आंबेडकर

----: दैनिक मराठा आचार्य अत्रे:-----
गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली पर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे.....!!!
अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा' तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा '7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख'.
"सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतात ल्या अस्पृश्याचां आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानु शतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते."
"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते.
आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय.
आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय.
आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.
आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय.
आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय."
"महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध" हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.
पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले.
कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले.
बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या."
... हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा "बंडखोर गुरूंचे" आंबेडकर हे सच्चे चेले होते."
"जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्या प्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमा विरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले."
"हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरां ची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली."
"जो तुमचा धर्म मला कुत्र्या-मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत."
"धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील.!"
"आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते."
"धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर' मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही ..! "
"हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली."
"अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावना प्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशां विरुद्ध गांधीजीं नी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही."
तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्या साठी म्हणून "अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघा" ची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा' वर सही केली."
"... 'गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा' 'आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा' ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते."
'पुणे करारा' वर आंबेडकरांनी सही करून गांधीजीं चे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण, ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले."
"आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!"
"नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापली कडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच 'घटना समितीत'अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय."
काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.
'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर 'भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार' व्हावेत हा काय योगायोग आहे?
"घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही."
"आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती."
"पण, दुर्दैव भारताचे ..! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ..! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला 'समतेचा, दयेचा आणि शांतीचा' संदेश देणाऱ्या त्या 'परम कारुणिक बुद्धाला' शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.
"आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता.  ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत."
"महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले."
"त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे."
"अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर 'भगवान बुद्धा' च्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली."
"मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणारे होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही."
'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते.
"आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते."
"महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे."
"त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो."
(मराठा : 7-12-1956) बाबासहेबाना जे आजुनही समजू शकले नाही त्याना हां लेख नक्की पाठवा---------

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.