पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. अंदमानच्या सहलीत चुनखडीने तयार झालेल्या बारतोग गुहा आणि बेरेन बेटावरचा जिवंत ज्वालामुखी बघायला जात होते. हा रस्ता सरकारने विशेष संरक्षण दिलेल्या जारवा आदिवासींसाठी राखीव असलेल्या जंगलांमधून जात होता. अद्यापही जवळजवळ आदिम स्थितीत राहणाऱ्या जारवांबद्दल वाचलं, ऐकलं होतं. रात्रीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे बंद असतो. पहाटे तपासणी नाक्यावर परवाना दाखवून आत सोडतात, या भागात वाहन थांववता येत नाही. पर्यटकांना खाली उतरायला परवानगी नसते. एकट्या वाहनाला प्रवेश नाही, गटाने जावे लागते. वाहनाचा वेगही विशिष्ट राखावा लागतो, गाड्यांच्या काचा बंद ठेवाव्या लागतात, जारवांची छायाचित्रं काढायला पूर्ण मनाई आहे... या सगळ्या सूचना बसमध्ये पुन्हा एकदा दिल्या गेल्या, जाताना पहाटेची वेळ होती. जारवांचं दर्शन काही झालं नाही, परतताना मात्र ते दिसले... आई आणि तिची तीन मुलं होती. चमकता काळा वर्ण, शिडशिडीत बांधा, कुरळे केस. कपाळावर लाल रंगाची नक्षी रंगवलेली. गळ्यात माळा. मुलांच्या अंगावर कपडे नव्हते. आईच्या अंगावर मात्र गुलाबी रंगाचा ढगळ फ्रॉक होता. बस शेजारून जाताना मुलं बसबरोबर धावली. सूचना बाजूला ठेवून बसमधून कुणीतरी बिस्किटांचे पुडे फेकले, कुणी चिप्सची पाकिटं, फ्रॉकवाली बाई भूक लागल्याच्या खुणा करत असताना बस वेगाने पुढे गेली. काही क्षणांचा तो अनुभव थरारून टाकणारा होता. माणूस म्हणून अत्यंत शरम वाटली. हजारो वर्षांपासून तिथं राहणाऱ्या त्या जंगलाचे राजे असलेल्या जारवांना बाहेरून आलेले बेपर्वा आणि बेशिस्त पर्यटक भिकाऱ्यांसारखं वागवत होते... त्यानंतर अंदमानची आठवण निघाली की बसमागे धावणारी अन् फेकलेला खाऊ गोळा करणारी मुलं आठवत. जारवांची आठवण पुन्हा येण्यासाठी निमित्त ठरली गेल्या पंधरवड्यातली घटना, अंदमानातील जारवा आदिवासी समूहातील १९ सदस्यांना प्रथमच निवडणूक ओळखपत्रं देण्यात आली. अंदमान निकोबारचे मुख्य सचिव चंद्रभूषण कुमार यांनी स्वतः जातीने ही ओळखपत्रं त्यांना दिली. अत्यंत एकांतप्रिय समजल्या जाणाऱ्या जारवा आदिवासींना नागरिकत्वाचा अधिकृत पुरावा प्रदान करून त्यांना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेतलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. दक्षिण अंदमान जिल्ह्यातील जिकांतांगमधील जारवांच्या वस्तीवर जाऊन त्यांना ही ओळखपत्रं देण्यात आली. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. त्यांच्या दैनंदिन जीवनात घुसखोरी कमीत कमी करणं महत्त्वाचं होतं, तसंच भारताचे नागरिक म्हणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणंही आवश्यक होतं. या दोन्ही बाबी साध्य करण्यात यश आलं. जारवांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला कोणतीही बाधा येक न देता हे करणं खरोखर कठीण होतं, पण ते साध्य होऊ शकलं. या सगळ्यांत मोठी भूमिका बजावली ती 'अंदमान आदिम जनजाती विकास समिती' ने. त्यांनी जारवा समुदायापर्यंत पोहोचून निडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करून प्रक्रिया सुलभ केली. यासाठी त्यांच्याशी जारवांच्या पारंपारिक पद्धतीनं संवाद साधला गेला आणि त्यानंतर जे १९ जण तयार झाले, त्यांना ओळखपत्रं दिली गेली. जारवा ही अंदमान बेटांवरच्या स्थानिक जमातींपैकी एक. दक्षिण आणि मध्य अंदमान बेटांच्या पश्चिम किनाऱ्यावर ते राहत्तात. आता केवळ २५० ते ४०० जारवा उरले आहेत. जारवांसह ग्रेट अंदमानी, ओंगे आणि सेंटिनेलीज या जमाती हजारो वर्षांपूर्वी आफ्रिकेतून या बेटांवर आल्या, असं मानलं जातं. म्हणजे आज आपण भारतीय भूमी म्हणतो, त्यावरचे हे सगळ्यात पहिले रहिवासी ठरतात. जारवा पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहेत. ते मासेमारी आणि शिकार करतात. सोबत फळ आणि मधही गोळा करतात. पूर्णपणे स्वयंपूर्ण जीवनशैली जगणारे जारवा बाहेरच्या लोकांवर अजिबात विश्वास टाकत नव्हते, मात्र गेल्या पाव शतकात यात थोडा बदल घडनाता दिसतो आहे. दोन वर्षांपूर्वी डॉ. रतन चंद्राकर यांना पद्मश्री मिळाली ती या जारावा समुदायासाठी केलेल्या कामामुळे. त्यांना जारवांचे डॉक्टर म्हणून ओळखलं जातं. डॉ. चंद्राकर मूळचे १९८८मध्ये ते अंदमानात आले. त्यावेळी घनदाट जंगलात राहणारे जारवा नुकतेच बाहेर येऊ लागले होते. सरकारने त्यांच्यासाठी काम करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोपवली, पण बाहेरच्या माणसांविषयी जारवांच्या मनात प्रचंड भीती आणि अविश्वास होता, एक असा प्रसंग घडला की अनेक वर्षांचा हा अविश्वास दूर झाला. १९९६मध्ये जारवा समुदायातली काही मुलं एका रहिवाशाच्या बागेतले फणस पळवून न्यायचा प्रयत्न करत असताना मालक ओरडत बाहेर आला आणि ही मुलं पळाली. त्या धावपळीत एका मुलगा धडपडला आणि त्याचा पाय चांगलाच दुखावला, फ्रैंक्चर झालं होतं, प्रचंड वेदना होत होत्या. पण एवढं होऊनही तो कुणाकडून पाणीही घेत नव्हता. हा १५ वर्षांचा मुलगा होता एन्मई. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. लोकांनी इतकी प्रचंड गर्दी केली की पोलिसांना लाठीमार करावा लागला, हे लोक पहिल्यांदाच 'जारवा' बघत होते. डॉक्टर आणि इतर स्टाफ बघून एन्मई थररत असे. डॉक्टरांनी लावलेलं प्लास्टर त्यानं फाडून फेकलं, खाणंपिणं नाकारलं. अखेर त्याला जिवंत मासे दाखवले आणि नंतर ते शिजवून दिले तेव्हा तो शांत झाला. उपचार करून पाच महिन्यांनंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. त्यानं हा अनुभव त्याच्या लोकांना सांगितला आणि त्यानंतर जारवांचा बाहेरच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हे लोक हळूहळू जंगलाच्या बाहेर पडू लागले. डॉक्टरांनी जारवांची भाषा शिकून घेतली. त्यांच्या चालीरीती समजून घेतल्या आणि त्यानंतर बाहेरच्या माणसांशी अंतर राखून का होईना, जारवांचा संवाद सुरू झाला. जारवांना वनस्पतींचं प्रचंड ज्ञान आहे. अनेक वनस्पतींचा वापर ते औषध म्हणून करतात. २००४च्या त्सुनामीदरम्यान अंदमानमध्ये प्रचंड नुकसान झालं, मनुष्यहानीही झाली. त्यावेळी जारवांचं काय झालं असेल, असं भय सर्वांनाच वाटत होतं, पण त्यावेळी एकाही जारवाने प्राण गमावला नव्हता, हे नंतर समोर आलं. निसर्गाचे अफाट ज्ञान त्यांना आहे! त्यांची प्रसूतीची पद्धतही एकदम शास्त्रोक्त आहे. पूर्वी न्युमोनियानं मोठ्या प्रमाणात मुलांचे मृत्यू होत. एकदा एका आजारी बाळाला इंजेक्शन देऊन बरं वाटलं, बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर आया आणि मुलांची दवाखान्याबाहेर गर्दी होऊ लागली. पण जसजसे जारवा अन्य लोकांबरोबर मिसळू लागले तसतसे त्यांना गोवर, गालगुंड, काविळीसारखे रोग होऊ लागले. या आजारांशी त्यांचा आधी काही संबंध आला नसल्याने त्यांच्यात त्याविरोधात प्रतिकारशक्तीच तयार झालेली नव्हती. या साथींत अनेकजण दगावले. जारवा कुटुंबवत्सल आहेत. आयुष्यभर जोडीदारासोबत राहतात, जोडीदार मरण पावला तरच दुसरा जोडीदार शोधला जातो. मासे, रानडुकराचं मांस, फळं आणि मध हे त्यांच मुख्य अन्न. तेल, मीठ किंवा कोणत्याही मसाल्यांचा वापर ते खाण्यात करत नाहीत. ते अंगावर कोणतंही वस्त्र घालत नाहीत, पण अलीकडे त्यांच्या अंगावर कपडे दिसू लागले आहेत. सरकारी किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था त्यांना कपडे देतात. ते सर्वोच्च अशा अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवतात. मृत्यूनंतरचं आयुष्य, स्वर्ग यावरही त्यांचा विश्वास आहे. मरण पावलेल्या प्रिय व्यक्तींची हाडं दागिन्यांसारखी अंगावर घालतात. ते समुद्राची गाणी गातात. नाचतात. त्यांचे वेगवेगळे खेळ आहेत. हातांवर उभं राहून दूर अंतरापर्यंत चालत जाण्याचा एक खेळ ते तासंतास खेळतात. एकेकाळी जमिनीवर घरंगळत जाणारा फूटबॉल बघून घाबरून पळत सुटणारे जारवा आता फुटबॉल, व्हॉलीबॉलही खेळू लागलेत. जारवांच्या भाषेला लिपी नाही, मात्र व्याकरण आहे. ते अतिशय बुद्धिमान आहेत. परकी भाषा, शब्द ते पटकन शिकतात. त्यांचा वापर करून संवाद साधतात, शिकू शकतात. त्यांनी बाहेरच्या जगाशी दोस्ती करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा बाहेरच्या जगाने मात्र त्यांना अत्यंत हीन पद्धतीनं वागवलं. काही पर्यटन कंपन्यांनी चक्क 'जारवा दर्शन'सारख्या सहली काढल्या, त्यांना फुटकळ खाऊ, कपडे देऊ करून त्यांची शस्त्रं, वस्तू पळवल्या. मुलं, महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढले. अशा घटना समोर आल्यानंतर सरकारने कडक नियम केले आहेत, तरी पर्यटकांच्या बेजबाबदारपणाच्या घटना अधूनमधून घडतातच. संपूर्णपणे निसर्गाशी एकरूप झालेला स्वयंपूर्ण समुदाय त्यांच्या पद्धतीने जगत असताना, त्यात तथाकथित पुढारलेल्या समुदायाने हस्तक्षेप करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं याला तज्ज्ञांची, जागतिक संस्थांची मान्यता नाही. पण हेच जर त्यांच्या संपूर्ण सहमतीने, त्यांच्या वेगाने आणि त्यांच्या इच्छेने होत असेल त्यांना सामावून घेतलं पाहिजे. म्हणून... भारतीय प्रजासत्ताकात नव्या १९ मतदारांचं स्वागत !
- प्रगती वानखेले
0 comments :
Post a Comment