""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""”"""""""""""""""
तिलका मांझी
(11 फेब्रुवारी 1750 – 13 जानेवारी 1785)
..........................................................................
आदिवासींद्वारे केल्या गेलेल्या 'आदिवासी विद्रोहा'चे नेतृत्व तीलका मांझी यांनी केले होते. इंग्रजांविरुद्ध त्यांचा हा लढा 1771 ते 1784 असा होता. 1778 मध्ये पहाडिया सरदारांना सोबत घेऊन इंग्रजांच्या तावडीतून रामगड कॅम्पला स्वतंत्र केले होते. म्हणजे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी 1778 मध्ये तीलका मांझी यांनी टाकलेली होती. परंतु त्यांचा इतिहास पुढे न आल्याने त्यांच्या या क्रांतीकारी पर्वाची माहिती देशाला झाली नाही.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
तीलका मांझी यांचा जन्म पहाडिया प्रदेशात 11 फेब्रुवारी 1750 रोजी झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे ते लहानपणासूनच चाणाक्ष व दूरदृष्टी असणारे होते. मोठे होत असताना आपल्या भागातील संथाल व पहाडिया यांच्यातील संघर्षाची जाणीव त्यांना होत होती. त्यात इंग्रज सरकारची कुटनीती व या दोन्ही सत्तांना आपापसात लढवून आपल्या ताब्यात घेतलेली सत्ता या बाबी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या.
इंग्रज सरकार व त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे जमीनदार, सावकार यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर केला जाणारा अन्याय तीलका मांझी यांना सहन होत नव्हता. या अन्यायाविरोधात आपण काही तरी केले पाहिजे या भावनेने पेटून उठलेल्या तीलका मांझी यांनी प्रथम एक संघटना उभारली. सामान्य लोकांच्या मनातील भावना ओळखून त्यावर भाष्य करणारे तीलका मांझी हे सर्व जाती धर्माच्या लोकांचा सन्मान करत होते. त्यामुळे त्यांना कमी कालावधीत लोकांचा मोठा पाठिंबा मिळू लागला.
इंग्रज सत्तेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र केले. त्यासाठी अनेकदा गुप्त बैठका घेतल्या. आपल्याला मिळून मिसळून राहायचे असेल तर या इंग्रज सरकारला आपल्या भागातून हाकलून लावले पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या सहका-यांच्या मनात पेटवली होती.
स्वातंत्र्याची पहिली लढाई लढतांना त्यांनी नदीकिनारी भागातील इंग्रजांचा खजिना लुटून तो गरिबांना वाटून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात तीलका मांझी यांच्याविषयी प्रचंड आपुलकीची भावना निर्माण झाली. हळूहळू आदिवासी युवकांना एकत्र करून तीलका मांझी यांनी आपली स्वताची स्वतंत्र शक्तिशाली संघटना तयार केली होती.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या या पहिल्या पर्वात तीलका मांझी यांचे चार भाऊ आणि पत्नीसुद्धा इंग्रजांशी लढता लढता शहीद झाले. सन 1781 मध्ये बनियारी जोर या लहानशा गावात संथाल आदिवासींनी भारताला इंग्रज राजवटीपासून मुक्त करण्यासाठी क्रांतीची मशाल हाती घेतली होती. ही क्रांतीची मशाल पुढे मोठ्या वणव्यात रूपांतरित होऊ नये म्हणून इंग्रज सरकारने मोठ्या ताकदीने यांच्यावर चढाई केली. या लढाईत सुमारे 388 आदिवासी बांधव शहीद झाले होते. यात महिलांचाही पुढाकार होता.
दि.13 जानेवारी 1784 रोजी भागलपूरमध्ये तीलका मांझी यांनी हल्ला चढवला. घोड्यावर बसून जाणाऱ्या किलीव्हलँड या इंग्रज अधिकाऱ्याच्या छातीत बाण मारण्याचे काम तीलका मांझी यांनी एका ताडाच्या उंच झाडावर चढून केले होते. त्यामुळे इंग्रजांनी तीलका मांझीचा मोठा धसका घेतला होता.
एक एका ठिकाणी संघर्ष करून तीलका मांझी विजय मिळवत होता. हाच विजयोत्सव साजरा करत असताना अचानक रात्रीच्या वेळी सर आयर कुट व पहाडी सेनापती यांनी तीलका मांझीवर आक्रमण केले. अचानक झालेल्या हल्ल्यात बेसावध असणाऱ्या तीलका मांझीचे प्रचंड सैन्य मारले गेले. परंतु तीलका मांझी मात्र काही इंग्रजांच्या तावडीत सापडू शकला नाही.
तीलका मांझी यांना एकीकडे इंग्रज सरकार तर दुसरीकडे पहाडिया सरदार यांच्याबरोबर लढावे लागत होते. इंग्रज अधिकारी पहाडिया सरदारांना हाताशी धरून तीलका मांझी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनेक प्रयत्न करूनही तीलका मांझी काही हातात सापडत नव्हता. दिवसेंदिवस इंग्रजांची बैचेनी वाढत होती. अनेक योजना आखल्या, अनेक बक्षिसं जाहीर केली, तरी तीलका मांझी त्यांच्या हातात सापडत नव्हते.
एक दिवस इंग्रज अधिकाऱ्यांना खबर मिळाली. ज्या संधीची ते आतुरतेने वाट पाहत होते ती आता चालून आली होती. एका पर्वतावर तीलका मांझी व त्याचे साथीदार वास्तव्यास आहेत याची खात्री करून क्षणाचाही विलंब न लावता इंग्रजांनी योजना तयार केली व प्रचंड फौजफाट्यासह संपूर्ण पर्वताला वेढा दिला. लढाई सुरू झाली. डोंगर व झाडांचा फायदा उठवत तीलका मांझी यांनी प्रखर लढा दिला. परंतु सैन्याला शेवटी अन्न, पाणी यांची टंचाई भासू लागली. अशाही परिस्थितीत तीलका मांझी यांचा जोरदार संघर्ष सुरूच होता. परंतु शेवटी कपटाने त्यांना पकडण्यात आले. त्यांना चार घोड्यांना बांधून फरफटत निर्दयीपणे घेऊन जाण्याचे काम इंग्रजांनी केले. यावरून त्यांच्याविषयी इंग्रजांना किती राग होता म्हणजेच तीलका मांझी यांचे अगदी सुरुवातीच्या काळातील लढा किती प्रभावशाली होता याची जाणीव होते. कित्येक मैल फरफटत नेऊनही तीलका मांझी जिवंत होते. त्यांचे संपूर्ण अंग रक्ताने माखलेले असतानाही ते इंग्रजांच्या विरोधात आपला रोष नजरेतून व्यक्त करत होते. त्यांची आपल्या भूमातेवरील प्रेमाची भावना व जिद्द यातून आपणास दिसून येते. पुन्हा तीलका मांझी यांच्यासारखे नेतृत्व उभे राहू नये व लोकांच्या मनात कायमची दहशत बसावी यासाठी सर्वांसमोर अतिशय क्रूरपणे पिंपळाच्या झाडावर तीलका मांझी यांना भागलपूरमध्ये चौकात दि. 13 जानेवारी 1785 रोजी फासावर लटकविण्यात आले. वयाच्या अगदी 35 व्या वर्षी हसतमुखाने फासावर गेलेल्या या महान योद्धयाच्या बलिदानातून आजच्या तरुणांना खूप काही शिकण्यासारखे आहे.
इतिहासानेही या महान क्रांतीकारी योद्धयाची उपेक्षा केलेली आहे. त्यांची कोणतीही पेंटिंग उपलब्ध नाही. ख्यातनाम चित्रकार डॉ.लाल रत्नाकर यांनी तीलका मांझी यांच्या जयंतीनिमित्त काही पेंटिंग बनवल्या होत्या. त्यातून त्यांची जीवनशैली उलगडण्याचा प्रयत्न केला.
- राजू ठोकळ
संदर्भ : 1) स्वातंत्र्य सेनानी वीर मूलनिवासी - आचार्य मंसाराम कुमरे
2) राजन कुमार यांची forward press मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी
0 comments :
Post a Comment