रखमा भगत
गंगी लगीन होऊन गंभीरवाडीला नांदाया आली. एक दीड वर्षाच्या आत घरात पाळणा हालला. त्यामुळे सारं आनंदाचं वातावरण झालं होतं. वर्षाच्या फारकानं दुसऱ्यांदा घरात पाळणा हालला होता. ऊन, वारा, पाऊस झेलत ती दोन पोरांना सांभाळत आपला मोडका संसार उभा करण्याचे काम करत होती. सा-यांच्या नजरेत भरावं असं संसार गीत तीन जगायला सुरुवात केली होती. डोंगरावर शेत फुलवून घरात धान्याच्या राशी तिनं उभ्या केल्या होत्या.
सकाळ झाली होती....पोरं सर्व आटपून शाळेत गेली होती. सखा, गंगीचा नवरा, बैलांना घेऊन शेतात गेला होता. रोज पहाटेच अंगणात शेणाचा सडा घालणारी गंगी आज सूर्य डोक्यावर आला तरी घराच्या बाहेर आली नव्हती. आकाशात जणू काळे ढग जमावेत आणि मनात संकटाची चाहूल लागावी असंच काही तरी होत होतं. गंगीचं अंग जड पडलं होतं. उठायची इच्छा असूनही अंगात उठण्याची ताकद नव्हती. अंगावर मोठा डोंगर कोसळावा तसे तिचे अंग दाबून गेल्यासारखे झाले होते.
"गंगे....ए गंगे.....काय करती गं घरात....दिस पार डोक्यावं आला तरी तू काय उंबरा ओलांडीना आज....काय औदासा भरली का काय?" शेजारची सखू आवाज देत होती. परंतु रोज सर्वांना हाका मारणारी गंगी आज काहीच प्रतिसाद देत नव्हती.
सखूला वाटलं गंगी सकाळीच रानात लाकडं गव-या आणायला गेली असेल....म्हणून ती पण आपले काम उरकून घेण्यासाठी निघून गेली. घरात डोकावून नक्की काय भानगड आहे हे बघण्याची तसदी तीनं घेतली नाही.
सखूचा आवाज ऐकून गंगी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. अंथरुणातून उठून बाहेर येण्याचे त्राण तिच्या अंगात उरले नव्हते. तिला उठून खूप कामे पुरी करायची होती....पण अशक्तपणा तिला तसे करू देत नव्हता. मनोमन ती अनेक देवदेवतांचा धावा करत, परंतु सारे व्यर्थ....!
सकाळीच रानात बैलांना घेऊन गेलेला सखा दुपार झाली म्हणून भाकरीची वाट पाहू लागला. परंतु गंगी काय येत नव्हती. त्याच्या पोटात कावळे ओरडून थकले. भूकही आल्या पावलांनी माघारी फिरली होती. सखाने बैलांना आंब्याच्या झाडाखाली बांधले व बांधावर सावलीत बसून वाट पाहू लागला. परंतु दूरवर त्याला कोणी येताना दिसत नव्हते.
सकाळी शाळेत गेलेले पम्या आणि नाम्या बारा वाजता घरी आले. त्यांना जोराची भूक लागली होती. म्हणून त्यांनी घरात आल्या आल्या टोपल्याकडे आपला मोर्चा वळवला. टोपल्यावरील झाकण काढताच त्यांना त्यात काहीच हाती लागले नव्हते. अगदी त्वेषाने त्यांनी आईकडे जेवणासाठी हट्ट धरण्याचा प्रयत्न केला. आरडा करूनही आई काही प्रतिसाद देत नाही म्हणून पम्या आणि नाम्याने आईला हाताने हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. कोवळ्या मुलांना आईला नेमकं काय झालंय हे कळाले नव्हते, परंतु काही तरी बिनसलंय हे मात्र त्यांनी जाणलं होतं.
नाम्या लहान होता....परंतु चंचल होता. त्याने लगेच शेतात जाऊन आपल्या वडिलांना आईला काही तरी झालंय असा निरोप दिला. झाडाच्या बुंध्याला डोकं टेकवून निजलेला सखा इलेक्ट्रिक शॉक बसावा असा ताडकन उठला व पायात चपला न घालता धावत सुटला. रस्त्यातील काटे त्याला दिसत नव्हते.....गंगीचा हसरा चेहरा त्याला हाका मारत होता. आपल्याला निरोप द्यायला आलेला नाम्या आला कि नाही हे सुद्धा त्याने पाहिले नव्हते.
गंगीला काय झालं असेल या विचारात सखा काही वेळातच घरात आला. गंगीचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन काय झालं म्हणून विचारत होता. खूप इच्छा असूनही गंगीला काही शब्द फुटत नव्हते. नाम्याला शेताकडून येड्यागत पळताना पाहून गणप्या आणि धन्या त्याच्या मागं पळत घरे आले होते. गंगीची अवस्था पाहून त्यांनी गावातील एक जीप काही मिनिटात आणली. कोणाला काही कळायच्या आत गंगीला घेऊन गाडी तालुक्याला दवाखान्यात जाऊ लागली. सखा हतबल होऊन रडत होता. गणप्या सखाला धीर देत होता. नाम्या आणि पम्या हि निरागस मुलं आपली भूख विसरून आईला काय झालं असेल म्हणून एकमेकांना विचारत रडत होती.
एक तासात जीप दवाखान्याच्या दरवाजात उभी राहिली. गणप्या आणि सखाने उचलूनच गंगीला दवाखान्यात नेले. डॉक्टर काही तरी जादू करतील आणि गंगी माझ्याशी बोलेल असं सख्याला मनात वाटत होते. दिवसामागून दिवस जात होता. पम्या आणि नाम्या सखीकडे जेवत होते....आपल्या आईला काय झालंय हे त्यांना कोणी सांगत नव्हते.
दवाखान्यात चकरा मारून सखा वैतागला होता....परंतु गंगी काही त्याच्या बरोबर बोलत नव्हती. डॉक्टरपण आता सखाला पाहून उडवा उडवीची उत्तरे देत होते. सहा महिने पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी सखाला सांगितले कि तुम्ही गंगीला घरी घेऊन जा. ती कोणत्याही उपचाराला साथ देत नाही. तिचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत.
"तीचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत...." असे डॉक्टरचे शब्द ऐकताच सुखाच्या पायाखालची माती सरकली. त्याच्यावर मोठे आभाळ कोसळले होते. तो खूप रडत होता. नेहमी संकटात सोबत उभी असणारी गंगी आज मात्र त्याला आधार देत नव्हती. आईची वाट पाहणारी मुलं त्याला दिसत होती. त्यांचं कसं होईल या विचारानं सखा हतबल झाला होता. आता जावं आणि जीवाचं बरं वाईट करावं असं त्याला सारखं वाटत होतं. परंतु गंगीला असं सोडून पळून जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं.
संध्याकाळी गाडी करून सखानं गंगीला जड अंतकरणाने घरी आणले होते. त्याला माहीत होते आता पुढे काय होणार आहे ते....परंतु तो मुलांना धीर देत होता.
गंगीच्या आईला तिला घरी आणल्याची खबर मिळाली होती. पोटचा गोळा असा निपचित पडलेला तिला बघवणार नव्हता, परंतु दुसरा काही पर्याय नव्हता. ती चालतच भंडारद-याहून गंभीरवाडीला निघाली. चालत जाताना तिनं रखमा भगताला काय झालंय ते सांगितलं...... रखमा नात्यातलाच असल्याने त्याने आपल्या घरातील काही झाडपाल्याची औषधे पिशवीत टाकली व गंगीच्या आईबरोबर चालू लागला. सांच्या पहराला दोघे धावपळ करत गंभीरवाडीला पोहचले.
सखाने गंगीच्या आईला डॉक्टरने काय सांगितले ते रडक्या आवाजात सांगितले व ढसाढसा रडू लागला. रखमा सर्वांना धीर देत होता. रखमा जरी त्या भागात 'भगत' म्हणून प्रसिद्ध असला तरी तो कधी खोटे मंत्र मारून लोकांना फसवत नव्हता. आज पर्यंत त्याने अनेकांना आपल्या आजारातून बरे केले होते, परंतु कोणाकडून फुटी कवडी दक्षिणा म्हणून घेतली नव्हती. त्याला रानातल्या झाडपाल्याची अचूक माहिती होती.
रखमाने गंगीच्या डोळ्यात बघितले.....नाडी तपासली. काही वेळातच त्याने स्पष्ट केले कि गंगी लवकरच बरी होईल काही काळजी करू नका. त्याने आपल्या पिशवीतून काही झाडांची मुळं व काही भुकटी बाहेर काढली. आपले कुलदैवत कळसूआईचे नाव घेतले व त्याने गंगीच्या तोंडात ती भुकटी चिमूटभर टाकली. सखाला रखमा भगत देवदूत वाटत होता. कारण तोच एकमेव आता म्हणत होता कि गंगी लवकरच बरी होईल. त्याने सखाला काही औषधे कशी घ्यायची हे समजावून सांगितले. काही पथ्य व रोजचा आहार काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या.
रखमा भगताची औषधे सुरु होऊन पंधरा दिवस झाले होते. आता गंगी घरातल्या घरात काम करत होती. थोड्याच दिवसात गंगी आपल्या सोबत शेतात येणार या अपेक्षेने सखा जोमाने शेतात काम करत होता. सहा महिने आई आपल्या सोबत बोलली नव्हती, आता ती थोडी फार बोलू लागल्याने नाम्या व पम्या आनंदी होते.
पंधरा दिवस उलटल्यावर रखमा भगत स्वतः गंगीला भेटायला आला होता. घरात काम करणारी गंगी पाहून त्यालाही आपल्या सेवेचे सार्थक झाल्याचे वाटत होते. सखाने तर पाया पडून आभार व्यक्त केले. नाम्या व पम्या दोघेही बाबा आले बाबा आले म्हणून रखमा भगताच्या भोवती पिंगा घालत होते. पुन्हा पूर्वीचे सुखाचे व समाधानाचे दिवस आलेत असे सखा पुन्हा पुन्हा सांगत होता.
रखमा भगत हसत हसत काय खावे आणि काय खाऊ नये हे गंगीला सांगत होता. जेवणात पालेभाज्या, कडधान्य हे खाण्याचे आग्रहाने बोलत असताना रखमा भगत सखाच्या डोळ्यातील करुण भाव टिपत होता. दुपारची न्याहरी करून रखमा कोणतीही दक्षिणा न घेता आपल्या घराकडे निघाला होता. सखा फक्त रखमाच्या पाठमो-या आकृतीकडे पाहून मनोमन हजारदा पाया पडत होता. आज गंगी व नाम्या स्वता गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला आले होते.
© Raajoo Thokal
Aboriginal Voices
आपलीशी वाटणारी कथा.🙌✌️💗🙏
ReplyDeleteसंपूर्ण प्रसंग वाचला...वास्तविक आहे... वनस्पतीपेक्षा भारी काहीच नाही...एखादी वनस्पती किती मोठा आजार बरा करु शकते याची कल्पना सुद्धा करु शकत नाही... फक्त वर्माला कर्म मिळाले पाहिजे...
ReplyDeleteआपल्या समाजात आजही असी माणसं आहेत...
हे प्रयोग करणारी माणसं वयोवृद्ध होऊन...एक एक करून काळाच्या पडद्याआड जाऊन...ही माहिती एक दिवस लोप पावते की अशी शंका येत आहे... त्यासाठी वेळेत यावर समाजाने काही मार्ग निघेल का यावर विचार केला तर बरं होईल...
खूप छान पद्धतीने लेखन केले आहे... आणि खुप महत्वाचा विषय आहे... पुढील लिखाणासाठी खूप मनःपूर्वक शुभेच्छा... लिहीत रहा सरजी...🙏 जगन खोकले
अप्रतिम लेखन...प्रत्येक प्रसंग नंतर पुढे काय...उत्सुकता टिकवून ठेवण्यात सफल..रानातल्या माणसांना पुनश्च रानाकडे वळलं पाहीजे...जुनं ते सोनं ..जाणून घेतलं पाहीजे...
ReplyDelete