माझ्या आयुष्यातील एक झुंजार पण तितकाच अबोल समाजसैनिक म्हणजे सतिश लेंभे आणि त्याचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे असे मला वाटते....
सतिशला एस एम सुपे मेमोरियलकडून दिनांक 5/05/2024 रोजी विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री श्री.मधुकरराव पिचड साहेब, विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ साहेब व मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. सतिश स्टेजवर सन्मान घेत असताना माझी त्याच्याशी भेट कशी झाली व त्यानंतरचा आमचा सौख्याचा प्रवास कसा होता या आठवणी डेहणेचा परिसर, तेथील निसर्ग डोळ्याखालून घालत असताना जाग्या झाल्या. त्या जशाच्या तशा मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
सतिश लेंभे आणि माझी भेट दिल्लीमध्ये 2016 साली राष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यासाठी गेलो असताना जुन्या महाराष्ट्र सदनात झाली. त्यानंतर आदिवासी संस्कृती संवर्धन कार्यक्रमात हा अबोल पण तितकाच हसरा चेहरा वारंवार भेटत गेला आणि यातून ओळख वाढत गेली. याच ओळखीचे रुपांतर कधी मैत्रीत झाले समजलेच नाही. आमची आवड, छंद, कार्यकक्षा असं काहीच एक सारखं नाही. परंतु आमचा जन्म ज्या मातीत आणि संस्कृतीत झाला, ती एकच आहे आणि सुदैवाने दोघांनाही थोडी फार जाण आहे कि आपण आपल्या समाजासाठी थोडा वेळ देऊन काम केले पाहिजे. याच जाणीवेतून आमच्यात विविध सामाजिक विषयांवर चर्चा होऊ लागल्या. आमच्यात होणारी चर्चा वरवर असली तरी आमच्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत याची जाणीव करून देणारी असायची. दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनात आमची भेट होत आलेली आहे व त्याच भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले हे मात्र नक्की.
खरं तर सतिश लेंभे हा नक्की कोणत्या गावचा आणि तो कोणत्या क्षेत्रात किंवा खात्यात काम करतोय याची देखील मला काहीच माहिती नव्हती. सोशल मीडियात देखील तो फार सक्रीय नसल्याने त्याबाबत माहिती मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. माझ्याविषयी कदाचित त्याला बरंच काही माहिती असेल, कारण मी अनेकदा ब्लॉगवर व्यक्त होत आलोय. आमच्यात अजून एका बाबतीत साम्य आहे आणि ते म्हणजे आम्हा दोघांना स्टेजवर जाऊन भाषण करायला आवडत नाही. यामुळेच कि काय आमची नाळ काहीसी घट्ट जुळली असावी.
आज त्याच्यावर सामाजिक भावनेतून दोन शब्द लिहीत असताना त्याचे गाव आंबेगाव तालुक्यातील माळीण हे असल्याचे समजले. माळीनचा हुंदका आजही आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. ते सर्व दु:ख पचवून तो सामाजिक कार्यात अग्रेसर आहे हेच मुळात खूप प्रेरणादायी आहे.
एक दिवस सकाळी सहा वाजता फोन वाजला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण इतक्या सकाळी सहसा कोणी फोन करत नाही. मी थोडेसे दचकुनच फोन हातात घेतला आणि स्क्रीनवर सतिशचे नाव दिसले. पटकन फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली. क्षणाचाही विलंब न लावता सतिश धनगर आरक्षण केसबाबत माहिती देऊ लागला. धनगर आरक्षण केस निर्णायक टप्प्यावर आलेली असल्याची त्याने माहिती दिली. वास्तविक माझा यापूर्वी कोणत्याही सामाजिक केसशी जवळचा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे सतिश जे काही सांगत होता, ते समजून घेणे थोडेसे जड जात होते. धनगर आरक्षण केसबाबत मला वास्तविक फार काही माहीत नव्हते. सतिशने केसबाबत माहिती दिल्यानंतर माझ्यावर कागदपत्र शोधण्याची जबाबदारी दिली.
गेल्या दहा वर्षात धनगर आरक्षण विरोधी जे काही मोर्चे झाले, त्यात जरी मी सहभागी असलो, तरी धनगर आणि आदिवासी यातील फरक मी कागदोपत्री पुरावे पडताळून समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता. डॉ.संजय दाभाडे हे सोशल मीडियात जे काही थोडक्यात मांडत असत, तेच माझ्या वाचनात आलेले होते. धनगर आरक्षण बाबत सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु होणार असल्याने राजकीय पातळीवर देखील याबाबत वातावरण तापायला सुरुवात झाली होती. धनगर समाजाचे नेते अतिशय ताकदीने त्यांची भूमिका मांडत होते. परंतु आदिवासी समाजाच्या नेत्यांकडून त्या ताकदीचा प्रयत्न होत नसल्याचे मी अनेकदा पाहिले होते. याच जाणीवेतून मी एक लेख लिहून यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या लेखचा आधार घेऊन सतिशने मला फोन केलेला असावा याची जाणीव मला झाली. सतिशने मला आपणास धांगड जमातीबाबत पुरावे आवश्यक आहेत याबाबत माहिती देऊन जमेल ती मदत करा अशी विनंती केली. तसेच त्याने बोलता बोलता याचीही कल्पना दिली कि सरकारी वकील व एकूणच सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकारच्या वकिलाकडून आपली बाजू मांडली जाईलच याची शाश्वती नाही. तेव्हा जे काही करायचे आहे, ते आपणासच करायचे आहे. सतिशचे बोलणे संपल्यावर माझ्या डोक्यात विचार चक्र सुरु झाले आणि माझ्या लक्षात आले कि आज पर्यंत आपण जि काही मांडणी करत आलोय, ती चुकीची आहे असेही नाही, परंतु ती पुरेशी नाही. म्हणून मग माझा लेख पुन्हा पुन्हा वाचून त्यातील उणीवा समजून घेतल्या. त्यांनतर सतिश बरोबर या अनुषंगाने चर्चा होऊ लागली.
जेव्हा मी धनगर जातीच्या पलीकडे जाऊन धांगड या आदिवासी जमातीचा अभ्यास सुरु केला, तेव्हा सतिश आणि त्यांची टीम करत असलेल्या कामाची व्याप्ती व महत्त्व समजले. या अत्यंत महत्त्वाच्या कामात सतिश पूर्णपणे झोकून काम करत होता, परंतु याबाबत तो कुठेही जाहीरपणे भाष्य करत नव्हता. खरं तर याचे मला जास्त आश्चर्य वाटत होते, कि सतिश हे सर्व मांडण्यासाठी समाजासमोर का येत नाही. हीच भावना कदाचित इतरांचीही असेल.
‘मूर्ती लहान पण मिर्ती महान’ असं असणारं हे व्यक्तिमत्त्व आदिवासी समाज कृती समितीच्या सचिव पदावर सन २०१३ ते २०१९ पर्यंत कार्यरत होते. या पदावर असताना विविध सामाजिक प्रश्नांवर न्यायालयीन लढाया लढण्यात वेळ देण्याचे काम केले. हे सर्व करत असताना अनेक केसेस झाल्या, काहींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, जात पडताळणी व नोकरीची चौकशी लावली, आजही ती सुरु आहे. बोगसांच्या विरोधातील त्याची लढाई तर अजबच आहे. हे सर्व होऊनही सतिश कुठेही डगमगला नाही किंवा आपली लढाई त्यांने थांबवली नाही. तो लढत आहे समाजाचा सर्व भार आपल्या खांद्यावर घेऊन.
खरं तर मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली सर्वोच्च न्यायालय हे शब्द जरी सामान्य आदिवासी माणसाने ऐकले तरी घाम फुटतो. या दोन्ही ठिकाणी आपल्या परिवाराची पुरेशी काळजी घेत सतिश वारंवार न्यायालयीन लढायांसाठी भेट देत असतो हे जेव्हा मला समजले, तेव्हा खरं तर हे अजब रसायन असल्याची मला खात्री पटली. याच्या माध्यमातून आज पर्यंत सन २०१२ ते २०२४ या कालावधीत उच्च न्यायालयात १३ तर सर्वोच्च न्यायालयात ३ केसेस लढल्या गेलेल्या असून त्यापैकी सर्वोच्च न्यायालयातील २ व उच्च न्यायालयातील ४ केसेसचा निकाल आदिवासी समाजाच्या बाजूने लागलेला आहे. हे सर्व करूनही तो जाहीरपणे हे कुठे मांडत नाही. या लढाईचे सर्व श्रेय तो सामाजिक संघटना व समाजाला देतोय हि त्याची उदारता फार कमी लोकांत दिसून येते.
कोणतीही केस म्हटली कि आपणास पैशाचा प्रश्न भेडसावतो. पण मला वाटते कि फक्त पैशाने केसेस जिंकल्या जात नाहीत, त्यासाठी अभ्यास, चिकाटी, सामाजिक भावना, त्याग, नम्रता, प्रामाणीकपणा, निष्ठा अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात आणि या सर्व गोष्टी सतिशमध्ये आहेत. म्हणून समाजाचे न्यायालयीन लढायांत नेतृत्व करत असताना समाजाने देखील त्यांना यथायोग्य साथ दिलेली आहे. धनगर आरक्षण केसबाबत उभा करावा लागणारा निधी कमी नव्हता. वकिलांची फी लाखांत होती. पण सतिश आणि त्याच्या टीमने सोशल मीडियात याचा बाजार मांडून कधीही पैसे गोळा केले नाहीत. धनगर आरक्षणाची भीती दाखवून समाजाच्या भावानिकतेचा वापर करून त्यांना खरं तर कोट्यावधी रुपये गोळा करून आपले खिसे भरता आले असते. पण त्यांनी असे केले नाही, त्यांनी निधीसाठी समाजाच्या जीवावर मोठे झालेल्या लोकांकडे मदत मागितली. समाजाला यात गृहीत धरले नाही किंवा समाजाकडून तशी अपेक्षा देखील केली नाही.
धनगर आरक्षण केसची सुनावणी सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर सतिश आणि मी सतत धांगड आणि धनगर यामधील फरक स्पष्ट करणारे पुरावे याबाबत चर्चा करत होतो. सुदैवाने मला सोशल मिडीयाचा अत्यंत चांगला वापर करून हजारो महत्त्वपूर्ण कागदपत्रे शोधता आली. मी रोज सतीशला काहीना ना काही तरी शोधून देत होतो. फक्त कागदच शोधून आम्ही थांबत नव्हतो, तर त्या कागदांचा योग्य तो अन्वयार्थ देखील लावण्याचा प्रयत्न करत होतो. हे सर्व सुरु असताना मध्येच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला दिले जाणारे आश्वासन ऐकून आम्ही थोडे भयभीत होत होतो. पण सतिश नेहमीच सकारात्मक असायचा.
सतिश धनगर आरक्षण केसबाबत कागदपत्र जमा करत असताना सरकारच्या विविध विभागांशी माहिती मिळविण्यासाठी देखील संघर्ष करत होता. त्यातून त्यांना उपलब्ध झालेले पुरावे, अहवाल, कागदपत्र तो अभ्यासासाठी मलाही उपलब्ध करून देत होता. या सर्व कागदपत्रांचा वापर करून आम्ही ताकदीने धांगड आणि धनगर हे भिन्न असल्याचे मत मांडू शकलो हि खरं तर माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
आरक्षणाची सुनावणी प्रत्यक्ष कोर्टात सुरु झाली तेव्हा खरं तर सर्वांच्या मनात सरकारच्या भूमिकेबद्दल शंका होती. त्यामुळे धनगर आरक्षणाचा निकाल आपल्या विरोधात लागू शकतो याची धास्ती होती. हजारो कागदपत्रे असूनही अशी भीती मनात निर्माण होण्यास सत्ताधारी सरकारची धोरणे व भूमिका कारणीभूत होती.
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी पुणे येथून प्रवास करून उपस्थित राहण्याचे काम सतिश अगदी नित्य नियमाने करत होता. कोर्टात प्रत्यक्ष काय घडले याबाबत मला माहिती देत होता. आपले वकील व विरोधी पार्टीचे वकील यांचे युक्तिवाद व प्रतिवाद मला समजून सांगून अजून आपण काय शोधणे गरजेचे आहे याबाबत दिशा दाखवत होता. त्याने दाखविलेल्या दिशेनुसार मी माझ्या परीने जास्तीत जास्त स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील कागदपत्रे शोधत होतो. एक दिवस सुनावणीला जात असताना सतिशने मी त्याला पाठविलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्सचा फोटो पाठवला. सदर फोटोत कागदपत्रांचा लागलेला ढीग पाहून मला खरं तर त्यावर विश्वासच बसला नाही. एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला हवे ते काम करून घेण्याचे कसब या व्यक्तीत आहे हे मला यावरून जाणवले. कारण त्याने मला दिशा दिली नसती, तर कदाचित मी या केसपासून आणि या संशोधनापासून फार दूर असतो.
सलग सुनावणी होत असताना सतिशची इच्छा होती कि मी पण एखाद्या दिवशी सुनावणीला यावे व प्रत्यक्षात काम कसे चालते हे पहावे. त्याच्या इच्छेनुसार मी एका सुनावणीला हजर राहिलो. सुनावणी फार वेळ चालली नाही. धनगर समाजाची बाजू मांडणारे वकील बोलायला लागले आणि न्यायाधीशांनी वारंवार तेचतेच मुद्दे फिरवून फिरवून मांडत असल्याचा निष्कर्ष नोंदवला आणि केस अंतिम निकालाच्या वाचनासाठी बंद केली. शेवटी सुनावणीच्या दिवशी प्रचंड मोठ्या संख्येने दोन्ही बाजूकडील लोकं कोर्टात हजर होती. आज पर्यंत एकाही सुनावणीला हजर नसलेले निकालाचे वाचन होणार असल्याने उत्सुकतेने हजर होते. शेवटी वेळेत निकालाचे वाचन सुरु झाले. अर्धा निकाल वाचून झाला, तरी नक्की काय निकाल लागेल हे कोणालाही अंदाजे सांगता येत नव्हते. सतिशला मी मेसेजकरून अपडेट विचारत होतो. तो अजून वाचन सुरु आहे असेच सांगत होता. दुपारनंतर धनगर समाज बांधवांकडून धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा अशा आशयाच्या पोष्ट टाकायला सुरुवात देखील केली होती. त्या पोष्ट वाचून मनात काहूर माजले होते, पण सतिश मात्र मेसेज करून सांगत होता, अजून थोडं थांबा. शेवटी धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका फेटाळत असल्याचे मत न्यायाधीशांनी मांडले. ते ऐकताच पहिल्यांदाच कोर्टात आलेले मान्यवर एकदम जल्लोष करायला लागले. कोर्टातला निकाल आपल्या बाजूने लागला हे समजताच जवळपास परिसरात कार्यरत असणारे असंख्य समाज बांधव तिथे जमा झाले. सोशल मीडियात मोठमोठ्या पोष्ट येऊ लागल्या. जो तो आपण कसे प्रयत्न केले याचा हिशोब मांडत होता. काहींनी तर नृत्य देखील केल्याचे व्हिडीओ पहायला मिळाले. हे सर्व होत असताना सतिश मात्र त्या गर्दीत कुठेही दिसत नव्हता. तो हा आनंद साजरा करायचा सोडून वकिलांशी पुढील कार्यपद्धती बाबत चर्चा करत होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तर आपण कसे लढले पाहिजे याची पायाभरणी करण्यासाठी त्याने सुरुवात केली होती. शेवटी सर्वांनी आनंद साजरा करणे नैसर्गिक होते, कारण हि सामाजिक लढाई अनेक वर्षांपासून सुरु होती. हा संघर्ष खूप मोठा असल्याने त्याचा जल्लोष तसाच होणे साहजिक होते. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काहींना या केसचा विसर देखील पडला. परंतु दिवस सतिशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्याची माहिती दिली आणि आपण लढाईसाठी सज्ज होण्याची पुसटशी कल्पना दिली. त्यानंतर सतीशचा आणि माझा काही फोन झाला नाही. एक दिवस अचानक दुपारी त्याने फोन केला व अभिनंदन म्हणून माझे कौतुक केले. काहीही न बोलता अभिनंदन म्हटल्यावर मी काहीसा गोंधळात पडलो. मला काय विचारावे ते समजेना. कारण कोणी माझे अभिनंदन करावे असे मी काही काम केलेले नव्हते याची मला खात्री होती. उत्सुकता अधिक न वाढवता त्याने सुप्रीम कोर्टाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली असल्याची माहिती दिली. त्यानंतर खूप उशिराने सोशल मीडियात आम्ही पोष्ट टाकली आणि त्याच अनुषंगाने काही बातम्या देखील आल्या.
हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे सतिशने केलेला हा संघर्ष त्याच्या स्वत:साठी कुठेही नव्हता. सदर लढाई हि आदिवासींना न्याय मिळवून देणारी होती. परंतु हे सर्व करत असताना त्याला जो काही मनस्ताप झाला किंवा आजही होत आहे, त्याबाबत त्याने कुठेही कुणाला सांगितले नाही. आदिवासी समाजाच्या लढाया लढण्यासाठी असे अनेक सतिश तयार झाले पाहिजेत व त्यांच्यासमोर या सतिश लेंभेचा आदर्श उभा राहिला पाहिजे, त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून मी हे शब्दबद्ध करत आहे. ज्याला खरे सामाजिक काम करायचे आहे, तो कधीही प्रसिद्धीच्या मागे धावत नाही, तो कधीही समाजाला गृहीत धरत नाही, तो कधीही समाजाला फसवत नाही, तो कधीही संकटांना घाबरत नाही हे सतिशच्या धनगर आरक्षण केसच्या लढाईतून दिसून आले. त्याने त्याच्या कार्यातून आदिवासी समाज कृती समिती, पुणे यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
असो सतिशच्या याच पडद्यामागील कामाची दखल घेऊन मुंबईतील आदिवासी समाज बांधवांनी त्याला संघर्षयोद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता त्याला सुपे मेमोरियल फाउंडेशन, पुणे यांच्याकडून सन्मानित केले गेले याचा मला आनंद व अभिमान आहे. मी आयुष्यात काय कमावले असे जर मला कोणी विचारले, तर मी आवर्जून उत्तर देईल कि मी सतिश लेंभे सारखा सच्चा मित्र कमावला आहे.
- राजू ठोकळ ! Aboriginal Voices
अभिनंदन
ReplyDelete