'जव्हार संस्कृतीची शोधयात्रा' हे डॉ. हेमंत बळवंत मुकणे यांचे पुस्तक हातात पडले आणि मन क्षणात इतिहासात तल्लीन झाले.
जव्हार, डहाणू आणि पालघर हा भटकंतीचा आवडता प्रांत असल्याने त्यातील इतिहास समजून घेणे हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असल्याने पुस्तकातील घटक बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि इतिहास यात स्थानिक जाती जमातींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. इथला भूगोल आणि इतिहास हा या मावळ्यांच्या बलिदानाने नटलेला आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. याच सत्याच्या अनुषंगाने हे पुस्तक जव्हार संस्थानचा इतिहास सहजपणे उलगडण्याचा महत्तम प्रयास करते.
जव्हार संस्थानचे संस्थापक ' जायबा मुकणे ' हे ठाणे जिल्ह्यातील तसेच महादेव कोळी जमातीतील पहिले संस्थापक राजे असल्याने त्यांचा इतिहास चांगल्याप्रकारे मांडण्याचा प्रयत्न लेखकाने पुस्तकातून केलेला आहे.
आज जव्हार म्हटलं की इथली पाणी टंचाई, बेरोजगारी, गरिबी, शेतीची भयावह अवस्था, आरोग्य सुविधांचा तुटवडा, शिक्षणाची अनास्था, कुपोषण, कुमारी माता अशा अनेक समस्यांचा एक चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. सद्य परिस्थितीला बाजूला सारून जव्हारच्या इतिहासाला पुस्तकरूपाने शब्दांकित करणे खरं तर मोठं आव्हान होतं. परंतु लेखकाने तत्कालिन अतिप्राचीन राज्याचा इतिहास मोठ्या ताकदीने पुराव्यासह लिहून मोठेच साहित्यिक क्रांतीकारी पाऊल टाकले आहे.
सदर पुस्तक भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्व इत्यादी विषयांचा सर्वसमावेशक व समन्वय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांना मार्गदर्शक व स्फूर्तिदायी ठरेल असे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमाकांत भोईर यांना वाटते. तीच भावना पुस्तक अभ्यासल्यानंतर माझ्याही मनात निर्माण झाली ही ताकद या पुस्तकाची आहे.
इतिहासाच्या अभ्यासात स्थानिक इतिहास हा देखील महत्त्वाचा असतो हे आपल्या संशोधनातून पटवून देण्याचे काम लेखकाने मोठ्या ताकदीने केले आहे. डॉ.हेमंत मुकणे यांनी विविध अंगांनी जव्हार संस्थानचा, तेथील उत्सवांचा, संस्कृतीचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. स्थानिक इतिहासाला एक विशेष महत्त्व असते. चळवळीत काम करताना आम्ही नेहमीच आदिवासी इतिहास शोधण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. या पुस्तकाने आमचे काम अधिक सोपे व गतिमान केले आहे. आमच्या जिव्हाळ्याचा इतिहास हा या पुस्तकाचा गाभा असल्याने विशेष आनंद पुस्तक वाचताना होत होता.
पुस्तक माझ्यासाठी जास्त औत्सुक्य निर्माण करते कारण यात ज्या जायबा मुकणे यांच्या ऐतिहासिक कार्याचा व त्यांच्या पश्चात 632 वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आलेला आहे, ते मुकणे पूर्वीचे जायबा पोपेरे हे अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावचे आणि हे गाव माझ्या गावाच्या वेशीवर असल्याने ती आत्मीयता माझ्या मनात आपसूक निर्माण होणे नैसर्गिक होते.
भारतातील पहिल्या सर्कशीची सुरुवात करणारे विष्णुपंत छत्रे हे काळ जव्हार संस्थानात घोडदळ सांभाळण्याचे काम करत होते. त्यांचा नामोल्लेख म्हणजे या पुस्तकाने वैशिष्ट्येपूर्ण घटनांची नोंद घेतलेली आहे याची जाणीव होते. जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांच्या मदतीने व मार्गदर्शनाने महादेव कोळी समाजाने शिक्षण प्रसारक संघाची स्थापना केली व समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. त्याचाच परिपाक म्हणून आज महादेव कोळी जमातीत शिक्षणाची टक्केवारी तुलनेने अधिक असल्याचे आपणास दिसून येते. परिणामी आदिवासींच्या शिक्षणातील बदलाचं पहिलं क्रांतिकारी पाऊल त्यांनी टाकल्याचे या पुस्तकाच्या रूपाने समजून येते. यामुळे समाजात विलक्षण परिवर्तन घडून आल्याचे दिसून येते.
हिज हायनेस फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज जव्हार संस्थान व हर हायनेस प्रियवंदा श्रीमंत सकल सौभाग्यसंपन्न महाराणी यांना इंग्लंडच्या बादशहाकडून 'हिज हायनेस' व 'हर हायनेस' हा बहुमानाचा किताब मिळाला. यावरून हा लोकराजा होता हे आपल्याला हे पुस्तक वाचून ध्यानात येते. संस्थानातील नागरिक ही आपली लेकरं आहेत आणि त्यांचा उध्दार हेच आपले परमध्येय व धर्म आहे याची जाणीव त्यांना असल्याची माहिती या पुस्तकामुळे समोर येते.
संस्थानच्या इतिहासात सहजपणा, सरलता व सखोलपणा असल्याची जाणीव पुस्तकामुळे आपणास होते. जव्हार संस्थानच्या तत्कालीन राजांच्या उद्यमशीलता व त्यासंबंधीची त्यांची दूरदृष्टी आपणास यातून अंतर्मुख होण्यास भाग पाडते.
जव्हार सारख्या भागात निसर्गाची कुठलीही अनुकूलता नसताना पोटतिडकीने संस्थान प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होते. महाराजांनी भाताच्या - भगरीच्या व तेलघाण्याच्या गिरण्या, बॉबीन फॅक्टरी, पेपर मिल, सॉ मिल, खळीचा कारखाना, चुन्याचा कारखाना असे अनेक उद्योगधंदे स्थापन करून त्यांना चालना दिली. इतकेच नव्हे तर प्रेमा बंदराची स्थापना, को - ऑपरेटिव्ह बँका, वाचनालये, दवाखाना, शाळा इत्यादी विकासात्मक कामे देखील केली. लेखकाने अथक परिश्रम घेऊन या सर्व घटनांचा ऐतिहासिक लेखाजोखा मांडला आहे. जव्हार संस्थानच्या कागदपत्रांची न्यायनिष्ट दृष्टीने मांडणी करण्याचा लेखकाचा प्रयत्न उत्तम आहे.
जव्हार राजघराण्याच्या पिढ्यांचा उपलब्ध इतिहास अधोरेखित केल्याने माहितीचा ऐतिहासिक खजिना या पुस्तकात अनुभवयास मिळतो. हे लेखन करताना त्यांनी अनेक ऐतिहासिक इंग्रजी व मराठी, पेशवेकालीन,पोर्तुगीज लिखित संदर्भ वापरूप पुस्तक वास्तवाने सिद्ध केले, यात दुमत ते नाही. पुस्तकाला वा:डमयीन दृष्टीने न पाहता ते ऐतिहासिक दृष्टीने पाहणे उचित आहे. त्यांनी जव्हार संस्थानची राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, महसूल, पोलिस प्रशासन, बाजार प्रणाली, पाणी व्यस्थापन, गावे आणि शहर विकास योजना, हॉस्पिटल, गलिच्छ वस्ती, सुधार योजना, विविध जातीधर्माच्या लोकांना समान दृष्टीने वागणूक, बेघरांना मोफत घरे बांधून देणे,अस्पृश्यता निवारण, जनकल्याण योजना बरोबर त्यांनी कला, साहित्य,नाट्यमंडळे, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, दारूबंदी, धान्य एकाधिकार योजना राबवून दुष्काळाच्या काळात रयतेला उपाशी राहू दिले नाही. विशेष म्हणजे दुष्काळाच्या काळात पालामोडी,योजना,रोजगार योजना आणि कर्जमाफी करणारे जव्हार संस्थान देशातील पहिले संस्थान म्हणून या राज्याकडे पाहिले जाते. आपल्या संस्थानातील शेतकरी गरीब आहे याची जाणीव ठेवून त्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्याचे कार्य राजांनी पार पाडले.
आदिवासी संस्कृती ही महिला प्रधान संस्कृती आहे. त्या दृष्टिकोनातून बघितले तर जव्हार संस्थांनच्या राजघराण्यातील अनेक महिला राणीसाहेबांचा राज्यकारभार तर डोळ्यात भरणारा आहे. दुसऱ्या महायुद्धात यशवंतराव महाराज हे युद्धात गुंतले असतांना 'करवाळ पड्याच्या'जळीत कांडातील नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांना घरे बांधून देण्याचे महत्तम कार्य 'प्रिवंदा राणी साहेबांनी' केले त्यास तोड नाही. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेचे शोषण करणाऱ्या सावकार, व्यापारी यांच्या वेळीच मुसक्या आवळून महागाईला चाप बसविला हे आजच्या राजकर्त्यांच्या देखील डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे. आपल्याला आत्मचिंतन करण्यास निश्चितपणे ही जव्हार संस्थानची कार्यकिर्द भाग पाडील एव्हढे मात्र खरे....
महाराणी मोहना, महाराणी सगुणाबाई, महाराणी राजसाबाई, राणी साहेब चंदा, गोपिकाबाई, आनंदी बाई, लक्ष्मीबाई, म्हाळसाबई ते शेवटच्या राणीसाहेब प्रियवंदा यांनी राजपुत्रांच्या अज्ञानपणात केलेले कार्य फारच उठून दिसते.
एकूणच जव्हार संस्थनाचा इतिहास, त्यातील धार्मिक स्थळे, किल्ले, शाळा, सामाजिक सुधारणा यांचे अतिशय सुंदर असे लेखन करून डॉ.हेमंत मुकणे यांनी जव्हारच्या राज्याचे पुनःश्च सुवर्णाक्षरांनी लेखन केले आहे. यानिमित्ताने पुस्तक कमालीचे वाचनीय तर आहेच शिवाय परिशिष्ट्ये, राजघरण्याची रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे, पुस्तकाची छपाई आर्ट पेपरवर केलेली आहे, तसेच अहवाल संदर्भ साहित्य सूची दिली आहे. म्हणून ज्यांना खऱ्या अर्थाने जव्हारच्या इतिहासाचे लेखन व सामाजिक राजकीय संदर्भ शोधायचे असतील, त्यांना हे पुस्तक मैलाचा दगड म्हणून मार्गदर्शन करीत राहील, राजासारखी समष्टदृष्टी ठेवून!
जव्हारच्या आजच्या वर्तमानात आपणास अनंत समस्या दिसून येतात. त्यात यंत्रणांची उदासीनता व प्रशासनाचे योजना राबवताना आलेले अपयश यामुळे येथील जनतेला भोगाव्या लागणाऱ्या यातना पाहताना जे अतीव दुःख होते. त्यावर मात करण्यासाठीची मानसिकता तयार करायची असेल तर या मातीतला इतिहास जागवला पाहिजे....तो जपला पाहिजे. यादृष्टीने आपल्या हातात या पुस्तकरुपाने एक मोठे ऐतिहासिक शास्ररुपी शस्त्र लेखकाने दिले आहे. त्याचा वापर आजच्या वर्तमानात कसा करायचा हा प्रश्न अर्थात येथील राज्यकर्त्यांचा आहे. परंतु जनतेने या स्मृती जागवून जर योग्य लढा उभा केला, तर राज्यकर्त्यांना सामाजिक भूमिका घेणे भाग पडेल यात मात्र शंकाच नाही.
''जव्हार संस्कृतीची शोधयात्रा"
लेखक: हेमंत बळवंत मुकणे
पृष्ठे-199 + राजघराण्याची अनेक रंगीत छायाचीत्रे
आवृत्ती 21 डिसेंम्बर 2017
किंमत-रु.599
पुस्तकाची छपाई व कागदाची गुणवत्ता व आकार बघता किंमत नगण्य आहे.
लेखक: मोबा- 9421625656 / 9226377049
- राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment