जव्हार संस्थान काही गैरसमज व तथ्ये...
जव्हार संस्थानातील मुकणे हे राजघराणे होते. त्यामुळे ते क्षत्रिय राजवंशी कुळातील असून त्यांचा आदिवासी असण्याशी काहीही सबंध नाही अशी चुकीची माहिती सोशल मीडियात पसरलेली आहे. त्यासाठी खालील काही तथ्ये समजून घेणे आवश्यक आहे.
काही लोक जाणीवपूर्वक किंवा गैरसमजातून जायबा मुकणे किंवा या राजघराण्याचा उल्लेख करताना ' कोळी राजा ' असा करतात. कोळी या शब्दाशी अनेक जाती व कुळ जोडले गेले असल्याने यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. यामुळे आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला गेला असून तो यथार्थपणे जगासमोर मांडणे आवश्यक आहे.
जव्हार संस्थानचे मूळ पुरुष जायबा मुकणे यांचे मूळ गाव अकोले तालुक्यातील कोंभाळणे हे आहे. त्यांच्या मुळगावी त्यांचे आडनाव 'पोपेरे' असे होते. बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे याच गावच्या आहेत. पोपेरे हे आडनाव आदिवासी जमातीतील आहे. जायबा इगतपुरी तालुक्यातील मुकणे या गावी वास्तव्यास आल्यानंतर त्यांना मुकणे हे आडनाव जोडले गेले. काहींना शहा/ शाह या नावांची शंका येते. याबाबत सांगायचे झाले तर शाह ही पदवी आहे, ते नाव / आडनाव नाही.
जायबा मुकणे यांचा मोठा मुलगा नेमशाह मुकणे याने 22 किल्ले जिंकून जव्हार संस्थानचा प्रदेश वाढवला म्हणून 5 जून 1343 रोजी दिल्ली दरबारातील सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने नेमशहाला 'शाह' ही पदवी देऊन त्याचा 'राजा' म्हणून स्वीकार केला.
पूर्वीच्या काळी राज्य हे मनगटाच्या व बुध्दीच्या जोरावर उभे केले जात होते. त्यामुळे राज्य निर्माण करणारा हा कोणत्या कुळातील आहे याच्याशी काडीमात्र संबंध नाही. आदिवासींची अनेक राज्ये देशात होती व परकीय सत्तेला उलथून टाकण्यासाठी आदिवासींनी प्रचंड लढा दिलेला आहे. त्यामूळे नेमशहा यास राजा म्हणून स्वीकारत असताना त्याच्या पराक्रमाचा विचार होणे आवश्यक आहे. यावर त्याच्या कुळाचा काही एक प्रभाव दिसून येत नाही.
जव्हार संस्थानच्या आता काही रोटी बेटी व्यवहारांबाबत खालील काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
तुळाजीराव मुकुंदराव भांगरे हे पतंगशहा चौथे यांचे जावई होते. त्यांच्या पत्नीचे नाव चंपाबाईसाहेब होते. जव्हार संस्थानाकडून या जोडप्याला उदरनिर्वाहासाठी वार्षिक 950 रुपये रक्कम मिळत होती.
श्रीमंतराजे मार्तंडराव मल्हारराव मुकणे उर्फ भाऊसाहेब (पाचवा) व महाराणी सगुणाबाई मुकणे यांची मुलगी चांगुणाबाई हीचा विवाह 6 मार्च 1926 रोजी फुलवडे, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे येथील जमीनदार सावळाराम नंदकर यांचे ज्येष्ठ पुत्र अनंतराव सावळाराम नंदकर यांच्याशी झाला. हे जोडपे लग्नानंतर राजघराण्यासोबत राहत होते. दोघांनी राजघराण्यापासून वेगळे राहायला सुरुवात केल्यापासून दोघांसाठी वार्षिक 1,300 रुपये रक्कम मंजूर केली होती. हेच अनंतराव नंदकर जव्हार संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. चांगुणाबाई नंदकर यांनी देखील निवडणुका लढवलेल्या होत्या.
राजेशाही अस्तित्वात असताना राजघराण्यातील रोटी बेटी व्यवहार प्रामुख्याने राज घराण्याबरोबरच केला जात असे. जव्हार संस्थान देखील याला अपवाद नाही. परंतु असे असले तरी जव्हार संस्थानातील काही राजकन्यांचे विवाह राजघराण्याबाहेरील आदिवासी कुटुंबात झालेले आहेत. अनेकदा जव्हारचे राजे क्षत्रिय असून ते आदिवासी नाहीत असा अपप्रचार करताना राजघराण्यातील विवाह संबंधांचे दाखले दिले जातात. त्यामुळे वरील रोटी बेटी व्यवहार बघता त्यांचे आपल्या जमातीतील लोकांशी सबंध होते हे आपण समजून घेतले पाहिजे.
- राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment