साधारण एक वर्षांपूर्वी मी पालघर जिल्ह्यात बदली मागितली आणि ती झाली. यात उद्देश होता की या भागातील आदिवासी संस्कृती, इतिहास, परंपरा, बोलीभाषा, शिक्षण यांचा अभ्यास करणे. यानुसार तेराव्या शतकापासूनचा खूप मोठा ऐतिहासिक वारसा मला येथे अभ्यासता आला.
काल सहज जुने पेपर वाचत असताना आपली शाळा ज्या दाभोन गावात आहे, त्याच्याशी निगडीत एक ऐतिहासिक बातमी वाचण्यात आली.
डहाणू, पालघरमधील दाभोन या छोट्याशा निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या गावात एक वर्षापासून काम करतोय. पण इंग्रजांच्या काळात या ठिकाणी काही लढाई झाली असेल असं काही कधी जाणवलं नव्हतं.
परंतु आज सहज जुने पेपर व त्यांची कात्रणं वाचत असताना डहाणूमधील दाभोन गावची ऐतिहासिक बातमी वाचनात आली आणि आपल्या या भागातील बदलीने आपण योग्य दिशेने जात असल्याची कल्पना समाधान देऊन गेली.
28 जून 1947 रोजी आलेल्या वारली बांधव पुन्हा युद्धाच्या मैदानात या बातमीच्या आशयाने या भागातील आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान समोर आले. आज आपणास या गावात इतके घनदाट जंगल दिसून येते, तर 1947 च्या दरम्यान किती जंगल असेल याची कल्पना आपण करू शकतो. या घनदाट जंगलात त्यावेळी इंग्रजांची घरे जाळून उठाव केल्याची ही बातमी आहे. नंतर इंग्रजांनी प्रचंड फौजफाटा मागवून येथील जंगलातील बंड दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आदिवासी बांधवांचा हा उठाव पुढेही चालूच होता.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि या पार्श्वभूमीवर हा झालेला उठाव या गावच्या ऐतिहासिक परंपरेत भर घालणारा आहे.
येथून जवळच एक गंभीरगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर भारमाजी चुंभाटे या वारली नायकाची सत्ता होती. या बाबी इतिहासाच्या पुस्तकात लुप्त झालेल्या आहेत. या शोधताना होणारा आनंद नक्कीच खूप समाधान देऊन जातो.
महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागात असे अनेक उठाव झालेले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
- राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment