सुप्रिया आत्माराम अहिनवे हे नाव आजपर्यंत खरं तर आपल्याला परिचित नव्हतं. परंतु आता हे नाव घराघरात पोहचत आहे ते तिच्या कर्तृत्वाच्या व जिद्दीच्या जोरावर. सुप्रिया खरं तर लहानपणापासून धाडसी व जिद्दी आहे. सतत नवनवीन प्रयोग करण्याची आवड तिच्यामध्ये नैसर्गिकरित्या आहे. शालेय जीवनातील खेळ असोत वा ग्रामीण संस्कृतीतील विविध सण असोत, ती नेहमी जिज्ञासुपणे त्यात विविधता जोपासत आनंद घेत आलेली आहे. तिचा नृत्याचा छंद असलेली सुप्रिया ते एक चिकित्सक व उच्च दर्जाची संशोधक असा जो प्रवास आहे तो तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.
नागमोडी वळणे घेत ओतुरकडून कोपरे मांडवे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांदारणे येथे तिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण झाले. घरापासून शाळेचे अंतर 1 किमी असल्याने सुप्रिया रोज पायी ये - जा करत होती. या बालवयात तिचा हा प्रवास भविष्यात गगनभरारी घेईल असे कोणालाही वाटेल नसेल. परंतु सुप्रियाचे वडील आत्माराम अहिनवे हे सन 1985 च्या सुमारास श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर येथे शिकलेले असल्याने त्यांच्यावर गाडगे बाबांच्या विचारांचा प्रभाव होता.
"पैसे नसतील तर जेवणाचे ताट मोडा,
हातावर भाकरी खा,
बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या
पण मुलाले शाळेत घातल्याबिगर राहू नका"
या गाडगे बाबांच्या शिक्षणविषयक विचारांचे मर्म जाणून त्यांनी आपल्या मुलीला माध्यमिक शिक्षणासाठी आपल्या घरापासून 5 किमी दूर अंतरावर असणाऱ्या उदापूर येथील सरस्वती विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. त्या काळात रस्त्यांची व्यवस्था नसल्याने रोज शाळेत जाऊन येऊन 10 किमीचा पायी प्रवास तिला करावा लागत असे. माळशेज घाट ओलांडून येणारा अंगाला झोंबणारा वारा व त्याच्यासोबत आलेला धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत तिला आपले इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वीचे शिक्षण पूर्ण करावे लागले.
सुप्रियाचे शिक्षण वाढत असताना तिचे शाळेपासूनचे अंतर देखील वाढत होते. दहावीनंतर कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी अनेक मुलं - मुली पुणे, मुंबई, जुन्नर इकडे गेली. परंतु इच्छा असूनही घरच्या परिस्थितीमुळे ओतुरला अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. प्राथमिक शिक्षणाचा पाया मराठी माध्यमातून झालेला असल्याने सुरुवातीच्या काळात आकरावी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम समजून घेणे अवघड जात होते. त्यात घरापासून कॉलेज 9 किमी दूर असल्याने रोज सायकलवर सुमारे 18 किमीचा प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात रस्त्यावरच्या चिखलातून सायकल चालवताना करावी लागलेली कसरत मनाला अधिक खंबीर व आव्हानांना भिडण्याचं सामर्थ्य देऊन गेली. इतका प्रवास करून जास्तीचा अभ्यास करणे थोडेसे त्रासदायक वाटत होते. त्यात घरातील कामात आईला मदत करावी लागत असे. परंतु काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही ही जिद्द मनात ठाम असल्याने इयत्ता 12 वीचे शिक्षण पूर्ण केले व यात विशेष प्राविण्य मिळाले.
पदवीचे शिक्षण घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होते. परंतु घरापासून दूर न जाण्याची मानसिकता आडवी आली आणि पुन्हा याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुन्हा तोच सायकलवरचा संघर्ष करत बी. एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता पुढील शिक्षणाचा पर्याय न निवडता सुप्रियाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 'मुलगी म्हणजे परक्याचं धन' या मानसिकतेच्या समाज व्यवस्थेत पदवीनंतर खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याचा निर्णय खूपच धाडसी होता. परंतु आई वडिलांच्या पाठिंब्याने सरकारी नोकरीच्या मागे न लागता विविध ठिकाणी मुलाखती दिल्या. या मुलाखती देत असताना तिला अनेक अनुभव आले. शेवटी ऑलिव्ह हेल्थ केअर, दीव दमण येथे तिला संशोधन व विकास शास्त्रज्ञ या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर नवीन ठिकाणी काम करताना मनात संकोचाची भावना असायची. परंतु हळूहळू येथील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीवर काम करताना तिला नावीन्यपूर्ण संकल्पना सुचत गेल्या. तिच्या या अविष्करात कंपनीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हे ती मोठ्या अभिमानाने सांगते.
जसे आपल्याकडे परप्रांतीय लोकांना काही लोक जाणीवपूर्वक त्रास देताना दिसून येतात, तसाच काही प्रमाणात त्रास महाराष्ट्राच्या बाहेर काम करताना तिला झाल्याचा अनुभव कथन करताना नकळत तिच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. तिचा मानवतावादी दृष्टिकोन यातून दिसून येतो. आज माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ येत आहे. जागतिक पातळीवर अमुलाग्र बदल होत असताना असा प्रांतवाद जोपासणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत ती मोठ्या हिमतीने व्यक्त करते.
मराठी माणसाने पुढे जाऊच नये यासाठी देखील आपल्या शेजारील राज्यातील लोकं फार प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय सुप्रियाला आला. त्याबाबत बोलताना ती म्हणते की, "कदाचित मुंबई महाराष्ट्रापासून त्यांना तोडता आली नसल्याचं दुःख आजही त्यांच्या मनात असावं आणि त्याचा बदलाच जणू ते घेत आहेत." परंतु लोकांच्या विकृत वागण्याकडे लक्ष्य न देता, तिने तिच्या कामावर लक्ष्य केंद्रित केले. या महाराष्ट्रद्वेशी लोकांशी स्पर्धा करत संशोधन करणे अवघड होते. परंतु शेतकरी कुटुंबातील मराठी मातीचे संस्कार व कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची शिवजन्मभूमीची वृत्ती तिच्या रक्तात असल्याने तिने आपल्या कामातून सर्वांना उत्तर दिले. अडचणीत संघर्ष करण्याची चिकाटी जन्मतःच मुलींमध्ये असते हे तिने दाखवून दिले. "द्वेष करणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या लोकांचा निव्वळ द्वेष करण्यात किंवा त्यांना समोरासमोर प्रत्युत्तर देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी माझे संशोधनातील ज्ञान वाढवत गेले. यातून कामाचा अनुभव देखील वाढत गेला. प्रामाणिकपणे व पूर्ण निष्ठेने काम करून मी माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि एकदा का एखाद्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण झाली व आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केले की मग नवनिर्मितीचे बळ आपणास नक्की मिळते. यातून अशा लोकांचा द्वेष हळूहळू कमी होतो." हा मौलिक विचार ती आजच्या तरुणांना आपल्या विचारांतून व्यक्त करते.
संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना, लोकांना 'पेटंट' हा शब्द नवीन नसेल, परंतु सुप्रिया ज्या कुटुंबातून, सामाजिक व्यवस्थेतून आलेली आहे, त्यांच्यासाठी ही बाब पूर्णतः नवीन आहे. त्यांना हे सगळं पटवून देणं तिच्यासाठी आव्हानात्मक होतं. परंतु या मातीतल्या लोकांना तिच्या संशोधनाचं महत्त्व समजणं हे संशोधनाचं सार्थक झाल्यासारखं आहे असे तिला वाटते.
सुप्रिया मराठी माध्यमातून शिकलेली असली, तरी आज तिने केलेले संशोधन मराठीतून मांडताना तिला कसरत करावी लागत आहे. सन 1930 च्या सुमारास रॉबर्ट पॉल शेरर यांनी लिक्वीड कॅप्सुल बनवण्याच्या मशिनचा शोध लावला. या मशीनचा वापर करून सॉफ्ट जिलेटीन कॅप्सुलमध्ये 2 रिबनचा वापर करून एक द्रव भरला जातो. या लिक्वीड कॅप्सुल तात्काळ परिणाम करणाऱ्या असल्याने औषधनिर्माण क्षेत्रात हा आविष्कार महत्त्वपूर्ण आहे. दोन द्रव पदार्थ एका कॅप्सुलमध्ये टाकल्याने त्यांच्यात अंतर्गत अभिक्रिया होत असल्याने वेगळेच द्रावण तयार होते. परिणामी कॅप्सुलमध्ये दोन द्रव एकत्र करणे धोकादायक होते. परंतु सुप्रियाच्या संशोधनाने यात अमुलाग्र क्रांती घडवून आणत फार्मा क्षेत्रात एक पुढचे पाऊल टाकले आहे. एका सॉफ्ट जिलेटीन कॅप्सुलमध्ये 3 रिबनचा वापर करून 2 द्रव पदार्थ एकाच कॅप्सुलमध्ये भरण्याची किमया सुमारे 100 वर्षांनंतर सूप्रियाने करून दाखवली आहे.
सुप्रियाच्या संशोधनाने फार्मा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. दोन कॅप्सुलचे काम एकच कॅप्सुल करणार असल्याने उत्पादनाचा, वाहतुकीचा प्रचंड खर्च वाचणार आहे. यामुळे बाजारात रुग्णांना स्वस्त दरात कॅप्सुल उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत सर्वसामान्य लोकांना या संशोधनाचा लाभ होईल असा आशावाद ती व्यक्त करते.
संपूर्ण देशातून APPARATUS AND PROCESS FOR ENCAPSULATING CAPSULES OR TWO DOSAGES FILL WITHIN ONE CAPSULE CONTAINING THREE RIBBONS या संशोधनाच्या माध्यमातून तिने उत्तमापुरचे नाव जगाच्या पटलावर चमकवले आहे. त्यामुळे तिला या संशोधनाचे पेटंट देऊन भारत सरकारने तिचा यथोचित सन्मान केलेला आहे. अशा या गगनभेदी कामगिरी बद्दल सुप्रिया आत्माराम अहिनवे हीचे अभिनंदन करताना व तिचा शास्त्रज्ञ म्हणून या मातीत उल्लेख करताना श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथील संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अत्यंत आनंद होत आहे.
शेवटी तिच्या या कर्तुत्वाकडे पाहून हफ़ीज़ बनारसी यांच्या पुढील पंक्ती आठवतात,
जितने ऊंचे ख़याल होते हैं
उतनी ऊंची उड़ान होती है
0 comments :
Post a Comment