जंगलाची आग……जनजागृतीची गरज
"राम्या काका, लोक कशा माजीं नाची रया.आपुबी गंमत दखाला चाला…….” असे म्हणून आपली आदिवासी माणसे कोणताही विचार न करता कार्यक्रमाची मजा घेण्यासाठी जातात. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे जाती-धर्माचे विष कालवलेले आढळून येत नाही. नक्षत्रांचं देणं म्हणून कि काय आजपर्यंत आदिवासी सर्व मानवजातीसोबत जन्माचा प्रामाणिक राहिला…..माणसेच सोडा…जंगलाशीसुद्धा कधी त्याने बेईमानी केली नाही. सर्वोच्च चांगुलपणा जो आपल्या संस्कृतीने आजपर्यंत जपलेला आहे, त्याला कुठेतरी आधुनिकतेची नजर लागल्यागत झाले आहे. थोड्याशा मोहापायी आपल्यातील काही लोकं जंगलातील संपत्ती मग त्यात असणारी झाडे, औषधी वनस्पती, पक्षी, प्राणी आदींचा व्यावसायिक दृष्टीकोनातून बाजार मांडू लागलेत. ज्या निसर्गावर आपले अस्तित्व आज टिकून आहे, त्याला उन्हाळ्यात आग लावण्याचे काम केले जाते. जंगलाला लावलेल्या आगीत माणसाला काही प्राप्त होत नाही. परंतु यात अनेक पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, वृक्ष यांची आतोनात हानी होते. कदाचित यात आपणास आज आपले कोणतेही नुकसान दिसत नसेल, म्हणून याकडे आपण पाहिजे त्या प्रमाणात काटेकोरपणे पाहत नाही. परंतु या आगीमध्ये नष्ट झालेल्या वनस्पती, पक्षी, प्राणी हि आपली एक प्रकारची संपत्ती आपल्या भावी पिढ्यांच्या दृष्टीने खूप मोठे नुकसान ठरू शकते. दिवसेंदिवस जर अशाच प्रकारे यासर्व नैसर्गिक घटकांचा -हास होत राहिला….तर उद्याचा आदिवासी जंगलापासून पोरका झाल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी भविष्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही…..कदाचित आपण एकटे या सर्व बाबींवर नियंत्रण आणू शकणार नाही….परंतु आज जर त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले तर कदाचित उद्या यातून अनेक जागृत तरुण जोडले जावून मोठ्या प्रमाणात जंगलाचे संरक्षण केले जावू शकते. आग विझविणे कदाचित आपणास शक्य होणार नाही. परंतु आग लावू शकणा-या व्यक्तींचे आपण प्रबोधन नक्की करू शकतो. आदिवासी समाजाची हि संपत्ती वाचविणे काळाची गरज आहे.
©Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment