जायबा महाराज यांची मानाची बंदी तलवार
दसऱ्याच्या निमित्ताने बंदी तलवारची शस्त्रपूजा केली जाते. राजगुरु श्री सदानंद महाराज यांनी १३०६ साली जायबा महाराजांना बंदी तलवार दिली होती. सदर तलवारीचा वापर करून अनेक लढाया जिंकण्याचे काम जायबा मुकणे महाराज यांनी केले होते. एका आदिवासी लढवय्या पुरुषाने आपल्या या बंदी तलवारीच्या मदतीने स्वतःचे आदिवासी राज्य म्हणजेच 'जव्हार संस्थान' निर्माण केले हे अतिशय क्रांतिकारी पाऊल होते.
तलवार हे समोरासमोरच्या लढाईत वापरायचे शस्त्र आहे. हे इतिहासकाळापासूनचे सर्वात प्रसिद्ध असे शस्त्र आहे. तलवार हे राजघराण्यातील लोकांचे भुषण होते. जव्हार संस्थानच्या राजमुद्रेत देखील याच तलवारीचा उल्लेख आहे. जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले. जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते. जव्हार संस्थानचे भूषण म्हणून बंदी तलवारीची ओळख इतिहासात नमूद आहे.
सदर तलवारीचे वजन, आकार, लांबी यावरून त्या काळात जायबा मुकणे महाराज यांच्या शरीराची बांधणी, उंची व ताकद यांचा अभ्यास मांडता येऊ शकतो. एका हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून लढाई करण्यासाठी किती कसब लागत असेल या कौशल्यांचाही आपण अंदाज करू शकतो. त्या काळात जव्हार परिसरात मुळात घोड्यावर बसून व पाठीवर ढाल, तलवार घेऊन प्रवास करणे अतिशय जिकिरीचे काम होते. या भागात घनदाट असे जंगल असल्याने या जंगलातून घोड्यावर बसून प्रवास करण्याचे कौशल्य जायबा महाराजांनी आत्मसात केलेले होते. परकीय आक्रमणाासून जव्हार संस्थानचे संरक्षण करण्यात या कौशल्याचा फायदा त्यांना व त्यांच्या नंतर गादीवर बसलेल्या महाराजांना झालेला आहे.
मुकणे ( मूळ गाव कोंभाळणे, ता.अकोले, जि.अहमदनगर) गावातील जयदेवराव (जायबाजीराजे) हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जायबाजी जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगडला जव्हार संस्थानची राजधानी करण्यात आली. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. तेव्हाच जव्हार साम्राज्यची उभारणी झाली. इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जायबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे महादेवाचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी कोळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून 'जव्हार' असे नाव रूढ झाले असावे असे म्हटले जाते.
जव्हार संस्थानच्या स्थापनेच्या महत्त्वपूर्ण कार्यात भूमिका बजावून आपली ओळख सिद्ध करणाऱ्या या 717 वर्षांपूर्वीच्या या बंदी तलवारीची यावर्षी जव्हार येथे दसऱ्याला मोठ्या सन्मानाने पुजा केली गेली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. सदर तलवार जव्हार येथे आणण्यासाठी जव्हार संस्थानचे वंशज महेंद्रसिंह मुकणे महाराज यांनी पुढाकार घेतला होता. इतका जुन्या काळातील वारसा लोकांना पाहायला मिळाल्याने एक वेगळेच समाधान लोकांना वाटले.
© Raajoo Thokal
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment