डहाणू परिसर भटकंती

डहाणू परिसर भटकंती

दि.३० मार्च २०१४ व ३१ मार्च २०१४
आयुश परिवाराचा एक ध्येयवेडा तरुण…..करण जनार्दन पवार…, संगणक क्षेत्रातील पदव्या असूनही अगदीच आदिवासी समाजासाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने अगदी वेडा झालेला तरुण……याला २९ मार्चला फोन केला आणि निश्चित केले कि आपण दोघे डहाणूला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आहोत……अगदी कोणताही विचार न करता त्याने होकार दिला. त्याला थोडक्यात का जायचे आहे याची कल्पना दिली आणि आपण बाईकवर जाणार आहोत असे सांगितले. ठाण्यात राहणा-या दुस-या एखाद्या मित्राला जर असे भर उन्हात कुठे डोंगरावर आणि ते ही बाईकने जायचे आहे असे म्हटलो असतो तर कदाचित त्याने अनेक कारणे सांगून माझे हि नियोजन बदलवले असते…..परंतु आदिवासी संस्कृतीचा ध्यास घेतलेला करण उर्फ उपटसोंड्या लगेच तयार झाला…..तेव्हाच मला वाटले होते कि याच्याबरोबर फिरायला मज्जा येणार……
ठरल्याप्रमाणे मी माझी डिस्कव्हर १००cc सकाळी ५ वाजता सुरु केली आणि
माळशेज घाटाच्या दिशेने गाडीच्या प्रकाशात माझी वाट शोधत निघालो……जरी उन्हाळा
असला तरी माळशेज घाट परिसर अगदी अंगाला झोंबत होता थंडीने….तसाच काहीसा हळुवार
एकटाच घाटात निसर्ग न्याहाळत पुढे सरकत होतो. मनात अंधार काही तरी प्रकाशमान करण्याची
प्रेरणा देत होता…..तसा माळशेज घाटाने अशा अंधारात एकटे कोणी फिरायला म्हणून
धजावत नाही….पण मला एक वेडच लागले आहे…त्यामुळे अनेकदा मी विचार न करता
येणा-या परिणामांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी करूनच असतो…..प्रवास सुरु
असतानाच काही वेळाने सूर्यदेवाने माझ्यावर किरणरुपी आशीर्वादांची बरसात केली…त्यात न्हाऊन निघालेला निसर्ग आणि मुरबाडचा परिसर…..नाणे घाटाचा अंगठा….जीवधनचे वानरलिंग मला प्रोत्साहन देत होते……त्यात मध्येच अगदीच रस्त्याच्या कडेला मोहाची फुले गोळा करणारी एक वयस्कर आजी दिसली……तो मोहाच्या फुलांचा सुगंध आणि आजीची फुले गोळा करण्याची लगबग मला क्षणभर थांबून क्लिक करण्याचा मोह धरत होती…..परंतु पुढे उशीर होईल या विचाराने हा अनमोल ठेवा मी क्लिक करू शकलो नाही…..सकाळी आठच्या सुमारास दूरूनच उंच इमारती, रेल्वेचा आवाज मला कल्याण जवळ आल्याची सुचना देत होते……शहर म्हटले कि मला धस्स होते…..नेहमीच गोंधळ मनात निर्माण करणारी हि संस्कृती तशी मला कधी आवडलीच नाही….परंतु अलीकडच्या काळात या गोंधळातही सह्याद्रीविषयी सकारात्मक दृष्टीकोन जपणारी काही घ्येयवेडी मित्रमंडळी भेटल्याने आता काहीसा आपुलकीचा सूर होता….गर्दीतून वाट काढत कसाबसा पोलिसांची नजर चुकवत कल्याण बसडेपोत पोहचलो….करणला फोन करून तिथे येण्यास सांगितले…त्यानेही दहा-पंधरा मिनिटात येतो असे सांगून फोन ठेवला.

कल्याण बस डेपो म्हटल्यावर माणसांइतकीच गाड्यांची गर्दी……अगदीच थोडावेळ थांबलो परंतु शहरी जीवनाची बस पकडण्यासाठी असलेली धावपळ मनाला सुन्न करून गेली. किती कष्ट आहेत या जीवनात काहीही मिळविण्यासाठी याची जाण झाली……बसण्याचे सोडा….बसमध्ये पाय ठेवायला जागा मिळाली याचे प्रवाशांच्या चेह-यावरील समाधान खरच मला खूपच भावले……त्याचबरोबर एवढ्या गर्दीत तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैशांची मागणी करणारा कंडक्टर पाहून तर मी किती सुखी आहे याची कल्पना मनाला आल्हाददायक करून गेली. काही वेळातच करणचा फोन आला…त्याला वाटले मी गेटजवळच उभा असेल…म्हणून तो कदाचित तिथेच मला शोधत होता…..परंतु गावाच्या मातीत लहानाचा मोठा झालेला मी अजूनही शहरी जीवनात पाहिजे तसा मिसळत नाही……नाही तसा प्रयत्न करूनही मन माझे त्यासाठी तयार होत नाही…..म्हणून काहीसा अगदीच मागच्या बाजूला एका कोप-यात मी उभा आहे असे त्याला सांगितले आणि तो लागलीच आला. आल्यानंतर त्याने नमस्कार केला….मला वाटले तो अगदीच फ्रेस होवून आला असेल…..परंतु शहरी तरुणांचा दिवस हा सूर्याच्या उगवण्याबरोबर क्वचित सुरु होतो याची कल्पना मला आली……त्याला कल्याणला बोलाविण्याचे कारण म्हणजे मला बाईक घेवून ठाण्याला पोहोचणे कदापि शक्य होणार नव्हते म्हणून…..त्याला गाडीची चावी देवून पुढचा प्रवास सुरु करण्यास सांगितले. त्याच्यासोबत त्याच्या घरी आलो……घरी आल्यानंतर कळाले कि त्याचे वडील पोलीस खात्यात नोकरी आहेत…..मग थोडी भीती वाटली….कारण पोलीस म्हटल्यावर आता डोकेदुखी वाजणार असेच वाटले……परंतु त्याच्या वडिलांना भेटल्यानंतर असे काही जाणवले नाही…..आदिवासी संस्कृती जतन केले गेले पाहिजे हा त्यांचा विचार माझ्या मनाला भिडला आणि मग काय मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या……आजच्या तरुणांनी समाजासाठी नक्कीच लेखन काम, फोटो, व्हिडीओ अशी महत्त्वाची कामे केली पाहिजेत हा त्यांचा विचार प्रोत्साहन देणारा ठरला…..करणचे आवरले…..त्याच्या घरातील वारली चित्रकलेची त्याच्याकडून थोडी माहिती घेतली आणि आम्ही डहाणूच्या दिशेने प्रवासास सुरुवात केली….वाटेत एक वणवा पेटत असल्याचे चित्र मनाची राखरांगोळी करत होते……पण काय करणार वणवा पेटून आता विझला होता…..पण धूर माझ्या मनात कायमचा साठला होता. लोकांची हि क्रूर मानसिकता बदलण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होण्याची गरज मनाला चाटून गेली.

करणची आणि माझी तशी दुसरीच भेट…परंतु आयुशच्या व्यासपिठावर आम्ही दोघेही खूप दिवसांपासून काम करतोय….तो तसा लोकांमध्ये जावून काम करत असल्याने त्याला ओळखणारे अधिक आहेत….माझी भूमिका हि पडद्यामागची असल्याने मला कोणी ओळखत नाही…..सचिन हा आयुशचा निर्माता असूनही आमची तशी प्रत्यक्ष भेट नाही…परंतु सामाजिक विचार मिळतेजुळते असल्याने अगदीच विचारांचा जवळचा संबंध जपलाय…..मुंबईच्या इमारती जसजशा मागे पडत होत्या तसतसा मी मोकळा श्वास घेत होतो…..परंतु दुपारचा सूर्य डोक्यावर आग ओकत असल्याने प्रवास काहीसा असह्य होत होता……आम्ही ड्रायव्हिंग आदलून-बदलून करत होतो. त्यामुळे काहीसा प्रवास बरा वाटत होता.

आदिवासी एकता परिषदेची बैठक असल्याने सुनील प-हाड व काही सामाजिक कार्यात सक्रीय असणा-या व्यक्ती आपणास भेटू शकतील असा विचार व्यक्त करून करणने भेट द्यायची का असा प्रश्न केला…मी लागलीच होकार दिला…..काहीशी वेडीवाकडी वळणे व खड्ड्यांतून जाणारा रस्ता पार करत आम्ही त्यांच्या कार्यालयात पोहचलो……मी त्यातील काही जणांना ओळखत होतो….परंतु बैठकीत महत्त्वाची चर्चा सुरु असल्याने आम्ही शांतपणे सहभागी झालो. कारणने काही क्लिक घेतले…..थोडावेळ थांबून त्यांचे विचार ऐकले……परंतु
पुढे जाण्यास आम्हाला उशीर होत असल्याने आम्ही बैठक अर्ध्यावर सोडून पुढील प्रवासास सुरुवात केली…..बैठकीत तशी कुणाबरोबर चर्चा न करताच आम्ही बाहेर पडलो असल्याने कुणाशी समोरासमोर ओळख नाही झाली.

प्रवासात करण मला आदिवासी एकता परिषदेच्या आजपर्यंतच्या कार्याची ओळख करून देत होता….त्याचे बोलणे ऐकत असताना त्यांच्या कार्याचे महत्त्व अधिक असल्याचा विचार येथील परिस्थिती पाहून माझ्या मनात डोकावत होता……प्रत्यक्ष कार्य करण्यावर या संघटनेचा भर असल्याचे करणने सांगितल्याने मला बरे वाटले.

आता डहाणू परिसरातील आदिवासी जीवन मला रस्त्याने जाताना स्पष्ट दिसू लागले होते…..पेहराव, जीवनशैली, घरांची रचना, बोली, व्यवसाय, वनस्पती या बाबींवर माझी नजर अधिक विचारपूर्वक पडत होती. त्यात सिंधीच्या झाडावरील मडके माझे चित्त विचलित करत होते….तेव्हा करणने त्यात ताडी गोळा केली जाते असे सांगितले……आणि डहाणू परिसरात सर्वाधिक ताडीचे उत्पादन केले जाते असेही सांगितले. २५ रुपये प्रमाणे स्थानिकांना याचा भाव मिळत असल्याने एक चांगला रोजगार येथील लोकांना उपलब्ध झाला आहे.

समुद्र किनारा पाहायचा कि इतर काही असा प्रश्न करणने केला आणि त्याला चटकन सांगितले आपण समुद्रकिनारा नक्कीच पाहायला नाही आलो…..मला आदिवासी संस्कृती दाखव असा विचार त्याला व्यक्त केला…..तरी पण नक्की काय पाहायचे असा दुसरा प्रश्न करताच त्याला मी वारली चित्रकला जर पाहायला मिळाली तर बरे होईल असे सांगितले. लागलीच त्याने मग खानवेल, दादरा व नगर हवेली येथील एका ठिकाणी आपणास मोठ्या प्रमाणात वारली चित्रकला पाहायला मिळेल असे सांगितले……मी नवीन असल्याने त्याला होकार दिला….त्यानेही आपली गाडी तिकडे वळवली……महाराष्ट्रातील खड्डेमय रस्त्यांची सवय झाल्याने सरकारच्या नाकर्तेपणाची तशी कधी चीड मनात आली नाही पण जेव्हा दादरा व नगर हवेलीत प्रवेश केला आणि तेथील रस्ते नजरेस पडले…तेव्हा काहीसा मला माझ्या सरकारचा तिरस्कार वाटू लागला…..

इतका मोठा फरक अनुभवल्यानंतर मी मनोमन अशाच बदलांची अपेक्षा माझ्या राज्यात असावी अशी अपेक्षा मनातल्या मनात व्यक्त करत होतो….वृक्षांची संख्या अधिक असल्याने वातावरण मनाला प्रसन्न करत होतो….शेवटी आम्ही वारली पेंटिंग असलेल्या प्रकृती परिचय केंद्र, खानवेल येथे पोहचलो….प्रत्येकी फक्त दहा रुपये तिकीट काढून आम्ही प्रवेश केला…..क्षणात समोर वारली चित्रकला दिसल्याने मन माझे त्यावर खिळले…..करण त्या चित्रांची माहिती करून देत होता….मी अधिकाधिक पेंटिंग क्लिक करण्याचा प्रयत्न करत होतो…..येथील चित्रशैली, बागेची स्वच्छता, बागेतील फुलझाडे, मचाण, हिरवळ सर्वकाही मनात आल्याचे चीज झाले असे विचार निर्माण करत होते. काजूचे झाड पाहून मन प्रसन्न होत होते. या बागेतील एका खोलीत अगदी सजावट करून आदिवासी जीवनशैली, प्राणी संपदा, वृक्ष, पक्षी, साप, फुले यांची माहिती अतिशय सुबकरीतीने मांडलेली होती. काहीसा प्रेमात पडल्यागत अवस्था माझी झाली.
पाहण्यासारखे खूप काही होते परंतु वेळ कमी होता आणि आम्हाला शेजारीच
असलेल्या तितली गार्डनमध्येही जायचे होते….इतक्या उन्हाळ्यात फुलपाखरे असतील का
हि उत्सुकता अधिक ताणली जात होती…..म्हणून आम्ही लगेच तिकडे गेलो.

तितली गार्डनमध्ये मोफत प्रवेश मिळाला….आतमध्ये प्रवेश करताच स्वर्गसुख लाभले….वेगवेगळ्या वनस्पती, फुलझाडे आणि त्यावर बागडणारी फुलपाखरे पाहून क्षणभंगुर जगाचा जणू मला विसर पडला….रंगी-बेरंगी फुलपाखरे क्लिक करण्यासाठी मला कसरत करावी लागत होती. परंतु एक क्लिक केल्यानंतर मिळणारा आनंद गगनभेदी होता हे नक्की…..कमळाची फुले पाहत असताना तेथे काम करणा-या व्यक्तीने आवाज दिला….भाईसाहब बंद करनेका टाईम हो गया…चलो…निकलो…! तसा त्याच्या बोलण्याचा मला राग आला नाही…कारण सहा वाजले होते आणि तो त्याचे काम वेळेत पूर्ण करत होता….त्यात त्याची मेहनत गार्डनमध्ये कणाकणात भरलेली असल्याने मला इतकी सुंदर बाग पाहायला मिळाली होती….अगदी थोड्यावेळात का होईना मला खूप काही जगायला मिळाले होते.

बुडतीच्या मार्गावर निघालेला सूर्य पाहून आम्ही आता मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला…..कारण सकाळपासून मी केलेला प्रवास आता काही प्रमाणात थकवा निर्माण करत होता….शेवटी पूर्ण अंधार पडायच्या आत आम्ही करणच्या काकाच्या घरी मोडगाव येथे आलो. करणचे काका, मोडगाव (पाटीलपाडा) येथील चिंतामण भिका पवार, पोस्टमन आणि मंडप डेकोरेटर, म्हणजे एक जाणते नेतृत्व. त्यांच्याशी बोलत, गप्पा मारत मी ओळख करून घेत होतो….व सभोवतालचा परिसर डोळ्यात साठवत होतो. येथील घरे खास ग्रामीण जीवनशैली दर्शविणारी होती. एक स्वतंत्र घर….त्याच्या आजूबाजूला खूप सारा मोकळा परिसर….त्याला लाकडी फांद्यांनी घातलेले कुंपण….मध्येच एक मचाण…त्यावर असलेला भाताचा पेंढा…..त्याच्याखाली अडकवेलेले शिके व त्यात ठेवलेले मडके पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. लहान असताना माझ्या मामाच्या गावाला अशा प्रकारचे जीवन मी जगलेलो आहे. त्या आठवणी क्षणार्धात ताज्या झाल्या.

साहित्य ठेवून आम्ही थोडे फ्रेश झालो…काकांशी गप्पा मारून मग जेवणासाठी काय हवे अशी विचारणा करण्यात आली. साहजिकच इकडे कोणी पाहुणा आला तर नॉन-व्हेज करण्याची प्रथा प्रचलित आहे आणि सोबत ताडी….. परंतु मी शुद्ध शाकाहारी असल्याने त्यांना आपला बेत बदलणे भाग पडले……ताडीचा भरलेला ग्लास मी परत पाठविला……ग्रामीण भागात आहारामध्ये प्रामुख्याने वरण-भात हा मेन्यू केला जातो. त्याप्रमाणे बटाट्याची भाजी, वरण-भात यावर ताव मारून आम्ही आमची दिवसभराची पोटाची भूक भागवली….!

काका-काकुंचा स्वभाव अगदीच मनमोकळा होता…..आपापसात बोलत असताना वापरण्यात येणारी भाषा समजण्यासाठी मी मेंदूला अधिक ताण देत होतो….काही कळाल्यानंतर खूप उल्हासित होत होतो….जीवनशैली ग्रामीण….आदिवासी…….परंतु जगण्यात आगदीच दिलखुलासपणा जपलेला….पाहुण्याला काही कमी तर नाही ना पडले असा प्रश्न कितीदा विचारला असेल काय माहित…..किती आपलेपणा होता वागण्यात….निसर्गाने या माणसांमध्ये हा जो चांगुलपणा भरलाय….तोच भावतो मला नेहमी…म्हणून वेळात वेळ काढून मी अशाच डोंगरद-यात माणुसकी जपणा-या माणसांत येत असतो….माणुसकी जगायला. दिवसभर कष्टाची कामे करून थकल्याने घरातील सर्वजण जेवण आटपून झोपी गेले…..मी आणि करण मस्त बाहेर मोकळ्या हवेत गप्पा मारत होतो….एकमेकांच्या आवडी-निवडी, कुटुंब यांची माहिती करून घेत होतो….तसा मी नेहमी बडबड करणारा…..परंतु यावेळेस म्हटले चला करणचे ऐकुयात……त्यानेही मनाच्या गुलदस्त्यात असलेल्या अनेक आठवणी उलगडून सांगितल्या……आठवणींची अनेक पाने चाळत असताना आमच्यातील मैत्री नकळतपणे अधिक प्रगल्भ होत होती……त्याच्या कॉलेजच्या आठवणी काही अपवाद वगळला तर माझ्यासारख्याच होत्या…..अगदीच ‘राडा’स्टाईल जगणे होते कधीकाळी…..जुने काही फोटो…त्यातील हेअरस्टाईल थोड्याअधिक फरकाने माझ्या सारखीच होती……अनेक गप्पांमधून मग विषयाची रंगत आदिवासीपणाची नस पकडत होती…..यातून पुढे सा-याच बाबी अगदी एकाच व्यासपिठावराच्या असल्यागत वाटत होत्या. शेवटी….उद्याची आठवण झाली आणि विषय आवरते घेत झोपण्यास जायला हवे असा विचार मांडला….सकाळी लवकर उठून महालक्ष्मी गडावर जायचे ठरले.

दि.३१ मार्च २०१४ रोजी सहाचा अलार्म वाजला पण आम्ही दोघेही उठलो नाही…..कालचा प्रवास आज झोपेच्या माध्यमातून व्यक्त होत होता…..शेवटी न राहवून सात वाजता मी उठलो व करणलाही उठवले….तसा क्वचितच तो इतक्या सकाळी उठत असेल परंतु आज लगेच उठला होता…..सकाळचे प्रसन्न वातावरण पाहून आंघोळ…चहा…नाष्टा न करताच आम्ही दोघे क्यामिरा घेऊन फोटो काढायला बाहेर पडलो……जमिनीवर पडलेली पाने….फुले….रंगी-बेरंगी पक्षी असे अनेक क्लिक मनसोक्तपणे घेत होतो…..सकाळच्या प्रहरी या भागात झाडाची बाळलेली पाने गोळा करणा-या स्त्रिया परिसरात दिसत होत्या….हे जीवन क्यामि-यात टिपण्याचा प्रयत्न करणार…तेवढ्यात आम्हाला पाहून त्यांनी आपली कामेच थांबवली….कोणी तरी सरकारी अधिकारी जमीन मोजण्यासाठी आलेले आहेत….या भीतीने अनेक महिला क्षणात गायब देखील झाल्या……थोडावेळ भटकंती केल्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी घराकडे आलो.
काकूंनी पाणी गरम केलेले होते…..मस्त उघड्यावर निसर्गाच्या सहवासात…पक्ष्यांच्या किलबीलाटात अंघोळ केली…..तो पर्यंत करण कोरा चहा चुलीवर उकळवून पीत बसला होता…..त्याची आंघोळ होत नाही तोच तांदळाच्या भाकरी व बटाट्याची भाजी हजर झाली होती. घरी इतकी सोय नाही इतके आदरातिथ्य पाहून मन भारावलेले होते…..मनोमन अशीच माणसे मला नित्य लाभोत अशी निसर्गदेवतेला प्रार्थना करत होतो.
सोमवारी सिल्व्हासा परिसरातील अभयारण्य व म्युझींअम पाहण्याचे नियोजन केले व त्यानुसार आम्ही प्रवास सुरु केला…परंतु पोहचल्यानंतर काहीसी निराशा झेलावी लागली…सिल्व्हासा परिसरातील अनेक महत्त्वाची ठिकाणी सोमवारी बंद असतात…हे समजल्याने काहीसा ताण आला…परंतु भटकेच आम्ही…थोडेच थांबणार होतो…..लगेच गाडी फिरवून परत महालक्ष्मी गडाकडे निघालो…..रस्त्याने दादरा व नगर हवेली येथील काही बगीचे बघितले….आपल्यापेक्षा त्यांच्याकडील स्वच्छता पाहून खूप हायसे वाटले…..गुजराती…मराठी…हिंदी….वारली…. अशा विविध भाषा कानावर पडत होत्या….बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो….तेथील हिरवळ भर उन्हात मनाला थंडावा तर देत होतीच….तृप्तही करत होती.

रस्त्याने प्रवासात आदिवासी जीवनशैलीतील अनेक महत्त्वपूर्ण बाबी नजरेस पडत होत्या…धावपळीत मनाच्या कप्प्यांत त्या साठविण्याचे काम करत होतो…..मध्येच करण माहिती सांगून प्रत्येक बाब अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करत होता. रस्त्याने परत येत असताना मोडगाव (सावरपाडा) येथे एका आदिवासी मुलाने वाचनालय सुरु केले असल्याची माहिती समजली. त्याचे नाव नरेश भगत आहे असे समजल्याने आम्ही लगेच त्याच्या घराची चौकशी सुरु केली…नव्हे त्याच्या घरी घेवून जाण्यास एक व्यक्ती तयार झाला…..घराकडे जाणारा रस्ता तसा कच्चाच….खडी मोठ्या प्रमाणात….त्यामुळे कसरत करावी लागत होती. सावरपाडा, असे एक आदिवासी गाव, जेथे वाहतुक व्यवस्था तशी तुरळक, संदेशवहनाच्या साधनांचा अभाव, वर्तमानपत्र, पुस्तके मिळणे महाकठीणच……जिथे राहण्यासाठी कुडाची घरे……असे असतानाही एक आदिवासी मुलगा पुढाकार घेउन गावात वाचनालय सुरु करतो…..ही खरी तर आम्हा उच्च शिक्षित तरुणांसाठी चपराक आहे……फेसबुक, ट्विटर किंवा इतर सोशल नेटवर्कद्वारे सामाजिक कार्याची हवा करतो……पण प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी आम्हाला गावात यायला रस्त्यातिल खड्डे अड़चन ठरतात……चला असे उपक्रम प्रत्येक गावात राबवुया असा निर्धार मनात जागृत झाला…….नाही प्रत्यक्ष पण आपल्याकडील जुनी मासिके, पुस्तके रद्दीत विकण्याऐवजी आपण ही पुस्तके अशा तरुणांच्या हवाली करून आदिवासी तरुणांचा या कामातील उत्साह द्विगुणित करुया असे अनेक विचार मला खरे तर लाजवत होते. नरेश कुठेतरी कामाला गेला असल्याने आम्हाला तो भेटला नाही. त्याच्या आईला सांगून वाचनालय उघडायला सांगितले. आतमध्ये वर्तमानपत्रातील महत्त्वाचे लेख, कविता व्यवस्थित मोठ्या कागदावर चिकटावून कुडाच्या भिंतीला अडकवलेले होते. काही पुस्तके तिथे व्यवस्थित मांडणीत ठेवलेली होती. वाचनालयात आलेल्यांना बसण्यासाठी सोफा ठेवलेला होता…कदाचित हा त्याला लग्न समारंभात मिळालेला असावा. मोलमजुरी करणारा तरुण गावात मोफत वाचनालय व संस्कृती संवर्धन केंद्र सुरु करतो हा विचारच किती प्रेरणादायी आहे याची कल्पना मला करवत नव्हती. आदिवासी संस्कृतीची…त्यात खासकरून वारली चित्रकलेची काही पुस्तके होती….आदिवासी आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा फोटो, तारपा वाद्य अशा विविध बाबी पाहून मन भारावले होते…..काही आठवणी म्हणून आईच्या परवानगीने क्लिक घेतले व अगदी प्रसन्न मनाने महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला प्रवास सुरु केला.

सोमवार असल्याने महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविकांची गर्दी दिसून येत होती….गडाचा सुळका लांबूनच मला खुणावत होता….गड म्हटले कि रक्त सळसळ करत होते….त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेचा विचार न करता आम्ही गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. वाटेत अनेक भाविक भेटत होते….लिंबाचा रस घेतल्याने काहीसा उत्साह वाढवून मी पुढे पळत होतो….करण झाडांची माहिती करून देत होता. माहिती ऐकत असतानाच मी वाटेतील साग, खैर, सिसव, बाभुळ आदी मौल्यवान वनस्पती व विविध औषधी वनस्पती….तसेच काही फुलांचे क्लिक करत होतो. जसजसा गडाचा माथा जवळ येत होता….तसतसा वनसंपदेचा थरार मनाला अधिक खुणावत होता. परंतु येथे येणा-या भाविकांनी केलेला कचरा पाहून मन मात्र सुन्न होत होते…..काहीसा राग येत होता….जर हा कचरा असाच वाढत राहिला तर येत्या काळात कदाचित हि वनसंपदा यात गाडली जाईल कि काय याची भीती माझ्या मनात निर्माण झाली….सह्याद्री स्वच्छतेसारखे अभियान या ठिकाणीसुद्धा राबविण्याचा विचार मनात एक वेगळे विचारचक्र फिरवत होता.
उंचावरून भोवतालचा विस्तारित असा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर मनात भरत होता. परंतु मध्येच वणव्याने उजाड झालेले डोंगर पाहून मन खिन्न झाले होते. पूर्वीच्या काळी भागात मोठय़ा प्रमाणात जंगले होती..परंतु आज काही भागात दाट तर काही भागात आता विरळ झाडे झाली आहेत. त्याची कारणे बहुदा वणवा आणि वृक्षतोड हीच असावीत असा विचार मनात आला. असे असूनही काही प्रमाणात अद्याप सदर भागात जंगली प्राणी व पक्षीतसेच काही औषधी गुणधर्माच्या वनस्पतीही पाहायला मिळत होत्या. त्यांची माहितीही जमेल तशी करण करून देत होता. परंतु जंगलातील ससा, हरिण, रानडुक्कर, मोर आदी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील काही हौशी शिकारी रात्रीच्या वेळी व दिवसा जंगलात आग लावतात हे त्याने सांगितले आणि मला येथील वनसंपदेची कीव यायला लागली. पावसाळ्यानंतर जंगलातील पालापाचोळा सुकून जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी लावलेली आग (वणवा) सर्व बाजुने वेगाने वाढत जातो. त्यामुळे तीन ते चार दिवस ही आग सतत पेटत राहते. त्यामुळे जंगलातील वन्यजीव व वनस्पती आगीत खाक होवून जातात.

जंगलात साग, खैर, सिसव, बाभुळ आदी मौल्यवान वनस्पती व विविध औषधी वनस्पती नष्ट होतात. त्याचप्रमाणे छोटे मोठे प्राणी त्यांची वस्तीस्थाने आगीत नष्ट होतात तर पक्ष्यांची घरटी व पिल्लेही आगीत होरपळून जातात. त्यामुळे जंगलातील वनस्पती, प्राणी दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असून भविष्यात जंगले बोडकी (उघडी) पडण्याची भीती आहे करणने माझ्याकडे बोलून दाखविली. दरम्यान सदर बाब गंभीर असतानाही वनविभागाचे अधिकारी सदर घटनेकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस आग लावण्याच्या घटना वाढत आहेत याचा प्रचंड राग मनात निर्माण झाला होता…हा राग अधिक वाढण्याअगोदर मी महालक्ष्मी मंदिराच्या दरवाजासमोर पोहचलो होतो…..मनातील सर्व विचार बाजूला ठेवून पायातील चपला बाहेर काढून मी मंदिरात प्रवेश केला….अहाहा….बाहेर अगदी तप्त वातावरण असताना इथे मात्र जन्माचा गारवा मनाला देवी प्रसन्न झाल्याचे समाधान देत होता. येथील देवीचे मंदिर अगदीच कातळकड्यामध्ये उभारलेले आहे. मंदिरात महालक्ष्मी मातेसोबत इतरही देव-देवतांच्या मूर्ती बसविण्यात आलेल्या आहेत. देवीसमोर परिसरातील निसर्ग संपदा टिकविण्याचे बळ आम्हास देवो….तसेच लोकांना निसर्गराजीबाबत चांगली बुद्धी देवो अशी प्रार्थना करून मी बाहेर पडलो. दगडाच्या कपारीमध्येही काही देवी वसलेल्या आहेत…त्यांचे दर्शन घेण्यासाठी अगदी लहान मुलांप्रमाणे रांगत पुढे जावे लागते…..परंतु फेरा पूर्ण झाल्यानंतर एकच समाधान लाभले. बाहेर आल्यानंतर माकडांची मस्त पाहून आम्ही काहीसा घाईने परतीचा प्रवास सुरु केला.

प्रवास सुरु असताना मध्येच संपत ठाणकर, एक आदिवासी शिक्षक, कवी, लेखक, वारली चित्रकार; यांना भेटण्याचा विचार मनात डोकावला……लगेच आम्ही त्यांच्या गावाची विचारपूस करत त्यांच्या गावात जावून पोहचलो. दुरून त्यांचे घर काही दिसत नव्हते….फक्त चीक्कुची, आंब्याची वनराई दिसत होती…त्या झाडांमध्ये शोधत आम्ही त्यांच्या घरासमोर जावून पोहचलो….एका कवी मनाच्या माणसाचे घर कसे असावे याचे उत्तम उदाहरण आम्हाला येथे पाहायला मिळाले…अगदीच मन प्रसन्न झाले. परंतु हि प्रसन्नता अधिक काळ टिकली नाही….कारण आतून आलेल्या मुलीने सांगितले कि सर बाहेर गेलेले आहेत आणि संध्याकाळी उशिराने परत येणार आहेत….न राहवून एक फोन केला…व मी अहमदनगरहून खास आपणास भेटायला आलो आहे असे सांगितले आणि सर म्हटले फक्त दहा मिनिटे थांबा मी येतो लगेच……सर येण्याची वाट आम्हाला पहावी लागणार होती….परंतु निसर्गसौंदर्याचा खजिना येथे असल्याने आमचा वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

संपत ठाणकर सर, अगदीच साधी राहणी…लहानमुलांना शिकवत असल्याने बोलण्यात काळजीचा सूर…परंतु कमी शब्दात अनोखा प्राचीन आदिवासी इतिहास ते प्रकट करत होते….शास्त्र आणि त्यातून निर्माण झालेली शस्त्रे दोन्हीही आदिवासी जीवनशैलीसाठी पूर्वीपासून कशी घातक ठरली याचे अनुभवविश्व त्यांनी आमच्यासमोर उभे केले. महत्त्वाचे काम असतानाही ते आम्हाला वेळ देत होते हा त्यांच्या मनाचा मोठेपणा मला भावला होता. त्यांना मी मध्येच न राहवून त्यांच्या ‘धिक्कार’ पुस्तकाविषयी मी वाचले असे सांगितले आणि लगेच त्यांनी धिक्कार सारखी अनेक पुस्तके आदिवासी तरुणांनी लिहिण्याची गरज आहे असे मत मांडले. आपल्या पुस्तकाचा परिचय करून देत असताना परकीय सत्तांनी…..खासकरून ख्रिश्चन लोकांनी आदिवासी संस्कृतीवर कसा हल्ला चढवलेला आहे याची उद्विग्नता ते आपल्या शब्दात मांडत होते. या बाबी आपण सहन करत गेलो तर उद्या आपली संस्कृती हि त्यांची होईल आणि मग आपल्याला त्यांच्या संस्कृतीवर जगावे लागेल….म्हणजेच त्यावेळेस आदिवासींचा नाश सुरु झाला असेल हे नक्की….त्यांच्या बोलण्यातील हि अगतिकता माझ्या मनावर साताजन्माचे घाव करत होती. काही तरी क्रांतिकारी केले पाहिजे हा अट्टहास मनात निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनाही घाई असल्याने त्यांनी त्यांची काही पुस्तके आम्हाला भेट दिली. तसेच आम्ही खास मागणी करून आमच्या संग्रहासाठी त्यांचे धिक्कार, देव बोलला, कणसरी डूलं, देव बोलला भाग २, वारली चित्रकला, वारली हृदय अशी पुस्तके सोबत घेवून त्यांच्यासोबत अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो. रस्त्यात सरांनी आम्हाला चहा पाजला व ते करढन येथे बोहाडा पाहण्यासाठी गेले…आंम्ही त्यांना तिथे परत भेटू असे बोलून आमच्या मार्गाने पुढे प्रवास करू लागलो.

मोडगाव येथे काकांच्या घरी आलो तर सूर्य मावळतीकडे गेलेला होता…..आम्हाला खूप उशीर होणार असे सर्वजण म्हणत होते….परंतु दिवसभर काहीही खाल्लेले नसल्याने पोटात कावळे ओरडत होते. म्हणून काकुंना लवकर काही तरी खायला द्या असा आग्रह धरला….आमच्या दुपारच्या जेवणासाठी त्यांनी वरण-भात बनवला होता…परंतु आम्ही न आल्याने तो आम्हाला रेडी मिळाला होता…त्यामुळे काहीसा वेळ वाचणार होता. मग पटकन जेवण आटोपले….काका-काकुंचा निरोप घेतला….”मास्तर घराचे काम पूर्ण झाले कि परत या” असा सारखा आग्रह व्यक्त करत होते. मी सुद्धा हो ला हो देत होतो……आत्ता तसा अंधार पडला होता…म्हणून मी गाडीची लाईट सुरु केली…..आणि सर्वात भयंकर म्हणजे गाडीचा Upper लाईट उडाला म्हणजे बंद पडला होता…फक्त Dipper लाईट सुरु होता….आमचा प्रवास जव्हारच्या दिशेने म्हणजे खास नागमोडी वळणांचा जंगलातून जाणारा होता….आणि तो सुद्धा सुनसान….मनात काहीसे धस्स झाले….परंतु मनोमन देवाला धन्यवाद दिले कि चला एक तरी लाईट चालू ठेवला आहे नशीब…..नाही तर मग आमची खूपच मोठी अडचण झाली असती. Dipper च्या प्रकाशात लांबचा रस्ता आणि खासकरून वळणे दिसत नासल्याने गाडीचा वेग मंदावला होता…..प्रवासाचे अंतर खूप होते…मग मनात चलबिचल सुरु झाली होती…..करणने रस्ता ओळखीचा असल्याने गाडी चालविण्यास घेतली….थोडा वेग वाढला होता….परंतु वळणे अगदीच अवघड असल्याने वेगात जाण्याचा धोका मनात भीती निर्माण करत होता…..शेवटी कसरत करत आम्ही करढन या गावातील बोहाड्यामध्ये दाखल झालो…..प्रवासाच्या त्रासापेक्षा वेळेत पोहोचल्याचे समाधान अधिक होते.

बोहाडा म्हणजे आदिवासींसाठी एक उत्सवच असतो…परंतु याला एक सांस्कृतिक अंग आहे. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम घाट उतारावर राहणा-या लोकांचा लोकप्रिय उत्सव म्हणजे बोहडा होय. साजशृंगार करून हे लोक मनपूर्वक नाचण्यासाठी, नाटक खेळण्यासाठी यामध्ये सामील होतात.
‘बोहडा’ हा आदिवासी लोकांचा नृत्यनाट्य प्रकार होय. बोहडयाची प्रथा खूपच जुनी आहे. निरनिराळे मुखवटे घालून वाजत-गाजत गावात मिरवणे हे या नृत्यनाट्य प्रकाराचे स्वरूप असते. पूर्वी शिका-याला अंगावर वाघाचे कातडे घालून किंवा गावदेवतांना माणसाच्या रुपात आणून नाचविण्याची प्रथा प्रचलित होती. आजही काही भागात हि प्रथा आपणास आढळून येते. उदा. वीराचे सोंग, सुपल्या, गांवठाण्या, कमळजा देवीची ताटी, डूक-या, बळीराम, बनाईबावरी, चंदन हिरा इत्यादी.

बोहडा नृत्य सादर करताना लोक तोंडाला साजेसे मुखवटे घालतात. आज आदिवासींच्या नाच-गाण्यांमध्ये हिंदू संस्कृतीतील काही प्रथाही आपणास दिसून येतात. काही पौराणिक मुखवटेही आदिवासींच्या जुन्या मुखवट्यांबरोबर नाचू लागले आहेत. यात नारद, वाल्याकोळी, राम-रावणाचे युद्ध, वाली-सुग्रीवाची लढाई, भीम-बकासुर युद्ध, दशरथ-श्रावण बाळाची कथा, राम-त्राटिका युद्ध इत्यादींचा उल्लेख करता येईल. पारंपारिक दैवतांचे व विविध देवदानवांचे मुखवटे घालून आदिवासी परंपरेच्या संगीत, गीत आणि नृत्य माध्यमातून या सोंगांनी कलाकारांसह सादर केलेले हे नृत्यनाट्य साकार होते. या नाट्यामध्ये धार्मिक कथासूत्र गुंफलेले असते. सत्याचा जय व असत्याचा पराजय याला विशेष स्थान देवून कथा मांडलेली असते.
आदिवासी समाजावर सभोवतालच्या परिस्थितीचा फार मोठा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. त्यामुळे जमीनदार, दुकानदार, पुढारी, पुढारलेला समाज, गावचा मास्तर ह्यांचीही सोंगे नाचविण्याचा अभिनव प्रकार बोहडा नृत्यात प्रचलित झाला आहे.

सातपाड्याचा साबण्या शेट, संत्यावाणी(मारवाडी), लगण्या बामण, तात्या पंतोजी, घुटयाचोर, पाड्याचा खोत, डूक-या पाटील हि पात्रे बोहडा नृत्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आपण आढळून येतात. पूर्वीच्या काळी दोन ते चार महिने बोहडा नाचला जाई. परंतु अलीकडच्या काळात सात-आठ दिवसांतच बोहाडे साजरे होवू लागले आहेत. बोहडे सामान्यपणे चैत्र पौर्णिमेला सुरु होतात व पावसाळयापर्यंत चालतात.
बोहडा हि नृत्य परंपरा तशी फार जुनी आहे. गेली सुमारे २०० वर्षे जोपासल्या गेलेल्या नृत्यपरंपरेतील हा नाच आहे. बोहड्यात सुमारे १०० मुखवटे असतात. प्रत्येकाचे वजन साधारणतः १ ते १० किलोपर्यंत असते. यात काही वजनदार व मोठे मुखवटे असतात. अहिरावण, महिरावण, दुंदुभी, वेताळ, नृसिंह हे मुखवटे वजनदार असतात. रात्ररात्र चाललेल्या या कार्यक्रमाचा शेवट अखेरच्या दिवशी सूर्योदयसमयी करतात.

बोहाड्यासाठी खूपच गर्दी जमलेली होती….मी शांतपणे निरीक्षण करत होतो….प्रत्येक क्षण…हालचाल मनात साठवत होतो. एक खास वैशिष्ट्यपूर्ण बाब माझ्या निदर्शनास आली. ती म्हणजे यानिमित्त तरुण वयात आलेल्या मुला-मुलींना आपल्या पसंतीचा जीवनाचा साथीदार शोधण्याची संधी यानिमित्त मिळणार होती. म्हणून नटून थटून आलेले तरुण-तरुणी माझे लक्ष्य वेधून घेत होते. आपल्या मनाप्रमाणे योग्य तो साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य देणारी अशी हि महान संस्कृती म्हणून मला आदिवासी संस्कृतीचा अभिमान वाटत होता.आजच्या या ठिकाणी मला सर्वच चेहरे अनोळखी असल्याने माझा मुक्तसंचार होता. बिनधास्तपणे मी क्लिक करत होतो. अंधार असल्याने क्लिक करत असताना खूपच काळजी घ्यावी लागत होती. अनेक मुखवटे पाहिले…मन मात्र तृप्त होत नव्हते…..जल्लोष मात्र मनाला आदिवासी संस्कृतीच्या बाबतीत सर्वोच्च ठिकाणी घेवून जात होता….

रात्रीचे बारा वाजले असताना मी करणला आपल्याला निघायला हवे असे म्हटलो….त्याचा चेहरा थोडासा उदास दिसला…तसे माझेही मन परतीच्या प्रवासाला तयार होत नव्हते…परंतु सकाळी ७;३० ला शाळा आहे आणि मला शाळेत रजा टाकून इथे हा आनंद घेणे कदापि आवडणार नाही….म्हणून शेवटी आम्ही परतीचा प्रवास सुरु केला….लाईटची अडचण असल्याने काहीसा हळुवार प्रवास त्या जंगलातून होता….माणसांची नाही पण रातकिड्यांची सोबत आणि चांदण्यांची प्रेरणा सोबत होती. शेवटी क्षणभर झोप न घेता आम्ही रात्री तीन वाजता ठाण्याला करणच्या घरी पोहचलो….करणच्या आईने मसाला भात दिला…..आईंच्या हातचा मसालेभात म्हटल्यावर मग काय चांगलाच ताव मारला…..करणला माझ्याकडील फोटो त्याच्या संगणकात घ्यायचे होते म्हणून मी पंधरा-वीस मिनिट झोप घेवून बरोबर चार वाजता एकटाच कल्याणचा रस्ता विचारत विचारत आलो. कल्याणच्या पुढे निघालो…..आता एकटाच असल्याने अंधारात मात्र मन कसे झाले असेल सांगायलाच नको…..एका पंपावर पेट्रोल टाकून माळशेज घाटात बोगद्याजवळील मंदिराशेजारी न राहवून परत काही वेळ झोप काढली….झोप इतकी आली होती कि त्यापुढे कोणतीही भीती थारा धरत नव्हती….इतरवेळी कदाचित कोणी हजारो रुपये दिले असते तरी मी तिथे एकटा राहिलो नसतो…परंतु आज मला झोपेने मजबूर केले होते. शेवटी सकाळी ७ वाजता ओतूर गाठले…..फक्त तोंड धुतले आणि शाळेत अगदीच वेळेत हजर झालो…..कर्तव्यनिष्ठा जपली गेल्याने मला सदर भटकंती यशस्वी झाल्याचा अधिक आनंद झाला होता.
दोन दिवस…दोन रात्री…आणि आम्ही दोघे….खूप काही जगलो…..खूप काही फिरलो…हजारो किमीच्या प्रवासात….हजारो क्लिक्सच्या संगतीने हजारो जीवनेच्छा शब्दात कथन करणे तसे अवघडच…..काही संवेदनशील बाबी यात नमूद केलेल्या नाहीत. आपण त्यासाठी एकदा जावेच असा आग्रह…!!
क्रमशः

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.