...जेव्हा बेल्जियमच्या राणीनं जिव्या सोमा मशे यांना 17 लाखांचं बक्षिस दिलं होतं!
प्रशांत ननावरे
वारली चित्रशैलीला आधुनिक कलेत मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या जिव्या सोमा मशे यांचं मंगळवारी पहाटे वयाच्या 84 व्या निधन झालं. आणि वारली चित्रकलेला मानाचं स्थान मिळवून देणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याची हळहळ अनेकांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या गंजाड या गावातून भास्कर कुलकर्णी या अवलियानं जिव्या मशे हा हिरा शोधला आणि दुर्गम पाड्यांच्या भिंतीवर खितपत पडलेल्या वारली चित्रशैलीला जगाचा कॅनव्हास उपलब्ध करून दिला.
सुवासिनींनीच वारली चित्र काढण्याच्या आदिवासी प्रथेला जिव्या मशे यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच छेद देत अखेरच्या श्वासापर्यंत वारली चित्रकलेच्या दुनियेत मनसोक्त मुशाफिरी केली.
मांजरपाटाच्या कापडावर शेणाचा लेप दिलेल्या कॅनव्हासवर लंगोटी घातलेले मशे तांदळाच्या पिठात बुडवलेला बाभळीचा टोकदार काटा किंवा बांबूची तासलेली काडी डाव्या हातात धरून चित्र काढताना तल्लीन होऊन जात असत.
आदिवासींच्या आयुष्यातले विविध प्रसंग आणि निसर्गाला कॅनव्हासवर उतरवताना त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात मोठ्या खुबीनं बसवलं.
एवढंच नव्हे तर पारंपरिक वारली चित्र संस्कृतीला नाविन्याची जोड दिली. म्हणूनच की काय वारली चित्र आज शहरांतल्या दिवाणखान्यात आणि उंची हॉटेलांच्या लॉबीमध्ये मोठ्या दिमाखात स्थिरावलेली दिसतात.
1973 साली भास्कर कुळकर्णी पहिल्यांदा गंजाडला गेले. तेव्हा मशे एका शेतात मजुरी करायचे. वेठबिगारीच होती ती. पैसे मिळाले तर मिळायचे नाहीतर उपाशीच राहायला लागायचं.
घरची परिस्थिती खूप वाईट होती. पण मशेंच्या हातात जादू होती. आदिवासींच्या लग्नात चित्र काढण्यासाठी मशेंना आवर्जून बोलावणं यायचं.
चित्र काढण्याचं काम वेळखाऊ होतं पण त्याला फुटकी दमडीसुध्दा मिळत नसे. भास्कर यांनी हे सगळं पाहिलं आणि मशेंच्या हातात शहरातून आणलेला डांबरी ब्राऊन पेपरचा रोल, रंग आणि ब्रश दिला. मशेंना सांगितलं, आता तू भिंतींवर चित्र काढू नकोस, याच्यावर काढ.
इंदिरा गांधी यांनी देशभरातल्या पारंपरिक कलांचा शोध घेण्यासाठी 1975 मध्ये एक विशेष मोहीम राबवली. आदिवासींची कला जगासमोर यावी आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा त्याचा उद्देश होता.
भास्कर कुलकर्णी हे देखील या मोहिमेचा भाग होते. दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरलेल्या प्रदर्शनासाठी कुळकर्णी मशेंना घेऊन गेले. तिथं मशेंनी काढलेल्या वारली चित्रांचं खूप कौतुक झालं आणि ही कला लोकप्रिय व्हायला सुरूवात झाली.
मातीच्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगानं काढलेल्या चित्रांमधून आदिवासींचे जीवन प्रतिबिंबित होत असते. पाहताना उभ्या, आडव्या रेषा, त्रिकोण, चौकोन आणि लहान मोठे ठिपके जोडलेले दिसत असलं तरी चित्र पूर्ण झाल्यावर त्याला मूर्त रूप प्राप्त होत असतं.
रंगांची उधळण, प्रकाशाचा खेळ यामध्ये नसला तरी विचार करून प्रसंगांचं चित्रण करणं आव्हानात्मक काम असतं. मशे यांचा त्यामध्ये हातखंडा होता. म्हणूनच दिल्लीवारीनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या राज्यांमधून म्हशेंना बोलावणं येऊ लागलं. मुंबईतल्या प्रथितयश अशा जहांगीर कला दालनात 1975 साली त्यांच्या वारली चित्रांचं प्रदर्शन भरलं.
वारली कला बायकांची असली तरी मशे यांचं पाहून आणि भास्कर यांच्या सांगण्यावरून अनेक आदिवासी पुरुषमंडळींनीही चित्रं काढायला सुरुवात केली.
म्हशेंनी आपल्या परिसरातल्या शेकडो अदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं. पण अजूनही सणा-समारंभाला पुरुष मंडळी चित्र काढायला गेली की परंपरा म्हणून बायकाच चार बोटं रंगात बुडवून भिंतीवर उमटवतात आणि मग पुरुष मंडळी चित्र रंगवायला सुरूवात करतात.
वारली कलेचा प्रसार व्हावा म्हणून राज्य शासनाच्या वतीनं मशेंनी ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांद्वारे अनेक होतकरू चित्रकारांना त्यांनी वारली चित्रकलेचे धडे दिले.
तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच, लग्नाचा मांडव, लग्नाचा चौक, निसर्गचित्र, प्राणी, कल्पित प्रसंगांच्या कलाविष्कारानं मशेंनी वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचवली.
देशपातळीवर नावाजलेल्या या कलाकराला नंतर परदेशातूनही आमंत्रणं येऊ लागली. अमेरिका, इंग्लंड, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, जपान आणि चीन आदी अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं पार पडली.
1976 साली भारत सरकारनं राष्ट्रपती पुरस्कार देऊन मशेंचा गौरव केला. 2002 साली वस्त्र मंत्रालयातर्फे 'शिल्प गुरू' हा सन्मान प्रदान करण्यात आला.
2011 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बेल्जियमच्या राणीनं मशे यांना 17 लाख रुपयांची बक्षिसीही दिली होती, तर जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेही मशेंचा गौरव करण्यात आला होता.
सदाशिव आणि बाळू ही मशेंची दोन मुलंही वारली कलेत पारंगत असून त्यापैकी सदाशिव हे वर्षातले तीन महिने जपानच्या म्युझियममध्ये कार्यरत असतात.
1976 साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली यांनी मशे यांना साडेतीन एकर जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. मात्र जवळपास 34 वर्षे जमिनीसाठी सरकार दरबारी हेलपाटे घातल्यानंतर 2011 साली राहुल गांधी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना जमिनीची कागदपत्रं सुपूर्द करण्यात आली.
अत्यंत साधेपणानं आणि आनंदी वृत्तीनं आयुष्य जगणाऱ्या आदिवासींची कलाही तितकीच साधी आणि आनंद देणारी आहे. वारली चित्रकलेच्या सुसंगत मांडणीतून कलासक्त समाजाचं हे चित्ररुपच समोर येतं. निसर्ग आणि मानवी जीवन प्रतिबिंबित करणारी हिच वारली चित्रकला जिव्या सोमा मशेंमुळे खर्या अर्थानं लोकाभिमुख झाली.
0 comments :
Post a Comment