संथाळांचे बंड (१८५५-५६)
----------------------------------
----------------------------------
जागर क्रांतीचा या पर्वामधील आजवरच्या किमान ५५-६० पोस्टमध्ये आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक अज्ञात क्रांतिकाऱ्यांविषयी माहिती ऐकली व वाचली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला व आपापल्या पद्धतीने इंग्रजांविरुध्द लढा दिला. काही ठिकाणी चळवळी झाल्या तर काही ठिकाणी बंड.
असेच एक बंड जे इतिहासामध्ये लपून बसले आहे ते म्हणजे १८५५-५६ मधले "संथाळांचे बंड".
इंग्रजांच्या भु-धारणांमुळे जमीन कसणाऱ्या वर्गामध्ये खूप बदल होत गेले. सरकारी कर आणि जमीनदारांच्या हिश्याचे प्रमाण वाढले. शेतकरी वर्ग सावकार आणि सरकारच्या साफळ्यात अडकला होता. त्यामध्ये निसर्गाने सुद्धा पाठ फिरवली आणि दुष्काळ पडले, उपासमारीने शेतकरीवर्ग हैराण झाले आणि असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले. त्यामध्ये एक बंड होते ते "संथाळांचे".
संथाळ हे अतिशय शांतताप्रिय व साधे लोक. शतकानुशतके जी जमीन ते कसत होते ती जमीन बंगालच्या १७९३ च्या कायमधारा व्यवस्थेमुळे जमीनदारांची झाली. जमीनदारांच्या मनमानीला आणि अत्याधिक करांच्या मागणीमुळे ही मंडळी आपली भूमी सोडून जंगलात गेली. तेथे जंगलतोड करून शेतीलायक जमीन तयार केली परंतु सावकारांनी त्या जमिनीवरही हक्क सांगितला. बंगाल व उत्तर भारतातील श्रीमंत लोकं, पोलीस, अधिकारी आणि न्याय अधिकारी सुद्धा शोषण करणाऱ्यांची बाजू घेत होते यामुळे संथाळांवरचा अत्याचार वाढला.
यामुळे १८५५ मध्ये संथाळांनी "सिधु" व "कान्हू" या दोन भावांच्या नेतृत्वाखाली एक घोषणा केली,
"हा देश आपण आपल्या ताब्यात घेऊन इथे आपले सरकार स्थापन करू" !!
संथाळांनी भागलपूर व राजमहल यांच्यामधील रेल्वे व तार व्यवस्था उधवस्थ करून टाकली. तसेच कंपनीची सत्ता समाप्त होऊन आपली सत्ता प्रस्थापित झाल्याची घोषणा केली. यावर ब्रिटिशांनी लष्करी कारवाई केली. परंतु सैनिकी ताकत कमी पडल्याने संथाळांनी जंगलाचा आश्रय घेतला व आपला लढा चालू ठेवला. यामध्ये मेजर बरो ह्याच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या इंग्रज फौजेला अपमानजनक पराभव स्वीकारावा लागला. इथे संथाळांना विजय प्राप्त झाला.
परंतु १८५६ मध्ये संथाळ नेत्यांना पकडण्यात आले व अतिशय क्रूरपणे हा बंड दडपून टाकण्यात आला. परंतु संथाळांचा राग व द्वेष शांत करण्यासाठी ब्रिटिशांना "संथाळ परगना" नावाचा नवीन जिल्हा निर्माण करावा लागला.
दुर्दैवाने "सिधु" आणि "कान्हू" या दोन भावांची नाव इतिहासात हरवून गेली.
© जागर इतिहासाचा
#आझादी_के_दिवाने
#जागर_क्रांतीचा
#जागर_इतिहासाचा
0 comments :
Post a Comment