आदिवासी आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाचे वास्तव

आदिवासी आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाचे वास्तव  

धनगर समाज आज आदिवासी आरक्षण मिळावे म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाकडून देखील विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. यावर चर्चा करण्याअगोदर केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या या अगोदरच्या निर्णयावर विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने १२ जून १९७९ ला धनगर समाजाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला होता. यावर सबंधित विभागाने सखोल चर्चाही केली होती. पण धनगर हा समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू न शकल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला. सदर बाब धनगर समाजाचे नेते त्यांच्याच समाजाला न सांगता भावनिकतेचा गैरफायदा घेत आरक्षण आपणास मिळेलच असा खोटा विश्वास निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. आदिवासींचे निकष कोणते आहेत व भटक्या जमातीची गुणवैशिष्ट्ये काय आहेत  हे आपण समजून घेतले तर हा फरक सहजपणे आपल्याही लक्षात येईल. ‘महाराष्ट्रातील आदिवासी जमाती’ या पुस्तकात डॉ.गोविंद गारे यांनी आदिवासी कोणाला म्हणावे याबाबत विवेचन केलेले आहे. त्यात आदिवासींच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातील एक व्याख्या अवलोकनासाठी देत आहे. 

 इ. स. १९६२ साली शिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासींची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे, 

    “एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पुर्वाजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधांवर आधारित सामाजिक व राजकीय रितीरिवाजांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला आदिवासी समाज असे म्हणतात.” 

विविध मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांवरून आदिवासी समाजाची पुढील लक्षणे सांगितलेली आहेत. 

१) विशिष्ट भूप्रदेश 
२) प्रमाण लघुता ( थोड्या लोकांचा समूह ) 
३) एकाच रक्तसंबंधावर आधारित 
४) स्वताची बोलीभाषा व लेखनकलेचा अभाव 
५) स्वतःची वेगळी जीवनपद्धती 
६) साधी अर्थव्यवस्था 
७) सीमित तंत्रविद्या 
८) समान धर्म ( निसर्ग पूजक ) 
९) सामाजिक एकजिनसीपणा 
१०) मातृसत्ताक 
                     धनगर समाज हा भटक्या विमुक्त गटात समाविष्ट केलेला असल्याने भटक्यांच्या उत्पत्तीविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. ‘भटके’ ( Nomadics) या शब्दाची उत्पत्ती ‘नेमो’ (Nemo) या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. याचा अर्थ ‘चारणे’ असा आहे. विविध जनावरांना घेऊन जेथे चारा उपलब्ध होईल तेथे नेण्याच्या प्रवृत्तीतून एक समाज तयार झाला. या निमित्ताने हिंडणारा व पुढे आपल्या उपजीविकेसाठी भटकणारा तो भटका ( Nomadic) समाज बनला. 

                   भारतीय समाजविज्ञानकोश, खंड-४ मध्ये गर्गे एस. एम. यांनी भटक्यांचे केलेले वर्णन आपल्या अवलोकनासाठी देत आहे...

                      “कोणत्याही एके ठिकाणी स्थायी स्वरुपाची वस्ती न करता उपजीविकेसाठी सतत आणि वरचेवर स्थलांतर करणा-या जमाती म्हणजे भटक्या जमाती. अनादी काळापासून टोळी जीवनाने राहणारा मानव अस्थिर होता. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्याला कायम फिरावे लागे. आपले जीवन निश्चित करणे शक्य झाले नाही ते भटकतच राहिले. या लोकांना आजही कायमस्वरूपी चरितार्थाची साधने उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांचे जीवन मागासलेले, अस्थिर व दुर्लक्षित झाले आहे. भटकणे हाच स्थायीभाव आहे. काही भटक्या जमातींना कुठेही घर नसते, कोणतेही गाव नसते. सदैव या गावाहून त्या गावास उपजीविकेसाठी त्यांना सहकुटुंब भटकावे लागते. तर काही भटक्या जमाती स्थायी जीवन जगतात. वर्षातून काही महिने व्यवसायाच्या स्वरूपामुळे पोट भरण्यासाठी त्यांना भटकावे लागते.” 

धनगर या शब्दाची उत्पत्ती : 
       The Dange Dhangar of Kolhapur District : A Sociological Study  या १९८७ साली प्रकाशित झालेल्या पी. बी.द्राक्षे यांच्या पुस्तकात ‘धनगर’ शब्दाच्या उत्पत्तीबाबत पुढील बर्णन आलेले आहे, 

   “धनगर या शब्दाच्या उत्पत्तीबाबत सामान्यत: धनगर या शब्दाचा अर्थ ‘धन’ म्हणजे संपत्ती (गुरे आणि मेंढ्यांच्या स्वरूपात) आणि ‘गर’ याचा अर्थ पाळणारा म्हणजेच जे लोक मेंढ्या किंवा गुरे पाळतात आणि त्यांची विक्री करतात, त्यांना धनगर म्हणून ओळखले जाते.”                       
                        ( पान क्र. ३०) 
              
वरील व्याख्या, वर्णन व धनगर शब्दाची उत्पत्ती या बाबी बारकाईने समजून घेतल्या तर आदिवासी जमाती व धनगर समाज यातील असणारा मौलिक फरक स्पष्ट दिसून येतो.. धनगर समाजावर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात अनेक समाजशास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण लेखन केलेले आहे. त्यातील मांडणी समजून घेतली तर धनगर समाज हा नक्की कोण आहे हे सामान्य व्यक्तीला देखील ठरवता येईल. अर्थात याची जाणीव राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आहे. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ते धनगर समाजाच्या अस्मितेला हात घालून समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब करत आहेत. धनगर हे आदिवासी आहेत कि नाही याबाबत न्यायालयीन लढाई सुरु आहे. असे असतानाही राजकीय दबाव तंत्राचा वापर करून चुकीची मागणी उभी करून सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्याचे काम धनगर समाज करत आहे. 
       
                      भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचा संविधानिक अधिकार दिलेला आहे. त्यानुसार योग्य व न्याय्य मागणी धनगर समाजाने केली असती, तर कदाचित समस्त आदिवासी समाजाने त्यांच्या मागणीला पाठींबा दिला असता. परंतु धनगर समाज आदिवासी आरक्षण, आदिवासी बजेट, आदिवासींचे राखीव मतदारसंघ, अॅट्रॉसिटी कायदा यांच्यावर डोळा ठेऊन मागणी करत असल्याने आदिवासी समाज बांधव त्यांच्या मागणीला विरोध करत आहेत. धनगरांना त्यांच्या विकासासाठी काय पाहिजे ते द्या, पण आदिवासी आणि धनगर हि तुलना करणे पूर्णपणे चूक असल्याचे मत आदिवासी समाज बांधव करत आहेत. 
धनगर समाजाकडून केल्या जात असणाऱ्या मागणीतील सर्वात पहिली मागणी हि आहे कि अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर यांचा समावेश केलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने आमच्यावर अन्याय होत आलेला आहे. या मागणीचा संविधानिक विचार केला किंवा पुरेशा पुराव्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर आणि धनगड हे दोन्हीही शब्द नाहीत. मूळ इंग्रजी आदेशात ‘Dhangad’ असा शब्द प्रयोग असलेल्या जमातीचा उच्चार वास्तविक ‘धांगड’ असा आहे. परंतु हे वास्तव जाणीवपूर्वक लपवून राज्यातील धनगर समाजाचे नेते ‘ड’ आणि ‘र’ या शब्दांचा खेळ करून आम्ही आदिवासी आहोत असे सिद्ध करू पाहत आहेत. मराठीतील ‘र’ हा हिंदीत लिहिताना ‘ड’ असा लिहिला जातो असा त्यांचा युक्तिवाद आहे. परंतु अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश १९५० मधील यादी हि हिंदीत नसून इंग्रजीत असल्याचे वास्तव ते जाणीवपूर्वक लपवतात.  जर त्यांचा हा युक्तिवाद शास्त्रीयदृष्ट्या खरा आहे असे मान्य केले, तर मग ‘अहमदनगर’ हा शब्द इंग्रजीत लिहिताना ‘Ahmednagad’ व ‘नागपूर’ हा शब्द इंग्रजीत लिहिताना ‘Nagpud’असे लिहिले जाणे आवश्यक होते. पण तसे लिहिल्याचे आपणास दिसून येत नाही. उलटपक्षी हिंदीतील ‘कुडूख’ हा शब्द इंग्रजीत ‘Kurukh’, मराठीतील ‘नांदेड’ हा शब्द इंग्रजीत ‘Nander’ व ‘बीड’ हा शब्द इंग्रजीत ‘Bir’ असा लिहिल्याचे जुन्या कागदपत्रांत दिसून येते (संदर्भ : Statistical Abstract of H.E.H. the Nizam’s Dominions from 1331 to 1340 Fasli, लेखक : Mazhar Husain, प्रकाशक : Government Central Press, प्रकाशन वर्ष : १९३८ ). 

धनगर हा शब्द विविध भाषांमध्ये कसा लिहिला जातो याबाबत Shepherds of India या सन १९७८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात शशी एस.एस. यांनी एका तक्त्याद्वारे स्पष्ट केलेले आहे. 
Appendix III  : Names in Language
The shepherds are known as under in Indian languages and dialects
             
Sr.No Language -  Name
1 Hindi - Pal Kshatriya, Dhangar, Baghel, Pal Gadariya
2 Punjabi - As Above
3 Urdu -  As Above
4 Kashmiri - Pohol
5 Sindhi - Redharu
6 Marathi - Dhangar
7 Gujrati - Rabari and Bharwad
8 Bengali - Rakhal (Rakhalu)
9 Assamese - Bherarokhiya
10 Oriya - Meshpalak
11 Telugu - Golla
12 Tamil - Attutidiyan
13 Malayalm - Attiyan
14 Kannada - Kurba, Kurub, Kuraba
15 Sanskrit -  Ajpal, Chagal
16 Oraon, Kurk - Dhangar

वरील विवेचन व संदर्भ समजून घेतले असता धनगर समाजाचे नेते ‘र’ चा ‘ड’ झाला असा जो जावई शोध लावत आहे, तो पूर्णपणे चुकीचा असून उलट मराठीतील ‘ड’ इंग्रजीत लिहिताना ‘र’ असा लिहिला जात असल्याचे साधे भाषा ज्ञान त्यांना नसल्याचे दिसून येत आहे.ओरिसा राज्यात ओरान समाजाची उपजमात असलेल्या आदिवासी जमातीचे इंग्रजी स्पेलिंग ‘Dhangar’ असे लिहिले जात असले तरी, त्याचा उच्चार व त्या जमातीची वैशिष्टे हि महाराष्ट्रातील ‘धनगर’ समाजाशी कुठेही जुळत नाहीत याबाबत अनेक पुस्तकांतून, साहित्यातून व अहवालांतून खुलासा झालेला आहे. उलटपक्षी उत्तरप्रदेशात धनगर हि जात अनुसूचित जातीच्या यादीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने देखील सिद्ध केलेले आहे. त्यामुळे धनगर समाजाकडून केला जाणारा स्पेलिंगच्या चुकीचा दावा हा पूर्णपणे खोटा असून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान करणारा आहे. मुळात आदिवासींचा धनगर समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाही. विरोध आहे तो त्यांना आदिवासी हि ओळख देण्याला. त्यामुळे धनगर समाजावर अन्याय झाला असा कांगावा करून व आपल्या राजकीय दबाव तंत्राचा वापर करून सामाजिक वातावरण खराब करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे यावर सरकारने वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
सन १९५० चा अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आदेश हा राज्यपालांच्या सल्लामसलतीने आणि राष्ट्रपतींकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक जाती जमातीच्या संदर्भातील अहवाल व तपशिलांच्या आधारे प्रसारित करण्यात आला होता. नंतरच्या काळात या आदेशात संसदेने विविध अहवाल व उपलब्ध पुरावे यांचा आधार घेऊन बदलही केलेले आहेत. परंतु ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ हा बदल करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश ( दुसरी दुरुस्ती) विधेयक २००२ संदर्भात कामगार आणि कल्याणविषयक स्थायी समितीच्या २७ व्या अहवालाचा संदर्भ समजून घेणे सर्वानांच उपयुक्त ठरेल. हा मुद्दा महाराष्ट्रातील ‘धनगड’ आणि ‘धनगर’चा होता. ‘धनगड’ जमातीचा महाराष्ट्रातील जमात सूची ३६ नुसार अनुसूचित जमाती म्हणून समावेश करण्यात आला आहे. सदर ठिकाणी स्पेलिंगची चूक झालेली असून तेथे ‘धनगड’ हि अनुसूचित जमात वास्तविक ‘धनगर’ आहे, असे एका खासदाराने जोरदारपणे मांडले होते. मंत्रालयाने यावर सविस्तर चर्चा केली. अनेक पुरावे तपासल्यानंतर मंत्रालयाने हि चूक दुरुस्त करण्यास नकार दिला. मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले कि समान नामकरण असलेले दोन भिन्न समुदाय महाराष्ट्रात आहेत. पहिला समुदाय म्हणजे ‘धांगड’ ( Dhangad ), जो ओरावचा उपसमूह आहे, ज्याची नोंद अनुसूचित जमाती क्रमांक ३६ वर आढळते. त्यांचा पारंपारिक व्यवसाय शेती आहे. दुसरा समुदाय म्हणजे ‘धनगर’ ( Dhangar ) होय. यांचा पारंपारिक व्यवसाय गुरेढोरे पाळणे आणि लोकर विणणे आहे. उपरोक्त अहवालातील परिच्छेद क्रमांक २.१७ आणि २.१८ देखील आपण समजून घेणे आवश्यक आहे. 

2.17 - The ‘Dhangad’ community has been included in the Constitution ( Scheduled Tribes ) Orders, 1950 vide entry No.36 in part IX of Maharashtra State. Shri Pradeep Rawat, MP has pointed out that there is spelling mistake in the community. He stated that instead of ‘Dhangad’ the correct name of this Scheduled Tribe community is ‘Dhangar’. He has, therefore, requested that the Community may take necessary action to correct the printing mistake.

2.18 -   The Ministry in their reply has stated that in the State of Maharashtra there are two distinct communities having similar nomenclature, one is Dhangad which is a sub group of Oraon, a Scheduled Tribe appearing at S.No.36 of the List of Scheduled Tribes. The traditional occupation of this community is cultivation.There is another community known as ‘Dhangar’ whose traditional occupation is cattle rearing and weaving of woolens. The ‘Dhangad’ and the ‘Dhangar’ are two distinct communities having no ethnic affinity at all. The Dhangars who are shepherds have been notified as Nomadic Tribe in the State of Maharashtra. Therefore, there is no printing mistake in the Scheduled Castes and Scheduled Tribes ( Amendment ) Act, 1976 through which the Constitution ( Scheduled Tribes ) Order, 1950 was amended.

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मागणीचा विचार करत असताना आजच्या राजकीय नेतृत्वाने व समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाच्या निकालाची देखील नोंद घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध मिलिंद आणि इतर ( A.I.R. 2001 SC 393 ) यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले कि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या १९५० च्या आदेशाप्रमाणे वाचल्या पाहिजेत. एखाद्या जमातीची ती उपजामात आहे किंवा तिचा भाग आहे असे म्हणण्याची देखील अनुमती नाही. कोणत्याही जातीचा समूह हा अनुसूचित जमाती आदेशामध्ये नमूद केलेल्या आदिवासी समुदायाचा समानार्थी आहे असे म्हणण्याची देखील अनुमती नाही. 

      या निकालाच्या अनुच्छेद ३५ मध्ये खालील गोष्टी नमूद केलेल्या आहेत :
१) अनुसूचित जमाती आदेश १९५० मध्ये जर एखादी जात, समूह, गट, नाव यांचा स्पष्ट उल्लेख केलेला नसेल तर त्याबाबत चौकशी करणे किंवा त्याचे आदिवासी असल्याचे पुरावे सादर करणे यास परवानगी नाही. 

२) अनुसूचित जमाती आदेश १९५० हा जसा आहे तसाच वाचला पाहिजे. अनुसूचित जमाती आदेशात नमूद न केलेल्या जाती, उपजाती, एखाद्या एखाद्या जातीचा भाग किंवा समूह हा अनुसूचित जमाती आदेशातील एखाद्या जमातीशी नामसाधर्म्य दाखवतोय असे म्हणण्याची अनुमती नाही. 

३) अनुच्छेद ३४२ च्या खंड (१) अन्वये अनुसूचित जमातीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा किंवा त्यातून काढण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे. हा बदल फक्त संसदेतील कायद्याने केला जाऊ शकतो. इतर कोणालाही त्याचा अधिकार नाही. 

४) अनुच्छेद ३४२ च्या खंड (१) अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये सुधारणा किंवा बदल करण्याचा अधिकार राज्यसरकार किंवा न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणास नाही. 

   धनगर समाज हा पशुपालक व भटका समाज असून त्याचा उल्लेख जात म्हणून अनेक ठिकाणी आपणास दिसून येतो. आदिवासी हा निसर्गपूजक असून धनगर समाजाच्या पशुपालक व्यवसायापासून पूर्णतः वेगळा आहे. धनगर नक्की कोण ? हे पडताळून पाहायचे असेल तर खालील लिखित साहित्यातील संदर्भ पडताळून पाहणे अगत्याचे आहे......
 
१) पुस्तक : Tribes and Castes of Indian Central Provinces of India
लेखक :  R.V.Russel
प्रकाशन वर्ष :  1916

“The shepherd castes who tend sheep and goats ( the Gdarias, Dhangars, and Kuramwars ) also falls into this group.” ( पान क्र. ६४ )

“धनगरांचा पारंपारिक व्यवसाय शेळ्या मेंढ्या पाळणे हा आहे आणि ते शेळ्यांचे दुध विकतात, मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगडी बनवतात. ते सामान्यत: मेंढ्या चरण्यासाठी पडीक असलेल्या जमिनीच्या जवळ राहतात.”   (पान क्र. ४८०-४८१) 
              

२) Census of India 1901 या पुस्तकात जातीच्या स्तंभात धनगर जातीचा उल्लेख केलेला असून नांदेड, शिरपूर, परभणी येथील नोंदी केलेल्या आहेत.  
                
३) Census of India 1891 मध्ये Dhangar अशाच स्पेलिंगचा उल्लेख आहे. त्यामुळे ‘र’ चा ‘ड’ होतो हा महाराष्ट्रातील धनगरांच्या बाबतीत असलेला दावा फोल ठरतो. 

४) पुस्तक : Census of India 1931 ( Bombay Presidency ), Vol VIII, Part II
लेखक : A.H.Dharup

धनगरांच्या पारंपारिक व्यवसायाचा उल्लेख Shepherds and wool weavers असा केलेला आहे. 

५) पुस्तक : Castes and Tribes of Southern India
लेखक :  Thurston, Edgar, Rangchari
प्रकाशक : Government Press, Madras
प्रकाशन वर्ष : 1909

“Dhangar – Dhangar or Donigar, is recorded, in the Madras census report, 1901, as a Marathi caste of shepherds and cattle breeders. I gather, from a note on the Dhangars of the Kanara district in the Mombay Presidency, that the word Dhangar is generally derived from the Sanskrit dhenu, a cow. Their home speech is Marathi, but they can speak Kanarese. They keep a special breed of cows and buffaloes, known as dhangar mhasis and dhangar gais which are the largest cattle in Kanara. Many of SHivajis infantry were Satara Dhangars.”  ( पान क्र. १६७ ) 
                 

६)  Census of 1891 ( Imperial Tables ) Imperial Series – Vol-X या पुस्तकात पान क्र. २३२, ५२४, ५३०, ५३४ वर जातीमध्ये धनगर समाजाचा उल्लेख केलेला आहे. 

७) Caste and Land Relations In India A study of Maharashtra या S.M.Mandhare  यांच्या १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात पान क्रमांक १०७ वर Agricultural Castes या तक्त्यामध्ये  पाटील, मराठा, हटकर, वंजारी, लिंगायत, परदेशी, गोसावी या जातींबरोबर धनगरांचा जात म्हणून उल्लेख आहे. त्याच पानावर Tribes (Scheduled Tribes) या तक्त्यामध्ये धनगरांचा उल्लेख नाही. 

८)  Gaon Conflict and Cohesion In An Indian Village या Henry Orenstein यांच्या १९६५ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात पान क्रमांक २६ वर माळी, धनगर, भोई, वडारी या जातींचा उल्लेख असून धनगरांचा मुख्य व्यवसाय Shepherd असा दर्शविण्यात आलेला आहे. 

९) The Last Wanderers : Nomads and Gypsies of India या T.S. Randhawa यांच्या पुस्तकात पान क्रमांक ५९ वर विविध व्यवसाय करणाऱ्या जातींचा उल्लेख आहे. यात Shepherd हा व्यवसाय करणाऱ्या जातींमध्ये गडरिया, धनगर, कुरुमवार या जातींचा उल्लेख आहे. 

     याच पुस्तकात पान क्रमांक ६२ वर “The Dhangar ( a Maratha caste of Shepherds ) constituated an important contingent of Shivaji’s guerilla soldiery” असा पशुपालन करणारी मराठा जात म्हणून धनगरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.  

     
   पान क्रमांक ९६ वर “The three main shepherd castes all have have functional names, that of the Dhangar or Maratha shepherds being probably derived from dhan, wealth, meaning their flocks of sheep and goats, while the Kurumwar or Telugu shepherds take their name, like the Gadaria, from the word for sheep, kuruba”  यातही धनगर किंवा मराठा पशुपालक असा उल्लेख करून लेखकाने धनगर जात मराठा समाजाशी निगडीत असल्याचे दर्शविले आहे. 

     त्याच पुस्तकात आलेला मजकूर “Dhangar the Maratha group of shepherds sell goats milk, make blankets from sheep’s wools and at times, use their shepherd dogs for hunting hare. They are Hindus” धनगर हे मराठा समाजातील एक गट असल्याचे स्पष्ट करतात. 

१०) Ethnography ( Castes and Tribes ) या Sir Athelstane Baines यांच्या १९१२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात पान क्रमांक १०३ वर आलेला मजकूर हा महाराष्ट्रातील धनगर आणि इतर राज्यातील धनगर नाव असलेला समाज यांच्यात फरक असल्याचे स्पष्ट करतो. महाराष्ट्रातील धनगर हे कुणबी असल्याचे व मराठी भाषा बोलणारा समूह म्हणून उल्लेख केलेला आहे. 

                     “The Dhangars are now, however, a Marathi speaking community, hardly to be distinguished from their kunbi neighbours. The Holkar chief of Indore belongs to this caste, and still enjoys hereditary grazing rights in parts of the Dekkan and some of the best of Shivaji’s celebrated ‘Mavali’ troops were Dhangar” 

११) Celebrating of Life : Indian Folk Dances या Jiwan Pani यांच्या पुस्तकात पान क्रमांक ३२ वर आलेला मजकूर “Dhangar is a shepherd community who migrated long ago from the Saurashtra region” धनगर हे पशुपालक असून ते भटके असल्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो. 

       याच पुस्तकात “The Dhangar dance is performed only by men” असा उल्लेख करून लेखक आदिवासी आणि धनगर यांच्यातील फरक स्पष्ट करत आहे. आदिवासींच्या सर्वच नृत्यांत पुरुष व महिला एकत्रितपणे नृत्य करतात. आदिवासींमध्ये महिलांना मानाचे स्थान दिले जाते. तारपा नृत्य, कांबड नाच, डांगी नृत्य इत्यादीत आदिवासी महिला व पुरुष एकत्रितपणे नृत्य करतात. याउलट धनगरांच्या नृत्यात फक्त परुष नृत्य करतात. हे आदिवासींच्या मातृसत्ताक संस्कृतीपासून फारच भिन्न आहे. 

१२) The Castes and Tribes of H.E.H. The NIzam’s Dominions, Vol-I या  Syed Siraj Ul Hassan ( One of the judge of H.E.H. Nizam’s High Court ) यांच्या सन १९२० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात “Dhangar – the shepherd and blanket weaver caste of the Marathwada….. The name ‘Dhangar’ is derived by some from the Sanskrit word ‘Dhenugar’ meaning ‘cow keeper’…. In physical character and customs they resemble the Maratha Kunbis, which suggests that they are formed from them” असा उल्लेख करून धनगर या शब्दाची उत्पत्ती व त्यांचे मराठा कुणबी या जात समूहाशी असलेले साम्य दर्शविण्यात आलेले आहे. सदर पुस्तकाचे लेखक हे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असल्याने त्यांनी मांडलेले मत अधिक महत्त्वपूर्ण आहे. 

१३) The Castes and Tribes of H.E.H. The NIzam’s Dominions, Vol-I या  Syed Siraj Ul Hassan ( One of the judge of H.E.H. Nizam’s High Court ) यांच्या सन १९२० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात वैदू ( Vaidu ) जातीच्या अंतर्गत रचनेबाबत ( Internal structure ) वर्णन करताना लेखकाने चार वर्गांचा उल्लेख खालीलप्रमाणे केलेला आहे, 

        “Vaidu’s have the following four sub-divisions – Jinga Bhoi, Koli, Dhangar and Mali, which have reference to the castes from which they were originally recruited” 

१४) Urban Politics In India या Rodney  W. Jones  लिखित व University of California Press  ने सन १९७४ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात पान क्रमांक २५ वर धनगर हि मराठी भाषा बोलणारी जात म्हणून उल्लेख केलेला आहे. 
     “Dhangars are a Marathi speaking shepherd caste, comparable in status to the Ahirs ( Cattle breeders ) of North India” 

१५) Report on the Administration of Holkar State for 1936 या पुस्तकात ‘धनगर मराठा’ असा उल्लेख करण्या आलेला आहे. 

१६) Hindu Tribes and Castes या  M. A. Sherring लिखित सन १८७९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात आलेला मजकूर धनगर व कुणबी यांच्या साम्याविषयी प्रकाश टाकतो. 
                “Dhangar – The shepherd and goatherd caste. It’s members are said to resemble the kunbis. There are several divisions of this caste” 

१७) Report of the Land Revenue Settlement of Hazara District of the Punjab या Captain E.G.Wace यांच्या १८७४ साली लाहोर येथून प्रकाशित झालेल्या पुस्तकात पान क्रमांक १९७ वर  ‘धनगर’ नावाच्या मातीच्या प्रकाराचा उल्लेख केलेला आहे. धनगर समाज ज्या Dhangad आणि Dhangar या शब्दांतील नामसाधर्म्याचा उल्लेख करतात, ते पाहता या पुस्तकातील धनगर या मातीच्या प्रकारचा संदर्भ महाराष्ट्रातील धनगरांशी खरच जुळवता येईल का यावर विचार होणे आवश्यक आहे. 
                “The nest quality of soil is known variously as Sikar, Retar, Rakkar, Dhangar, Jhamra, Garera, Gar, Danna, Thangar, Harrand……. Dhangar and Jhamra are hard clay soils full of stones” 
                     वरील मजकुरातील धनगर आणि महाराष्ट्रातील धनगर यांच्या स्पेलिंगमध्ये कोणताही फरक नाही. याचा अर्थ ते समान होत नाहीत. तसेच Dhangad आणि Dhangar या स्पेलिंगमध्ये कोणतेही साम्य नसताना ते ओढूनताढून जोडण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. 

१८) Gazetteer of Bombay Presidency : Ahmednagar, Vol-I (1884)  पुस्तकात पान क्रमांक ३७ वर धनगरांचा व्यावसायिक  पशुपालक म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. 
         “The only professional shepherds are Dhangars…..”

१९) Statistical Abstract of H.E.H. the Nizam’s Dominions from 1331 to 1340 Fasli, लेखक : Mazhar Husain, प्रकाशक : Government Central Press, प्रकाशन वर्ष : १९३८ या पुस्तकात पान क्रमांक १५२, १६६, १८४, २६६ मध्ये व Census of India 1931, Volume XXIII, लेखक : Gulam Ahmed Khan, प्रकाशन वर्ष : १९३३ या पुस्तकात पान क्रमांक १०६, २४५, २४७ मध्ये  Bir, Nander असे अनुक्रमे बीड व नांदेडचे उल्लेख करण्यात आलेले आहेत. यावरून मराठीतील ‘ड’ हा इंग्रजीत ‘र’ असा लिहिला जातो असे सिद्ध होते. त्यामुळे मराठीतील ‘धनगर’ हा शब्द इंग्रजीत ‘धनगड’ असा लिहिला गेल्याचा दावा फोल ठरतो. 

२०) Census of India 1931, Volume XXIII, लेखक : Gulam Ahmed Khan, प्रकाशन वर्ष : १९३३ या पुस्तकात पान क्रमांक १८४  मध्ये Hindu ( Brahmanic ) जातींच्या स्तंभात ३६ नंबरवर Yadava ( Golla, Gowli, Dhangar ) असा उल्लेख करण्यात आलेला आहे व त्यांचा व्यवसाय म्हणून Cowherds and Shepherds असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 
                          याच पुस्तकात पान क्रमांक १८४ वर Tribal जमातींची यादी दिलेली असून यात भिल, गोंड इत्यादी आदिवासी जमातींचा उल्लेख केलेला आहे. धनगर हे आदिवासी असते तर Hindu ( Brahmanic ) या स्तंभात त्यांचा उल्लेख करण्याऐवजी Tribal च्या जमातींच्या यादीत त्यांचा समावेश लेखकाने केला असता. परंतु आदिवासी आणि धनगर यांच्यात कोणतेही साम्य नसल्याने लेखकाने वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत. 

२१) Census of India 1901, Vol-XXII, Hyderabad, Part I Report by Mirza Mehdy Khan या पुस्तकात पान क्रमांक २२२ वर धनगर जातीचा उल्लेख केलेला आहे. 
        “…..there is at least one caste, Dhangar, which has a smaller percentage”

२२)  पुस्तक : म-हाटी संस्कृती काही समस्या 
लेखक : शं. बा. जोशी, 
आंतर भारती प्रकाशन, 
दि.२४ डिसेंबर १९५२ 

या पुस्तकात धनगर जातीचा उल्लेख केलेला असून व-हाडात धनगर (मराठे) म्हणण्याची पद्धत रूढ असल्याचे वर्णन केलेले आहे. 
       सदर पुस्तकातील वर्णन धनगर शब्दाच्या विविध अंगांचे दर्शन घडविते. 

     “कर्णाटांतील धनगर ( कुरूब), कुणबी वैगेरे जातींतून घराण्यातील एक व्यक्ती – ज्येष्ठ पुत्र किंवा कोणता तरी एक पुत्र – व्रतस्थ ठेवण्याची, देवाला अर्पण करण्याची रूढी आहे”      (पान क्रमांक १५) 

      “व-हाटची पुष्कळ देशमुख – देशाचे प्रमुख – घराणी ‘हटगार’ (धनगार) कुळींची असल्याचे कळते. हटगारांना हटगार – धनगर किंवा धनवडे ( मराठे ) म्हणण्याची प्रथा व-हाडकडे आहे. हे मुळांत गोपालनवृत्तीचे लोक होत. (गो) धन पाळणारे म्हणून यांना ‘धनगर’ नाव मिळाले. हटगार या शब्दाचा अर्थही कानडीत गोपाल असाच आहे”  
      (पान क्रमांक २७)

“हट्टीकार म्हणजेच ‘धनगर’, ‘धन’ला येथे गो-धन असा अर्थही आहे. कानडीत ‘दन’ म्हणजे गुरे ढोरे......(गो) धन पाळणारा तो ‘धनगर’ अर्थात ‘हट्टीकार’, तोच ‘दनगार’. ‘दनगार’ ( म्हणजे गुरे पाळणारा ) हा शब्द आजही कानडी बोलीत रूढ आहे”   (पान क्रमांक ४३)

 “हट्ट म्हणजे गौळवाडा; हट्टे म्हणजे गवळी, धनगर, धनवडे”

  “कर्णाटांतही हट्टीकार जन आहेत. या भागांत हट्टीकार – दन (धन) गार जनाला आणखी एक पर्यायशब्द रूढ आहे; यांना ‘हालूमतदवरु’ म्हणण्याची प्रथा आहे. हालू म्हणजे दुध. हालूची वृत्ती करणारे म्हणजे धनगर – गवळी असाच याचा अर्थ आहे.  
                           (पान क्रमांक ५५) 
            
                     वरील विवेचनावरून धनगरांच्या पुर्वपरंपरेची कल्पना येण्यास मदत होते.  

२३)  होळकरांची कैफियत : संशोधन व टिपा (दुसरी आवृत्ती १९७२) या यशवंत नरसिंह केळकर यांच्या पुस्तकात धनगर आणि मराठे हे एकच असल्याची नोंद आढळते. 

        “.......नंतर पेशवे यांनी पवार, धनगर वैगेरे अवघे मराठे मंडळी जमा करून गंगेपुढे चाल केली”               (पान क्रमांक २)
 
    “....मग धर्माजी शिंदे वैगेरे मराठे धनगर यांनी सल्ला दिला.....”  
                                     (पान क्रमांक १७२) 

२४)  पुस्तक : आजच्या हिंदू जीवनांतील ध्रुववस्तीचे अवशेष, 
 लेखक : भा. रं. कुळकर्णी, 
 प्रकाशक : राजवाडे संशोधन मंडळ, धुळे 
 प्रकाशन वर्ष : १९३८ 

“धनगर जातीत फारच लहानपणी लग्न करण्याची चाल आहे.”  (पान क्रमांक २४५) 

“धनगरांच्या प्रमुख तीन जाती :
अ) खुटेकर उर्फ आहेर किंवा अहिर धनगर 
आ) झेंडेकर 
इ) हाटकर “            (पान क्रमांक २६७ )

२५)  पुस्तक : अहिराणी भाषा व संस्कृती ( अल्प परिचय )
लेखक : भा. रं. कुळकर्णी
प्रकाशन वर्ष : १९४२ 

“अहिर, सोनार, शिंपी हे स्वत:ला मराठे रजपुतांपेक्षा काहीसे वर समजतात, तर अहिर धनगर, सुतार, न्हावी, लोहार, गुरव वैगेरे जातींचा मराठे रजपुतांशी अन्न व्यवहार चालतो.”

२६) पुस्तक : साम्राज्यातील आपले संबंधी ब्रिटीश बेटांतील लोक भाग १ ला 
 लेखक : ना. म. पटवर्धन 
 प्रकाशन वर्ष : १९३२ 
 
       सदर पुस्तकात धनगर समाज हा इतर देशातही म्हणजेच स्कॉटलंडमध्येही अस्तित्वात असून त्यांच्या तेथील व्यवसाय देखील गुरे ढोरे व शेळ्या मेंढ्या चारणे हा असल्याचा उल्लेख पान नंबर ५५ वर करण्यात आलेला आहे. 

२७) पुस्तक : मंडल आयोग सामाजिक परिवर्तनाचे पुढचे पाउल 
लेखक : धरमचंद चोरडिया 
प्रकाशक : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र 

     या पुस्तकात अन्य मागासलेल्या महाराष्ट्रातील जातींच्या यादीत ६९ नंबरवर धनगर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

२८)  पुस्तक : महात्मा फुले रचनावली 
अनुवाद व संपादन : डॉ. एल.जी.मेश्राम ‘विमलकीर्ती’

    “जो लोग ...... बकरियो के झुंड पालने लगे, वे धनगर ( गडरिया, गडेरिया ) हो गए”

   “शूद्रो के कुलस्वामी जेजुरी के खंडेराव ने शुद्र (कुनबी) कुल कि म्हालसाई और धनगर कुल कि बानाबाई – इन दो जातियो कि दो औरतो से ब्याह किया था, इसलिए पहले कुनबी और धनगर इन दो जातियो में आपस में बेटी व्यवहार होता था”         (पान क्रमांक २८९) 

२९) पुस्तक : देवी श्री अहल्याबाई होळकर 
लेखक : पुरुषोत्तम 
प्रकाशन : मार्च १९१३ 

     “मल्हारराव होळकर यांच्या संगतीने पुष्कळसे मराठे धनगर झाले”   
                             (पान क्रमांक ७१) 

३०) पुस्तक : श्रीमंत बाजीराव बल्लाळ 
लेखक : नागेश्वर विनायक बापट 
प्रकाशन वर्ष : १९०३ 

   “होळकर या शब्दातील ‘होळ’ या नावाचा एक गाव पुणे जिल्ह्यात नीरेच्या काठी आहे. त्या गावी मल्हाररावाचा बाप चौगुला होता, व तो तेथील राहणारा म्हणून त्यास ‘होळकर’ म्हणत. तो जातीचा धनगर. त्याला इ.स.१६९३ त मुलगा झाला. त्याचे नाव मल्हारी असे ठेविले” 

३१) पुस्तक : परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांचे चरित्र 
लेखक : वामन परशराम मेहेंदळे 
 प्रकाशन वर्ष : १९१७ 

       “...... आटपाडी व गुणदाळ ह्या तालुक्यांत धनगर, कोळी, कुणबी, चांभार, ढोर वैगेरे जातीच्या लोकांची वस्ती फार असून ते विद्याहीन आहेत”     
                              (पान क्रमांक ६) 

३२) पुस्तक : जातिभास्कर 
लेखक : खेमराज श्रीकृषदास 
 प्रकाशन वर्ष : १८४८ 

    “यह जाती ....... गडरिया कहलाती है युक्तप्रदेश में यह भेड बकरी चराते है, उनके कम्बल आदी बनाते है यह...... बम्बई में अहिर, नागपूरमें गौली, राजपुतानेमें गुजर, मालवेमें धनगर और डंगर कहाते है”      
                     (पान क्रमांक ३७१) 

३३) पुस्तक : महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र 
लेखक : दत्तात्रय बळवंत पारसनीस 
 
    “फकीरजी गाढवे – हे सातारा जिल्ह्यांतील वाई गावचे रहिवासी असून जातीचे धनगर होते”

     “उदाजी कुटके – हे जातीचे धनगर असून अहमदनगर जिल्ह्यांतील कोळ पिपळगावचे राहणारे होते”       (पान क्रमांक ६५) 

३४)  पुस्तक : श्रीमाणिकप्रभू चरित्र 
लेखक : गणेश रघुनाथ कुलकर्णी 
प्रकाशक : अप्पासाहेब देशपांडे 
प्रकाशन वर्ष : १९३७ 

 मैलार या अति प्राचीन क्षेत्राचे मल्हारी महात्म्यातील वर्णन करताना पुढील उल्लेख आलेला आहे,
 
   “मणिचूल पर्वतावरील हे क्षेत्र त्या काळी अत्यंत भरभराटीत होते. देवाचे पुजारी धनगर जातीचे होते.”       (पान क्रमांक १५१) 

३५) पुस्तक :  Shepherds of India 
लेखक : Shashi S.S.
प्रकाशन वर्ष : १९७८ 

“The word Dhangar is derived from cattle wealth. Gar is indicative of cattle-grazers or shepherds.”             ( Page No 15 )

 “It is essential to mention here some theories. The Dhangar historians believe Dhaval village…….. This proves that Dhangars are a part of Maratha society.”    (Page No.16) 

“Name of the Caste or sub-caste  in Maharashtra – Dhangar, Khuntekar, Hatkar, Hatgar, Banjara, Baghel, Maratha”                    (Page No.19) 

 “Like the Marathas of Indore who call themselves Dhangar Ahir, the Ahirs of Maharashtra prefer to be known as Ahir Dhangars.”       (Page No. 46) 

 

३६)  पुस्तक : मराठी विश्वकोश, खंड १२ 
लेखक : दौलतराव भोसले
संपादक : लक्षमणशास्त्री जोशी 
प्रकाशन वर्ष : १९८५ 

 “महाराष्ट्रातील भटक्यांच्या व्यवसायामध्ये पशुपालन करणारे यामध्ये गुरे आणि शेळ्या मेंढ्यापासून मिळणारी लोकर, कातडी, हाडे, दुध तसेच गुरांची विक्री, त्यांची देवाणघेवाण यावर उदरनिर्वाह करतात. कळपातील पशूंच्या गरजांशी त्यांचे भटकेपण निगडीत असते. त्यांना चरण्यासाठी आवश्यक कुरणाच्या शोधात ते फिरतात.”           ( पान क्र. १९ & २०) 

३७)  पुस्तक - Mendhe Dhangars in Hatkangale Taluka : A Sociological Study 
लेखक : धनगर एस.एम.
प्रकाशन वर्ष : १९८३ 

   “....... ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणावर मेंढ्या आणि गाई यांची मालकी असे त्याला धनगर किंवा श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जाई.”   (पान क्र.१६) 

३८)  पुस्तक : महाराष्ट्रातील भटका समाज 
लेखक : ना. धो. कदम 
 प्रकाशन वर्ष : १९९३ 

  “धनगर म्हणजे ‘धनाचे आगर’ असाही अर्थ प्रचलित आहे.”    (पान क्र. ११२) 

३९)  पुस्तक : सातारा येथील वैदू जमातीचा समाजशास्त्रीय अभ्यास 
लेखक : एस.एम.चव्हाण 
प्रकाशन वर्ष : १९९३ 

 “ज्यावेळी पृथ्वीवर फक्त पाणीच होते, जमीन नव्हती, तेव्हा आदिपुरुष जामऋषी होता. त्याने पाण्यावर राहण्यासाठी लव्हाळ्याचा पाळणा केला. यावेळी सामर्थ्याने जाम ऋषीला तीन मुले झाली त्यांची नावे रक्तमुनी, यपमुनी, दुधमुनी. यातील दुधमुनीला कापले तेव्हा पाण्याचे दुध झाले. रक्तमुनीला कापले तेव्हा रक्त झाले व यपमुनीला कापले तेव्हा जमीन निर्माण झाली. यावेळी अंजना देवीच्या अंगावर ईभिष्ण या देवाच्या लघवीचे सात थेंब पडले व देवीस सात मुळे झाली. या सात मुलांचा ताडाच्या पानापासून पाळणा तयार करून जाम ऋषीने सांभाळ केला व हि मुळे मोठी केली. हि सात मुळे म्हणजे वैदू, कोल्हाटी, वडार, कैकाडी, धनगर, ब्राम्हण व महार हि होत.”  
               (पान क्रमांक २७) 

४०)  पुस्तक : धनगर समाजाचा प्राचीन इतिहास व गोत्र 
लेखक : गणपतराव कोळेकर 
 प्रकाशन वर्ष : १९९२ 

  गणपतराव कोळेकर यांनी धनगर समाजाचा वेदकाळापासून इतिहासाच्या माहितीचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते, 

                     “काही अभ्यासक म्हणतात कि धनगर समाज हा द्रविड वंशातील आहे. परंतु द्रविड वंशातले पोटभेद तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळी, तुळू असे आहेत. त्यात धनगर समाज नाही. धनगर समाजामध्ये अहिर, अस्सल किंवा मराठा, बनगी, बरगेबंद किंवा मेटकरी, डंगे, गडगे, गवळी, हटकर किंवा झेंडे, होळकर, कंगर, क्षित्री, खिलारी किंवा भिलारी, खुटे किंवा खुटेकर, कुकटेकर, लाड, मेंढे, म्हसकर, सणगर, शेगर, शिरोट्या व उटेकर असे पोटभेद आहेत. त्यामध्ये आदिवासी, वन्य जमाती किंवा द्रविड वंशाचे नाव नाही.” 

                     “आर्य लोक उत्तर धृवाकडून दक्षिणेकडे येताना आल्प्स पर्वत व अलताई प्रदेशात बरेच दिवस राहिले. तेथे असलेले वन्य प्राणी, मेंढ्या मानवाला आपले मांस व दुध रूपाने अन्न पुरवणारे असे बहुउपयोगी प्राणी म्हणून त्यांना माणसाळून आणले व पाळले. आर्य लोकांचे वंशजच धनगर हे लोक आहेत.”  ( पान क्रमांक ५ & ६ ) 

४१) पुस्तक : भारत के यायावर 
लेखक : शशी एस. एम. 
प्रकाशन वर्ष : १९८४ 

    “........मध्य भारतातील (महाराष्ट्र) धनगर समाजाची सामाजिक संरचना हि आर्य संस्कृतीप्रमाणे आहे.”     (पान क्रमांक २७, २८)   

धनगर समाज नक्की कोण आहे याबाबत असलेले काही पुरावे व संदर्भ पडताळून पाहिल्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण निकालाबाबत माहिती असणे व काही तथ्ये समजून घेणे  आवश्यक आहे. 
१) उत्तर प्रदेशात अलाहाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने १७ जुलै २००९ रोजी याचिका दाखल केली होती. त्याचा क्रमांक रिट सी.नं.४०६२ / २००९ असा आहे. न्यायालयाने १४ मार्च २०१४ रोजी निकाल देत धनगर हि ‘जात’ असल्याचे शिक्कामोर्तब केलेले आहे. दुसरी याचिका क्रमांक रिट सी.नं.१२४३६/२००७ नुसारही धनगर हि ‘जमात’ नसून ‘जात’ असल्याचे सिद्ध झालेले आहे. 

२) सन १९११ च्या जनगननेतील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर जातीची नोंद आहे.

३) सन १९११ मध्ये बॉम्बे प्रेसिडन्सी, सी.पी.& बेरार, मराठवाडा या तीन प्रांतात धनगर समाजाचा ‘जात’ म्हणूनच उल्लेख आहे.  

४) सन १९३१ ची जनगणना जे.एच.हट्टन यांनी केली होती. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते. त्यांच्या जनगननेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६ वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४ वर धनगर जातीचा स्पष्ट उल्लेख आहे. खंड दोनमध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३० वर ‘गडरीया’ नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्याच्या उपजातीची नावे भाखड, धनगर आहेत. 

५) ओराव हि मध्यप्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल राज्यातील महत्त्वाची जमात आहे. ओराव हे जन्मजात शेतकरी आहेत. त्यांची स्वतःची शेती असून आपल्याच जमिनीत मशागत करण्यात गुंतलेले असतात. ओरावचे प्रादेशिक नाव धांगड असे आहे. त्याचा अर्थ शेतमजूर असा होतो. याच्या उलट  धनगर हि पशुपालक जमात असल्याच्या अनेक नोंदी आहेत. त्यामुळे धांगड व धनगर यांच्यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. 

६) आदिवासींची कुलचिन्हे हि निसर्गातील सजीव किंवा निर्जीव वस्तू असतात. ओराव (धांगड) यांचा धरम देव हा सूर्य देव आहे. त्याची ते पूजा करतात. सूर्य हा निसर्गाचे एक प्रतिक आहे. या उलट धनगर बिरोबा व खंडोबाची पूजा करतात. बिरोबा व खंडोबा हे त्यांचे प्रमुख देव आहेत. बिरोबा व खंडोबा हि मानवी प्रतिके आहेत.

 
७) ओरिसातील ओराव (धांगड) मध्ये  १८ कुळे आहेत. महाराष्ट्रातील धनगरांमध्ये ३२ कुळी आहेत.  त्यामुळे धांगड आणि धनगर हे एकच आहेत असे म्हणणे पूर्णपणे चूक आहे. 

८) आदिवासींमध्ये कुलचिन्ह असते. तर धनगर समाजामध्ये गोत्र पद्धती अस्तित्वात आहे. आदिवासींची कुलचिन्हे हि निसर्गातील प्रतीके असतात.  उदा. हिरवा देव, वरसुबाई, उंबऱ्या देव, इत्यादी 

९) आदिवासींच्या पारंपारिक नृत्यांत महिला व पुरुष एकत्रितपणे नृत्य करतात. कांबड नृत्य, तारपा नृत्य, डांगी नृत्य इत्यादी. धनगर समाजातील धनगर नृत्यात फक्त पुरुष नृत्य करतात. आदिवासी समाजात मातृसत्ताक पद्धती असल्याने महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान संस्कृतीत दिलेले आहे. धनगर समाजात पितृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. 

१०) धनगर, रजपूत आणि मराठा समाज यांचे गोत्र  कुळी, वंश व प्रवर समान ती आर्यांनीच लिहिलेली आहे. 

             धनगर आणि आदिवासी जमाती यांच्यात संस्कृती, परंपरा, राहणीमान, रूढी, सामाजिक मुल्ये, सामाजिक ठेवण, भू-प्रदेश, प्रमाण लघुता, रक्तसंबंध, बोलीभाषा, जीवनपद्धती, अर्थव्यवस्था, धार्मिक आचरण, सामाजिक एकजिनसीपणा, कुलप्रतिकवाद, मूळ पुर्वाजापासून झालेली उत्पत्ती, देवक, वसतीस्थान, कुलाची कार्ये, आप्तसंबंध इत्यादी बाबतीत फरक आहे. त्यामुळे धनगर समाजाने असंविधानिक मागणी करून धनगर व आदिवासी असा वाद निर्माण करून आपल्या दोन्ही समाजापुढे असणाऱ्या मुलभूत आव्हानांकडे डोळेझाक करू नये. धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती पूर्वी सधन असल्याचे अनेक लिखित पुरावे उपलब्ध आहेत. बदलत्या काळाबरोबर जंगलविषयक कायदे व धोरण बदलल्याने मेंढ्या चरण्यासाठी उपलब्ध असलेले जंगल कमी झाले व  त्याचा विपरीत परिणाम धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीवर झालेला आहे. यात बदल करायचा असेल तर आदिवासी आरक्षण मिळविणे हेच एकमेव ध्येय आहे असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आदिवासी समाजाची राजकीय परिस्थिती न तपासता सामाजिक व आर्थिक परिस्थिती तपासणे योग्य राहील. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव योजना नाही. ती एक सामाजिक प्रतिनिधित्व देणारी संधी आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आज शरद पवार, सुप्रिया सुळे, महादेव जानकर, अण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर अशी अनके मंडळी धनगरांना आदिवासी आरक्षण मिळावे म्हणून आकांडतांडव करताना दिसून येत आहे. परंतु हीच मंडळी धनगरांच्या मुलभूत समस्यांवर बोलताना इतकी आक्रमक झालेली आपण पाहिलेली नाही. धनगर व आदिवासी समाजाच्या समस्या ह्या सामाजिक पातळीवरील आहेत. त्यांना सोडवायचे असेल तर सामाजिक पातळीवर विचार मंथन होणे आवश्यक आहे. आपल्या इतिहासातून योग्य ती प्रेरणा घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकारने नव्याने जंगल विषयक कायदे आणलेले आहेत, त्यातून धनगर व आदिवासींना वाचायचे असेल तर एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. जिथं जंगल अस्तित्वात नसेल, तिथे ना आदिवासी आपलं अस्तित्व टिकवू शकणार आहे, ना धनगर समाज. त्यामुळे राजकीय लोकांच्या षडयंत्रात दोन्ही समाज भरडले जात असून याचे भान दुर्दैवाने दोन्ही समाजात सामान्य लोकांना नाही. 

जय बिरसा 
जय राघोजी 
जय आदिवासी 
जय महाराष्ट्र 

© Aboriginal Voices

टीप: धनगर आरक्षणबाबत सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व pdf डाऊनलोड करून वाचा....


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.