आदिवासी इतिहास
मुकणे राजा
शिक्षणाच्या अभावामुळे इतिहासात आदिवासींच्या पराक्रमांविषयी खूपच कमी उल्लेख आढळतात. तरी आपणास माहित असणा-या नोंदी आपण सर्वांबरोबर शेअर कराव्यात. या विचारांच्या देवाणघेवाणीतून आपले आपल्या समाज बांधवांचे समाजाविषयी असणारे ज्ञान अधिक व्यापक व सखोल होण्यास मदत होईल.
ऐतिहासिक काळ आणि स्वातंत्र्य लढयांत महादेव कोळी ही जमात इतिहासात अधिक प्रसिद्धीला आली. जुन्नर प्रांतातील मावळा मध्ये फार पूर्वी पासून या जमातीचे वर्चस्व होते . इ.स. १३४० मध्ये महंमद तुघलकाने कोंडाणा व अहमदनगरचा डोंगरी किल्ला महादेव कोळी जमातीच्या नायकाचा पराभव करून ताब्यात घेतल्याचा उल्लेख सापडतो. कोंडाणा हा किल्ला नागनाथ नावाच्या महादेव कोळी नायकाच्या ताब्यात होता .त्याने शत्रू
विरुध्द आठ महिने किल्ला लढवला . परंतु पुढे रसद
तुटल्यामुळे किल्ला सोडून तो पळून गेला .
देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत बिदरच्या राजाने पोपेरा नावाच्या महादेव कोळ्याला जव्हार
राज्याचे अधिपात्त्य दिल्याचा उल्लेख मिळतो. त्या वेळी जव्हारच्या अधिपत्याखाली बावीस किल्ले होते. इ.स १३४० ते १४९० मध्ये बहामनी राजांनी व इ.स १५४० ते १६२६ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीने महादेव कोळी नायकाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले होते. इ.स १४४३ मध्ये मलिक -उल- तुजार नावाच्या बहामनी सरदाराने शिवनेरी किल्ला व त्याच्या भोवतालची गावे महादेव कोळी लोकांच्या ताब्यातून घेतल्याचा पुरावा मिळतो.
इ.स १६३७ मध्ये महादेवकोळी लोकांनी एकजूट करून मोघलांविरुद्ध लढा पुकारला. या लढ्याच्या हालचालींमुळे इ.स. १६३७ च्या सुमारास महादेवकोळी लोकांच्या बंदोबस्तासाठी सैन्य पाठवावे असा उल्लेख ऐतेहासिक कागदपत्रात मिळतो. शिवाजी महाराजांच्या काळाच्या
अगोदर जुन्नर प्रांतातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांचे
आधिपत्य महादेव कोळी जमातीच्या नायकांकडे असल्याचेही पुरावे मिळतात. सिंहगड जिंकला त्यावेळी बारा दरवाजांवर बारा महादेवकोळी
रखवालदार होते असे तत्कालीन शाहीर भानुदास
आणि शाहीर अज्ञादास यांच्या पोवाड्या वरून
स्पष्ट होते. महंमद तुघलकाने दख्खन जिंकेपर्यंत अनेक किल्ल्यांचे किल्लेदार महादेवकोळी नाईक होते.
बहामनी राजांनी ( १३४० ते १४९०) व अहमदनगर च्या राजांनी (१४९० ते १३३६) महादेवकोळी जमातीला त्यांच्या परंपरागत प्रमुखाच्या किंवा नाईकाच्या अधिपत्याखाली स्वातंत्र्य दिले होते. महादेवकोळी
लोकांच्या शूरत्वाची व संघटीत पणाची चुणूक बादशहाला कळली होती. त्यामुळेच सन १४४३ मध्ये महादेवकोळ्यांच्या ताब्यात असलेला शिवनेरी किल्ला मलिकउल तुजार या बहामनी सरदाराने काढून घेतला.
१७ व्या शतकाच्या मध्यावधीत महादेवकोळ्यांनी राजसत्तेविरुद्ध उठाव केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. अहमदनगरच्या राजवटीचा १६३६ मध्ये पाडाव झाल्यावर मोगलांची राजवट सुरु झाली. शाहजहान बादशहाच्या राजवटीत तोरडमल ने जमिनीची मोजणी करून कायम स्वरुपाची सारा आकारणी सुरु केल्यावर महादेवकोळी लोकांनी प्रमुख खेमा रगतवान (नाईक) यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले, मोगलांविरुद्ध मोठे बंड केले.
श्री छत्रपती शिवाजी राजांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले त्या काळात जुन्नर प्रांताखालील महादेवकोळी जमातीशी जवळचा संबंध आला. हि जमात स्वातंत्र्यप्रेमी आणि लढवय्यी आहे हे महाराजांनी
लहानपणापासून चांगलेच हेरले होते, स्वराज्य
स्थापण्याच्या कमी यांचा चांगला उपयोग होऊ
शकेल असे त्यांना वाटत होते व यासाठी योग्य
संधीची ते आतुरतेने वाट पाहत होते आणि हि संधी
आली इ. स. १६५७ मध्ये महाराजांच्या स्फूर्तीने या
भागातील महादेवकोळी संघटीत झाले. मोगलांच्या
विरुद्ध त्यांच्या हालचाली वाढू लागल्या शिवाजी
महाराजांचा या चळवळी मागे हात आहे हे
बादशहाच्या लक्षात आल्याबरोबर बादशाहने मोठी
कुमक पाठवून महादेव कोळ्यांनी चालवलेल्या
बंडाळीचा बंदोबस्त केला. या बंडाळीच्या रूपाने
महादेवकोळ्यांनी जुन्नर येथील मोगल राजवट उखडून
काढण्याचा प्रयत्न केला. महादेवकोळ्यांच्या या
उठावामुळे बादशहा संतापला हजारो महादेवकोळी
पकडून आणून बादशाहने जुन्नर येथे मोठे शिरकाण केले व हजारो लोकांच्या मुंडकयांचा ढीग करून त्यावर
चबुतरा बांधला त्याला काळा चबुतरा असे म्हणतात .
महाराजांच्या शब्दाचे मोल जाणून महादेवकोळी
शरण न जाता त्यांनी शुराचे मरण पत्करले यावेळी
मोगलांचा सरदार रणदुल्लाखान होता. सामुदायिक
कत्तलीच्या या चौथऱ्याची नोंद इतिहासात कोळी
चौथरा म्हणून झाली आहे पण त्याचे सार्थ नाव
“महादेव कोळी चौथरा” असे आहे.
कॅप्टन मकिन्तोश (Mackintosh) हा सत्ताविसाव्या मद्रास रेजिमेंटचा (पायदळ) इंग्रज सेनाधिकारी अहमदनगर च्या पोलिस दलाचे अधिपत्य करीत होता.
त्यावेळी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात
महादेवकोळी लोकांनी इंग्रजांविरुद्ध अनेक बंडाळी
आणि चळवळी सुरु केल्या होत्या या चळवलींचा
बंदोबस्त करण्याचे काम कॅप्टन मकिन्तोश कडे
सोपविण्यात आले होते, त्यावेळी बंदोबस्ताच्या
निमित्ताने सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांतून फिरत
असताना महादेवकोळी जमात कशी होती याची
माहिती त्याने लिहून ठेवली आहे हि माहिती
आजही प्रमाण मानली जाते कॅप्टन मकिन्तोश म्हणतात ” पूर्वीच्या काळी महादेवकोळी कणखर बाण्याचे, पराक्रमी, आणि स्वतंत्र वृत्तीचे होते, तसेच ठक्कर बाप्पांच्या मते “सह्याद्री पर्वताच्या डोंगर दऱ्या खोर्यांत
राहणारी महादेवकोळी हि अतिप्राचीन डोंगरी
जमात आहे तसेच ते स्वताला “राजकोळी” समजतात.
तसेच प्रसिद्ध डब्लू. कुक यांच्या मते महादेवकोळी
स्वतःला सोल्जर्स ऑफ नाईट असे म्हणवून घेत असत…!
जव्हार येथील महादेव कोळी जमातीचे राज्य
उत्तर हिंदुस्थानात मोगलांच्या स्वाऱ्या यशस्वी
झाल्यानंतर त्यांनी दक्षिण हिंदुस्थानाकडे आपले
लक्ष वळविले. त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीच्या
यादवांचे राज्य चालू होते देवगिरीच्या यादवांच्या
राज्यात व नंतर महाराष्ट्रातील इतर विभागात
मोगलांनी स्वाऱ्या करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात
केली आणि कल्याण ,शहापूर हा देवगिरीचा मुलुख
त्यांनी काबीज केला.त्य. त्यानंतर मोगलांच्या
स्वाऱ्या नाशिक विभागाकडे वळल्या . हिंदू देव
देवतांची ,तीर्थक्षेत्रांची नासधूस करणे,लोकांना
छळने , बाटवने ,त्यांच्यावर जिझियासारखे कर
आकारणे ,असे प्रकार त्यांनी त्या भागात केले.
हा त्रास नाशिक ,अहमदनगर ,अकोलनेर ,त्र्यंबकेश्वर,
इगतपुरी आणि जुन्नर प्रांतात रहाणाऱ्या महादेव
कोळी जमातीलाही झाला. याच सुमारास सदानंद
महाराज नावाचे नागपंथी साधू या भागात
प्रसिद्धीला आले होते. हा त्रास त्यांनाही सहन
झाला नाही. धर्म भ्रष्टते विरुद्ध त्यांनी या भागात
हालचाली सुरु केल्या गावोगाव फिरून धर्म
भ्रष्टतेविरुद्ध त्यांनी लोकजागृती केली .
मुसलमानांचा त्रास कमी करण्याच्या उद्देश्याने
इगतपुरी भागात मुकणी गावच्या जमीनदार
शेतकऱ्यांना संघटीतकरण्याचा व कोकणात जाऊन
वाराल्यांच्या ताब्यात असलेल जव्हारच राज्य
घेण्याचा सल्ला त्याने दिला. साधू महाराजांचा
सल्ला सर्वांना पसंत पडला. महाराजांचा आशीर्वाद
घेऊन देवराम मुकणे नावाच्या जमीनदाराने या
कार्याला सुरुवात केली हेच देवराम मुकणे पुढे
जव्हारच्या राजघराण्याचे मूळ पुरुष जायबा म्हणून
प्रसिद्धीला आले.
जव्हारच्या राज्यावर हल्ला करणे देवराम उर्फ
जायबा मुकणे यांना तितकेसे सोपे नव्हते. कारण
त्यांच्याजवळ सैन्य, दारुगोळा ,पैसा व इतर सामुग्री
काहीच नव्हती शिवाय जव्हार जवळचा भुपतगड
किल्ला मलिक नावाच्या लढवय्या सुभेदाराच्या
ताब्यात होता .सैन्य पैशाची गरज भागवण्यासाठी
देवराम उर्फ जायबा मुकणे यांनी प्रथम सहकाऱ्यांबरोबर सुरत बंदरात जाऊन बरीच लुटमार केली.
पापुरा नाव धारण करून हि मंडळी इ.स १२९८ ते १३०६
पर्यंत पैसा व इतर सामुग्री गोळा करत होती .
पुढे हि गोष्ट सुरतेच्या सुभेदाराच्या लक्षात आली व
त्याच्या सैनिकांनी जायबा मुकण्याच्या टोळीचा
पाठलाग सुरु केला. सुरत जवळच्या कोडद गावच्या
भट्ट घराण्याने या टोळीला आश्रय दिला. त्यामुळे
सुरतेच्या सुभेदाराकडून आलेले गंडांतर टळले. पुढे जव्हारचे राज्य मिळाल्यावर पुरोहित म्हणून या भट्ट
घराण्याला राजपुरोहिती देण्यात आली. सुरतहून
आल्यावर प्रथम भुपत गड किल्यावर जायबा
मुकण्याच्या टोळीने चाल केली व मलिक
सुभेदाराच्या हातून तो किल्ला त्यांनी काढून
घेतला .भुपत गड जव्हार पासून १५ कि . मी अंतरावर
आहे. त्याच्या चारी बाजूंनी तट असून गडावर सैन्याच्या पाण्याच्या विहिरी आहे. त्यानंतर जव्हारच्या किल्ल्यावर चाल करून तेथील वारली सुभेदार सुंभाटे यांचाही पराभव त्यांनी केला. अशा रीतीने जव्हारचे राज्य जायबा मुकणे यांच्या ताब्यात १३०६ मध्ये आले. पुढे सुंभाटे
हा वारली सुभेदार जायबा यांना येऊन मिळाला. त्याला गंभीरगडची सुभेदारी देण्यात आली.
इ.स. १३४१ पर्यंत जव्हारचे अधिपत्य कोणीच मान्य
केलेले नव्हते. पुढे इ.स १३४२ मध्ये मुबारक खिलजीने
जायबाला राजा हि पदवी बहाल करून उत्तर कोकण
वरील त्याचे अधिपत्य मान्य केले. पुढे त्याच वर्षी
म्हणजे ६ जून १३४२ रोजी दिल्लीच्या बादशहाने
जायबाच्या ऐवजी त्याच्या मुलाला (धुळबराव मुकणे ) ’राजा ‘ हि पदवी बहल केली व नेमशहा या नावाने त्याला गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी जव्हारच्या राज्याच्या ताब्यात बराच मोठा प्रदेश होता.
जायबाने ५००० चौ. मैलाच्या प्रदेशावर राज्य केले. तो
एक स्वतंत्र राजा होता. हे राज्य बरीच वर्ष स्थिर
झालेले होते. जव्हारच्या राज्यात एकून २२ किल्ले
होते. त्यापैकी पाच किल्ले अहमदनगर जिल्ह्यात
होते. त्यांची हद्द हरिश्चंद्रगडा पर्यंत होती. जव्हारच्या राज्याचा त्यावेळचा महसुल नऊ लक्ष रुपये होता. मुसलमान बादशाहने बराच सपाट भू -प्रदेश स्वाऱ्या करून जिंकला होता . डोंगराळ भागात मात्र बादशहाचे वर्चस्व नव्हते. विशिष्ट भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमुळे येथील स्थानिक राजे
विजय नगरच्या हिंदू राजाचे अगर गोवळकोंड्याच्या
बहामनी राज्याचे सार्वभौमत्व मान्य करत. अशा
रीतीने सोळाव्या शतकापर्यंत जव्हारचे राज्य
निर्वेधपणे चालू होते.
नंतरच्या काळात जव्हारच्या राजाच्या हातून मुसलमान बादशहाने दक्षिणेकडील बंदरे घेण्यास सुरुवात केली. त्या नंतर किनारपट्टीवर पोर्तुगीज आले. जव्हारच्या
राज्याची हद्द त्यावेळी कोकण बंदरापर्यंत होती.
त्यामुळे साहजिकच पुढे १५६९ मध्ये पोर्तुगीजांशी
जव्हारच्या राजाचे वैर वाढले. जव्हार करांना त्यामुळे माघार घ्यावी लागली. त्यावेळी दिव, दमन,उंबरगाव हि प्रमुख ठाणी होती. त्यावर जव्हारच्या राज्याचे वर्चस्व होते.
सतराव्या शतकात मराठ्यांच्या कडे सत्ता
आली. दिल्लीच्या सत्तेविरुद्ध जव्हारच्या राजाने
१६७१ साली बंड केले व शिवाजी महाराजांना
सामील झाले. शिवाजीमहाराज सुरत लुटण्यासाठी
जव्हार मार्गानेच गेले व त्यांना जव्हारच्या राजाने
सैन्याची मदत केली होती. चिमाजी अप्पाला वसई
सर करण्यासाठी देखील जव्हारकरांनी सैन्य
पाठवून हातभार लावला होता. प्रारंभी जव्हारचे
सर्व राज्य जंगल पट्टीत होते. त्याची हद्द थेट धरमपूर
संस्थानाला जाऊन भिडली होति. अठराव्या
शतकापर्यंत जव्हारचे राज्य निर्वेधपणे चालू होते पण
अठराव्या शतकाचं उत्तरार्धात पेशव्यांनी
जव्हारच्या राजाकडून खंडणीची मागणी केली.
जव्हारच्या राजाने आपल्या राज्यातील काही
उत्तमात उत्तम जमीन पेशव्यांना दिली . पुढे हे
संस्थान बडोदा संस्थानाचे मांडलिक म्हणून राहू
लागले. पेशवाईचा अंत झाल्यावर जव्हारचे संस्थान इतर
संस्थानाप्रमाणे ब्रिटीशांच्या सार्वभौमत्वाखाली गेले. जव्हारच्या राजसत्तेने पुढे इस्ट इंडिया कंपनीशी करार करून जमवून घेतले व इस्ट इंडिया
कंपनीचे एजंट म्हणून जव्हारकर १८२६ पासून वावरू
लागले. त्या नंतर ब्रिटीश सत्तेच्या अधिपत्त्याखाली
जव्हारची राजसत्ता कारभार करू लागली.
स्वातंत्र्य मिळाल्यावर हे संस्थान १० जून १९४८ ला
भारतीय संघराज्यात विलीन झाले.
मुकणे संस्थानाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याकाळातील ते एक श्रीमंत व प्रगत व व्यापारी शेती करणारे राज्य होतं. त्यामुळे जमा होणारा महसूल हा हत्तीवरून गोळा करावा लागत होता. या संस्थानाचे स्वताचे चलन होते. तसेच स्वतंत्र असे राष्ट्रगीतही होते. कधीकाळी स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांना मोलाची मदत करणारे हे संस्थान आज स्वतंत्र भारतात कुपोषण, दारिद्र्य, बेरोजगारी, असुविधा यांचे केंद्र बनले आहे.
महादेव कोळी समाजात जन्मलेल्या अन् स्वकर्तृत्वावर
राजेपण मिळवणा-या जायबांच्या [देवराम मुकणे ]
पराक्रमावर प्रकाश टाकणारी, उच्च कुलातील स्री बरोबर
विवाह आणि त्याच बरोबर महादेव कोळ्यांच्या पराक्रमी
इतिहास आणि संस्कृतीच दर्शन घडवणारी 'जायबा' हि दुर्मिळ कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे.
हे पुस्तक लिहिले नसते तर आपल्या इतिहासातलं एक
गौरवशाली पृष्ठ कालौघात गहाळ झालं असतं.
संदर्भ, साभार प्रस्तुती : -
आदिवासी भुषण डॉ. गोविंद गारे
साहेब यांचे “सह्याद्रीतील आदिवासी
महादेवकोळी”
फोटो :
1) जव्हार संस्थान पदक
2) जायबा कादंबरी ( इंग्रजी)
3) जय विलास राजवाडा, जव्हार
#जागर_इतिहासाचा
#आझादी_के_दिवाने
0 comments :
Post a Comment