भव्य आदिवासी समाज मेळावा
खेतेवाडी, ता.अकोले,(नगर)
रविवार,
दि.25 ऑक्टो.2015.
🌿🌿
ज्या गावात एक प्राथमिक शाळा सोडली तर दूसरी कोणतीच सुविधा शासन व भूरटे पुढारी अज्जुन पोहोचवू शकले नाहीत.
रस्ते, वीज, पाणी या प्राथमिक गरजांची पूर्तता शासन करू न शकलेल्या 'खेतेवाडी' या गावात आजचा आदिवासी बांधव सुंदर जीवन सजवतोय.
ज्या गावात पावसाळ्यानंतर एक माहिन्यातच माहिलाच काय तर पुरुष व लहान मुले पिण्याचे पाणी अर्धा-एक किलोमीटर चालत जावून डोक्यावर वाहून आणतात अशा गावात रात्री 3 वाजता चहाचे फर्मान केल्यावर केवळ 10-15 मिनिटांत चहा मिळावा खरोखरच वंदन त्या गावातील आदिवासी बांधवांना व त्यांच्या पाहुणचाराला.
स्वतंत्र्यानंतर 68+ वर्षानंतर आजही आपले आदिवासी अस्तित्व जपून निसर्गाची पूजा करून शासन सुविधांवर अवलंबून न राहता निसर्गाच्या सानिध्यात डोंगरदऱ्यात दडलेले खेतेवाडी गावातील ग्रामस्थ व आयोजकांनी केलेला हा भव्य मेळावा म्हणजे पालतू पुढारी आणि निष्क्रिय शासनाला दिलेली सणसणीत चपराकच होती.
ग्रामस्थ, आयोजक व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आलेले आदिवासी कार्यकर्त्यांचे व त्यांच्या असाधारण कामगिरीचे कौतुक करावे तितके कमीच.
खेड्या-पाड्यात असे जाणीवजागृती मेळावे होणे आजच्या घडीला गरजेचे आणि आवश्यकच आहे. समाजऋण फेडण्यासाठी याहून वेगळा मार्ग नाही.
🔵 पेसा कायदा व वनकायद्याचे ग्रामप्रशासनात असणारे योगदान यांविषयी माहिती व मार्गदर्शन करताना डॉ.पऱ्हाडजी यांनी शासन व्यवस्था कशी दिशाभूल करत आहे हे उदाहराणांसह विशद केले. सरकार क्षुल्लक/मारक योजना राबवून स्वतःचिच पोळी भाजण्यात व्यस्त आहे. तसेच वनवासी, जंगली अशा शब्दांनी अदिवासींना हिनवून/नावे ठेवून देशाच्या मूळ मालकास हिनवण्याचे काम सरकार करत आहे, गावातील आदिवासी देवता, वाघबरस, गावदेवी, वाघोबा आदि देवतांना पूजून सर्वांनी आदिवासी अस्तित्व जपावे.असा मोलाचा संदेश दिला.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे एकट्या आदिवासीबरोबरच समुहाने विरोध व वेळप्रसंगी विद्रोह करावा आणि आपली आदिवासी एकता तसेच ताकत दाखवून देण्याची आज खरोखरच गरज आहे असेही या मेळाव्यात तमाम आदिवासी बांधवांस आवाहन केले.
अतिक्रमणाद्वारे स्वतःच्या गावातून गरीब+अशिक्षित आदिवासी कसा बेदखल होतो. याचे सुद्धा विविध उदाहराणांतून समञ्जसपणे मार्गदर्शन केले. हे सारे सांगत असताना जल-जमीन-जंगल यांचे खरे मालक आपणच आहोत वहिवाटेची, वडिलोपार्जित, पूर्वजांपासूनची ही आपली जमीन असून या संपत्तीचे वेळोवेळी रक्षण करा असाही संदेश दिला.
गावागावांत ग्रामपंचायतींनी पेसा लागू करा आम्ही निधि उपलब्ध करून देवू असे जरी शासन म्हणत असले तरी निधिद्वारे विकास कसा होऊ शकतो?
एका बाजूला पेसा लागु करून दुसऱ्या बाजूला 17 जमातींचे जात सर्वेक्षणाची भाषा करून आदिवासी जनतेची दिशाभूल करत आहे. जल-जमीन-जंगल यांवर ताबा करून शासन/सरकार अदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचे कारस्थान करायला लागले आहे, तसे न करता त्यांनी 'वनहक्क कायद्याची' प्रखर अंमलबजावणी करावी जेणेकरून माझा आदिवासी बांधवाला रोजगार्निर्मिती मिळेल असाही उलगडा केला .
आणि यासाठी खेड्यापाड्यात जनजागृती महत्वाची आहे.
🔵 आदिवासी लोकशाहिर मा.श्री.ढवळा ढेंगळे यांनी सदर मेळाव्यात पोवाड्याद्वारे सादर केलेला विचार समाजबांधणीसाठी बहुमोल ठरला. आजच्या पिढीला वडीलोपार्जित संस्कार जरी मोलाचे असले तरी त्यातून उलगडणारा इतर धार्मिक पगडा आदिवासी समाज्यास मारक आहे. खेड्यापाड्यात असे मेळावे होणे गरजेचे आहे.
खेतेवाडीतील या मेळाव्यामध्ये शाहीर ढेंगळा यांनी तरुणांच्या मनावर रूजेल असा विचार शाहीरी आवाजात तमाम उपस्थितांमध्ये रुजवला. आदिवासींची विटंबना करून रामायण-महाभारतातील पात्रांचे इतिहासकारांनी केलेले वर्णन आपल्या आदिवासी समाज्यास किती मारक आहे आणि यात आपला समाज कसा गुरफटत गेला आणि देव-तांडव कसे अंगवळणी पडत गेले ...? या सर्वांचे स्पष्टीकरण गाव-खेड्यात/परिसरात निरंतर नावारूपाला असणाऱ्या आदिवासी देव-देवतांच्या ओळखीतुन आणि विविध दाखल्यांतुन उदाहराणांसह केले. उपास्थित सर्व आदिवासी बांधवांना संबोधताना शाहीरांनी भारदस्त आवाजातील पोवाड्यांतून समाजवर्णन व रक्तरंजित आदिवासी क्रांतिकारकांच्या साहसकथा सुरेख रेखाटल्या.
त्यांचा आदर्श, वारसा व विचार आदिवासी मनांत सतत तेवत रहावेत यासाठी तरुणाईला एक संदेशच दिला.
🔵 हरहुन्नरी कलाकार श्री.ठका बाबा गांगड
पंचक्रोशीतील हरहुन्नरी कलाकार, राज्य-राष्ट्र स्तरावर ख्याती मिळवून विविध ठिकाणच्या व्यासपीठांवर आदिवासी ठसा उमटवणारे 85+ वयातील ठकाबाबा गांगड यांच्यातील कलाकाराने तमाम उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी स्वतःमध्ये जपलेला दुर्मिळ कलेचा झरा रसिक प्रेक्षकांमध्ये खुला करून कालाकाराला वयाची अट नसते असा संदेश दिला.
Inttelectual Property जी जतन करण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी त्यांना कुठलेच कोचिंग क्लास, ट्रेनिंग,शिक्षण, टुशन्सची आवश्यकता भासलि नाही.
निसर्ग हाच शिक्षक आणि तारक असे ब्रीद जपणारे वयोव्रूद्ध ठकाबाबा यांनी सादर केलेली मिमिक्री/ अदाकारी, अनेक पशुपक्षांचे हुबेहुब आवाज, शरीर ठेवणीतील लाजवाब अदाकारी, शरीर लवचिकतेतून योगासने, स्वतःचा चेहरा हावभाव व ताण आणून बदलणे यांसारखे सारेच कलाविष्कार सादर करताना इतक्या वयातही त्यांनी जपलेला कलेचा ध्यास अबाधित ठेवून तरुणांना लाजवेल असा अदाकारिचा प्रत्यय या खेतेवाडीच्या मेळाव्यात दिला. त्या कलातपस्वीचे अभिनंदन करावे तेव्हडे कमीच. आयोजकांनी त्यांना दिलेली संधी खरोखरच कार्यक्रमाची शोभा वाढवून गेली. त्यांना इतरत्रही विविध कार्यक्रमात व्यासपीठ मिळावे, जेणेकरुन आदिवासी हरहुन्नरी कलाकार व त्याची कला जीवंत राहील.
🔵 विविध स्तरांवर ख्याती मिळवलेल्या लेझीमपथक व ढोलपथक व कलाकारांनी या मेळाव्यात अनोखा नजराणा पेश करून उपस्थितांची दाद व शाबासकी मिळवली. team work कसे असावे? या बाबतीचा जणू त्यांनी संदेशच दिला.
🔹लेझीम पथक
🔹ढोल पथक व
🔹शाहीरांचे एकलव्य कलापथक
हे मनोरंजनातून एक वेगळी शिकवण देण्यात जराही उणे पडले नाहीत वा मागे हटले नाहीत. त्यांचे हे योगदान अनन्य साधारण असे होते.
त्यांच्या या मेळाव्यातील सक्रीय सहभागाला व समाजप्रेरणेला आयोजकांचे लाभलेले सहकार्य खूपच प्रशंसनीय ऐसे होते.
🔵 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातूनआलेल्या शेकडो सक्रीय आदिवासी कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यातून तसेच आयोजक व आदिवासी मित्रांच्या तळमळीतून आणि खेतेवाडी-सातेवाडी ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून सदर भव्य आदिवासी मेळावा रविवार, दि.25 ऑक्टोबर, 2015 रोजी मौजे खेतेवाडी (ता.अकोले,जि.नगर) येथे संपन्न झाला.
या आदिवासी मेळाव्याच्या आठवणी सर्व उपस्थितांच्या स्मरणात चीरकाल तेवत राहतील यात कणभरही शंका नाही.
जय जय जय आदिवासी.
-दिनेश भोईर
(रेवणशिष्य)🌿
वाडा, जि.पालघर.
0 comments :
Post a Comment