राघोजी भांगरे

🚦आदिवासी क्रांतिकारक - राघोजी भांगरे🚦
                      यांचा इतिहास

परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणा-या आदिवासी कोळी - महादेव जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे.

राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकदवान, धाडसी बंडखोर नेता होता. राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला.

⚫इंग्रजांचे अत्याचार

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. पेशवाई बुडाल्यानंतर (१८१८) इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या शिलेदा-या काढल्या. बुरुज नष्ट केले. वतनदा-या काढल्या. पगार कमी केले. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.

⚫सावकारांचे अत्याचार

त्यातच पुढे १८२८ मध्ये शेतसाराही वाढविण्यात आला. शेतसारा वसुलीमुळे गोरगरीब आदिवासींना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले.

कर्जाची वसुली करताना सावकार मनमानी करू लागले. कर्जाच्या मोबदल्यात जमिनी बळकावू लागले. दांडगाई करू लागले. त्यामुळे लोक भयंकर चिडले.

⚫अत्याचारा विरूध्द बंडाची सुरुवात

त्यातूनच सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्त्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली (१८३०). यातून महादेव कोळी बंडखोरांत दहशत पसरेल असे इंग्रजांना वाटत होते.

⚫राघोजी भांगरे यांचे बंड

रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यांमुळे राघोजी भयंकर चिडला. नोकरीला लाथ मारून त्याने बंडात उडी घेतली.

उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु झाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्याच्या परिसरात राघोजीने मोठे बंड उभारले.

⚫बंडा विरूध्द इंग्रजांचा कडेकोट बंदोबस्त

कॅप्टन मार्किनटोशने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाटरस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर नमले नाहीत. उलट बंडाने व्यापक आणि उग्र रूप धरण केले. इंग्रजांनी कुमक वाढविली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. माहितीच्या आधारावर इंग्रजांनी ८० लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले

⚫फंदफितुरी - बक्षीस

दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापुजी मारला गेला. पुढे राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे ग्याझेटियर्सच्या जुन्या आवृत्तीत 'ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले' असा उल्लेख आहे.

⚫मारवाड्यांवर छापे

राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठीकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी त्यांच्या आईचे निर्दयीपणे हाल केले. त्यामुळे चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिकमध्ये इंग्रजांना सळो को पळो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक सावकाराचे नाक कापले. राघोजीच्या भयाने सावकार गाव सोडून पळाले, असा उल्लेख अहमदनगरच्या ग्याझेटियर्समध्ये सापडतो.

साता-याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे जे व्यापक प्रयत्न चालले होते. त्याच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे समाजावर पकड ठेवणे व छळ करणा-या सावकारांना धडा शिकविणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे.

राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले. नोव्हेंबर १८४४ ते मार्च १८४५ या काळात राघोजीचे बंड शिगेला पोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने स्वतःच 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत,' अशी भूमिका जाहीर केली होती.

⚫चारीत्र्यवान राघोजी भांगरे

स्त्रीयांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रामाणिक नीतीमत्ता याला धर्मिकपणाची जोड त्याने दिली. महादेवावर त्याची अपार श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंढरपूर येथे बंडांच्या काळात तो दर्शनाला गेला होता. त्याच्या गळ्यात वाघाची कातडी असलेल्या पिशवीत दोन चांदीचे ताईत असत. त्याच्या बंडाला ईश्वरी संरक्षण आणि आशीर्वाद असल्याची त्याची स्वतःची धारणा होती.

⚫अटक - फाशी

देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरुदेखील होता. मे १८४५ मध्ये गोळी लागून देवाजी ठार झाला. त्यांच्या जवळचे प्रमुख लोक ठार होत गेले त्यामुळे राघोजी भांगरे अस्वस्थ होवून खचले असावे. नंतर त्यांनी आपला रस्ता बदलला. नंतरच्या काळात तर गोसाव्याच्या वेशात ते तीर्थयात्रा करू लागले. विठ्ठलाच्या दर्शनाला त्यांनी दिंडीतून जायचे ठरविले. ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्यांनी आयुष्यभर कधीही सोडली.

२ जानेवारी १८४८ या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.  त्याने स्वतःच बाजू मांडली. 

⚫दुर्दैव

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली.

राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा त्याला इतिहास होता. अभिजनवादी इतिहासकारांचे या क्रांतीकारकाच्या लढ्याकडे काहीसे दुर्लक्षच झाले.

"फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या"

असे त्याने न्यायाधीशांना सांगितले. ते न ऐकता सरकारने बंडाचा झेंडा फडकवणा-या या शूर वीराला २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविण्यात आले.

अकोले [जि.अहमदनगर] तालुक्याच्या या भूमिपुत्राच्या बंडाने पुढच्या काळातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच अकोले तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.

[ हा लेख लिहिताना ठाणे व अहमदनगर जिल्ह्याचे ग्याझेट व 'सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी' हे पुस्तक संदर्भासाठी वापरले आहे.]

⚫क्रांतीसुर्य राघोजी भांगरेचा जीवनपट
         क्रांतिवीर राघोजी भांगरा-भांगरे

१)राघोजी भांगरेचा जन्म - ८/नोव्हेंबर/१८०५
२)आईचे नाव - रमाबाई
३)वङिलांचे नाव - रामजी भांगरे
४)मुळ गाव - देवगाव, ता.अकोले, जि.अ-नगर
५)क्रांतीचा उदय - १८२६
६)क्रांतीची प्रतिज्ञा - १८२७
७)सह्याय्यक सल्लागार - देवजी आव्हाङ
८)अंगरक्षक - राया ठाकर
९)राघोजीचे उठाव उग्र - १८२८
१०)इंग्रज सत्तेचा विरोधात - १८३०
११)भिल्ल समाजाची मदत - १८३०
१२)राजे उमाजी नाईकांना अटक - १८३१
१३)राघोजींना पकङण्यास ५ हजारांचे बक्षिस - १८३२
१४)रतनगङ परिसरात उठाव - १८३८
१५)बापु भांगरेस अटक - १८३८
१६)गोर्यांचा मोठ्या फौजा दाखल - १८४३
१७)राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट - १८४४
१८)जुन्नरचा उठाव - १८४५
१९)उठावाच्या ठावठिकाणाचे शोध - १८४६
२०)राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल - १८४७
२१)पंढरपुरमध्ये दर्शनासाठी - १८४८
२२)क्रांतीविर राघोजी भांगरेना फाशी - २ मे १८४८.
              
या महान क्रांतिकारकाच्या विनम्र स्मृतिस
             विनम्र अभिवादन
  🙏.....कोटी कोटी प्रणाम.....🙏

- संकलित


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.