ब्रिटीशांनी त्यांना ओळखलं व कैद केलं...
यानंतर,
ब्रिटीशांनी कित्तुरचा राजवाडा लुटला,खजिन्यातली 16 लाख रुपयांची रोकड,4 लाखाचे जडजवाहीर तसंच कित्तुरचे 3000 घोडे,2000 उंट,दारुगोळा,36 तोफा,56 बंदुका,तलवारी,धनुष्यबाण,भाले इ. शस्त्रांचा साठा ताब्यात घेतला.
त्यानंतर राणी चेन्नम्मा,शिवलिंगरुद्रसर्जाची विधवा विरम्मा,आणि चेन्नम्माचा दिवंगत पुत्र शिवबसवराज याची विधवा यांना आठवडाभर राजवाड्यात नजरकैद ठेवण्यात आलं.कित्तुरची देसकत ब्रिटीशांना देण्यात यावी अशा दस्तावर जबरदस्ती त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यांना सक्त पहार्यात बैलहोंगलच्या अजिंक्य किल्ल्यात नेण्यात आलं तिथंच पाच वर्षानंतर 3 फेब्रुवारी 1829 ला तिचा अंत झाला.राणीचा अंत्यविधी पुर्ण लष्करी इतमामात झाला.
राणी चन्नम्मांची महानता आजही कित्तुरमधे अनुभवण्यास मिळते.राणीसाहेबांच्या आठवणीत 22 ते 24 आॅक्टोबर या काळात कित्तुर महोत्सव साजरा केला जातो.त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मुर्तीचं अनावरण नवी दिल्लीच्या पार्लमेंट हाऊस काॅम्प्लेक्स मधे 11 सप्टेंबर 2007 ला भारताच्या पुर्व महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आलं.
राणी चन्नम्मा आणि साथीदार यांनी जो ब्रिटीशांविरुद्ध अभुतपुर्व लढा दिलाय त्याला तोड नाही.कित्तुरची भुमी यावत्सुर्यचद्रौ या पराक्रमाची साक्ष पुढच्या पिढीला देत राहील.
संदर्भ - 1) सदाशिव वोडेयर - राणी चन्नम्मा (NBT)
2) गॅझेटियर आॅफ बाॅम्बे प्रेसिडेन्सी,खंड 11,पृ 484,578-581.
3) वासुदेवशास्त्री खरे, ऐतिहासीक लेख संग्रह,भाग 15,पृ.8054
4) विकीपिडीया
© विशाल गवळी
#आझादी_के_दिवाने
#जागर_क्रांतीचा
#जागर_इतिहासाचा
0 comments :
Post a Comment