जव्हार संस्थान स्थापन झाल्यापासूनचा इतिहास तपासला तर बहामनी सुलतान, मोघल, पेशवे, मराठा, पोर्तुगीज, इंग्रज अशा विविध परकीय सत्तांशी जव्हारच्या तत्कालीन राजांनी संघर्ष केला. या संघर्षात कधी विजय झाला, तर कधी हार देखील पत्करावी लागली. बदलत्या काळानुसार जव्हार संस्थानची सीमा देखील बदलत गेली. सुरवातीच्या काळात पेठ, सुरगाणा, बागलाण येथपासून ते भिवंडी, कल्याण, वसई असा प्रदेश या संस्थानच्या अंतर्गत होता. जव्हार संस्थानच्या गादीचा काही प्रमाणात येथील महिलांनी देखील राज्यकारभार सांभाळलेला आहे. या राज्याला फाशीची शिक्षा देण्याचा देखील अधिकार होता.
जव्हार संस्थानच्या अंतर्गत अनेक किल्ले होते. तसेच परदेशात व्यापार देखील चालत असे. जव्हारच्या सरदाराने १७६० मध्ये अकोल्यातील रतनगड किल्ला जिंकून घेतल्याचा उल्लेख सापडतो.
इतर राज्यांच्या तुलनेत या राज्याचे महसुली उत्पन्न तसे कमी होते. कारण येथे पडणारा जोरदार पाऊस, तसेच प्रचंड जंगल त्यामुळे येथील शेतीचा पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. असे असताना या राज्याचा राज्यकारभार चालवणे तसे जिकरीचे काम होते.
जव्हार संस्थान लोकशाही मूल्ये पेरण्यात सदैव अग्रेसर होते. स्वातंत्र्यापूर्वी या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत होते. तर विविध शैक्षणिक संस्थांना राजश्रय प्राप्त होता.
आदिवासी संस्थान म्हणून याची असलेली स्वतंत्र ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी सखोल अशा संशोधनाची व साहित्य निर्मितीची गरज आहे.
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment