'सिनगी दई' हे नाव आहे जे ऐकताच आपल्याला आनंद होतो. आपल्याला अभिमान वाटतो. आपल्या हृदयात आणि मनात एक प्रेरणा जागृत होते. 'सिनगी दई' कशी होती? तिचे व्यक्तिमत्व कसे असेल? तिने आपल्या मेहनतीतून नेतृत्व कसे उभे केले असेल? आपल्या राज्यात सैन्य नाही हे तिला माहीत असताना, एकही माणूस नाही याची जाणीव असताना तिने आपल्या चातुर्याने शत्रूचा केलेला सामना आपल्यात आजच्या युगातील आव्हाने, समस्या यांना सामोरे जाण्याची प्रेरणा निर्माण करतो. अतिशय कर्तबगार, शूर योद्धा, हुशार, चतुरस्त्र आणि इतर अनेक गुणांनी संपन्न अशी ही ओरांव स्त्री आपल्यासाठी क्रांतीचा प्रेरणास्रोत आहे.
कदाचित आपण रोहतासगडचा इतिहास ऐकला किंवा वाचला असेल. रोहतासगडच्या राजाचे नाव रुईदास होते. त्यांची एकुलती एक मुलगी राजकुमारी "सिनगी दई" होती.
राजा रुईदासचा रोहतासगड कसा होता? त्याचा कारभार कसा होता? त्यांचे जीवन, रोहतासगडमधील लोक, राज्याचे क्षेत्रफळ, त्यांची समृद्धी, लोकांची जीवनशैली इत्यादींची संपूर्ण माहिती ओराव कुरुख लोकगीतांमधून मिळते. त्यांचा इतिहास ओरांव कुरुख लोकसाहित्य, लोककथा, लोककला, लोकजीवन आणि अनेक माध्यमांतून आजही आजही आपणास शिकायला मिळतो.
सिनगी दई लहानपणापासूनच अतिशय चंचल व निडर होती. ती ताकदवानही होती. ती जेवढी शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, तेवढीच ती हुशारही होती. ती तिचे वडील रुईदास यांना प्रशासकीय कामात मदत करत असे. वडील तिच्याशी अनेक बाबींवर सल्लामसलत करत असत, जे बाप-लेकीशिवाय कोणालाच माहीत नव्हते. अनेक वेळा राणी (सिनगीची आई) राजाला म्हणायची, “मुलीचं खेळण्याचे वय आहे, तिला दरबाराच्या कामात अडकवू नका. यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबेल." यावर राजा उत्तर द्यायचा, "तुला माझ्या मुलीच्या सर्वगुण संपन्नतेची कल्पना नाही. माझी मुलगी काय करू शकते हे मला माहीत आहे." अशा प्रकारे वडिलांना आपल्या मुलीवर म्हणजेच राजकुमारी सिनगी दईवर पूर्ण विश्वास होता.
सिनगी घोडेस्वारीतही तरबेज होती. घोडेस्वारीसोबत तलवारबाजी व इतर युद्ध कौशल्यांची तिला चांगली जाणीव होती. विविध युद्ध कौशल्य शिकण्यात तिला नेहमी आवडत असे. सेनापतीची मुलगी कायली ही तिची चांगली मैत्रीण होती. दोघी मैत्रिणी लांब घोडेस्वारीला जात असत. घोडेस्वारीला जाताना त्या दोघी सामान्य पुरुषांसारखेच कपडे घालत असत. त्यामुळे त्यांना कोणीही ओळखू शकत नसत. घोडेस्वारीमुळे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाची, त्यांच्या गरजा आणि आपल्या राज्याची माहिती मिळाली. शत्रूने आपल्या राज्यात कोठूनही घुसखोरी करू नये, शत्रूने कोठेही हल्ला करू नये यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी तिला अगदी कमी वयात घेता येऊ लागली. खेळण्या बागडण्याच्या वयात तीला अनेक गोष्टींची माहिती मूकपणे घेता आली. अशा प्रकारे घोडेस्वारीच्या आनंदाबरोबरच राज्याच्या हिताचे महत्त्वाचे कामही करण्याची तिला संधी मिळाली.
एकंदरीत सिनगी सर्व गुणांनी परिपूर्ण होती. चेरो, खेरवार आणि इतर शेजारच्या राजांनी रोहतासगडवर हल्ला केला, तेव्हा तिच्या या सर्वगुण संपन्नतेचा फायदा झाला. शेजारच्या अनेक राजांनी रोहतासगडवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केला, पण ते रोहतासगडच्या लष्करी क्षमतेपुढे टिकाव धरू शकले नाहीत. अशा स्थितीत शेजारच्या सर्व राजांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की, आपण एकत्र येऊनच रोहतासगडचा पराभव करू शकतो. एकट्याने लढणे हे आपल्या सर्वांसाठीच पराभवाचे कारण आहे. अशा रीतीने सर्वांनी मिळून तयारी करून रोहतासगडवर हल्ला केला, पण रोहतासगडचे साम्राज्य खूप मजबूत आणि शक्तिशाली होते. रोहतासगडच्या ताफ्यातील लढाई आदिवासींच्या सैन्यापुढे शत्रू राष्ट्रांचा टिकाव लागला नाही. शेजारच्या राजांची चांगली तयारी असूनही त्यांना रोहतासगड जिंकता आला नाही. अनेकवेळा चढाई करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याचे कारण म्हणजे सिनगी जेव्हा जेव्हा पुरुषाचा वेष परिधान करून आपल्यात राज्यात घोड्यावरून फिरत असे, तेव्हा तेव्हा ती आपल्या राज्य कारभारातील उणीवा समजून घेऊन त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्याची आपल्या वडिलांना सूचना देत असे. यामुळे राज्याचा राज्यकारभार अधिक सक्षम होण्यास मदत झाली होती. सिनगीने लोकांच्या भावनांचा व गरजांचा जवळून अभ्यास केलेला असल्याने, लोक कल्याणाच्या योजना राबविण्याची सूचनाही ती वडिलांना वेळोवेळी देत असे. यातून एकंदरीत जनतेच्या हिताची कामे झाल्याने, युद्ध काळात जनता आपल्या राजाच्या सोबत उभी राहत असे. परिणामी जनतेचा मिळालेला पाठिंबा व राजाच्या सैन्याची ताकद त्यांना विजय मिळवून देत होती. कोणीही फितुरी करत नसल्याने परकीय शत्रूंना जोरदार आक्रमणानंतरही पराभवाचा सामना करावा लागत होता.
अशीच बरीच वर्षे गेली. शेजारचे राजे रोहतासगडवर विजय मिळविण्यासाठी कूटनीती आखत राहिले, पण त्यांनाही हरण्याची भीती वाटत असल्याने पुन्हा हल्ल्याची हिम्मत करत नव्हते. सर्व राजे एकत्र येऊन चर्चा करत असताना त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. रोहतासगडमधील एक दूधवाली शेजारच्या राज्यात दूध पोहोचवण्यासाठी जात असे. ती रोहतासगडची रहिवासी असल्याने तिला त्या राज्यातील प्रत्येक घडामोडी माहीत होत्या. तीला प्रत्येक सण, विधी, व्यवस्थापनाच्या तरतुदी इत्यादी माहीत होत्या. नेहमीप्रमाणे शेजारच्या राज्यात ती दूध देण्यासाठी गेली असताना, तिने बोलताना तिने मला सांगितले की, "ओरांन समाजात दरवर्षी “विशू सेंदरा” चे आयोजन केले जाते. सेंदराचा हा उत्सव वैशाख महिन्यात होतो आणि या कार्यक्रमात सर्व पुरुषांनी सहभागी होणे बंधनकारक असते. अशा प्रकारे प्रत्येक गावात, घरात आणि संपूर्ण राज्यात फक्त महिला असतात. ही बातमी इतर राज्यांतील हेरांपर्यंत पोहोचली. शेजारच्या सर्व राजांनी एकत्र येऊन हल्ल्याची एक योजना बनवली. या सर्वांनी मिळून ठरवले की या ठराविक वेळी रोहतासगडवर हल्ला चढवला तर यश नक्की मिळेल याची त्यांना खात्री पटली. आपल्या पुढील योजनेत अधिक बारकावे समजून घेण्यासाठी, त्यांनी त्या दुधवाल्या महिलेला बोलावून तिला आमिष देऊन तिची गुप्तहेर म्हणून नेमणूक केली. तिनेही आनंदाने हे काम मान्य केले आणि कामाला सुरुवात केली. आता ती शेजारच्या राजांना रोहतासगडमधील रोजच्या बातम्या देऊ लागली.
आता गवळीन लुंदरीने येणाऱ्या काळातील विशू सेंदरा या सणाच्या आयोजनाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. ती त्याच राज्यातील व गावातील महिला रहिवासी असल्याने कोणालाही तिच्याविषयी संशय आला नाही. त्या महिलेने पुरेशी माहिती जमा करून शेजारील राज्यांना दिली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार सेंदरा साधारण महिनाभर चालेल आणि या काळात गावातील सर्व पुरुष सेंदरा खेळण्यासाठी गावाबाहेर, राज्याबाहेर पडतील. गावात आणि राज्यात फक्त महिलाच असतील. या काळात हल्ला केला, तर आपला विजय निश्चित आहे या नुसत्या कल्पनेने शेजारचे राजे खूप खुश झाले. ते सर्व एका खास प्रसंगाच्या शोधात होते. तो प्रसंग त्यांना एक संधी घेऊन आला होता. शेजारच्या सर्व राजांनी मिळून आपला कार्यक्रम आखला आणि ठरलेल्या दिवशी हल्ला करण्याचे निश्चित केले.
पाहता पाहता विशू सेंदराची वेळ जवळ आली. दूधवाल्या गवळीनच्या माहितीनुसार शेजारच्या राजांनी तयारी केली होती. वैशाख महिन्यातील एका ठराविक वेळी ओरांव समाजातील पुरुष विशू सेंदरासाठी निघाले. हा सेंदरा महिनाभर चालतो. या सेंदरामध्ये ओरांव समाजाशी संबंधित सर्व गोष्टी, धोरणे, नियम, सण, परंपरा इत्यादींवर चर्चा केली जाते. समाजाशी संबंधित प्रथा व परंपरांचे चिकित्सक निरीक्षण व परीक्षण केले जाते. त्यामध्ये काही पुनर्मांडणी करणे आवश्यक असेल तर ती या काळात केली जाते वेळ आणि काळानुसार सामाजिक नियम आणि धोरणांमध्येही बदल करण्याची गरज वाटत असेल, तर ते बदल सर्वानुमते या उत्सवात केले जातात. आजही ही प्रथा ओरांव समाजात सुरू आहे. अशा रीतीने संपूर्ण ओरांव समाजाचा कारभार एकट्या राजाच्या विचाराने व धोरणात्मक नियमाने नव्हे तर संपूर्ण समाजाच्या संमतीने व सोयीने चालत असे. ओरांव समाजात राजा आणि प्रजा असा भेदभाव नव्हता. स्वामी-नोकर, उच्च-नीच, गरिबी-श्रीमंती यांना स्थान नव्हते. यामुळेच ओरांव राज्य खूप समृद्ध आणि सुखी होते. त्यांची भरभराट आणि आनंद पाहून शेजारच्या राजांना हेवा वाटत होता आणि त्यामुळेच त्यांनी रोहतासगडकडे लोभस नजरेने पाहणे सुरू केले होते आणि काहीही करून आपण या राज्यावर विजय मिळवायचा ही इच्छा त्यांच्यात निर्माण झाली होती.
शेवटी तो सामाजिक उत्सवाचा दिवस उजाडला आणि गावातील सर्व पुरुष आपले घर, गाव, राज्य सोडून दूर जंगलात निघून गेले. पुरुष सेंदरामध्ये गेल्यानंतर आता गावात आणि राज्यात फक्त महिला उरल्या होत्या. शेजारचे राजे याची वाट पाहत होते. त्यांनी रोहतासगडवर मोठ्या आवेशाने आणि उत्साहाने हल्ला केला. सनगी दई नेहमी सावध असायची. राज्यात आपले वडील व पुरुष सैनिक उपस्थित नसताना राज्य कारभाराची धुरा तिने स्वीकारलेली होती. तिने या कालावधीत आपल्या राज्याची सुरक्षा करण्यासाठी महिला तुकडीची नियुक्ती अगोदरच केलेली होती. तिला हल्ल्याची माहिती मिळताच, तिने ताबडतोब महिला सैन्याला हुकूम दिला व शत्रूवर चाल करून जाण्याचे ठरवले. या मोहिमेचे नेतृत्व स्वतः सिनगी दई हिने केले व शत्रूंचा धैर्याने व शौर्याने सामना केला. तिच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व स्त्रीया ह्या पुरुष वेशात लढल्या. शत्रू सैन्याला याची पुसटशी जाणीवही झाली नाही, की आपण स्त्रियांशी लढत आहोत. आपल्या पुरुष सैन्याचा सामना करावा लागेल याची मुळात कल्पनाच त्यांना नव्हती. त्यामुळे सिनगी दईच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या पुरुष वेशातील महिलांना पाहून शेवटी शत्रू पराभूत होऊन पळून गेले. काही दिवसांनी शत्रूंनी पुन्हा रोहतासगडवर हल्ला केला. मात्र यावेळीही त्यांना पुरुषांच्या वेशात लढणाऱ्या महिला दलांशी सामना करावा लागला. अशा प्रकारे या महिला सेनेने शत्रूंचा तीनदा पराभव केला.
वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आता शेजारचे राजे काहीसे रागावले होते. आपल्याला चुकीची माहिती दिली असावी म्हणून त्यांना गवळीन लुंदरीचा प्रचंड राग आला होता. त्यांनी तिला पकडून शिक्षा देण्याचे ठरवले. मग एके दिवशी त्यांनी लुंदरीला पकडले आणि विचारले, "तू म्हणत होतीस की सर्व पुरुष सेंदराच्या उत्सवाला जातात, परंतु पुरुष सैनिक तर लढाईत होते. तू आम्हाला खोटी माहिती दिली. यासाठी तुला शिक्षा का करू नये." हे ऐकून दूधवाली हसली आणि त्यांना फटकारत म्हणाली, "तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही लोक तर महिलांकडून हरलात. तेही एकदा नाही तर तीन वेळा. तुम्ही लोकांनी बुडून मरावे." उपस्थित राजांना दुधवाली लुंदरी काय म्हणत आहे याची उकल होत नव्हती. ते तिला घाबरवत म्हणाले, "तुझ्या खोटे बोलल्याबद्दल तुला शिक्षा केली जाईल याची तुला जाणीव आहे का?" दूधवालीला सत्य माहीत असल्याने ती घाबरली नाही. ती धीटपणे म्हणाली, "जर तुम्ही लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसाल तर आता जाऊन बघा. त्या महिला सैनिकांनी अजून नदी ओलांडली नसावी. नदी ओलांडताना ते हात आणि चेहरा धुवतील. जर ते पुरुष असतील तर ते आपले तोंड एका हाताने धुतील. पण जर त्या स्त्रिया असतील तर त्या दोन्ही हातांनी तोंड धुतील.” हे ऐकून उपस्थित राजांनी आपल्या हेरांना आदेश दिला. दुधवाल्या लूंदरीने सांगितल्याप्रमाणे त्या हेरांनी नदी किनारी जाऊन पुरुष वेशातील सैनिकांचे निरीक्षण केले. लुंदरीने सांगितलेल्या माहितीत सत्यता आहे याची हेरांकडून खात्री पटल्यावर सर्व राजांच्या मुठी आवळल्या गेल्या. त्यांना रागही आला आणि लाजही वाटली. पण आता दूधवालीच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला होता.
आता त्यांनी चौथ्यांदा हल्ला करण्याची तयारी केली आणि सिनगी दईच्या सैन्याला आव्हान दिले.
इतक्या कमी वेळात चौथा हल्ला होईल याची कोणी कल्पना देखील केली नव्हती. त्यामुळे सिनगी दईने राजालाही कळवले नव्हते. आता ते परतीच्या वाटेवर असताना पुन्हा हल्ला झाला होता. बेसावध असणाऱ्या आणि अगोदरच थकलेल्या महिला सैनिकांच्या तुकडीने शत्रूला प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु यावेळी त्यांच्या लढ्याला मर्यादा पडत होत्या. सिनगी दईच्या नेतृत्वाचा कस लागला होता. परंतु अपुऱ्या सैन्याच्या बळावर तिला आपला पराभव स्पष्ट दिसू लागला होता. पण तिने लढाई सोडली नव्हती.
शेजारच्या राजांनी मोठ्या तयारीने चौथा हल्ला केला आहे याची जाणीव तिला व्हायला वेळ लागला नाही. यावेळी सिनगी दईला त्या राजांचा सामना करणे अशक्य वाटू लागले होते. त्यांच्याकडून पकडले जाणे हे आणखी वाईट आहे याची तिला जाणीव होतीच. शत्रू सैन्याने बंदी बनवल्यावर स्त्री असण्याच्या सन्मानाला कसा धक्का पोहचू शकतो याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे राज्यातील तमाम महिलांसह गुप्त मार्गाने पळून जाणे योग्य राहील असे तिला वाटत होते. या विचारातूनच तिने धाडसी निर्णय घेतला व आपले राज्य सोडले. अशा प्रकारे तिला आपले वैभवशाली आणि सुंदर स्थापित राज्य सोडावे लागले. पुरुषांना याची माहिती देण्यासाठी तीने काही महिला सैन्य सेंदरा उत्सवाच्या ठिकाणी पाठवले. आता ते सर्व गुप्त मार्गाने निघाले. सेंदराच्या जंगलात गेलेल्या पुरुषांना निरोप देण्यासाठी गेलेली महिलांची एक तुकडी दुसऱ्या वाटेने भरकटली आणि पहिला गट दुसऱ्या मार्गावर गेला. दोन वेगवेगळ्या गटात असल्यामुळे एक गट झारखंडमधील छोटानागपूरमध्ये दाखल झाला आणि दुसरा गट राजमहालच्या टेकड्यांकडे गेला. त्यांना वाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रथम, घनदाट जंगलातून प्रवास करणे, वन्य प्राण्यांचा धोका, लहान मुलांची काळजी घेणे, भूक-तहान इत्यादी अडचणींवर मात करत ते सर्व जंगलातून मार्गक्रमण करत होते. चालताना त्यांना रात्र झाली. त्यांना रात्री मुक्काम करणेही आवश्यक झाले होते. कारण रात्रीच्या अंधारात त्या घनदाट जंगलात चालणे शक्य नव्हते. आता सिनगी दई आणि कायली दई रात्री आराम करण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होत्या. वृद्ध स्त्रिया आणि लहान मुले सर्वच भुकेने व्याकूळ झाले होते. यावेळी त्यांना एक मोठी गुहा आणि एक करम वृक्ष दिसला. करम वृक्ष ओरांवसाठी पवित्र आहे. त्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्या करम वृक्षाची आणि गुहेच्या आजूबाजूच्या परिसराची कसून पाहणी केली असता ती बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचे त्यांना दिसून आले. अशा प्रकारे रात्रीच्या विश्रांतीसाठी सर्वजण तिथेच थांबले.
शत्रूला काही करून महिला सैनिकांच्या या तुकडीला पकडायचे होते. त्यासाठी त्यांनी सर्व दिशांना शोधाशोध केली. परंतु त्यांना सिनगी दई हाती लागली नाही. आजही आपणास रोहतासगड त्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
क्रमशः
- राजू ठोकळ
AVM | Aboriginal Voices Maharashtra
संदर्भ :
1) सिनगी दई, डॉ. शांति खलखो (Dr. Shanti Xalxo)
0 comments :
Post a Comment