जव्हार संस्थान व ग्रंथालयाचा सुवर्णमय वारसा...
ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.
जव्हार शहरात आजही भव्य संस्थानकालीन ग्रंथालय आहे.
या वाचनालयात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक पुस्तकप्रेमी येथे येऊन ज्ञानात भर घालतात. ज्ञानाच्या निर्मितीत, संशोधनात जव्हार नेहमी अग्रेसर राहिलेले आहे. आर्थिक कारणास्तव जेव्हा मुंबई सरकारला जी. एस. सरदेसाई यांच्या देखरेखीखाली पेशव्यांचा मराठी इतिहास पुनर्लेखन कार्य बंद करण्याची वेळ आली असताना जव्हार संस्थानचे तत्कालीन राजे यांनी या कार्यास मार्च 1932 रोजी 250 रुपयांची मदत केलेली होती. सदर घटनेवरून साहित्य निर्मिती व ग्रंथालय याबाबत जव्हार संस्थान जागृत होते हे दिसून येते. श्रीमंत महाराज यशवंत महाराज मुकणे हे स्वतः जव्हार संस्थानकालीन ग्रंथालयाचे आजीव सभासद होते. या ठिकाणी श्रीमंत महाराज यशवंतराव मुकणे यांचा ग्रंथालयासमोरील फोटो या संस्कृतीचा वारसा आपणास दाखवून देतो.
- राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment