माझी भटकंती
माझी सह्याद्रीची भटकंती करत असताना सह्याद्रीचे निसर्गत्व
प्रामाणिकपणे जपणा-या अनेक आदिवासी समाजबांधवांशी अगदी जवळून संपर्क आला. ठाणे
जिल्ह्यात भटकंती करत असताना प्रामुख्याने वारली, कातकरी, ठाकर, कोकणा व मल्हार
कोळी या जमातीतील आदिवासी बांधवांशी एका ताटात घरातल्यासारखे जेवण केले. यांच्या
संपर्कात आल्यानंतर घरापासून दूर असल्याचा कधी साधा विचारसुद्धा मनात आला नाही.
जव्हार दर्शन करत असताना तर अगदी रक्तातील नात्याच्या व्यक्तींप्रमाणे सर्वांना
आमचे स्वागत केले. तेव्हा मला सह्याद्रीच्या कातळकड्यांमध्ये आपले अस्तित्व
जपणा-या या बांधवांमध्ये माणुसकीचा झरा अविरतपणे खळखळ करत वाहताना दिसला. धुळे
जिल्ह्यात भिल्ल, कोकणा, मावची, पावरा, धानका व गावित
ह्या जमाती तर मला दुधापेक्षाही अधिक शुद्ध विचारांच्या वाटल्या. त्यांच्या मायेचा
गोडवा मी मनात साठवलाय.....त्यातूनच मला नवीन ध्येय गाठण्याची ऊर्जा मिळत आहे.
माझी मायभूमी अहमदनगर जिल्ह्यात भटकंती करत असताना महादेव कोळी व ठाकर या जमातींशी
तर माझा घरोबा निर्माण झाला आहे. अकोले तालुक्यातील निसर्गवैभवात तर मी कुठे हरवून
जातो हेच मला कळत नाही. रायगड जिल्ह्यातील ठाकर, कातकरी
बांधवांची सोबत तर कोकणवैभवाची साक्ष देणारी होती. अमरावतीमधील कोरकू
समाजबांधवांचे मनातील सौंदर्य हे तर येथील व्याघ्र प्रकल्पांपेक्षाही अधिक बहारदार
होते. यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम, गोंड व आंध
यांनी आपल्या बोलण्यातून येथील संत्रीपेक्षा गोड वाणीने आमचे आदरातिथ्य केले.
गडचिरोली व गडचिरोली जिल्ह्यात तसा अधिक संपर्क नाही आला....परंतु जी काही कमी
अधिक ठिकाणे बघण्याची संधी मिळाली त्यात गोंड, माडिया-गोंड, परधान व हलबा या जमातींचे राहणीमान जवळून बघितले. नक्षलवाद का
फोफावलाय या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना अनेक कटू सत्यांचा सामना करावा लागला.
एकंदरीत माझ्या भटकंतीत मी निसर्गवैभव, गडदुर्ग, इतिहास यांच्यासोबत आदिवासी लोकजीवन बारकाईने अनुभविले. यात एकाच
गोष्टीचे वाईट वाटले, ते म्हणजे सरकार
जंगली प्राणी, पशु यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे
करत असताना आदिवासी भूमिहीन होत असल्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. येथे जंगलातील
प्राण्यांच्या संरक्षणासाठी खूप सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु आज पर्यंत
ज्या आदिवासी बांधवांनी जंगलाचे संरक्षण केले त्यांना आज आपल्याच घरातून बेदखल
केले जात आहे. माणसाने निसर्गावर
‘विकास’ नावाचे जे
आक्रमण चालवले आहे, त्यातून आदिवासी
मात्र आपले अस्तित्व गमावून बसला आहे. कधी धरणांच्या नावाखाली, तर कधी अभयारण्याच्या नावाखाली त्याचे स्थलांतर केले गेले......योग्य
पुनर्वसन न केल्याने समाज पुरता जगण्यापासून पोरका झाला. सर्वसमावेशक विकास
नसेल, तर लोकशाहीला
काय अर्थ उरतो? विकास हवाच, पण तो काही
जणांना नागडे आणि भुकेकंगाल करून कशाला? सर्वांना
सन्मानाने जगण्यासाठी लागणा-या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. देशातल्या बहुसंख्य
जनतेची रोजीरोटी नैसर्गिक संसाधनांवर आणि या संसाधनांवर असलेल्या त्यांच्या
हक्कावर अवलंबून आहे. हे हक्क आणि संसाधने हिरावून घेतली तर हे लोक सुखाने कसे काय
जगू शकतील? आणि हे असे घडत असेल तर लोकशाही देशात नक्षलवाद
वाढला नाही तर नवल ते काय....!!!द्द्क्स3
0 comments :
Post a Comment