जागतिकीकरणाची झळ
मागासलेला समाज म्हटला कि
का आदिवासी माणूस दिसतो
दुर्लक्षित घटक म्हणून आजही
का आदिवासी जगास वाटतो
आर्थिक मागासलेपणा
दारिद्र्य
बेरोजगारी
निरक्षरता
अंधश्रद्धा
कुपोषण
अनारोग्य
ही तर नागर समाजाची अपत्ये
जीवनशैलीतील बदल म्हणजे समस्या नव्हे
समाजव्यवस्थेचेच रडगाणे का लपविता सत्य
ग्लोबल व्हिलेज नावाचं समीकरण
गावाकडं आम्हाला समजलं नाही
जगतिकीकरणाची झळ तेव्हढी मात्र
आमच्या झोपडीला सोसवली नाही
सामाजिक
सांस्कृतिक
शैक्षणिक
राजकीय
यात कुठंच नाही आमचा समन्वय
मग होतेय दमछाक धावताना
वाटतो अशक्त आम्ही जगाला
गोडवे खोट्या प्रगतीचे गाताना
कला
गाणी
नाच
पेहराव
गोंदण
दागिणे
हरवलं सोन्यासारखं जीणं
पैशानं हिरावलं ते स्वाभिमानी राहणं
पर्यावरणाचा -हास
झाडांची कत्तल
वन्य जीवांची तष्करी
आदिवासींची हकालपट्टी
वनविभागाचा मुजोरपणा
श्रीमंतांची मक्तेदारी
नेतेमंडळींची अय्याशी
अधिका-यांचा बडेजाव
हे सगळं त्यांचं विकासाचं मृगजळ
विस्थापित आम्ही त्यांना कसली बसतीय झळ
उपयुक्तता जपता जपता
त्यांची भोगवादी संस्कृती घुसली
विषमतेच्या जातीयवादी बाजारात
आमची इज्जत वेशीवर टांगली
दिवसा ढवळ्या होतात नेहमीच
कुठे हत्या
कुठे अपहरण
कुठे बलात्कार
कुठे अत्याचार
कुठे गोळीबार
कुठे लाठी हल्ला
कुठे ऍसिड फेक
हा सारा आवाज दाबण्याचा डाव
नक्षलवाद, माओवाद यांच्या व्याख्याही त्यांच्याच
सा-यांत बळी जाणारा चेहरा मात्र आमचाच
प्रतिकूल परिणाम घेऊन
ते योजना माथी मारत आहेत
राजरोस घटनेला डावलून
आदिवासीला मारत आहेत
नाही होणार कशाचीही चौकशी
नाही होणार कोणालाही अटक
नाही होणार कोणालाही शिक्षा
कारण आमच्याच मातीत आम्ही
अपराधी म्हणून ओळखले जातोय
त्यांच्यातले सारे अवगुण
ते आमच्यातून दाखवत आहेत
आमच्या हातात बंदूक देऊन
ते आम्हालाच मारत आहेत
जागतिकीकरणाची झळ
जंगलात आम्हाला बसत आहे
औद्योगिकीकरणाचे बळ
शहरात त्यांना मिळत आहे
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment