जयपाल सिंग मुंडा (3 जानेवारी 1903- 20 मार्च 1970)
जयपाल सिंग मुंडा यांचा जन्म 3 जानेवारी 1903 रोजी झाला. ते भारतीय आदिवासी आणि झारखंड आंदोलनाचे प्रमुख नेते होते. ते एक प्रसिद्ध राजकारणी, पत्रकार, लेखक, संपादक, शिक्षणतज्ञ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1925 मध्ये 'ऑक्सफोर्ड ब्लू' हा हॉकीचा पुरस्कार मिळवणारे एकमात्र आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. ते कॅप्टन असताना 1928 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले होते.
छोटा नागपूर (आजचे झारखंड) मधील 'मुंडा' या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला होता. मिशनरीजच्या लोकांमुळे त्यांना ऑक्सफोर्डमधील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये शिकण्याची त्यांना संधी मिळाली. अभ्यासात ते खूप हुशार होते. त्याचबरोबर हॉकीमध्येही त्यांचे विशेष प्राविण्य होते. वाद विवाद स्पर्धानमध्येही त्यांनी नाव कमावले होते.
भारतीय सिव्हिल सर्व्हिस (ICS) मध्ये त्यांची निवड झाली होती. ICS चं प्रशिक्षण त्यांना अर्धवट सोडावं लागलं कारण त्यांना 1928 मध्ये हॉकी संघाचा कर्णधार म्हणून ओलीम्पिकसाठी नेदरलँडला जावे लागले. ती हीच टीम होती ज्यांनी सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला होता. परदेशातून सुवर्ण पदक जिंकून आल्यानंतर त्याना एक वर्षाचे ICS चे प्रशिक्षण पुन्हा घेण्यास सांगितले. त्यांनी अर्धवट प्रशिक्षण पूर्ण करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यांना पूर्ण प्रशिक्षण पुन्हा करण्यास सांगितल्याने त्यांनी त्यास नकार दिला.
बिहारमधील शिक्षण व्यवस्थेत आपले योगदान देण्यासाठी त्यावेळचे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी पत्र लिहिले. परंतु दुर्दैवाने त्यांना कोणताही सकारात्मक पाठिंबा मिळाला नाही. 1938 मध्ये त्यांनी पटना व रांची येथील दौरा केला. या दरम्यान त्यांना आदिवासींच्या संघर्षमयी जीवनाची ओळख झाली. यातून आदिवासींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
जानेवारी 1939 मध्ये त्यांनी आदिवासी महासभेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्याच नेतृत्वात बिहारमधून झारखंड या वेगळ्या राज्याची मागणी पुढे आली.
आदिवासी महासभेचे अध्यक्ष पद घेतल्यानंतर ते आदिवासी अधिकारांचा आवाज बनले. संविधान सभेत आपल्या वक्तृत्वशैलीचा पुरेपूर वापर करत आदिवासी अधिकारांची महत्त्वपूर्ण बाजू मांडली. भारतीय संविधानात 'आदिवासी' हा शब्द प्रयोग आदिवासींसाठी वापरण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु दुर्दैवाने त्याकाळातील आदिवासी द्वेष्ट्या लोकांनी आपले राजकीय वजन वापरून आदिवासी शब्दाऐवजी 'अनुसूचित जमाती' असा शब्द प्रयोग केला. याचा परिणाम म्हणून आजही आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस लोकांची घुसखोरी सुरूच आहे.
- राजू ठोकळ
#आझादी_के_दिवाने
#जागर_इतिहासाचा
0 comments :
Post a Comment